देखणा कबीर

दिशावेगळ्या नभांची
गेली तुटून कमान ;
तुझ्या व्रतस्थ दुखाचे
तरी सरे ना ईमान !

जन्म संपले तळाशी
आणि पुसल्या मी खुणा ;
तरी वाटांच्या नशीबी
तुझ्या पायांच्या यातना

भोळ्या प्रतिज्ञा शब्दांच्या
गेली अर्थालाही चीर ;
कांचा वेगळ्या पार्‍यात
तरी देखणा कबीर !!


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

शून्य शृंगारते

आतां सरी वळवाच्या ओसरू लागल्या,
भरे निली नवलाई जळीं निवळल्या.

गंधगर्भ भुईपोटी ठेवोन वाळली
भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी.

कुठे हिरव्यांत फुले पिवळा रुसवा,
गगनास मेघांचा हा पांढरा विसावा.

आतां रात काजव्यांची माळावर झुरे,
भोळी निर्झरी मधेंच बरळत झरे.

धुके फेसाळ पांढरे दर्वळून दंवे
शून्य शृंगारते आतां होत हळदिवें.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - जोगवा

माळ

हिरव्या माळापुढे निळा गिरि
गिरवित काळी वळणे काही
छप्पर झाले लाल अधिकच
धूर दरीतून चढतच नाही

पुसून गेले गगन खोलवर
काठावरति ढग थोडासा
थोडासा पण तीच हेळणा
पिवळा झाला फ़क्त कवडसा

हिरव्या माळापुढे निळा गिरि
मावत नाही इतुका फ़िक्कट
अबरळ्त चाललि पुढेच टिटवी
माळ ओसरे मागे चौपट


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - जोगवा

कविता

या माझ्या अजाण कवितेचा अपमान
कां करतां बाबांनो कां?
प्रेम हवंय का या कवितेचं?
मग तें मागून मिळणार आहे का तुम्हांला?
खूप कांही द्यावं लागेल त्यासाठी.
काय काय द्याल?
आत्म्याची बाग फुलवतां येईल तुम्हांला?
पण त्यासाठी तुम्हांला तुमचा आत्मा
तुमच्याच तळहातावर
एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल,
पण त्यासाठी तुमचे हात तुम्हांला
चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील.
कराल?

माझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून,
दूर असतों.
भीत भीत स्पर्श करतों तेव्हा तिचे डोळे
पाणावल्यासारखे चमकतात.
डहुळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम.
ती एका पोक्त कलेने प्रौढ होते.
या कवितेच्या मुलायम केसांवरून
सरकून जातात श्यामघनांतले मंद संधिप्रकाश.
वाटतं की ती आताच उभीच्या उभी
निसटून जाणार आहे
दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गांत.
स्पर्श करतांना अजूनहि मी तेवढा शुद्ध नाही
एखाद्या बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा

या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाउं नका
कारण ती ज्या वाटा चालते आहे
त्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या.
मोडून पडाल!
तिच्या नावाचा जप करायचा असेल तर
त्यासाठी तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे
रुद्राक्षमणी ओवून
जपमाळ करावी लागेल
आणि श्वासनि:श्वासांचा करावा लागेल कमंडलू;
पसरावें लागेल संज्ञेचें व्याघ्रचर्म.
आहे तयारी?
ज्या आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने;
तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा,
मगच पाहा तिच्याकडे डोकें वर उचलून.
ती भोगतेय जें जें कांही त्यांतल्या तिळमात्रही वेदना
तुम्हांला सोसायच्या नाहीत.

मी स्वत: पाहातोंय स्वत:च्याच कवितेला
एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

दोन मी

तो कुणी माझ्यातला तो घनतमी ठेचाळतो
तरीही मी का चालतो ? तो बोलतो ना थांबतो

वाकणारया अन मला तो पाहुनिया मोडतो
झाकितो तो गच्च डोळे, श्वास वक्षी रोखतो

अग्निज्वालेच्यापरी तो नग्न आहे केशरी
कल्पना होती अशी अन अजून आहे ती खरी

कोणते पोशाख त्याचे चोरले मी भर्जरी
विकित बसलो येत हाटीं, आणि खातो भाकरी

तो उपाशी तरीही पोटी लाज माझी राखतो
राख होतानाही ओठी गीतगाणी ठेवितो

मैफलीला तो नि मी दोघेही जातो धावूनी
एकतो मी सूर , तो अन दूरचे घंटाध्वनी

तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
दीन मी बांधून डोळे एकटा अन चालतो


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

गाडा

कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर?
गाणें सुरू झालें तेव्हा चंद्र होता डोईवर,
गाणे मध्यावर आलें - चंद्र झाला रानभर,

गाणें संपले आणिक पक्षी फडाडला तमीं
आणि तसाच मिटला घरट्यांत ... अंतर्यामी.

वाट रानांतली किर्र, हुरहूर सर्वदूर,
चक्रें फिरती फिरती, करकरे चराचर,

कळ्या फुलतात येथे, पाने गर्द वाजतात,
फुलें घळतात येथे तरी पानें वाजतात,
पानें झडतात येथे तरी वारे वाजतात,
वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात.

कुणासाठी भरूं पाहे डोळां ऐसें उष्ण पाणी?
कुणासाठी झरताहे झरा गप्प ऐशा रानीं?
कुणासाठी झरताहे आयुष्य हें क्षणोक्षणीं?
कुणासाठी रस भरे सालोसाल फळांतुनी?

प्रश्न नव्हे पतंग अन्‌ खेचूं नये त्याची दोरी
आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी?

कुणासाठी, कशासाठी, कुठे आणि कुठवर
ऐंसे घोकीत घोकीत व्हावयाचे दिगंबर.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

व्यथा गात गात

कशाला दिले तू मला लक्ष डोळे
उभा तू उभा तू असा पाठ मोरा
किती जन्म गेले त्वचेचे तमाला
तरी बाहुली रे जपे अश्रु खारा

कहाणी मनाची तुझा शब्द पाळी
मुक्याने वहातो तमी देहमेणा
जरा बाजुला घे कुणी अश्रुबुंथी
नवा जन्म येतो पुन्हा त्याच वेणा

कुठे दूर झाल्या तुझ्या पायवाटा
जळे उंबर्‍याशी दिवा रात रात
धुक्याच्या दिशेला खिळे शून्य दृष्टि
किती ऊर ठेवू व्यथा गात गात


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण
- १०-५-५९