तुझी का रे घाई माझ्यामागे ?

परतीरी उभा राहूनी तू हाका

एकसारखा का मारितोस ?

अडथळा होतो मला सदाकदा

लक्ष माझे द्विधा करितोस

अद्यापहि माझे काम झाले नाही

तुझी का रे घाई माझ्यामागे ?

कामकाज माझे पूर्ण झाल्यावर

नाही क्षणभर थांबणार !

थांब थोडा वेळ, करितो विनंती

तुला काकूळती येऊनि मी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

तुझ्या गावचा मी इमानी पाटील

सार्‍या मंडळींना माझा रामराम

चावडीचे काम सुरु करु

आपुली रक्कम देऊनीया टाका

थकबाकी नका ठेवू कुणी

कुलकर्णी, काढा हिशेबाच्या वह्या

जमाखर्च लिहा बिनचूक

वेसकरा, भरी कचेरीत पट्टी

घेऊनि पावती परत ये

तुझ्या गावचा मी इमानी पाटील

देवा, त्या कोठील भीडभाड !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

देव आसपास आहे तुझ्या !

पुढे पुढे आता असेच जायाचे

मागे न यायाचे परतुनी

चुटकीसरशी आणि एक दिन

व्हायाचे विलीन अनंतात !

मागे वळूनीया पाउलांच्या खुणा

का रे पुन्हा पुन्हा पाहतोस ?

का रे दचकुनी लागता चाहूल

पुढले पाऊल टाकितोस ?

अरे माझ्या जीवा, ठेव हा विश्वास

देव आसपास आहे तुझ्या !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

देवा, माझे पाप नको मानू हीन

कमळाला जन्म देणार्‍या चिखला,

कस्तूरि तुजला मानितो मी

जन्म घे कोळशा, हिरा तुझ्या पोटीं

तुझे गुण कोटी पारखी मी

कोण म्हणे दासी, देवी तू पवित्र

उदरी विदुर जन्मे तुझ्या

कान्होपात्रे अगे, गणिकेच्या मुली,

तुझी मी माउली वन्द्य मानी

देवा, माझे पाप नको मानू हीन

फुलव त्यातून गुणवल्ली


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

सर्व हे नश्वर, शाश्वत ईश्वर

जायाचे जग हे असेच यापुढे

उगाच बापुडे मन कुढे

यायची जायची तीच तीच दुःखे

तीच तीच सुखे पुन्हा पुन्हा

तीच ती वादळे, तेच ते भूकंप

तेच ते प्रकोप प्रळयाचे

तीच तीच युद्धे, तीच तीच क्रांति

केवळ आवृत्ति मागल्याची

सर्व हे नश्वर, शाश्वत ईश्वर

तोच मना स्मर निरंतर


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अपूर्णच ग्रंथ माझा राहो !

पौर्णिमेच्या चंद्रा, पुरे हा उत्सव

आता तुला क्षय लागणार

फुललेल्या फुला, हौस पुरे झाली

गळशील खाली कोमेजुनी

डोंगर चढूनी आलास तू थेट

आता कडेलोट ठरलेला !

उगाच आणखी जीवनाचा फुगा

फुगविशी फुका, फुटेल ना !

पूर्ण व्हायचे न मला भगवन्त,

अपूर्णच ग्रंथ माझा राहो !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कळो वा न कळो तुझे ते गुपित

पाखरे करिती गोड कुजबुज

काय हितगुज चाले त्यांचे !

भ्रमर फुलांशी करितो गुंजन

कोणते कूजन चाले त्याचे

वारा घुमघुमे वनराईमाजी

काय चाले त्याची कानगोष्ट !

लेकराच्या कानी कुजबुजे माय

त्याचा अर्थ काय तीच जाणे

कळो वा न कळो तुझे ते गुपित

सांग तू कानात देवा, माझ्या


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या