रूपमुग्धा

सौंदर्याचा लीलासागर लागे हालायाला

निज लावण्योदक देखावे-इच्छा झाली त्याला.

प्रतिबिंबित आपल्या पहावी सृष्टीची व्यभिशोभा

प्रबल ओढ ही रूपसागरा त्या चढवी प्रक्षोभा.

स्वयंप्रभा अवलोकायाची जरि आवड हो त्याला

'दुजे' करुनि लागते पहावे त्याही अप्रतिमाला !

पुढे आरसा ठेवुनि बसली नवबाला एकान्ती

प्रकाश पाडित होत्या तेथे उज्ज्वल दीपज्योति.

असामान्य सौंदर्य कसे ते ज्या जग हे वाखाणी

देखायाते इच्छित होती रूपगुणाची खाणी.

स्वच्छ आरशाच्या भूमीवर प्रतिमा बिंबित झाली

लावण्याच्या कोवळिकेवर पोरचि मोहुनि गेली !

मंत्रबळे मांत्रिके करावे मंत्रबद्ध इतराला

तो संमोहनमंत्र उलटला, स्वयं बांधला गेला !

मूर्ति मनी संकल्पे होती काय उभी, अभिरामे ?

ह्रदयाचे सिंहासन बघता दिसते शुद्ध रिकामे !

वस्तूच्या निरपेक्ष असे जे भावरूप सौंदर्य

काय चालले असे तयाचे हे तव चिंतनकार्य ?

करी कल्पना सौंदर्याची सुहास्य जे अव्याज

सुरम्यतेचा तेच चढविते त्या वस्तूवरि साज.

तिरस्कार कधि प्रेम, रुष्टता कधि आकुलता, कोप

उमटुनि ते अनुरूप चालती अंगाचे विक्षेप.

ओष्ठ, भ्रू, कर कधी मोडिशी, स्थिर कधि चंचल दृष्टि

क्षणोक्षणी निर्मिशी विलक्षण नूतन अभिनयसृष्टि !

रंगविकारांचे उमटुनि हो तव सुतनूवरि मेळ

संगे त्यांच्या खेळतेस का तू हा अद्‍भुत खेळ ?

नेत्रातिल तेजाची कलिका इकडे तिकडे नाचे

जीवभाव एकत्र होउनी त्या त्या ठायी साचे.

सभोवार तेजाची निर्मळ चादर पसरत जाते

जीव उडी घे त्या मृदु शय्येवरती लोळायाते.

प्रसन्नतेचा प्रशान्त शीतल तेजोनिधि कोंदाटे

जीव सारखा पोहत डुंबत राहो त्यांतचि वाटे !

सूक्ष्म नेत्रकिरणांते घेउनि विणले वस्त्र नवीन

"मोल काय ते सांग" - पुसाया सौदागर तरि कोण ?

सौंदर्याच्या या स्फुरणाते पाहुनि प्रत्यक्षाते

साहित्यातील रसभावांचे व्यर्थ प्रदर्शन होते !

फुटे आरसा, स्वप्न उडाले स्पष्ट वाजता 'खट्ट'

मुक्तांगावर स्खलित पदर घे सावरूनि ती घट्ट !

सभोवार भयचकित लोचने पहात उठली पटकन्‌

रागात्मक भावाचे तुटले नाजुक सूत्रह तट्‌कम्‌ !

जन्मा येउनि एकवेळ हा पर्वकाळ साधावा

पूर्णोदय 'नारीतत्वाचा' भाग्ये अवलोकावा !

रसास्वादनाचित विषयांचे केवळ करिता येते-

स्वसंवेद्य आस्वादन; तेथे वाचा स्तंभित होते !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रतिमाभंग

ज्यांनी भारतपुण्यभूमिवरती फोडोनिया डोंगर

लेणी निर्मुनि दाविले निज कलानैपुण्य लोकोत्तर;

वज्रप्राय कठोर भेदुनि महायत्‍ने शिलाप्रस्तर

तो कैलास अगम्य आणुनि दिला आम्हास पृथ्वीवर !

ज्यांनी मूर्ति अनेक निर्मुनि नव्या रंगावली रेखिल्या,

ज्यांच्या पाहुनि त्या कलाकृति जगे सोत्कंठ वाखाणिल्या;

हा नेत्रोत्सव पाहण्यास जमले ते तृप्त झाले जन

धीरोदात विभुत्व, ते परतले, तेथील संपादुन.

त्यांनी मूर्ति अनेक यत्‍न करूनी होत्या श्रमे निर्मिल्या

गर्वोन्माद भरात नीच यवने येवोनि त्या भंगिल्या !

हा विध्वंस समोर एक, दुसरे अद्यापिही चालता -

राष्ट्रात्मा खवळोनि जाय न कसा विच्छेद हे साहता !

प्रज्ञावंत विचारशील असती आम्हात जे संस्थित

साक्षेपे म्हणती समस्त विसरा ही दुष्टता सांप्रत.

सारे यद्यपि शान्तिपाठ पढतो सप्रेम येथे सदा

आहो मानव हे कसे विसरता आम्हास येते, वदा ?

ज्या सन्मूर्तिवरी मनोविहग हा फेरे असे घालित

ते अत्यंत सखोल वाच्य करिता येते कसे ह्रद्गत ?

कोणी निष्ठुर येउनी जरि तिला भंगोनि टाकीतसे

या निर्माल्य जगात, राहुनि अशा, त्याने जगावे कसे ?


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

पत्री समर्पण

श्रीराम

अनंत आई झगडे मनात
उसंत ना संतत चालतात
किती निराश किति थोर आशा
किती मनी चालतसे तमाशा।।

कसे तुला दावु समस्त माते
अशक्य ते या दुबळ्या मुलाते
परी कळावी तुज मन्मनाची
स्थिती, अशी आस तुझ्या मुलाची।।

म्हणून जो हा हृदयात सिंधु
उचंबळे, त्यातिल एक बिंदु
समर्पितो ठेवून नाम पत्री
तुझ्या महोदर पदी पवित्री।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, २८-२-२५

हृदय मदीय तव सिंहासन होवो

हृदय मदीय तव सिंहासन होवो।।
अभिनवतम रमणीया गुणनिधान
मूर्ति तुझी विलसत राहो।।हृदय....।।।

दंभ दर्प काम क्रोध
बहु करिती विरोध
उपजे न ज्ञानबोध
तिमिर सकल जावो।।हृदय....।।।

भक्तिभाव-गंधाची
सद्विचार-सुमनांची
मंगलमय-गानांची
पूजा तुज पावो।।हृदय....।।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२६

मजवर कृपा करावी

प्रभुवर मजवर कृपा करावी
मतिमलिनता हरावी माझी।। मजवर....।।

भरो प्रेम अंतरंगी
जडो जीव संतसंगी
मम अहंता गळावी सारी ।। मजवर....।।

नुरो तम अता समीप
जळो हृदयी ज्ञानदीप
मति तव पदी जडावी माझी।। मजवर....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

एक किरण

एक किरण मज देई
केवळ एक किरण मज देई।।

कोटी रवि-शशि
तू पेटविशी
विश्वमंदिरी पाही
परि मम हृदयी
तिमिर सदाही
श्रमुनी जीव मम जाई।। एक....।।

किती कृमि-कीटक
रोगोत्पादक
बुजबुजाटा जणू होई
दे सौभाग्या
दे आरोग्या
तम मम विलया नेई।। एक....।।

मी धडपडतो
मी ओरडतो
कोणि न धावो भाई
आस तुझी मम
हरि झडकारि तम
मुळी न सुचे मज काही।। एक....।।

एक किरण ना
मागे फार
एक किरण शुभ
देऊन तार
प्रणति तुझ्या शुभ पायी
तेज:सिंधो!
प्रकाशबिंदु
दे, होईन उतराई।। एक....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, सप्टेंबर १९३४

माझी बुडत आज होडी

माझी बुडत आज होडी
मज कर धरून काढी।। माझी....।।

तुफान झाला सागर सारा
मज सभोती वेढी।। माझी....।।

लोटितील मज भीषण लाटा
खचित मृत्यु-तोंडी।। माझी....।।

शांत करी रे तुफान दर्या
काळमुखी न वाढी।। माझी....।।

अपराध तुझे रचिले कोटी
परि धरी न आढी।। माझी....।।

पुनरपि माते राहीन जपूनी
करीन कधी न खोडी।। माझी....।।

रागावली जरी माय मुलावरी
संकटी न सोडी।। माझी....।।

ये करुणाकर ये मुरलीधर
हात धरुनी ओढी।। माझी....।।

किती झाले तरी मूल तुझे मी
प्रेम कधी न तोडी।। माझी....।।

इतर कुणी ते धावान येतील
आस अशी न थोडी।। माझी....।।

बाळ तुझा हा होऊन हतमद 
हाक तुजसि फोडी।। माझी....।।

आजपासुनी तव करि राया
सोपवीन होडी।। माझी....।।

मुरली वाजव सागर शांतव
वादळास मोडी।। माझी....।।

मुरली वाजव, वादळ लाजव
दाव गीतगोडी।। माझी....।।

जीवन तव पदी वाहून बालक
हात तात! जोडी।। माझी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४