महात्मा - भयाण काळोखी एक कृश मूर्ति

भयाण काळोखी एक कृश मूर्ति

घेऊनि पणती हिंडताहे

सापडलेले होते भूमीवरी रक्त

करीत पुनीत पादस्पर्शे

जागोजाग होती लागलेली आग

म्हणे, ’फुलबाग फुलवीन’

पशु होते तिथे घालीत तांडव

’करीन मानव त्यांना’, म्हणे

शुक्रतारा कोणी किंवा देवदूत

पूर्वेला उदित झाला आहे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

महात्मा - पाउलापुरता नाही हा प्रकाश

सांगायाचे होते सांगून टाकले

जावो ते ऐकले वा न जावो

कधीचा घेऊन दीप अंधारात

आहे मी चालत पुढे पुढे

येणारे येतील शोधीत ही वाट

आहे मी एकटा नाहीतरी

पाउलापुरता नाही हा प्रकाश

दूरचे भविष्य माझ्यापुढे

म्हणोत कोणी हे अरण्यरुदन

माझे समाधान चिरंतन !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

महात्मा

अजून उराशी धरिली मी आस

मजला प्रकाश दिसणार

काळोखच आहे मागेपुढे दाट

त्यातूनही वाट काढणार

पदोपदी काटे, पदोपदी ठेच

प्रभु गोमटेच करणार

दुःखाचेच घोट प्यालो आजवरी

सुख कधीतरी लाभणार

चाललाच आहे माझा नित्य शोध

होईल तो बोध होवो केव्हा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

महात्मा - उत्तम मानव वसुंधरेचा हा

मानवधर्माची पाजळून ज्योत

ईशाचा प्रेषित गेला स्वर्गा

अहिंसाशांतीचा सत्याग्रही वीर

त्यजूनी शरीर गेला स्वर्गा

दिव्य वज्रे जगा अर्पूनि अस्थींची

महात्मा दधीचि गेला स्वर्गा

उत्तम मानव वसुंधरेचा हा

त्यजुनीया देहा गेला स्वर्गा

हिंदजननीचा थोर हा सुपुत्र

गात ’राम-मंत्र’ गेला स्वर्गा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

महात्मा

मारेकर्‍या, गेला व्यर्थ तुझा वार

नाही पारावर फजीतीला

अमर तो जाशी ज्याला मारायाला

मेल्याहूनी मेला झालास तू

काळे तुझे तोंड लोपे काळोखात

त्याला प्रकाशात जागा नाही

ज्यावरी येशूला केली खिळेठोक

धर्माचे प्रतीक झाला क्रूस

युगायुगाचा तो जाहला महात्मा

धनी तू दुरात्मा रौरवाचा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

हरे राम ! किती पाहिला मी अंत !

"पिस्तुलाने मला दिला हा इशारा

विश्रांति शरीरा, हवी तुला

दरिद्री दलित झाला मायदेश

दिले तुला क्लेश त्याचेसाठी

सत्याग्रहास्तव तुला बंदिवास

सोशीले उपास निर्वाणीचे

मायबहिणींची पुसाया आसवे

तुला हिंडवीले आगीतून

हरे राम ! किती पाहिला मी अंत !

जा रे पंचत्वात विलीन हो"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

स्वातंत्र्य म्हणजे ईश्वराचे दान

अरे हिंदपुत्रा, सांग कशासाठी

तुझी ही हाकाटी रात्रंदिस ?

कोणता तू केला आजवरी त्याग

जीवनाचा याग मातेसाठी ?

तुझा हा कलह, क्षुद्र तुझा मोह

तुझा मातृद्रोह ख्यात जगी

काय ही पायीच्या तोडतील बेडया ?

कल्पना ही वेडया सोड खुळी

स्वातंत्र्य म्हणजे ईश्वराचे दान

याचकाची दीन भिक्षा नोहे


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या