काव्यानंद

दैत्यांनो ! न समुद्रमंथन, वृथा येथे बाळाची कथा

येथे वायुसुता ! हतप्रभ तुझी उड्डाणदर्पप्रथा.

होते अक्षमवेग यद्यपि जगच्चक्षो ! तुझे दर्शन

वाया केवळ वादपाटव न हे वाचस्पते ! वाग्रण.

येथे अद्‌भुतरम्य नित्य पडले स्फूर्तिप्रभेचे कडे,

अम्लान प्रतिभा-कळ्या उमलल्या आहेत चोहीकडे.

वोसंडे दुथडी भरूनि सरिता संकल्पना पावन

वृत्तींची रसलीन चंचळ खराश्रेणी करी क्रीडन.

सारीही जड इंद्रिये न शकती येथे प्रवेशावया

बुद्धिग्राह्य न वाव त्यास, न कळे ठाव प्रमाणत्रया.

वृत्त्यन्तर्गत टाकणे कठिणता, तद्रूपता पावणे,

काव्यानंदरसप्रसंग मग निस्संग संभोगणे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

बंडवाला

"शोभिवंत भीवरातीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"फुले भरुनि ओचले गुंफुनी स्वकरे त्यांचे सर

पुजावा वाटे गौरीहर."

आलापित घाला हे होती मंजुल गीतस्वर

गडाच्या बसोनि टोकावर.

"प्रफुल्ल ते भीवरातीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी-

सख्याच्या संगे वसणे वनी"

नगर गोपुरे सोडुनि सारे म्हणसी येइन वनी

अगोदर विचार कर साजणी

दर्‍या आणि दरकुटीत आम्ही क्रमितो दिनयामिनी

यातले मर्म समज कामिनी.

वनविहरण मग मनोहारिणी ! करणे वदलो तरी

गातसे तेच गीत सुंदरी.

"प्रफुल्ल ते भीवरातीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी-

सख्याच्या संगे वसणे वनी."

"वारु पंचकल्याणी अबलख, करी शिंग ह्या खुणा

दाविती उघड करुनि आपणा.

"नृपमृगयावनरक्षक आपण स्वामिभक्त 'बनकरी'

दिसोनी ये हे वरच्यावरी !"

बाले ! बनकर शिंग मजेने वाजे आरुणागमी

आमुचे घोर निशेच्या तमी.

तरिहि सखी गातसे. "तीर गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी-

सख्याच्या संगे बसणे वनी"

"फुले भरुनि ओचले गुंफुनी स्वकरे त्यांचे सर

पुजावा वाटे गौरीहर."

"अंगि ऐट; चमकती हत्यारे; रक्त करी रंवरंव

भेरिचे झडता भैरव रव.

"नित्य असे पाहते; वाटते शिलेदार फाकडे

असावे खास हुजुरचे गडे."

रणभेरी कर्ण्याचा आता नाद न कर्णी पडे

किर्रती रात्रींचे वनकिडे;

संकेतध्वनि तो परिसुनि सरसावुनि भाले करी

सज्ज मन्मित्र होति झडकरी.

खरे, रम्य भीवरातीर ते ! खळखळ जळ वाहते !

खरे ते प्रमोदवन भोवते !

मम स्वामिनी होउनि अपुले जीवित मज अर्पिणे

कर्म हे अति साहस साजणे !

मत्त यवनकिंकरत्व-चिन्ही रति तव, मज संप्रती

शहाचा गुन्हेगार बोलती.

नाव गाव ठाव न मुळि आम्हा, घडीचा न भरवसा

कळेना अंतहि होइल कसा;

यास्तव अमुचा सुभगसुन्दरी ! संग न श्रेयस्कर

आम्हाहुनि पिशाच बरवा वर !

विकटविपिनवाटिकेनिकट विस्तृतविटपांच्या तळी

मंडळी मिळते टोळीतली;

होतो मागे कोण तदा ते आता आहो कसे

फिकीर न याची आम्हा असे !

"प्रफुल्ल भिवरातीर, तरीहि, गंभीर नीर वाहते

अफाटचि हिरवट-वन भोवते !

"राज्ञीपद सुखभोग सोहळे नको; डोहळे मनी

सख्याच्या संगे बसणे वनी."


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

बकुल

जीवाचे पहिलेच फूल फुलले दे, मीहि ते घेतले.

स्वच्छंदे दिन दोनचार मग ती तत्संगमी रंगले.

रूपोन्मादभरागमे मज गमे सौम्दर्यलोकेश्वरी-

मी, माझा सहजाधिकार सुमनस्व्कार हा यापरी !

येताहो करभार घेउनि पुढे अन्य द्रुमांचा थवा.

चाकाटे मम चित्तवृत्ति बघुनि तो थाट त्यांचा नवा !

प्रारंभीच निशा वनात अपुला अंधार पाडीतसे,

हातीचे बकुलप्रसून गळले, केव्हा कळेना कसे !

सूर्याच्या प्रखर प्रभेत न मुळी नक्षत्र नेत्रा दिसे.

जाणे चित्त परंतु नित्य गगनी अस्तित्व त्याचे असे.

चेतोगर्भनभात नित्य तळपे नक्षत्र माझे तसे;

ते माते अथवा तयास विसरे मी- हे घडावे कसे ?

श्वासे देह करी प्रफुल्लित जरी संसर्ग याचा घडे,

चित्ता छंद जडे, अनावर मिठी प्राणास याची पडे,

स्फूर्तीच्या उठती अखंड लहरी याच्याच जीवातुन;

ठावे काय मला स्वभावचि असे याचा असा दारुण

पाहू वाट किती? 'क्षमस्व' म्हणते ! लाचार माझी स्थिति !

नेत्री प्राण उरे, कसूनि बघणे आता परीक्षा किती ?

नारीधर्मरहस्यभाग नव्हता ठाऊक माते जसा

नारीचा ह्रदयस्थभाव कळला नाही तुलाही तसा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

बुलबुल

निबिड तिमिर वर नभी संचरे

तळी उष्ण निश्वसती वारे,

सरणांचे भोवती निखारे,

स्थली या देख- एकटाच पिंपळ एक

चिरव्यथित तरुजीवज्योति

खिन्न तेज वितरिते सभोती,

जीर्ण विरल तत्‌पर्णावरती

दुःख निर्वाण-उमटवी ठसा निज पूर्ण !

उपेक्षिलेली पहिली प्रीति

रम्योदास तसे एकान्ती

एकस्थल या रौद्र प्रान्ती

तरीहि आहे-दरवळूनि परिमळ वाहे.

पांडुर मृदु लावण्यद्युतिजल

स्थलपरिसर करि ढाळुनि निर्मळ

जातिलता कुणि एकच केवळ

अदय नियतीने-लाविली तिथे स्वकराने

देह तिचा कृश फिकट पांढरा

पाहुनि होई जीव घाबरा,

वाटे सुटता उडविल वारा

पर्णसंभारा-वर भिरभिर सैरावैरा.

लागो वारा पाउस पाणी,

कुणी धृष्टकर टाको चुरडुनि,

तरि वरि भर ये वोसंडोनी

विकासश्रीला-ती अखंड मंडित बाला.

करुणामय स्वर्ललना कोणी

दिव्याश्रूंचे शिंपुनि पाणी

खचित करी संगोपन जपुनी

असे चित्ताला-वाटते बघुन वेलीला.

मृदुल धवल नव कुसुमशालिनी

व्रतस्थेस जरि बघतिल नयनी

सहजोद्‌गारे वदतिल रमणी-

"अगाइग, नवल- ही जाई नच येथील !

"वसंत न करी चैत्रशिंपणे,

"डोलत रविकर न करी येणे,

"झुरे न अंतरि तरिही तेणे

"अगाइग, नवल- ही जाई न या महिवरिल !

"साहुनि राहे कडक हिवाळा

"कुंजाचा आधार न इजला

"तरी भोगकल्लोळ सोहळा

"फुलांचा भोगी- ही जाई नवल जोगी !"

आश्चर्य एक की कुणि अलबेला

पक्षी पडता नच दृष्टीला

येई तत्सन्निध रात्र्ला

प्रेमघायाळ-भटकोनि रानोमाळ !

चाले त्याचा दीर्घ निशेभर

गूढ भावमय मृदु गीतस्वर

जणु निर्जर वीणाझंकार

की बुलबुल बोले-वनराई मोहुनि डोले !

ह्रदयि खवळला शोकसागर

कंठातुनि तरि निघती सुस्वर

येती ऐकुनि होती ते नर

स्वच्छंदी फंदी - नादाच्या ब्रह्मानंदी !

पक्षी आपण, प्रीती केली

भासे त्यांना वाया गेली

नयनाश्रू ओघळती खाली

चाखिती धुंद-दुःखाचा परमानंद !

उदास रजनी नच संपावी,

जागर दुःखे ही सोसावी,

चित्त तयांचे असेचि भावी

विलक्षण भारी-विरुताची जादूगारी

दिशा फाकती, तेज उगवते,

प्रभात होते, गीत थांबते;

त्यासरसे ते दृश्य वितळते

तेजबंबाळी-रम्याची होते होळी !

उत्कटतेने ह्रदय फोडिती

ते स्वैर स्वर रूपा येती;

कोणी म्हणती त्यात उमटती

स्पष्ट साचार-रमणीचे नामोच्चार !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

एक संवाद

चिमुकल्याच चांदण्या चमकती स्फूर्तिकणाच्या परी-

'होती लुप्त अनन्तोदरी !'

वर्षाकाली जलमय भूतल निर्झरगण तो करी-

'राहे धूळ निदाघी खरी !'

बालतृणांकुर वेलबुटीची शाल महीची करी-

'विटते निमिषाच्या अवसरी !'

नाजुक फुल जाईचे भारी वासे भुवना भरी-

'एका श्वासे सुकते परी !'

सौंदर्याची मूस ओतली नार अशी साजरी-

'होतो रंग फिका लौकरी !'

नवकाव्ये कवि करिती, असती मोत्यांच्या जणु सरी-

'पाणी क्षणिकचि त्यांचे परी !'

सख्या खोडिसी मला असे का? सान चांदण्याविना

निशेची काही कर कल्पना.

बालासम हे स्वैर नाचरे ओढे नसते तरी

होती रुक्ष मही मग पुरी !

कोमल मधुरोज्ज्वल भावांची खाण न जरि सुंदरा

जिणे मग दुःसह होते नरा !

नभाएवढा भानु एकटा पृथ्वीभर की तळे

कल्पिता कल्पनाच मावळे !

चंद्र एकटा रम्य; वेष्टिता असंख्य तारांगणी,

शोभा होते का रे उणी ?

स्तुतिनिंदेची अभ्रे येती सामान्याच्या वर,

सत्कवि दोहींच्याही पर.

क्षणभर अमुचे जीवित म्हणशी, असोचि ते क्षणभरी

चमकुनि जाऊ 'कोठे तरी.'

भाग पाडुनि तोल जाता काळाचे एकदा,

गोंधळ संपेना मग कदा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

यमदूतास

अखिल जगतात- आनंद नांदतो मूर्त ॥ध्रु॥

स्वर्णरसांकित गिरिशिखरात,

अरुणरागरंजित मेघात,

स्निग्ध शांत की शशिप्रभेत,

शब्द होतात- 'उठ भाग्य लूट जगतांत ।'

प्राप्तस्थिति असता विपरीत

भग्न जीर्ण निर्जल विहिरीत

उगवुनि पिंपळ वर येतात

ते म्हणतात- 'चल जाऊ उंच नभात !'

कंदुक आपटता ईर्षेने

उसळुनि वर येतो वेगाने;

वाढे बल संप्रतिरोधाने,

जिव्हाळा भेटे- मग जीवन कैसे आटे ?

'दासोऽहं' हा जपता मंत्र

लोटुनि गेला काळ अनन्त,

तृप्तता न झाली संप्राप्त,

दोष कोणाचा ?- हा दासो‍हंवृत्तीचा.

परिस्थितीचे कल्पुनि भूत

कंपित होते दुर्बल चित्त,

निष्क्रियतेच्या मसणवटीत-

शून्य ह्रदयात-संचार करी ते भूत !

अशेष भुवनांतिल जीवन ते

वेचुनि घेउनि जावे वरते,

आत्मभूत मन करुनी त्याते

द्यावे सकला-अनुसरुनि जलद-रीतीला !

थेंबे थेंबे बनला सागर,

भूगोलाला कण आधार,

कार्य करावे लहान थोर,

निश्चित मिळते-फळ योग्य काळ येता ते ?

तप्तान्तःकरणा निववावे,

पतितांचे उद्धार करावे,

जानपदभ्युदयार्थ झटावे,

साधक व्हावे- प्रगतीच्या आड न यावे !

आत्मा स्वामी तू निभ्रान्त

शाश्वत तू अस्तोदयरहित

उठता विवेक हा ह्रदयात

दूर पळतात-ते भ्याड यमाचे दूत !

प्रेमाची प्रभु निर्मळ ज्योत.

जीवदशेची तिजवर वात

पेटवुनी विचरे जगतात,

विश्व हे सारे- शुचि, मंगलमय मुळचे रे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

फुलांची ओंजळ

ऐशी प्रेमाची ती जाती, लाभाविणे करी प्रीती - तुकाराम

सृष्टीचा लडिवाळ बाळ वेल्हाळ कवी धाकटा

अफाट जगहाटात पाहिला हिरमुसला एकटा.

कळवळली कनवाळु मनी असमाय मायमावली

बाजारातुन काढून मायापाखर वर घातली.

चंद्रसूर्य खेळनी दिली खेळाया तेजागळी,

कुरवाळी हळुवारपणे पण फुले कविमनकळी.

नक्षत्रांची, चटक फुलांची, माळ टपोरी नवी

जरतारी तारात गुंफुनी लेकरास लेववी.

आकाशाचे अंगण झाडुनि अवीट रंगे वरी

विचित्र रेखा लिही लिही ती कळाचतुर सुंदरी.

'बाळ उदासी वणवण भटकुन अपार निष्टुर जगी.

असेल थकला, -विचारात या क्षणभर झाली उगी.

प्रेमासम निज अमर्याद, अक्षय्य, विनिर्मित करी

शुद्ध दुधाची नदी; पाहती अझुनी जन अंबरी.

एकाहुनि आगळी एक, रुचिरत्वे निस्तुळ खरी,

दृश्याची ती असंख्य लेणी पुढे मुलाच्या करी.

शिशुमन रमावायास करी आयास माय ती असे,

अगाध माया मोठ्यांनाही नाचवितसे भलतसे !

अळुमाळ परंतु न तो रिझला, काळोख दाट दाटला,

अजाणपण-जाणिव उपजता दृश्यलोभ आटला.

दृश्याचा अवडंबर अंबर पदर दूर सारुन

विशाळ वक्षी घट्ट धरी मग कवीस कवटाळुन.

सान्त अनन्ताची मिळनी ती, अगम्य अद्‌भुत स्वारी !

मायलेकरे अभिन्न झाली निजानंदसागरी.

सृष्टीशी कवि समरस झाला, प्राण तिचा आतला;

ह्रत्कमळाची तिच्या कळाली फुलती-मिटती कळा.

बोजड बाह्यालंकाराची झण्‌काराची रति

नुरली, अर्थाकार तयाची झाली प्रेमळ मति.

कवीच झाला सृष्टी, सारी सृष्टी झाली कवि,

दिसण्याचे-लपण्याचे गारुड अपूर्ण हा भासवी.

आकाशाचा अणू घेउनी त्यात विश्व दाखवी,

फुंकर घालुनि अजस्त्र विश्वा क्षणार्धात लोपवी,

हा हासता हसते ती, अथवा हा रडता ती रडे.

पहाट फुटते हा उठता हा निजता झापड पडे.

पूर्णापासुनि ढळलेले जग जाते पूर्णाकडे,

लांबण मोठी, वाट बिकट ती उतार चढ वाकडे.

सृष्टीचक्र हे तोल जाउनी कलते भलतीकडे,

खडतर मार्गी दीर्घकाळ ते केव्हा केव्हा अडे.

चक्र सचेतन, सतेज, पण कीटाच्या काळ्या पुढे

चक्र काळ, हा काळवंडुनी करी कधी हिंपुटे

उंचवट्यावर केव्हा जाता प्रकाशकण पाहते

पूर्णत्वाच्या भ्रांतीने तेथेच स्वैर नाचते.

पाणथळीचा खोता तेजोभास पाहता कधी

सैराटपणे भडकुनि तिकडे फसते चिखलामधी.

स्नेहाभावे एक्या जागी फिरूनि घरघर करी

तेव्हा वाटे मार्ग कंठिला आपण हा किति तरी !

जाणिव आणि नेणीव मिळोनी स्वभाव याचा घडे;

तेजोन्मुखता परी न मोडे सदा ते पडे;

सुखाभिलाषे अंग चोरणे, थंडपणे थांबणे,

लाभालाभा तोलुनि मोजुनि रूढीने चिकटणे,

या अधमेहुनि त्या अविचारी बुद्धीचे थोरले,

पात निपात अनन्त बरे तेजोभिमुखत्वामुळे.

आनंदाला म्लानपणा नच सौंदर्याला क्षय

स्थलाकडे त्या जाताहे हे विश्वचक्र निर्भय.

मार्गाची रुक्षता न याला यत्किंचित जाणवो,

परिश्रमाची प्रचंडता नच अनुत्साह उपजवो.

काव्यरसामृत यास्तव कारुण्याने निर्मुनि कवि

मृदुमधुरोज्ज्वल गीते गाउनि तेजोबल वाढवी.

भूतकाळचे वैभव किंवा सांप्रतची हीनता

प्रकर्ष भावी समोर दावी कवी समय जाणता.

हित केव्हा कटु बोल बोलुनी, हातभार लावुनी

सृष्टिचक्र हे नीट चालवी वाट उजू दाउनी.

भुताधारे समजुनि चालू काळ नीट, निर्मितो

सोज्ज्वल भविष्यकाळाला, कवि धन्य नव्हे काय तो ?

काव्य अगोदर झाले, नंतर झाले जग सुंदर,

रामायण आधी, मग झाला राम जानकीवर.

झाले कवि होतील पुढे, ह्या विशाल कालोदरी

अघटित घटना घडुन राहिली, कोण कल्पना करी ?

भारतराष्ट्रनभोमुकुरावर, सार्‍या पूर्वेभर,

चिन्हे दिसती महाकवीच्या आगमनोत्सवपर.

'राजनिष्ठ' कवि सांप्रतचे ते सर्व चला या मिळा,

या रायाचा मार्ग झाडुनी रचा चारुतर फुला.

तुमच्या परंपरेतचि याचा व्हायाचा संभव

जनकत्वाचे पद ते तुमचे, तुमचे ते वैभव !

सृष्टीचे लाडके तुम्ही संलाप तुम्हांशी करी

प्रलाप किंवा विलाप त्याला म्हणोत कोणी तरी.

"अद्वितीय उत्तम न सर्व ते अधम" म्हणुनि लेखिती

दूषक तुमचे अपूर्व त्यांची तर्काची पद्धति !

विजय असो तुमचा, तुमचे जे दूषक त्यांचा तसा

रानफुले ही तुम्हा वाहिली, नंदनवनसारसा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ