घाटमाथ्यावर

होतो मी सहचारिणीसह उभा त्या घाटमाथ्यावर

सृष्टीचे नव भव्य रुप हृदया उत्साह दे केवढा !

खाली खोल दरी, भयाण पुढती धिप्पाड मोठा कडा !

खाली जंगल दाट आणि वरती शोभे निळे अंबर

सूर्याच्या पिवळ्या उन्हात नटली कोठे गिरींची शिरे

कोठे शुभ्र जलौघ, दुर दिसती झाडीत कोठे पथ

धावे फुंकित शीट कर्कश, दिसे घाटात अग्नीरथ

जाती घालुनि शीळ भुर्र उडुनी केव्हा गुणी पाखरे

जोडीने पसरुन पंख अपुले तो कौंच पक्षीद्वय

जाई संथ हवेत पोहत, किती ते दृश्य चेतोहर !

ओलांडून दरी निवांत बसले पाषाणखंडावर

पाठोपाठ मनोविहंगहि-असा लागून गेला लय !

तेव्हा मी म्हटले, ’प्रिये, कधितरी सोडूनि देहास या

आत्मे काय उडून जातिल असे स्वर्गास गाठावया !’


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

स्वप्न

"मी स्वप्न असे देखिले सये मैत्रिणी
की आपण गेलो एका बागेमधि दोघीजणी

वेलींच्या मांडीवरी झोपल्या कळ्या
उघडून पाकळ्या त्यांना करि बालरवी गुदगुल्या !

गुजगोष्टि कुणा, तर जो जो गाई कुणा
तो झुळझुळ मंजुळ वारा हालवी डोलवी कुणा !

गोजिर्‍या फुलांचे खेळगडी गोजिरे
कशि गुंगत होती बाई बहुरंगी फुलपाखरे !

या लीला देखुनि मति माझी हर्षली
जणु ’जिवती’ लेकुरवाळी, फुलबाग मला भासली !

मज गोड भास जाहला कशाचा तरी
मी मधेच थबकुनि पाहे लागून ओढ अंतरी

जाहल्ये उताविळ-मन गेले लोभुनी
मी लालजर्द ’झेंडूचा’ घेतला गेंद तोडुनी

तान्हुल्यास जणु का घेत माय उचलुनी
तो हृदयी धरिला बाई हुंगिला चुंबचुंबुनी

चिमुकल्या झेंडुची बहीण जणु चिमुकली
ती ’मखमल’ गोजिरवाणी तू कुरवाळुनि चुंबिली

लावून नजर मी हसत बघे तुजकडे
तू वदलिस उसन्या रागे, ’ही कसली थट्टा गडे !’

स्वप्नात कोणत्या गुंग मती जाहली !
दोघींना ऐकू आल्या कसल्या ग गोड चाहुली !"


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

मैत्रिणी

लाभ तुझ्या मैत्रीचा दोन घडी मैत्रिणी

आणि अता जन्माची जाहलीस वैरिणी !

तू होउनि हाती मम हात दिला मैत्रिचा

अवचित का झिडकारुनि टाकिलास मानिनी !

जीवनपथ होतो मी आक्रमीत एकला

अभिलाषा धरिली, तू होशिल सहचारिणी !

दाखविली बोलुनि, हा काय गुन्हा जाहला ?

काय म्हणुनि माझ्यावर कोप तुझा भामिनी !

दिव्य तुझ्या प्रतिमेचा झोत मोहवी मला

होरपळुनि तरु माझा टाकिलास दामिनी !

गे आपण जोडीने मधु गीते गायिली

चोच मारुनी उडून जाशि निघुनि पक्षिणी !

कांति तुझी, डौल तुझा, नृत्य तुझे डोलवी

जहरि डंख करुनी मज, जाशि निघुनि नागिणी !

हृदयीची दौलत मी पायी तुझ्या ओतिली

मी भणंग, मी वेडा बनलो मायाविनी !

तडफडतो दिनरजनी जखमी विहगापरी

सूड कुण्या जन्मीचा उगविलास वैरिणी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

पुनरागमन !

हो जागी प्रतिभे, सलील फिरवी वीणेवरी अंगुली

माझ्या आठवणीवरी तव मती गे पाहिजे रंगली !

होते सांज, करीत किल्‌बिल घरा येते विहंगावली

एकांती बसता तया परतुनी येतात चित्ती स्मृती

ती माझी सहधर्मिणी, सुगृहिणी माझी प्रिया मालती

तारुण्यातच ती कशी करपुनी गेली लता कोवळी ?

या वातावरणात काय फिरतो आत्मा तिचा मोकळा !

माघारा परतून आण; तुजला ती साध्य आहे कला !

झाले फुल मलूल, गंधलहरी हो लीन वायूमधे

पाहे हुंगुनि आसपास, भरुनी श्वासात आणी तिला

डोळ्यांला दिसते अजून हसरी मूर्ती तिची प्रेमला

आत्मा तीत तिचा भरुन, तिजला माझ्यासवे बोलु दे

कांते, ये हसितानने जवळ ये, संकोच का हा वृथा !

मृत्यूनंतर आपला न तुटला संबंध गे सर्वथा

जो षण्मासहि जाहले न करुनी संसार माझ्यासवे

काळाने तुज तातडी करुनि तो बोलावणे धाडिले

होते ऐहिक जन्मबंध जुळले ते सर्व झाले ढिले---

नाही आत्मिक भाव मात्र; मग का मी गाळितो आसवे ?

डोळे हे पुसितो, उगाच तुजला वाईट वाटेल ना !

ही स्वप्नातिल नित्य भेट न तुझी ना भासा ना कल्पना !

डोळे जाति दिपून, तेज किति हे आले अहाहा तुला !

सोन्याच्या पुतळीपरी उजळुनी आलीस तू मैथिली !

आला मंगल भाग्य-योग जुळुनी, की पर्वणी पातली !

देशी भेट फिरुन, खास तुझिया प्रेमास नाही तुला !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

उशीर उशीर

उशीर उशीर !

केलास का बाई इतुका उशीर !

शरद संपून, हेमंत संपून येताहे शिशीर !

दर्पणी माझिया डोकावू नको

जीव कासावीस करु हा नको

तुझ्या ग चंद्राचे चांदणे क्षणाचे

युगाचा भरे तिमीर

एकले चालून थकले जिणे

मागल्या जन्माची फेडाया ऋणे

फुलू दे नविन जीवनप्रसून

गळू दे जुने शरीर

नवीन विण्याची नवी हो तार

मधुर मधुर काढी झंकार

आपुल्या प्रीतीचे नव्या प्रचीतीचे

गावया गीत मी अधीर

माझ्या फुलातिल सुगंधा होऊन ये

माझ्या गीतातिल रागिणी होऊन ये

पुढल्या वसंती होऊन वासंती

येई गे, नको उशीर !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

उत्कंठा !

ते पुरे करी नटणे थटणे

ये निघून तू लवकर सजणे

असेल वेणी तव विस्कटली

कंचुकिची वा गाठहि सुटली

भीड नको धरु तरिही कसली

असशील तशी ये तू सजणे

ते पुरे करी नटणे थटणे

त्या हिरवळल्या पथिकेमधुनी

येतेस कशी चंचल चरणी !

मोहनमाळेमधील सारे

तुटून पडतिल मणी टपोरे

पैंजणिची गळतील घुंगरे

तरि फिकिर नको तुजला रमणी

येतेस कशी चंचल चरणी !

बघ मेघ दाटले हे गगनी

असशील तशी येअ तू निघुनी

सोसाटयाचा वारा सुटला

नदितीराहुन बलाकमाला

भये भरारा उडून गेल्या

ही गुरे जवळ गोठा करिती

बघ मेघ दाटले हे वरती !

घेशील दिवा तू पाजळुनी

परि मालवेल तो फडफडुनी

सुंदर तव हे विशाल डोळे

तयात न कळे काजळ भरले

दिसती या मेघांहुनि काळे

घेशील दिवा तू पाजळुनी

जाईल परी फडफड विझुनी

ते पुरे करी नटणे थटणे

ये निघून तू लवकर सजणे

तशीच अपुरी ती फुलमाळा

राहू दे, तिज गुंपायाला

वेळ कुणाला ? या अवकळा-

बघ मेघ दाटले हे गगनी

एकेक घडी जाते निघुनी !

ते पुरे करी नटणे थटणे

ये निघून तू लवकर सजणे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

पुष्पांचा गजरा

पुष्पांचा गजरा विशीर्ण मजला वाटेवरी आढळे

त्याची खिन्न विपन्न पाहुन दशा, त्याला करी घेतले

होता येत सुवास त्यास अजुनी, गेला जरी कोमुन

काले जाय निघून यौवन परी मागे उरे सद‌गुण

कोणाचा गजरा ? प्रमत्त तरुणी-वेणीतुनी हा पडे ?

किंवा होउन प्रेमभंग युवती याला झुगारुन दे ?

शृंगारास्तव भामिनीस गजरा आणी तिचा वल्लभ

त्याने काढुनि टाकिला निज करे, की होय हा निष्प्रभ !

आता मागिल सर्व वैभव तुझे स्थानच्युता ओसरे !

बाला कोण तुला धरुन हृदयी चुंबील हुंगील रे !

कृष्ण, स्निग्ध, सुगंधयुक्त विपुला त्या केशपाशावरी

डौलाने मिरवेन हासत, अशी आशा न आता धरी

घेई मानुनि तू तथापि गजर्‍या चित्ती समाधान हे

की एका कवितेत भूषित मला केले कवीने स्वये !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या