पंडित शाहणा आला

पंडित शाहणा आला मनामधीं उलटा सुलटा आला जमाना । पाऊस म्हणतो कर्मेना । धरत्रीनें पीक टाकिलें अंतपारी दिसेना ॥ध्रु०॥

दुनयामधिं बंड मातलें जो बळी तो कानपिळी । सुलतानी अस्मानी राव ऐका एकच धुमाळी ।

मोमणानें माग टाकले शिपाई झाले साळी माळी । ज्या योनीला जन्म घेतला त्याची उद्धरली नाहीं कुळी ।

आपलें सांडी देवदंडी त्याला पुर्वेला येईना । आप आपल्यामधीं मर्जी ठेविती मोक्षपदाशीं मिळेना । पंडित० ॥१॥

कळावांतणीची झाली राळ बटकी झाल्या शिरोमणी । दे साळू वाण्याची घाण केली या मारवाडयांनीं ।

गुरुवांचें संधान बुडविलें महार या वाजंत्र्यांनीं । पाटीलपांडे घरीं राहिले पट्‍टी केली कुणब्यांनीं ।

पहा पासरी कितीक ध्यावी सवा हात खचली धरणी । पाऊस अंतरीं शाहाणा मग तो जाऊन बैसला कोकणीं ।

बाबन हकांचा महारधनी याला पुरविल्या येईना । भोपळ्यामधीं सत्व राहिलें तो पाण्यांमध्यें बुडेना । पंडित० ॥२॥

लेक म्हणे बापाला म्हातारा झाला याची शुद्ध गेली । सुन सासुची मर्जी ठेविना फिरुन बोलू ती लागली ।

शिष्य झाले मस्त गुरुची विद्या गुरुवर फिरली । गोरसाला कोणी पुसेना दारु महाग विकू लागली ।

पतिव्रता ही उपाशी मरती तिला मिळेना सावली । चंचल नार बांधीत असे नवें घर एक दरसालीं ।

ब्राह्मण जोशी लटके यांचा ठोका येईना । अनंतफंदी म्हणे गडयांनों ऐकुनि घ्यावे सुज्ञाना ॥३॥


कवी - अनंत फंदी

घर नको मला मी फार त्रासलें

घर नको मला मी फार त्रासलें । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण शपत आण मनीं उदासलें ॥ध्रु०॥

कोण भेटली मोहून फासले । वर्ष चार चुकुर नार नसे थार लाऊनि तार पहातो मासले । संगतीमुळें बेताल नासले ।

समजतात जरी येतात प्यादेमात कुच उरांत रसालले । सुबक ठेंगणी मुसमुसासले । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण० ॥१॥

भुलनिशा करी जसें द्रव्य हरवतं । टाकितें उसास जातो भास खास नाहीं सुखास विषय करवत । रात्र वैरिणी दिवस पर्वत ।

ठेवितें शीर बंधु दीर व्हा वजीर पैलतीर न धीर धरवत । साक्षी देतील आसपासले । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण० ॥२॥

अरुचि अन्न हें लागनें कडूं । हिंपुटींत जीब मुठींत हुटहुटीत कळवटींत पालथी पडूं । कधीं सखा सखी एकांतीं सांपडूं ।

सपन पडत उलट घडत कडकडत डाग पडत मळत का पडूं । गत कशी करुं मिळाले असले । नवती जान प० ॥३॥

निश्चय तिचा हिशोब गरतिचा । पावले दयाळ चंद्रमाळ रुंडमाळ व्याळ वेळ भरतीचा । मेघ वर्षतां उदय धरत्रीचा ।

धरुनि हात हांसत जात महालांत बेतबात पंचआरतीचा । चित्तवृत्तीनें सावकासलें ।

फंदी मूल करी कटाव नित घटाव सूर्यबिंब आज प्रकाशलें ।

नवती जान पतीची० ॥४॥


कवी - अनंत फंदी

हार तुरे तुला धीरा मी गुंफितें

हार तुरे तुला धीरा मी गुंफिते । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा धिरा धिरा तुझ्यावरी आधीं रंग शिंपितें ॥ध्रु०॥

होळिला तुम्ही घरीं असतां कधीं ? ॥ मी आपुल्या स्वहस्तें का निजमस्तकीं गुलाल फेकीन दयानिघी ।

रंग खेळणें होऊं द्या आधीं । मग हो सारे रात्र घेऊनि बसा मला तुम्ही रंगमहालामधीं ।

शरीर हें तुला आज वोपिंतें । नकोरे होऊं घाबरा तूं दिल भरा धिरा० ॥१॥

दध्धराजभरा लई दिसा आला । होऊनि स्थीर धीर धरी, अधीर नका वस्त्र तरी नेसूं द्या मला ।

क्षणभरी उशीर लागला । ठीक ठाक चाकपाक झाक साबना उद्यां दिदार चांगला ।

वेणी मोकळी चापचोपिनें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा० ॥२॥

चाहते तुझ्यावर रंग टाकीन । त्या हातें फुलले तेल रेलचेल करुन आंग मर्दीन ।

भरभरु मुठी गुलाल फेंकीन । गोकुळीं जसा श्रीकृष्ण फाग खेळतो तसें तुम्हा मी लेखीन ।

तो हरी जसा त्या प्रीय गोपीतें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा०॥३॥

बनून फाकडी राहिली उभी । रंग राग पाग खेळूनि तुफंग मार करितसे खुबी । खुप देखणी लहानशी छबी ।

चोळी तंग घे पचंग आंग संग करीं निसंग मग कोणा न भी । तुज मी आपल्या ह्रदयीं स्थापितें ।

छंद फंदी आनंदाचे कटिबंध ते प्रबंध यामुखें अलाफितें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा० ॥४॥


कवी- अनंत फंदी

तुज नाहींरे माझी काळजी

तुज नाहींरे माझी काळजी ॥ध्रु०॥

आपण तरि जीव द्यावा । नाहिं तरि शुद्ध हातामधिं घ्यावा विणा टाळ जी । तुज नाहींरे० ॥१॥

कोण मिळाली ठकणी । माझा रांवा उडविला गगनीं ।
केली राळ जी । झाली राळ जी । तुज नाहींरे० ॥२॥

कोण मिळाली विवशी । कोणीकडे नेला राजबनसी ।
पिटी भाळ जी । आपटी भाळ जी । तुज । नाहींरे ॥३॥

घरास आले फंदी । तेव्हां सुंदर चरणा वंदी ।
घाली माळ जी । सख्याला माळ जी । तुज नाहींरे० ॥४॥


कवी - अनंत फंदी

एका राजाला कन्या झाली

एका राजाला कन्या झाली तिच्या उरावर तीन थान । जाईल आंधळ्याची तिथें लाग लाविला कुबडयानं ॥ध्रु०॥

तेथोनाची वाईट झाली कोणी करिना मग तिजला । तिला एका आंधळ्याला देऊन आपल्याच गांवामधिं ठिवला ।

तिला एका कुबडयानं फितवलं रोज घरामधिं आणि त्याला । कवाड वाजतां आंधळा म्हणे घरामधि कोण आला ।

ती म्हणे कुत्रें आले घरामधिं बाहेर घालितें पिटून । अशी कुबडयाला रोज आणिती पुढें ऐका त्याचें कथन । एका० ॥१॥

एके दिवशीं कुबडा बोले तिथानिशीं ऐकतां । कोण येतो म्हून उगाच आंधळा । सारा वेळ लावितो कथा ।

हा मरतां म्हणजे बरें गडे होत । तुझा आपला संग बरा होता । कुबडयानें एक सर्प मारुन बाहेरुन आणला ताथा ।

तिथानीचे केला हवाला घाल याला रांधुनशेन । दे आंधळ्याला खाया म्हणजे जवळ आल याचें मरण । एका० ॥२॥

तेव्हां तो सर्प चिरुनशेन तवली ठेविली चुलीवर । आंधळ्याला शिजवाया बसविले कुबडा होई तिजवर स्वार ।

गतका आला तवलिला तेव्हां तो पाहे कानाच्या सुमार । जहराचा कडका जो बसला आंधळ्याचा नेत्रावर ।

जहराच्या कडक्यान डोळ्यांच्या टिकाच गेल्या उडून । पहा उलटयाच सुलटें झालें त्याला रक्षिता भगवान । एका० ॥३॥

डोळे उघडून पाहे आंधळा कुबढा आणि तीनथानी । कुबडा वरती खालीं दोहींच्या आंगाचें पाणी पाणी ।

जळत लांकूड घेऊन झणी आंधळा उठला तत्क्षणीं । कुबडयाला माराया चालला आंधळा आहे त्याचे मनीं ।

जळत लांकूड उचलून झणी त्यान घातलं कुडवण ।


कवी - अनंत फंदी

आषाढबन

इथलेच पाणी,
इथलाच घडा,
मातीमध्ये -
तुट्ला चुडा.

इथलीच कमळण,
इथलीच  टिंबे
पाण्यामध्ये -
फुटली बिंबे.

इथलेच उ:शाप,
इथलेच शाप,
माझ्यापशी -
वितळे पाप.

इथलीच उल्का,
आषाढ-बनात,
मावलतीची -
राधा उन्हांत.

दि. २३.१.५८, 

पाऊस

देवळाजवळचा ;
पाराजवळचा
पाऊस.
... देवळापलीकडचा
परापलीकडचा
पाऊस
सर्व ................................
......................................
........................................

पाऊस
रस्तोरस्ती
रस्त्याच्या पलीकडचा
पाऊस
रस्त्यात
सर्व काळोखात
वस्त्यात ....................................
...........................................
...........................................
आयुष्यात
गल्लीबोळात
जुनेरात
आठवणींच्या
पातळात
समईत ................................
........................................
पाऊस
डोळ्यांत
सर्व.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश