फार थोडे आहे आता चालायचे !

फार थोडे आहे आता चालायाचे

मन का हे काचे काळजीने ?

पिकले पान का कधी करी खंत !

नाचत गुंगत गळे खाली

फुलवीती मागे वृक्षाचे वैभव

कोवळे पल्लव वासंतिक

जीवनसृष्टीचा माझ्या ये शिशीर

आता का उशीर प्रयाणाला ?

चालवाया वंश हळूच हासत

येताहे वसंत मागाहून


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

शिशिराचा मनी मानू नका राग

नका व्यर्थ करू झाडांनो, ओरड

झाली पानझड सुरु आता

पिकल्या पानांचा धरू नका लोभ

फुटणार कोंब नवे पुन्हा

शिशिराचा मनी मानू नका राग

फुलवाया बाग येतसे तो

कृश-वुद्ध झाला, नका करू खंत

तारुण्य-वसंत आणील तो

नवीन पालवी, नवीन मोहर

कोकीळ सुस्वर गाईल तो


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आपुले मन

आपुले मन तू मोठे करशील

होईल मंगल सर्व काही

हासून उमले फूळ कळीतून

सुंदर प्रसन्न वेल दिसे

निर्मळ वाहतो झरा थुईथुई

दरीखोरे होई शोभिवंत

खुला करी कंठ कोकीळ गाऊन

जादूने भारून टाकी राई

का रे धुमसशी मनी मूढ प्राण्या,

दे रे कुढेपणा टाकून तो


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मोट हाकलतो एक

येहेरींत दोन मोटा

दोन्हींमधीं पानी एक

आडोयाले कना, चाक

दोन्हींमधीं गती एक

दोन्ही नाडा-समदूर

दोन्हींमधीं झीज एक

दोन्ही बैलाचं ओढणं

दोन्हींमधीं ओढ एक

उतरनी-चढनीचे

नांव दोन धाव एक

मोट हाकलतो एक

जीव पोसतो कितीक?


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

कुणी शिकविले

"कुणी शिकविले रचाया कवने?"

पुसती लाडाने बाळे माझी

"सोनुल्यांनो, होतो तुमच्यासारखा

आईचा लाडका बाळ मीही

मांडीवर मला निजवून आई

जात्यावर गाई गोड ओव्या

ऐकून प्रेमळ, प्रासादिक काव्य

फुलून ह्रदय गेले माझे

मनाशी लागलो करू गुणगुण

म्हणता 'कवन' त्याला तुम्ही!"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

लुटा हो लुटा

नाही माझे धन कधी झाले कमी

कुणबी असा मी भाग्यशाली

अलुत्यांनो या हो, बलुत्यांनो या हो,

लुटा हो लुटा हो माझे खळे !

देवाजीने दिली मला ही देणगी

सदा ही कणगी भरलेली

सुखाने आपुला घेऊन जा घास

कमी नाही रास व्हायची ही

नंतर मी माझी खाईन भाकर

देईन ढेकर समाधाने


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

खरा जो कुणबी

मृगाचा पडला पाऊस पहिला

वापसा जाहला पेरणीला

खरा जो कुणबी साधितो ही घात

झाकुनीया प्रेत म्हातारीचे

धरूनी पाभर करितो पेरणी

करी मागाहूनी क्रियाकर्म

जीवनात माझ्या आज आली घात

मनसोक्त गात बैसणार

कसाहि कुणाचा येवो अडथळा

नाही माझा गळा थांबणार


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या