दुष्काळ २

उलटादमान आयाजी आया । सेवक खामींचें मानिना ॥ध्रु०॥

जिकडे तिकडे माजले टोळ । दुनियेचें वाटोळें झालें । मुलूख कुल उजाड हलकल्होळ ।

आंगावरती चमक्यांची ओळ । घालतील कुठवर हळदी बोळ । राहिना कोठें मकाला (?) डोळा ।

कार्लीं भेंडया वांगिं पडवळें । जसा माल बापाचा बापाचा । बांधिति मोटारे मोटा ।

सत्कर्माचा तोटा । समय खोटारे खोटा ॥उलटा०॥१॥

कलिमहात्म्य उफराटें । होऊं लागलें खर्‍याचें खोटें । खाटमार ऐकिलांत कोठें ? ।

ज्याला न भरवतीं आपुलीं पोटें । ते जसे मोंगलाचें बेटे । फिरवुनि ठेवितात पागोटें ।

महार पोरग्याच्या गळ्यांत गाठये । हुर्डा खाउनि बनले बेटे । फार माजले गांटे गोटे ।

उलटा दमाना आयाजी आया । सेवक स्वामींचें मानिना ॥२॥

धामधूम चोहोंकडेच गर्दी । पठाण कंपु आरब गारदी । जिकडे तिकडे फांसे पारधि ।

लोक मिळाले महा बेदर्दी । ज्याला मिळेना भाकर अर्धी । त्याला बसाया घोडी जर्दी ।

त्यासी बडेजाव आठ चांरदिं । सवेंचि झाली भाऊ गर्दी । तशामधें जे होते दर्दी ।

पार पडले मर्दामर्दी । दुनियेचा फुटाणा झालारे झाला । सेवक स्वामींचें मानीना ॥३॥

घर बिगारी भलताच धरावा । ब्राह्मण शूद्र शोध न करावा । जेथिल मुक्काम तेथेंच न्यावा ।

वस्त्रें घेऊन नागवावा । त्याला माघारा बोडका लावावा । त्याला दुसरा शिपाई भेटावा ।

त्याणेंच पुढें दामटत्वा । असा अवघि वेळ यावा जावा । ज्याचा गहूं हरबरा लुटावा ।

तोच बिगारी पुढें पिटावा । गांवकर्‍यांचा प्राण अटावा । पाटिलबाबा पळोनि जावा ।

गरिब एखादा हातिं लागावा । त्याचे मतें पाटिल बाबा । माराखालीं भोत भरावा ।

खंडणीचा ठराव ठरवावा । त्याचे जिवाला हा प्रळय झालारे झाला ॥सेवक स्वा० ॥४॥

हातांत भाला जेवूं घाला । कोण कुणाचा गुरु ना चेला । भलताच धमकावी भलत्याला ।

चोर दंडितो कोतवालाला । हा एक दाखला मिळाला पतिव्रता मुकली प्राणाला ।

शिनळ चढली लौकिकाला । सांगत फिरते ज्याला त्याला । एक जात टोपीवाला ।

मीं नाहिं भ्यालें पन्नासांला । अनंतफंदी सांगे जनाला । उलटा दमाना आयाजी आया । सेवक स्वा० ॥५॥


कवी - अनंत फंदी

जोरु कसमका कज्या

जोरु कसमका कज्या मुनो हाजा लढते फिरतेते ॥ बडा हजांबा खडा एकपर एक धबाधब गिरथेते ॥ध्रु०॥

खानोपिनेके तंगशाई येतोनाका दिननिकला ॥ माबापनो भलान किया मजपर रुटा हागतारा ।

साराघर दिनभुला खडू किबन हिकरता मुकाला । मयचरखेकेकमाई काहा लाग तुझे खिलाऊ नगदुल्ला ॥

पुढायतानें धरलिया सोसो येरझार करतिथे ॥बडा० ॥१॥

तुक्या कमाती फत्तर चुडयेल क्यो करती हाय हाय ॥ ऐसे लगकार जुया मारु एक बाल नहिरहने पाया ।

क्यापशम चरखेके कमाई हाम शिपाई हारगिसना खाया । दररकिब मारे तलबारा लोहखना खन तुटता जाय ॥

ये दुःख काल ककालेमे तेरे माबाप जगावे मरयेते ॥बडा० ॥२॥

सच कहुप्यारे सचकहु तुझे खुदाकी सौंगन कहा नौकरी रोताया ऐसा उलटा समया आया तिन दीन भुका मरथाता ।

तुझे तो रोटिका सपना औरतकुक्या खिलताया । मुये तुझेमे चाटु का हांडया धुके पिताया ।

तेरे सरीखे मेरे बापकु घरमे पानी भरतेथे ॥बडा० ॥३॥

रांडभांड बिछडीतो प्यारे फिर अबरु रहती कैसी । मरद आदमी झुटा होयतो नेक पतिव्रता जैसी ।

अनंतफंदीके छंद जैसे तलावमे कमल तिरथेते ॥४॥


कवी - अनंत फंदी

क्षीरसागरीचा हरी

क्षीरसागरीचा हरी पाहूं आल्या गोपी । अष्‍टनायका सोळा सहस्त्र तितक्या आटोपी ॥ध्रु०॥

जशी जिची भावना तसाच त्या रंगा । कोठें वेणी फणी न्हाणी धुणी नीत उठून हाच दंगा ।

तीचा योग जणुं भागिरथी गंगा । कोठें विलास अथवा कोणाघरीं मुनीं ब्रह्मचारी नंगा ।

एकांत लक्ष्मीकांत गेला झोपी । अष्‍टनायका सोळा सहास्त्र तितक्या आटोपी ॥१॥

करी थट्टा घटाला धक्का फोडी सुगडें । तरतरा पदर फरफरा फेडी लुगडें ।

गोपाळ मित्र नको मनांत लाजूं गडे । हें तुझेंच कवतुक वस्त्राआड उघडें ।

धर सुद दाट दहीं दूध लोणी ओपी । अष्‍टनायका सोळा सहस्त्र तितक्या आटोपी ॥२॥

वनीं धेनु चारितां कामळ हातीं काठी । माधवा थवा भोताला पशुदाटी ।

न्याहारीच्या बाहारी मग दहीकाला वाटी । खर्कटी बोटें आवडीनें देव चाटी ।

फंदी मूल म्हणे तुझी कळा तुला सोपी । नसे अंत कृतांता क्षणामधें चोपी ।

अष्‍टनायका सोळा सहस्त्र तितक्या आटोपी । क्षीरसागरीचा हरी पाहूं आल्या गोपी ॥३॥


कवी- सवाईफंदी

अक्रुर

अक्रुरा गोपी आक्रंदती हरीप्रति ठेवा । मथुरेशीं नको नेऊं पहारे मथुरेशीं नको नेऊं आमचा प्राणविसांवा ॥ध्रृ०॥

येऊन गोकुळी अवतरला दीनबंधु । तेपासुनि अवघे आनंदले गोपबंधू त्रैलोक्यामाजी दुमदुमिला आनंदु ।

हें क्षीर सागरिचें निधान ब्रह्मानंदु । हा भक्तांना कनवाळू गोकुळाबाई । अक्रुरा याविना गोपी धृतराष्‍ट्र न दिसे कांहीं ।

मथुरेशीं कसा नेतां समुद्रजावाई । या हरिवांचुनि आम्ही मृत्यु पावलों लवलाही । हा पुतनारी घननीळ हत्तीचा छावा । आमचा प्राणविसांवा ॥१॥

मथुरेशीं कंस कसा रिपु निर्मिला हरिचे साठीं । धाडिलें तुम्हातें आणावया जगजेठी । अक्रूर पण तुम्ही क्रूर भासतां पोटीं ।

निष्‍ठुर हा तुमच्या ह्रदयीं विषाच्या गोटी । आधीं समस्त गोपींचें प्राण वधावे । मग स्वस्तिक्षेम मथुरेशीं हरीला न्यावें ।

हरि गेल्यावर राहुन आम्ही काय करावें । म्हणुनि स्वहस्तें आम्हाशीं मारुनि जावें । या मुरारीचा दचका प्राणाशीं नसावा । आमुचा प्राण० ॥२॥

अक्रूर म्हणे पुरुषोत्तम सर्वां ठायीं । भरुनि उरलासे तुम्हाशीं ठावा नाहीं । हा जळिं काष्‍ठीं पाषाणीं शेषशायी ।

कंसालागी हरी हा वधील एके धाई । ही तुम्हास भासती याची लहान पराई । परि हा प्रळयाग्नि कैक बांधिल पायीं ।

हा सर्वांचा देह असुनि विदेही । गोपीहो तुम्हाला भ्रांत पडली एव्हां । आमचा प्राण० ॥३॥

अक्रुरा तुम्हि इतुकें बोललां असत्य । कळलें ये समयीं तूं कंसाचा भृत्य । वचनें ऐकुनी गोपी चित्तीं वनवास जाला ।

अक्रुरा काननीं कसें मोकलिलें गोपिकांला । जननी मृत्तिका फाकिती प्रयळ झाला । मालणी कैक प्राशिती विषाचा प्याला ।

फंदि अनंत म्हणे ह्रदयीं हरि बसवा । आमचा प्राणविसांवा । मथुरेशी नको नेऊं अक्रुरा पहारे । मथुरेशीं नको नेऊं आमुचा प्राणविसावा ॥४॥


कवी - अनंत फंदी

पति तर केवळ शुद्ध दांडगे

पति तर केवळ शुद्ध दांडगे घागरगडचे हंस जसे । पाणी वाहतां खटी पडल्या खांदी कावड डुल्लतसे ॥ध्रु०॥

चवला पुरती करी मजूरी कंबर बांधुनि हजीर जसे । अक्षरशत्रू 'ओनामासी' हें तव ठाउक स्वप्निं नसे ।

तंबाखूचा मोठा चाळा नाहिं मुखावर तेजकळा । दोटक्यांनीं भले दांडगे पाझर येइना खडकाला ।

परि निवळ फतर । पति तर केवळ० ॥१॥

तूं तर केवळ देवाघरची मुखरणी मध्यें श्रेष्‍ठपणीं । नाजुक साजुक कळी प्रफुल्लित पातळ पुतळी ठेंगणी ।

राजस गोंडस स्वहस्तकमळीं गौरवर्ण तनु देखणी । विशाळ डोळे बुबुळ कुळकुळित नाहिं कुठे तिळतुल्य उणी ।

शांत प्रकृती हास्यमुखी सुंदराकृती हो सदा सुखी । रंभा पाहुनि लज्जित होउनि तव गुणश्रवणीं पडति गळां ।

पति तर केवळ ॥२॥


कवी - अनंत फंदी

पंडित शाहणा आला

पंडित शाहणा आला मनामधीं उलटा सुलटा आला जमाना । पाऊस म्हणतो कर्मेना । धरत्रीनें पीक टाकिलें अंतपारी दिसेना ॥ध्रु०॥

दुनयामधिं बंड मातलें जो बळी तो कानपिळी । सुलतानी अस्मानी राव ऐका एकच धुमाळी ।

मोमणानें माग टाकले शिपाई झाले साळी माळी । ज्या योनीला जन्म घेतला त्याची उद्धरली नाहीं कुळी ।

आपलें सांडी देवदंडी त्याला पुर्वेला येईना । आप आपल्यामधीं मर्जी ठेविती मोक्षपदाशीं मिळेना । पंडित० ॥१॥

कळावांतणीची झाली राळ बटकी झाल्या शिरोमणी । दे साळू वाण्याची घाण केली या मारवाडयांनीं ।

गुरुवांचें संधान बुडविलें महार या वाजंत्र्यांनीं । पाटीलपांडे घरीं राहिले पट्‍टी केली कुणब्यांनीं ।

पहा पासरी कितीक ध्यावी सवा हात खचली धरणी । पाऊस अंतरीं शाहाणा मग तो जाऊन बैसला कोकणीं ।

बाबन हकांचा महारधनी याला पुरविल्या येईना । भोपळ्यामधीं सत्व राहिलें तो पाण्यांमध्यें बुडेना । पंडित० ॥२॥

लेक म्हणे बापाला म्हातारा झाला याची शुद्ध गेली । सुन सासुची मर्जी ठेविना फिरुन बोलू ती लागली ।

शिष्य झाले मस्त गुरुची विद्या गुरुवर फिरली । गोरसाला कोणी पुसेना दारु महाग विकू लागली ।

पतिव्रता ही उपाशी मरती तिला मिळेना सावली । चंचल नार बांधीत असे नवें घर एक दरसालीं ।

ब्राह्मण जोशी लटके यांचा ठोका येईना । अनंतफंदी म्हणे गडयांनों ऐकुनि घ्यावे सुज्ञाना ॥३॥


कवी - अनंत फंदी

घर नको मला मी फार त्रासलें

घर नको मला मी फार त्रासलें । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण शपत आण मनीं उदासलें ॥ध्रु०॥

कोण भेटली मोहून फासले । वर्ष चार चुकुर नार नसे थार लाऊनि तार पहातो मासले । संगतीमुळें बेताल नासले ।

समजतात जरी येतात प्यादेमात कुच उरांत रसालले । सुबक ठेंगणी मुसमुसासले । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण० ॥१॥

भुलनिशा करी जसें द्रव्य हरवतं । टाकितें उसास जातो भास खास नाहीं सुखास विषय करवत । रात्र वैरिणी दिवस पर्वत ।

ठेवितें शीर बंधु दीर व्हा वजीर पैलतीर न धीर धरवत । साक्षी देतील आसपासले । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण० ॥२॥

अरुचि अन्न हें लागनें कडूं । हिंपुटींत जीब मुठींत हुटहुटीत कळवटींत पालथी पडूं । कधीं सखा सखी एकांतीं सांपडूं ।

सपन पडत उलट घडत कडकडत डाग पडत मळत का पडूं । गत कशी करुं मिळाले असले । नवती जान प० ॥३॥

निश्चय तिचा हिशोब गरतिचा । पावले दयाळ चंद्रमाळ रुंडमाळ व्याळ वेळ भरतीचा । मेघ वर्षतां उदय धरत्रीचा ।

धरुनि हात हांसत जात महालांत बेतबात पंचआरतीचा । चित्तवृत्तीनें सावकासलें ।

फंदी मूल करी कटाव नित घटाव सूर्यबिंब आज प्रकाशलें ।

नवती जान पतीची० ॥४॥


कवी - अनंत फंदी