मातेचे गाणे

(गाणे संपताच माता म्हणते)

“सुंदर कितिकरि हे गाणे वेडावुन जावे प्राणे
पहा तरू हे गहिवरले टपटप गळती अश्रुजले
पहा तुटे तो नभि तारा ऐकुन गीता मनोहरा
गुप्त खालती येवोनी गीताचा ऐकत ध्वनी
बाळ, कसे रे हे गाणे वेडा जणु हा कवी मने
वेडा इतरांनाहि करी हृदयि भावनापूर भरी”

(मुलगा म्हणतो)

“चित्रकार कवि हे सारे होतिल एकसरे
भूमातेचे हे भक्त भाग्य तिचे ते वाढवित
भारतभूच्या भाग्याची तहान सर्वांना साची
देशामाजी स्वतंत्रता आणायाला उत्कटता
कवीचित्रकारांनाही दास्य तयांचे मन दाही
देशासाठी तव गेला सुत, न नवल हे, हा झाला
धर्म आइ गे सकळांचा ध्यास समस्त देशाचा”

(इतक्यात एकदम दुसरे गाणे गाणे ऐकू येते.)
कोठुन दुसरा ध्वनी येतो हळुहळु मोठा हा होतो

(आई म्हणते)
“प्रभातफेरी करावया मुले चालली रे सखया
रुचे तयांना ना शय्या निघती जागृति ती द्याया.”

(मुलगा म्हणतो)
“ऐकू आई तरि त्यांचे गीत रोमहर्षक साचे”

(प्रभातफेरीचे गाणे)
उठा बंधुंनो! पहा उगवला भास्कर वेळेवरी
तमोहर भास्कर वेळेवरी
प्रकाश पसरी जिकडे तिकडे
धरणीवरि अंबरी।।

झोपेची का वेळ असे ही उघडा रे लोचन
आपुले उघडा रे लोचन
झापुन बसलो म्हणून आले आले हे दुर्दिन
झापड उडवा डोळे उघडा पहा काय चालले
सभोवती पहा काय चालले
स्वातंत्र्याच्या दिव्य विचारे राष्ट्र सर्व रंगले
गुलामगिरिचा अजुन न आला वीट तुम्हाला कसा
बंधुंनो, वीट तुम्हाला कसा
स्वातंत्र्यास्तव कष्ट कराया कंबर आता कसा
ऐशीही सोन्यासरी। संधी न पुन्हा येईल
जरी उठाल झडकरि सारे। भाग्योदय तरि होईल
प्रगटवा आपुले तेज। स्वातंत्र्य माय मिळवील
उठा, करावी अचाट करणी, झोप नसे ही बरी
बंधुंनो, झोप नसे ही बरी
उठा उठा रे मायभूमि ही मुक्त करा सत्वरी।। उठा...।।

हिंदुमुसलमान एक होउनी स्वातंत्र्यास्तव उठा
उठा रे एक दिलाने उठा
स्वातंत्र्याचा निजसत्तेचा फडकू दे बावटा
ब्राह्मण अब्राह्मण बंधूंनो पुरे करा भांडणे
क्षुद्र ती पुरे करा भांडणे
श्रेष्ठकनिष्ठ न कोणी उठुनी देशास्तव झुंजणे
मायभूमिच्यासाठी जो ना धावे अस्पृश्य तो
समजणे मनात अस्पृश्य तो
बंधुबंधुसे उठा उठा रे भारत बोलावितो
मायभूमिसाठी आता होउनिया भाई भाई
भांडणा तुम्ही विसरावे ही स्वातंत्र्याची घाई
ही स्वतंत्र भूमी करणे आपुली भरतभूमाई
गुलाम म्हणुनी जगणे आता आपण धरणीवरी
अत:पर आपण धरणीवरी
स्वतंत्र भारत करावयाते उठा उठा सत्वरी।। उठा बंधुंनो....।।

(मुलगा म्हणतो)
“आई पाहि हे दृश्य सर्व या भारतावरी
सर्वत्र जागृती झाली तम ना जनतांतरी।।

मुले बाळे पहा एक विचारे भारली जशी
हसेल दिव्य तेजाने भारताननसच्छशी।।

भारताचे दिव्य भाग्य मदीय नयना दिसे
आनेद शांति ती नांदे वाव ना कलहा असे।।"



(गाणे)
प्रियकर भारत, गुणमणि भारत, स्वातंत्र्या पावो
सकल विकलता
विलया जाउन
निजतेजा लाहो।। प्रियकर....।।

संहारुन संसार-विषमता
निर्मुन धरणीवरती समता
शातिपथा दावो।। प्रियकर....।।

मोहमलिनता दुरभिमानता
असुर-समरता सत्ता-रसता
जगतातुन जावो।। प्रियकर....।।

मनुज-दिव्यता विश्वबंधुता
उदया येवो मरुनी पशुता
वरति जगा नेवि।। प्रियकर....।।

धर्म सकल होवोत उदार
हंसासम जन निवडो सार
स्नेह विपुल होवो।। प्रियकर....।।

करुनि निजांतर-तिमिर-निरास
करुन घेउ दे जगा विकास
प्रतिबंध न राहो।। प्रियकर....।।

उत्साहाचा आनंदाचा
सहृदयतेचा जगदैक्याचा
पवन मधुर वाहो।। प्रियकर....।।

ज्ञानहि वाढो आदर वाढो
श्रद्धा वाढो सदगुण वाढो
परमात्मा येवो।। प्रियकर....।।

उत्तरोत्तर प्रकाश लाभुनी
पूर्णतेकडे डोळे लावुनी
प्रभुस मनुज पाहो।। प्रियकर....।।

पिता पुत्राचा सवांद

(मुलगा हे दिव्य दर्शन पित्यास घडवितो व विचारतो, “बाबा, तुम्ही भारतमातेसाठी नाही का मरणार, नाही का झिजणार?” तेव्हा बाप म्हणतो,)

“बाळ मी सर्व देईन सेवा हातूव ह्या घडो
जनांची करिता सेवा मदीय देह हा पडो।।
आम्ही दोघे जीवनाते उदात्ततर रे करू
बाळा हे गुण-लावण्य संसार लीलया तरू।।
पुत्र तू आमुचा धन्य अंजना घालुनी अम्हा
दिधली दिव्य तू दृष्टी हरुनी मोहता तमा।।
प्रकाश तो पहा येतो पसरेल महिवरी
त्यापरी सत्प्रभा येते आमुच्या सुप्त अंतरी।।”

(मुलगा म्हणतो, “खरेच बाबा, प्रभातप्रभा फाकत आहे व भाग्याची प्रभाही भारतावर फाकेल; भारतमाता स्वातंत्र्याने तळपेल.”)

प्रकाश आला पहा तरी। स्वतंत्रता भारतावरी
अमरत्वाची प्रभाचशी। उषा चमकते आकाशी
सकल लोपला अंधार। सृष्टी दिसते मनोहर
पवन वाहतो
सुमगण फुलतो
परिमल भरतो
हृदयाल्हादक दिगंतरी।। प्रकाश....।।

चराचरा ह्या विश्वाला। चैतन्याची चढे कळा
निद्रातंद्रा दुरावली। जागृति सकलांतरि आली
तरु डोलती
विहंग उडती
कलरव करिती
सुरम्य मंजूळ शुभ स्वरी।। प्रकाश....।।

हरित-श्यामल-तृणावरी। नाचत किरणे सोनेरी
मोत्यांसम हे दंव दिसते। प्रकाश हृदयी साठविते
मऊ गलिचे
लावण्याचे
हे मोत्यांचे
सृष्टिदेवता ही पसरी।। प्रकाश....।।

पहा पहा तो उभा रवी। विश्वाचा तो मुका कवि
काव्य ओतितो विश्वात। श्रद्धा याची हृदयात
तेजोराशी
चराचराशी
देती आशी
आशा देतो खरीखुरी।। प्रकाश....।।

जगी लोपुनी अंधार। प्रकाश येतो बाहेर
उत्साहाचे माहेर। बना सांगतो प्रभाकर
दु:ख न राही
अभ्र न राही
प्रकाश येई
पडला उठलो पुन्हा परी।। प्रकाश....।।

प्रकाश येतो जन उठती। बंध भराभर ते तुटती
मायामोहातुन सुटती। आशेला पल्लव फुटती
वैभव येते
भाग्य हासते
तेज फाकते
विकास येइल घरोघरी।। प्रकाश....।।

दिव्य कोंदला आनंद। शुभ मंगल परमानंद
नाचति गाणी गाऊन। हाती हाता घेऊन
विद्या येते
कला शोभते
मूर्ती दिसते
प्रभूची मज भारतांतरी।। प्रकाश....।।


(मुलगा म्हणतो, “बाबा, माझी वृत्ती सदगदित झाली आहे. भारतमातेचे ग्रहण सुटलेले दिसत आहे. पहा पहा.” गाणे)
ग्रहण सुटले ग्रहण सुटले।।
माझ्या मातेचे पाश सारे तुटले।। ग्रहण....।।

पारतंत्र्याचे नाव आता कुठले।। ग्रहण....।।

आता बुद्धीवर नुरतिल पटले।। ग्रहण....।।

द्वेषकलहादि दिसतिल मिटले।। ग्रहण....।।

भारतमाताचे पांग आज फिटले।। ग्रहण....।।

प्रतिभेला हो पाझर फुटले।। ग्रहण....।।

आमच्या प्रेमाला पल्लव फुटले।। ग्रहण....।।

दैन्य नैराश्य सकळहि हटले।। ग्रहण....।।

जयजयकाराचे ध्वनि शत उठले।। ग्रहण....।।

किति आनंद सुख किति पिकले।। ग्रहण....।।

भारतमातेचे मुख तेजे नटले।। ग्रहण....।।

पुत्राचे सात्वंन

(मुलगा आईला म्हणतो, “आई तुलासुद्धा माझ्या मरणाचे आता वाईट वाटणार नाही; भारतमातेची हजारो मुले स्वत:ची समज. मला प्रेम दिलेस ते त्यांना दे. आई, मी निष्ठुर नाही.”)

“आई ना मनि आण बाळ तव हा निष्प्रेम पाषाणसा
आहे प्रेम कृतज्ञता किति मनी शब्दांत वर्णू कसा
तू स्नेहार्द्र मदर्थ ते पिकविले प्रेमामृताचे मळे
आई मी विसरेन का? पुरविले माझे सदा तू लळे।।

आई तू जपलीस सतत मला प्राणांपरी आपुल्या
आई तू श्रमलीस गे निशिदिनी ह्या वाढवाया मुला
आई ना ऋण ते फिटे कधि तव प्रेमास सीमा नसे
माझे अंतर त्वद्विचार करता वोसंडुनी येतसे।।

गंभीरांबुधिहून खोल गगनाहूनी असे विस्तृत
माते प्रेम तुझे न गे वदवते वाणी तिथे कुंठित
पृथ्वीचे अणुरेणु तारक ते ते मोजता येतिल
त्वत्प्रेमामृत-मापनी मति परी वेडावुनी जाईल।।

आई जीव मदीय सतत तुझ्या प्रेमामृते पोसला
भूमातेस तिला सुखी बसवण्या मी तो सुखाने दिला
खेदाते न करी, हसे जननिये, प्रेमे बघे मन्मुख
आता शेवटचे, पहा पसरते तेथे प्रभा सन्मुख।।

आई भूमिवरी जनास सुखवी मानी तुझी ही मुले
प्रेमस्नेह तयांस दे मज दिले जे, ल हासवी ही फुले
कर्तव्या परमादरे करुनिया, येशील भेटावया
तेथे बाळ बसेल हा तुजकडे दृष्टीय लावूनिया।।”

वदुनि वचन ऐसे जाहला सदगदीत
नयनी घळाघळा ते तेधवा अश्रु येत
परि फिरुन पुसोनी लोचना बाळ बोले
परत जरि मधूनी नेत्र होतात ओले।।

पुत्र विधवा नववधूविषयी

(मुलगा स्वत:च्या विधवा नववधूबद्दल सांगतो)

“अजुनी जननी मला असे
वदणे एक परी वदू कसे
अविनीत मला न तू गणी
मम शब्दा परसोनिया मनी।।

कठिणा करुणा किति स्थिती
मम पत्नी अजुनी लहान ती
विधवा वदचील लोक हे
मनि येऊन मदीय धी दहे।।

अवहेलन ना तिचे करी
मुळी आबाळ तिची न ती करा
न तिला श्रमवा, करा सुखी
फुलवावी कलिका हसन्मुखी।।

न ढका हृदयास लाविजे
जननी काळजि नीट घेइजे
लतिका हळुवार वाढवा
गुण-शीले रमणीय शोभवा।।

शिकवून करा सुधी तिला
तुम्हि देणे सुविचार शक्तिला
मनुजास जरी सुशिक्षण
तरि होईल जगात रक्षण।।

सकलीहि असो परिस्थिती
सुविचार-प्रभु नित्य रक्षिती
जरि बुद्धि विनीत होइल
न पडे वक्र कधीहि पाउल।।

जरि पालक इच्छिती तिचे
तरि माहेर असो तिला तिचे
जरि ती असली कुठे तरी
तिजला होउ न दु:ख अंतरी।।

‘मम भवनि हिचे पांढरे पाय आले
म्हणुनि मम सुताचे प्राण हा हाय गेले.’
जननि नच वदावे त्वां असे लोकरीती
कठिण कटु नृशंसा ही असे लोकनीती।।

‘अशुभ अवदसा ही कैशि आली घरात
मिळवित सुखि माती ही करी मत्सुतान्त
परम अवकळा ही आजि आली घराला
हरहर हर सारा हा हिने घात केला’।।

वचन वदुनि ऐसे, मानसाते तदीय
तुम्हि कधि दुखवा ना, काय तद्दोष होय?
कळतवळत नाही सान बाळा बिचारी
जननि! हृदय तीचे ना कधी तू विदारी।।

 मृदु मधुर त-हेने वागवावे मुलीला
सहज कधि मदीय ध्येयही सांग तीला
हसत शिकत मोठी नीट होईल जेव्हा
भवजलधिमधूनी पार जाईल तेव्हा।।

परत जरि कराया वाटला तो विवाह
तरि परम सुखाने तो करो सौख्यवाह
गमत अपरिणीता बालिका आइ माते
करुनि निजविवाहा सेवुदे सन्मुखाते।।

जरि करिल विवाहा पाप ना ते गणावे
उलट विमल धर्मा अंगिकारी म्हणावे
तुम्हि तिजसि सुखाने संमति स्वीय द्यावी
मति करपुन आई ती तदीया न जावी।।

करणे क्षम तुम्हि तन्मति
निज कर्तव्य करावयाप्रती
मग बोल तुम्हास तो नसे
जननी मी वदु काय फारसे”

(माता गदगदून बोलते)

“करि न लवहि चिंता बाळ मी वाढवीन
तव करुण वधूला सर्वदा मी जपेन
हृदय न दुखवीन प्राण गेल्याहि माझा
तुझिच शपथ माझ्या मोहन प्रेमराजा
नयन बुबुळ तेवी तीस मानीन नित्य
सुखविन शिकवीन प्रेम देईन सत्य
मुळि न मनि करावी बाळ वेल्हाळ खंत
जरि जगति मदीया अश्रुला ती न अंत
जमले जल लोचनामधी
किति हेलावुन ये हृदंबुधी
पदरे झणि ती पुशी परी
मग गांभीर्य वरी मुखावरी।।”

पुत्राचे शेवटचे निवेदन

(आईच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू जमलेले पाहून मुलगा शेवटचे सांगतो)
किति मी समजाविले तुला
न रडे देइ निरोप तू मुला
नच मोहदरीत तू पडे
परि कर्तव्यगिरीवरी चढे।।

धरि धीर मनात गाढसा
न रडावे जननी ढसाढसा
जगता सुखवी सदा सये
किति मी सांगु बरे तुला बये।।

रडणे प्रभुजीस नावडे
रडणे द्रोह तदीय तो घडे
हसुनी मज दे निरोप तो
मरणाने तव पुत्र शोभतो।।

मृति ही सदलंकृती मला
मृति देते मज किर्ति निर्मळा
सुत धन्य खराच जाहला
जननी तू करि थोर सोहळा।।

करुनी निज नेत्र कोरडे
निज कर्तव्य करावया पुढे
झणि सिद्ध विशंक आइ हो
मति मोदे तव दु:ख हे सहो।।”

(मातेचे म्हणणे)

“ठेवून हृदयी तूते स्मरुन त्वद्वचा सदा
हृदयी भगवंताच्या धरुनी पावना पदा।।

प्रेमस्नेहामृताचा मी सुकाळ धरणीवरी
करीन बाळका नित्य वाक्य हे हृदय धरी।।

येईल लोचनी पाणी त्वत्स्मृती मज येउन
कर्तव्य करण्यासाठी पुसून परि टाकिन।।

दोन ही पिकली पाने श्रमुनी गळती यदा
भोटाया तुजला येऊ बघाया प्रर्भुच्या पदा।।”

(मुलगा म्हणतो)

“मोहतिमिर नाशाया आला देवाचा हा बाळ
आई बाबा निरोप द्यावा देव करिल सांभाळ
येतो बाळ अता
सुखवा भारतमाता। येतो बाळ अता।।

(मुलगा आता कायमचा जाणार हा विचार मनात येऊन मातेला फार दु:ख होते. ती मुलाला सदगदित होऊन म्हणते-)

आपार पान्हा हृदयात हाटे
आपार पाणी नयनांत लोटे
पुसूनिया ती परि लोचनांस
अतीव कष्टे वदते मुलास।।

“उभा राहा नीट जरा समोर
गड्या तुला पाहिन एकवार
असे तुझे दर्शन शेवटील
पुन्हा न ते ह्या भुवनी मिळेल”।।

समोर येऊन सुपुत्र राही
तयास माता अनिमेष पाही
बघू न देती भरतीच डोळे
पुशी, पुन्हा ते बनतीच ओले।।

न बोलवे तृप्ति म ती बघून
भरेच पाणी नयनी फिरुन
पुन:पुन्हा लोचन ते पुसून
तयास ठेवी मनि साठवून।।

पिते जणू बाळकरुप आई
पिताहि साश्रु स्वसुतास पाही
उचंबळे वत्सलता अनंत
न वर्णनाला कवि हा समर्थ।।

पुन: पुन्हा बाळक-मूर्ति पाही
न तृप्ति ती मातृमनास होई
‘मदीय माते! मम वेळ आली’।।
वदून ती मूर्ति अदृश्य झाली।।

टवटवीत ती तरुची पाने। विहंग गाती मंजुळ गाणे
सृष्टी सांगते दु:ख गिळावे। कर्तव्यास्तव पुन्हा उठावे।।

माझी पत्री

कुठुन आणू सुमने सुवासी
उदार माते तव पूजनासी
न बाग येईल कधी फुलून
सुपुष्प-रोपे जळती सुकून।।

जुई न जाई न गुलाब राही
न मोगरा गे निशिगंध नाही
न पारिजाते न टिके बकूल
न रोप ते एकहि गे जगेल।।

कुठून आणू बहुमोल पाने
प्रयत्न केले किति लेकराने
जगे न आई तुलसी न वेल
जळेल दूर्वींकुर ना हसेल।।

सुपुष्प नाही न पवित्र पान
सदैव खालीच मदीय मान
सदैव माझी परडी रिकामी
श्रमूनिही बाग बये निकामी।।

मदंतरांतील उदंड पाणी
अखंड देतो नयनी भरोनी
तरी न ही बाग फुलून येई
बघू किती वाट मनात आई।।

करावयाला तव पूजनाला
किती परी उत्कटता मनाला
किती तरी दाबु कितीक रोधु
किती सदा मी समजावू बोधू।।

न वाट आता बघतो कशाची
कुचंबणा ना करितो मनाची
असेल बागेत मदीय जे जे
समर्पितो ते तव पादपूजे।।

अनंत-मालिन्ययुते विशीर्णे
निरस्त-तेजे कृश हीन दीने
कशीतरी ही परडीत पाने
करून गोळा भरिली मुलाने।।

मदंतरांतील अपार पाणी
सुदीन पानांवर शिंपडोनी
करुन मी निर्मळ आणिली ही
करुन घे गोड तयांस आई।।

हसोत सारे मम पूजनाला
न तू हसावे जननी मुलाला
भिकार माझी म्हण तू न पत्री
समर्पितो जी चरणी पवित्री।।



 - साने गुरुजी
- पुणे, २७ फेब्रुवारी १९३५

जाणीव

क्षणोक्षणी असते जाणीव मनाच्या सोबतीला,
भावनांच्या संवेदना म्हणूनच जाणवतात मनाला

समुद्रकिनार्‍याला असते जाणीव फेसाळत्या थेंबांची,
भरती ओहोटीत सोबत असलेल्या पाण्याच्या गहिर्‍या प्रेमाची

रात्रीलाही जाणीव असते उगवत्या सुर्याची,
काळोखाच्या गर्भातून जन्मलेल्या प्रकाशाच्या किरणांची

गरिबांना जाणीव असते माथ्यावरच्या ओझ्याची,
श्रमासाठी भटकणार्‍या अनवाणी जड पावलांची

श्रीमंतांना असते जाणीव हरवत चाललेल्या नात्यांची,
चढाओढीत घुसमटलेल्या अतृप्त संसाराची

श्वासापासून श्वासापर्यंत जाणीवच सोबत असते,
मनाच्या कोपर्‍यांतल्या स्वप्नांना हळूच स्पर्शून जाते

ठाव मनाचा घेता घेता नकळत हरवून जाते,
कधी सुखात, कधी दुःखात मनास गोठवून जाते

गोठलेल्या मनाच्या संवेदना जाग्या होतात प्रीतीस्पर्शाने
भावनांचे अर्थ शोधाया निघालेल्या आठवणीने

जाणीवेच्या वाटेवरती अर्थ भावनांचे उमगले
आता काही तरी शोधायचे आहे, जाणीवेच्या पलीकडले...


कवियत्री - वैशाली राजवाडे