अभागिनी आई

का गे रडतेस आता धायधाय !

आणि हाय हाय म्हणतेस !

शेफारले पोर तुझे खोडकर

झाले अनावर आता तुला

नको म्हणताही कोठाराची किल्ली

त्याचे हाती दिली भोळेपणे

गुप्त तिथे होती संदूक ठेविली

अखेर लागली त्याचे हाती

अभागिनी आई, पुरा झाला घात

तुझ्या नशिबात दुःख आता !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

गोसाई

तठे बसला गोसाई

धुनी पेटयी शेतांत

करे 'बं बं भोलानाथ'

चिम्‌टा घीसन हातांत

मोठा गोसाइ यवगी

त्याच्या पाशीं रे इलम

राहे रानांत एकटा

बसे ओढत चिलम

अरे, गोसायाच्यापाशीं

जड्याबुट्या व्हत्या फार

देये लोकाले औसद

रोग पयी जाये पार

अशा औसदाच्यासाठीं

येती लोकाच्या झुंबडी

पन कोन्हाबी पासून

कधीं घेयेना कवडी

चार झाडाले बांधल्या

व्हत्या त्याच्या चार गाई

पेये गाईचज दूध

पोटामधीं दूज नहीं

एक व्हती रे ढवयी

एक व्हती रे कपीली

एक व्हती रे काबरी

आन एक व्हती लाली

सर्व्या गायीमधीं व्हती

गाय कपीली लाडकी

मोठ गुनी जनावर

देवगायीच्या सारकी

व्हती चरत बांदाले

खात गवत चालली

रोप कशाचं दिसलं

त्याले खायासाठीं गेली

रोप वडाचं दिसलं

भूत बोले त्याच्यांतून

'नींघ वढाय कुठली !

व्हय चालती आठून'

आला राग कपीलाले

मालकाच्याकडे गेली

शिंग हालवत पाहे

माटी उखरूं लागली

तिचा मालक गोसाई

सम्दं कांहीं उमजला

'कोन आज कपीलाले

टोचीसनी रे बोलला?'

तसा गेला बांधावर

रोप हाललं हाललं

त्याच्यातून तेच भूत

जसं बोललं बोललं

टाके गोसाई मंतर

भूत पयीसनी गेलं

तसं वडाच्या रोपाचं

तठी जैर्‍ही रोप झालं

आरे जहरी बोल्याची

अशी लागे त्याले आंच

रोप वाढलं वाढल

झाड झालं जहराचं

मोठ्ठ झाड जहाराचं

गोसायाच्या शेतामधीं

ढोरढाकर त्याखाले

फिरकती ना रे कधीं

काय झाडाचं या नांव ?

नहीं मालूम कोन्हाले

आरे कशाचं हे झाड

पुसा गोसाई बोवाले !


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

आरंभ उद्यान, शेवट स्मशान

आरंभ उद्यान, शेवट स्मशान

आमुचे जीवन असे आहे !

सुंदर, आनंदी निसर्ग स्वतंत्र

त्याला आम्ही यंत्र केले आहे

एकाच आईची बाळे आम्ही सारी

परी हाडवैरी झालो आहो

जे जे अकृत्रिम, करावे कृत्रिम-

आमुचे अंतिम ध्येय आहे

आदमईव्हाच्या वारसाकडून

अपेक्षा याहून दुजी काय !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आता भोवतात तुमचे ते शाप

मीच गुन्हेगार आहे दलितांनो,

अहो मजुरांनो, कुणब्यांनो

मीच तुम्हा नित्य उपाशी ठेविले

आणि निजवीले धुळीमध्ये

मीच माझ्यासाठी तुम्हा राबवीले

तुम्हा नागवीले सर्वस्वी मी

तुमचे संसार उध्वस्त मी केले

तुम्हाला लावीले देशोधडी

आता भोवतात तुमचे ते शाप

असे घोर पाप माझे आहे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

यंत्रयुगात या आमुचे जीवित

यंत्रयुगात या आमुचे जीवित

कळसूत्री यंत्र झाले आहे

सृष्टीचे सुंदर पाहाया स्वरूप

राहिला हुरूप आम्हा नाही

रम्य अस्तोदय, इंद्रचाप- शोभा

पाहावया मुभा आम्ही नाही

पाखरांची गाणी, निर्झराची शीळ

ऐकावया वेळ आम्हा नाही

निसर्गाशी गोष्टी बोलाया निवांत

क्षणाची उसंत आम्हा नाही


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अपूर्वच यंत्रा, तुझी जादुगिरी

अपूर्वच यंत्रा, तुझी जादुगिरी

तुझी कारागिरी काय वानू !

हवेत पांगल्या गायनलहरी

घेतोस अंतरी आकळूनी

कळ फिरविता पुन्हा ऐकवीसी

संतुष्ट करिसी चित्त माझे

मानव-मतीचा अद्‍भुत विलास

विश्व आसपास बोले, भासे

निगूढ संगीत गाती ग्रहलोक

येईल का बोल ऐकू मला?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

असे आम्ही झालो आमुचे गुलाम

इथे गवतात उमलले फूल

परी कोणा भूल पडे त्याची !

इथे झुडपात खग गाई गान

कोणे एके कान देईनीया !

इथे-डोंगरात थुईथुई ओढा-

वाहे, त्याची क्रीडा कोण पाहे !

इथे माळावर सुटते झुळूक

कोण तिचे सुख अनुभवी !

असे आम्ही झालो आमुचे गुलाम

राहिला न राम जीवनी या !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या