फार मोठी आम्हा लागलीसे भूक

फार मोठी आम्हा लागलीसे भूक

आता नाही भूक राहणार !

यापुढे आमचा रोज क्रांतिदिन

नाही हीनदीन राहणार

पेटविली आम्ही एकदा मशाल

आता सर्वकाल पेटणार

प्रचंड आमचा सुरु झाला यज्ञ

त्याला कोण विघ्न आणणार ?

चाळीस कोटींचे घोर आक्रंदन

कोण समाधान करणार ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आक्रोश, किंकाळ्या ऐकल्या मी !

मंगल मंगल उजळे प्रभात

कुजबुजे वात कानी माझ्या

उगवत्या सूर्या कराया वंदन

फिरवी वदन पूर्वेला मी

काय मी पाहिले ? काय मी ऐकिले ?

मस्तक जाहले सुन्न माझे

नव्हता तो रम्य अरुणाचा राग

होती आग आग पेटलेली

नव्हत्या प्रेमळ प्रसन्न भूपाळ्या

आक्रोश, किंकाळ्या ऐकल्या मी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आता हवे बंड करावया

केवळ आमुची केली समजूत

चांद आरशात दाखवीला

पुरा वीट आला, नको ती याचना

केवळ वंचना-मृगजळ

पुरे झाल्या थापा, होते ते थोतांड

आता हवे बंड करावया

माघारी आणाया हरपले श्रेय

आता हवे दिव्य करावया

उचलीला विडा, लाविला भंडार

आता हा निर्धार शेवटला !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कोटि कोटि आम्ही उभे अंधारात

नाही का आमुचे संपले ग्रहण ?

कधी मोक्षक्षण यावयाचा

क्षितिजी लागले कधीचे नयन

कुठे तो अरुण ? कुठे उषा ?

येणार येणार म्हणती उदया

कधी सूर्यराया येणार तो ?

तेजस्वी तयाच्या प्रकाशाचे कडे

कधी पूर्वेकडे दिसणार ?

कोटि कोटि आम्ही उभे अंधारात

कधी काळरात जाणार ही ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

हिरीताचं देनं घेनं

नको लागूं जीवा, सदा मतलबापाठीं

हिरीताचं देनं घेनं नही पोटासाठीं

उभे शेतामधी पिकं

ऊन वारा खात खात

तरसती 'कव्हां जाऊं

देवा, भुकेल्या पोटांत'

पेटवा रे चुल्हा आता, मांडा थाटवाटी

नको लागूं सदा जीवा, मतलबापाठी

पाहीसनी रे लोकाचे

यवहार खोटे नाटे

तव्हां बोरी बाभयीच्या

आले आंगावर कांटे

राखोयीच्यासाठीं झाल्या शेताले कुपाटी

नको लागूं जीवा, आतां मतलबापाठी

किती भरला कनगा

भरल्यानं होतो रिता

हिरीताचं देनं घेनं

नहीं डाडोराकरतां

गेली देही निंघीसनी नांव रे शेवटीं

नको लागूं जीवा, सदा मतलबापाठीं


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

परदेशातून प्रगट हो चंद्रा

परदेशातून प्रगट हो चंद्रा

तुझी हास्यमुद्रा दिसो आम्हा

अवचित मागे जाहलास गुप्त

करुनी स्तिमित सर्व जगा

अतिपूर्वेकडे तुझा हो उदय

पावली विस्मय पश्चिमा ही

स्वदेशाचे मुख कराया उज्ज्वळ

तारक-मंडळ निर्भिले तू

औषधिपते, दे दिव्य संजीवनी

करी रे जननी व्याधिमुक्त


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अरे कुलांगारा, करंटया कारटया,

अरे कुलांगारा, करंटया कारटया,

घातक कुलटा बुद्धि तुझी

जन्म दिला, केले लालन पालन

संस्कृति-शिक्षण दिले तुला

राहिली न तुला आईची ओळख

तुझे पापमुख पाहू नये

भोगिली अपार तिने कष्टदशा

आता तिच्या नाशा टपलास !

खांडोळी कराया उगारिशी हात

अरे तुझा घात ठरलेला !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या