उत्कंठा !

ते पुरे करी नटणे थटणे

ये निघून तू लवकर सजणे

असेल वेणी तव विस्कटली

कंचुकिची वा गाठहि सुटली

भीड नको धरु तरिही कसली

असशील तशी ये तू सजणे

ते पुरे करी नटणे थटणे

त्या हिरवळल्या पथिकेमधुनी

येतेस कशी चंचल चरणी !

मोहनमाळेमधील सारे

तुटून पडतिल मणी टपोरे

पैंजणिची गळतील घुंगरे

तरि फिकिर नको तुजला रमणी

येतेस कशी चंचल चरणी !

बघ मेघ दाटले हे गगनी

असशील तशी येअ तू निघुनी

सोसाटयाचा वारा सुटला

नदितीराहुन बलाकमाला

भये भरारा उडून गेल्या

ही गुरे जवळ गोठा करिती

बघ मेघ दाटले हे वरती !

घेशील दिवा तू पाजळुनी

परि मालवेल तो फडफडुनी

सुंदर तव हे विशाल डोळे

तयात न कळे काजळ भरले

दिसती या मेघांहुनि काळे

घेशील दिवा तू पाजळुनी

जाईल परी फडफड विझुनी

ते पुरे करी नटणे थटणे

ये निघून तू लवकर सजणे

तशीच अपुरी ती फुलमाळा

राहू दे, तिज गुंपायाला

वेळ कुणाला ? या अवकळा-

बघ मेघ दाटले हे गगनी

एकेक घडी जाते निघुनी !

ते पुरे करी नटणे थटणे

ये निघून तू लवकर सजणे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

पुष्पांचा गजरा

पुष्पांचा गजरा विशीर्ण मजला वाटेवरी आढळे

त्याची खिन्न विपन्न पाहुन दशा, त्याला करी घेतले

होता येत सुवास त्यास अजुनी, गेला जरी कोमुन

काले जाय निघून यौवन परी मागे उरे सद‌गुण

कोणाचा गजरा ? प्रमत्त तरुणी-वेणीतुनी हा पडे ?

किंवा होउन प्रेमभंग युवती याला झुगारुन दे ?

शृंगारास्तव भामिनीस गजरा आणी तिचा वल्लभ

त्याने काढुनि टाकिला निज करे, की होय हा निष्प्रभ !

आता मागिल सर्व वैभव तुझे स्थानच्युता ओसरे !

बाला कोण तुला धरुन हृदयी चुंबील हुंगील रे !

कृष्ण, स्निग्ध, सुगंधयुक्त विपुला त्या केशपाशावरी

डौलाने मिरवेन हासत, अशी आशा न आता धरी

घेई मानुनि तू तथापि गजर्‍या चित्ती समाधान हे

की एका कवितेत भूषित मला केले कवीने स्वये !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

जकातीच्या नाक्याचे रहस्य !

"कोणिकडे जाशी स्वारा, दिसशी का घाईत ?"
"जकातिचे नाके आहे त्या आंबेराईत !"

बिजलीपरि चमकुन गेला ---घोडेस्वार
नवल अहो, हां हां म्हणता झाला नजरेपार !

जकातिचे नाके आहे त्या आंबेराईत
बहारास आली होती दो जीवांची प्रीत

ऐका तर गोष्टीला त्या झालि वर्षे वीस
स्वार अजुनि तेथे दिसतो अवकाळ्या रात्रीस

जकातिचे नाके जळके आज दिसे ओसाड
घोटाळुनि वारा घुमवी काय बरे पडसाद !

म्हातारा नाकेवाला मल्हारी शेलार
त्याची ती उपवर कन्या कल्याणी सुकुमार !

मोहिमेस निघता तेथे स्वार करी मुक्काम
कल्याणी झाली त्याच्या जीवाचे आराम !

मोहरली अंबेराई, सरता झाला माघ
बहारास आला त्यांच्या प्रीतीचा फुलबाग

"मनहरणी, शीतळ तुझिया स्वरुपाचा आल्हाद
अमृताचा धारा ढाळी जणु पुनवेचा चांद

आंब्याचा मोहर तैशी कांति तुझ्या देहास
जाईचे फूल तसा तव मंद सुगंधी श्वास

कल्याणी, पाहुनि तुजला फुलतो माझा प्राण
दे हाती हात तुझा तो, कर माझे कल्याण !

या आंबेराईची तु वनराणी सुकुमार
कल्याणी, सांग कधी ग तू माझी होणार ?"

"आणभाक वाहुनि कथिते, तुम्हि माझे सरदार
प्रीत तुम्हांवरिती जडली, तुम्हि भारी दिलदार

नाहि जरी बाबांच्या हे मर्जीला येणार
म्हणतातच, ’पेंढार्‍याची बाइल का होणार ?’

पंचकुळी देशमुखांचे तुमचे हो घरदार
नाहि परी बाबांच्या हे मर्जीला येणार !"

कोण बरे फेकित आला घोडा हा भरधाव ?
जकातिच्या नाक्यापुढले दचकुन गेले राव !

"चैतपुनव खंडोबाची, ऐका हो शेलार
ध्यानि धरा लुटुनी तुमची जकात मी नेणार"

आंब्याच्या खोडामध्ये घुसला तो खंजीर
बेलगाम निघुनी गेला---गेला तो हंबीर !

पुनव करी राईवरती चांदीची खैरात
जकातिच्या नाक्याकडली लख्ख उजळली वाट

सोंग जसे लळितामधले यावे उडवित राळ
धुरोळ्यात भडकुन उठला तो टेंभ्यांचा जाळ

ओरडला गढिवरला तो टेहेळ्या झुंझार
’सावध व्हा, पेंढार्‍यांचा आला हो सरदार !’

वाघापरि गर्जत आला, "येळकोट-मल्हार !
रामराम अमुचा घ्या हो मल्हारी शेलार !

पारखून घ्या तर आता हिरा आणखी काच ! "
आणि सुरु झाला नंग्या समशेरींचा नाच

"कल्याणी पेंढार्‍याची बाइल का होणार !"
काय असे डोळे फाडुनि बघता हो शेलार ?

"कल्याणी नेली’ एकच झाला हाहाकार
पाठलाग होऊन सुटले स्वारामागे स्वार

स्वाराच्या पाठित घुसला अवचित तो खंजीर
विव्हळला; परि नाही तो अडखळला खंबीर !

तसाच तो दौडत गेला विजयाच्या धुंदीत
तसाच तो दौडत गेला मृत्यूच्या खिंडीत

"जकात ही लुटिली ज्याने प्रीतीची बिनमोल
जीवाचे द्यावे लागे मोल," बोलला बोल

’कल्याणी जातो !’ सोडी शेवटला हुंकार
कोसळला घोडयावरुनी धरणीवरती स्वार !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

वेळ नदीच्या पुलावर

घटिकाभर मोटर पुलाजवळ थांबली
ती अजून घटिका स्मरणी मम राहिली

किति श्रावणसंध्या उन्हात पिवळ्या खुले !
गगनात पसरले मेघखंड रंगले

क्षितिजावर पडले इंद्रधनूचे कडे
चम्‌चमति तृणावर नीलपाचुचे खडे

सृष्टिचे रुप रमणीय दृष्टिला पडे
आनंद अहो, आनंद भरे चहुकडे !

नुकतीच जिची का बाल्यदशा संपली
चेहरा गोल, हनु जणू उजळ शिंपली !

कुणि थोर मराठा कुळातील कन्यका
ऐटीत पुलावर बसली नीलालका

निर्व्याजपणा मोकळा निसर्गातला
संपूर्ण तिच्या चेहर्‍यावरी बिंबला

ती प्रसन्नवदना लावण्याची कळी
भावंड धाकटे खेळवीत बैसली !

खालती नदीचे जळ वाहे खळखळा
वरि गुंगुनि तारायंत्र साथ दे जळा

सृष्टिचे सानुले भाट-अशी गोजिरी
पाखरे येउनी बसली तारेवरी

मनसोक्त लागली गाऊ ओतुन गळा
मोहरली त्यांची संगीताची कळा

का स्फूर्ति एवढी उचंबळे अंतरी ?
तर कोणाची ही सांगा जादूगिरी ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बालयक्ष

बोलतात बाई बालयक्ष याला
कुंजातुनि आला यक्षिणींच्या

विसरुन पंख इवले धवल
आला, हे नवल नाही काय ?

हासत, खेळत, बोबडे बोलत
आला हा डोलत सदनात

जाईच्या वेलीला आला का बहर
आंब्याला मोहर फुटला का ?

गाऊ का लागली पाखरे मंजुळ
वारे झुळझुळ वाहू लागे ?

अशी काही जादू घडली घरात
काय गोकुळात यशोदा मी ?

खोडकर तरी खोडया याच्या गोड
पुरविती कोड शेजारणी

मेळा भोवताली लहान्या बाळांचा
फुलपाखरांचा फुलाभोती

’एक होता राजा’ गोष्टी या सांगत
गंमत जंमत करीत हा !

नाजुक रेशमि धाग्यांनी आमुची
मने कायमची बांधणारा

काळजीचे काटे काढून आमुची
काळिजे फुलांची करणारा

खेळकर माझा लाडका वसंत
जीवाला उसंत नाही याच्या

झोप गुर्रकन लागे कशी तरी !
नाही जादूगिरी कळत ही

झोपेत गालाला पडतात खळ्या
कोण गुदगुल्या याला करी ?

पंख लावूनीया गेला का स्वप्नात
यक्षिणी-कुंजात उडून हा ?

तिथे यक्षिणींनी घेरला वाटत
मुके मटामट घेतात का ?

कल्पवल्लरीच्या फुलाला पाहून
बाळ खुदकन हसतो का ?

असा बालयक्ष माझा ग गुणाचा !
बाई न कुणाचा, माझाच हा !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आजोळी

माझ्या मामाची रंगीत गाडी हो

तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो

मला आजोळी घेऊन जाई हो

नाही बिकट घाट

सारी सपाट वाट

मऊ गालीचे ठायी ठायी हो

शीळ घालून मंजूळवाणी हो

पाजी बैलांना ओहाळ पाणी हो

गळा खुळखूळ घुंगुरमाळा हो

गाई किल्‌बील विहंगमेळा हो

बाजरिच्या शेतात

करी सळसळ वात

कशा घुमवी आंबेराई हो

कोण कानोसा घेऊन पाही हो

कोण लगबग धावून येई हो

गहिवरुन धरुन पोटी हो

माझे आजोबा चुंबन घेती हो

लेक एकूलती

नातु एकूलता

किति कौतूक कौतूक होई हो


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आजोबा

आजोळ माझे लहान गाव
’कळंब ’ आहे तयाचे नाव

नदी ’अश्विनी’, ’माणिक’ ओढा
गावशिवारा घातला वेढा

ओढयाच्या काठी मळा मामाचा
पडाळ छोटी,छोटी बगीचा

मायाळू भारी माझे आजोबा
म्हणती त्यांना सगळे ’बाबा !’

आंघोळ त्यांची भल्या सकाळी
गोपीचंदन लाविती भाळी

नारायणाला हात जोडिती
पूजा करिती, पोथी वाचिती

ऐन दुपारी आंब्याखालती
घोंगडीवरी अंग टाकिती

घायपाताचा वाक घेऊनी
दोर वळिती पीळ देऊनी

करडे पाटीखाली झाकिती
गुरा वासरा पाणी पाजती

शेण काढुनी झाडिती गोठा
स्वच्छ ठेविती अंगण , ओटा

तिन्ही सांजेला येत माघारी
गुरे दावणी बांधिती सारी

पाठीवरुनी मुक्या जीवांच्या
हात फिरतो प्रेमळ त्यांचा

पाहुणा कोणी येता दुरुनी
बोलती त्याशी तोंडभरुनी

गोष्टी सांगती देवाधर्माच्या
अभंग गाती तुकारामाचा

देवाचे नाव सदा तोंडात
झोप तयांना लागते शांत

आजोबा माझे भारीच गोड
त्यांच्या प्रेमाला नाहीच जोड !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या