आई, दार उघड

किती धडपडलो किती भागलो मी। किती श्रमलो यावया तुझ्या धामी
किती रडलो मी सतत धायिधायी। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

तुझ्या पायांशी देइ आस-याला। नको दूर करु आई वासराला
तुझ्या पायांविण काहि नको पाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

मला भिवविति हे वृक व्याघ्र घोर। मला घाबरविति उग्र दुष्ट चोर
खाऊखाऊ करितात धीर नाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

थंडिवा-याचा बाळ उभा दारी। सकळ थरथरते अंग बघे भारी
घेइ पोटाशी ऊब मला देई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

ठेव मजला तू निजवुनी कुशीत। मला अंगाई गाइ गोड गीत
कितिक जन्मावधि झोप मला नाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

अमित जन्मांची लागली तहान। कसे तडफडती प्राण हीन दीन
तव प्रेम- पयोधर गोड देई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

तुला करुणेचा बोलतात सिंधु। मला का देशी एकही न बिंदु
मीच नावडते पोर सांग कायी। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

अनेकांना तू सतत पावलीस। परी मजवरती का ग कावलीस
तुझ्यावीणे आधार अन्य नाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

अनेकांना तू देशि साउलीस। का ग माऊली! मजवरी रुसलीस
तुझ्यावीण मला ओस दिशा दाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

बाळ दारी रडतसे दीनवाणा। तुला ये ना का आज प्रेमपान्हा
कसे आईचे हृदय कठिण होई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

चकोराते तो आइ! असा इंदु! चातकाला तो जेवि नीरबिंदु
तुझे दर्शन मज तसे प्राणदायी। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

बोल माझ्याशी,आइ! एक बोल सुधा- सागरकल्लोळ
तुझा शब्द मला नवप्राणदायी। दार उघड अता,आइ! जीव जाई।।

आइ! गेले हे खोल किती डोळे। तुझ्यासाठी मत्प्राण हे भुकेले
अहर्निश त्वद्विरहग्नि फार दाही। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

पिके पाण्याविण जाति गे सुकून। मुले मातेविण जाति गे झुरुन
तुझ्याविण माझा जीव सुकुन जाई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

कामधेनू होईल का कठोर। ताप देइल का कधी चंद्रकोर
कशी गंगा होईल तापदायी। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

मातमहिमा ना आज मालवावा। मातृगरिमा ना आइ! घालवावा
ब्रीद सांभाळी ते न लया नेई। दार उघड अता, आइ! जीव जाई।।

आइ! माझी ही शेवटील हाक। आइ! बाहेरी येउनिया टाक
अजुन बाहेरी तू जरी न येशी। तुझ्या पोराचे प्रेत तू पहाशी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मे १९३३

देवाजवळ

तुझ्याविणे कोणि न माते वत्सले मला गे
तुझा ध्यास आता आई सर्वदैव लागे
अनाथास नाथ ग कोणी ना कुणीहि पाता
तूच तात माझा, प्रेमस्निग्ध तूचि माता।।

पाप अंतरंगी आहे संचले अनंत
सुचे रुचे काहि न वाटे दिवारात्र खंत
पापपंकमग्न मला तू काय ठेवशील
नसे असे आई!  तव गे क्रूर दुष्ट शील।।

परम सदय कोमल माते!  ते त्वदंतरंग
त्वत्कृपाबुधीचे येवो मजवरी तरंग
मलिन मानसी मम जे जे सकल ते धुवावे
विमल पुण्यवान आई!  लेकरु करावे।।

नको गर्व हेवा दावा लोभ तो नसावा
विषयवासनाकंद मळासकट तो खणावा
नको मान उच्च स्थान प्रभु!  नकोच किर्ती
मनी वसो एक सदा ती तुझी मधुर मूर्ती।।

करु काय?  संतापविती वासनाविकार
हीन दीन दुबळा मी तो शीण होइ फार
विषयडोहि डुंबे मोदे मन्मनोमतंग
कधी आइ!  या वृत्तीचा करिशि सांग भंग।।

मदिंद्रिया सकळा करितो मी तुझ्या अधीन
तूच त्यास आवर मी तो त्वत्पदी सुलीन
तुझ्यावरी घालुन आता सर्व दु:खभार
विसंबून राहिन देवा!  तार किंवा मार।।

मला देवदेवा! वाटे सांगण्यास लाज
मान घालुनीया खाली असे उभा आज
जगी घालवोनी देवा!  वत्सरांस तीस
काय मेळवीले?  काही नाहि!  धिक् कृतीस।।

कोप अल्प झाला न कमी, कामवासना ती
अहोरात्र गांजित, चित्ती अल्प नाही शांति
लोभ लुप्त झाला नाही, व्यर्थ सर्व काही
फुकट फुकट सारा गेला जन्म हाय पाहि।।

क्षुद्र- वस्तु- लोभी गेलो गुंतुनी कितीदा
क्षुद्र वस्तु हृदयी धरुनी मानिले प्रमोदा
कला नाहि, विद्या नाहि, शील तेहि नाहि
हाय हाय देवा!  स्थिति ही मन्मनास दाही।।

अता तरी देवा! ठेवा हृत्स्थ मोह दूर
आता तरी होवो मन हे विमल धीर वीर
सद्गुणाचि सत्कृत्याची मौत्किके अमोल
जीवनांबुधीत बनू दे रुचिर गोल गोल।।

नसो व्यर्थ, सार्थक होवो, प्रभो!  जीवनाचे
फुलो फल जीवनमय हे अता एकदाचे
दिसो रंग रमणीय असे वास दरवळू दे
तुझी कृपा झाली आहे हे मला कळू दे।।

मदाचरण होवो धुतल्या तांदळासमान
पुढे पुढे पाउल पडु दे जाउ दे चढून
तुझी कृपा होई तरि हे सर्व शक्य वाटे
नको अंत पाहू आता, लाव बाळ वाटे

स्नेहमयी माउलि तू गे साउली जिवाची
तूच एक आधार मला आस तू नताची
नको उपेक्षू तू, माते!  अश्रु हे पुसावे
मला नीट मार्गावरती आणण्यास धावे।।

तिमिर घोर नैराश्याचा मानसास घेरी
मला येइ मदध:पाता बघुन घोर घोरी
कृपाकौमुगदीचे आता किरण येउ देत
उदासीनता चित्ताची सकळ संहरोत।।

किती मनोरथ मी देवा मनी मांडियेले
भव्य किति ध्येयांना मी मनी खेळवीले
दिसे मला जे जे मोठे तेच तेच व्हावे
असे मनी वाटे, हाती काहिही न व्हावे।।

जसे मुल यात्रेमध्ये खेळणी विलोकी
फुगा घेइ किंवा चिमणी खळखुळाच तो की
असे त्यास होई, कोपे तो पिता तयाचा
काहिही न घेउन देई, बाळ रडत त्याचा।।

तसे जगी बाप्पा देवा!  जाहले मदीय
करु हे करु की ते हा निश्चयो न होय
मदुत्साह सतरा कामी विभागून जाई
म्हणुन देवराया!  हाती काहिही न येई।।

ग्रंथकार प्रतिभावान् या सत्कवि प्रभावी
राष्ट्रवृत्त- संशोधक- सत्कृति करी करावी
दयावंत व्हावे संत प्रभुपदाब्जरक्त
करुन लोकसेवा किंवा आटवू स्वरक्त।।

अशी किती ध्येये रात्रंदिन मला दिसावी
काहिही न करिता वर्षे व्यर्थ सर्व जावी
उभा रिक्त हस्ते त्वत्सिंहासनासमोर
प्रलज्जित, प्रभुजी!  ठरलो मी दिवाळखोर।।

दिली बुद्धि, शक्तिहि, दिधली इंद्रिये समर्थ
दिला देह अव्यंग असा व्हावया कृतार्थ
अल्प सार्थकाहि ना केले, मनोबुद्धिदेह
भ्रष्ट विकल सारी केली, नाशिले स्वगेह।।

वास घेतला रे माझा नित्य वासनांनी
कशी तुझी पूजा कारु मी वासल्या फुलांनी
अता तुझ्या ओतिन पायी कढत अश्रु माझे
प्रभो!  असे वदताना हे किति मदंत भाजे।।

दिले भांडवल तू देवा!  सत्कृपासमुद्रा !
काहि मी न केले झाली म्लान दीन मुद्रा
पोटि होइ अनुताप परी टिकत अल्प काळ
मोह-मधर-रुपे फसतो फिरुन फिरुन बाळ।।

पुन्हा पुन्हा पापे रचितो येति अश्रू डोळा
नाहि त्यांस किंमत, तू न प्रभुजि!  मूढ भोळा
खरे अश्रु अनुतापाचे येति एकदाच
म्हणुन अश्रु माझे हे तो नसति खास साच।।

प्रभो!  तुला सारे कळते तुजसि सांगु काय
तार तार तार मदीया तूच थोर माय
नाहि काय माया?  ये ना कळवळा तुला गे
तुझा बाळ भागे, घेई लोभुनि वा रागे।।

कधी कधी, आई!  वाटे जाउ की मरुन
नाही काहि उपयोग जगी हे जिणे जगून
भूमिभार केवळ झालो कर्महीन कीट
न लागेल आता माझ्या मना वळण नीट।।

पदोपदी घसरत जातो मोहमार्गगामी
कामना अनंता धरितो मी मनात कामी
या न जन्मि मज लाभेल प्रभा पुण्यतेची
अहा अहोरात्र मनाला गोष्ट हीच जाची।।

अहोरात्र झगडत आहे अंतरात, आई !
समर हे न संपेल असे वाटते कदाही
रिपूंजवळ झुंजत आहे एकला सदैव
अता धीर नाही आई!  मद्विरुद्ध सर्व।।

नको नको जीवन देवा!  नको अता आयु
ज्योत जीवनाची विझवी सरो प्राणवायु
जगा प्रभो!  उपयोग असे तरि नरे जगावे
भूमिभार जो कुणि त्याने शीघ्रची मरावे।।

भले जगाचे मी देवा अल्पही न केले
पुण्यवंतजननयनी मी अश्रु आणियले
परस्वांत निष्ठुरतेने नित्य पोळियेले
अन्य जीवनांस कितीदा दु:खदग्ध केले।।

मनी नित्य पापविचारा हसत खेळवीले
कुकर्मात जीवन सारे अहोरात्र नेले
विंचु अंतरंगी डसती शेकडो सदैव
म्हणुन मरण आता हेतू मनी एकमेव।।

पापविस्मृती ना देवा दीवनी पडेल
स्मृतिपिशाच्चगण मानेला सर्वदा धरील
मरुन जाउ दे रे आता दे मला मृतीस
मरण देइ, करितो चरणा साश्रु मी नतीस।।

होय, येति विमलहि माझ्या अंतरी विचार
अल्पकाळ टिकुन परू ते फिरुन जात दूर
जशी वीज लवुनी जाई ध्वांत फिरुन राही
तशी होइ मच्चित्ताची गति सदैव पाही।।

सद्विचार धरण्या जावे तोच जाति दूर
हर्षफुल्ल मद्वदनींचा जाइ गळुन नूर
खिन्नता अपारा पसरे अति निराश वाटे
येति अश्रु नयनी किति हे अंतरंग फाटे।।

त्वत्कृपा न, म्हणुनि न राहे सद्विचार चित्ती
दु:खदैन्यनैराश्याची घेरिते विपत्ती
पदोपदी होणारे हे बघुन मदन्याय
सांग तूच जीवन मग हे मज रुचेल काय।।

असा सरी, देवा!  ऐक प्रार्थना विनम्र
हृदय समुन्नत हे होवो विमल शांत शुभ्र
तुझी मूर्ति मधुरा राहो मनि, घडो विकास
पुरव पुरव, देवा!  माझी एक हीच आस।।

नयन येति भरुनी वदतो तुजसि कळवळोनी
आत जात आहे, आई!  बघ किती जळोनी
नको अंत आता पाहू धाव धाव धाव
सत्पती मला सतत तू हात धरुन लाव।।

अजुन पाप करण्यातचि ना वाटते कृतार्थ
पाप जाहल्यावरि तरि ते नयन आर्द्र होत
अजुन नाश नाही झाला सर्व तोच येई
असे अजुन आशा म्हणुनी शीघ्र येई आई!।।

तुझ्या करी देतो माझी मंद रुग्ण नाडी
असे अजुन धुगधुगि तोची औषधास काढी
रसायना दिव्या देई बाळ हासवावा
निज प्रभो!  करुणामहिमा आज दाखवावा।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

जीवननाथ

तृणास देखून हसे कुरंग। मरंदपाने करि गान भृंग
जलांतरंगी करि मीन नाच। तवानुरागी प्रभु मी तसाच।।

दयासुधासिंधु तुम्ही अपार। सुखामृताचे तुम्हि डोह थोर
लहानसा तेथ बनून मीन। विजेपरी चमचम मी करीन।।

मदीय तू जीवननाथ देवा। मला स्वपायांजवळीच ठेवा
तव स्मृति श्वाससमान जीवा। मदीय संजीवन तूच देवा।।

मदीय तू नाथ मदीय कांत। मदीय तू प्राण मदीय स्वांत
मदीय तू सृष्टी मदीय दृष्टी। मदीय तू तुष्टी मदीय पुष्टी।।

जिथे तिथे मी तुजला बघेन। कुदेन नाचेन मुदे उडेन
तुलाच गातील मदीय ओठ। तुझेच ते, ना इतरा वरोत।।

कधी कधी तू लपशी गुलामा। परी तुला मी हुडकीन रामा
तुला लपंडाव रुचे सदैव। गड्या परी तू मम जेवि जीव।।

कधी न जाई बघ दूर आता। तुझ्या वियोगे मज मृत्यु नाथा
प्रिया! तुझे पाय मदीय डोई। बसू असे सतत एक ठायी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, डिसेंबर १९३२

सुखामृताची मग नित्य धार

कळ्या जळीवीण कशा फुलाव्या। दिशा उषेविण कशा खुलाव्या
उचंबळे इंदुविना न सिंधु। तसाच मी त्वद्विण दीनबंधु।।

कशास चिंता परि ही उगीच। जिथे तिथे माय असे उभीच
जिवा कशाला करितोस खंत। जिथे तिथे हा भरला अनंत।।

अनंत नेत्री तुज माय पाहे। अनंत हाती तुज वेढताहे
जरा तुझे तू उघडी स्वनेत्र। दिसेल सर्वत्र पिता पवित्र।।

जरा जरी ते उघडाल दार। प्रकाश तेथे भरतो अपार
हवा शिरे निर्मळ आत खूप। तसेच आहे प्रभुचे स्वरुप।।

करी न तू बंद निजांतरंग। शिरेल तो अंतरि विश्वरंग
सताड ठेवी उघडून दार। सुखामृताची मग नित्य धार।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, जानेवारी १९३३

तुला देतो मी जमिन ही लिहून

जीवनाच्या ओसाड वाळवंटी। कधी करिशिल कारुण्यमेघवृष्टि
कधी झिमझिम पाऊस पाडिशील। वाळवंटांचे मळे शोभतील।।

जीनाची मम पडित ही जमीन। लागवडिला आणील सांग कोण
मला शक्ति नसे कुशलताहि नाही। जगी कोणाचे साह्य तेहि नाही।।

मशागत कर तू पडित वावराची। मला काही नको सर्व घेइ तूची
तुला जे जे प्रभु मनी आवडेल। पडित भूमित या सकळ ते पिकेल।।

मला मोबदला नको एक दाणा। लागवडिला ही पडित भूमि आणा
तुला देतो ही जमिन मी लिहून। मला काहि नको दावि पीकवून।।

मळे होतिल ओसाड वावराचे। पाहुनिया सुखतील नेत्र साचे
जमिन माझी ही फुकट न रे जावी। तुला करुणा एवढी आज यावी।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, मे १९३३

आशा

संपोनीया निशा। उजळते प्रभा
दिनमणी उभा। राहे नभी

लाखो मुक्या कळ्या। त्या तदा हासती
खुलती डुलती। आनंदाने

ऊर्ध्वमुख होती। देव त्या पाहती
गंध धुपारती। ओवाळिती

तैसे माझे मन। येताच प्रकाश
पावेल विकास। अभिनव

तोवरी तोवरी। अंधारी राहिन
दिन हे नेईन। आयुष्याचे

फुलेल जीवन कळी। केव्हा तरी
आशा ही अंतरी। बाळगीतो


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२८

सोन्याचा दिवस

जन्ममरणांची। पाउले टाकीत
येतो मी धावत। भेटावया

पापांचे पर्वत। टाकूनिया दूर
येतो तुझे दार। गाठावया

दिवसेंदिवस। होउनी निर्मळ
चरणकमळ। पाहिन तूझे

पाहुन पायांस। निवतील डोळे
सुखाचे सोहळे। लाभतील

कधी तो सोन्याचा। येईल दिवस
पुरेल ही आस। अंतरीची


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑगस्ट १९३२