उपदेशपर फटका

शोध करीरे मना हरि भजनाविण अवघें वृथा ॥धृ० ॥

हरीभजनीं ठरला । तो यमाजीकडे न घरला । भवसिंधु त्यालाच वसरला । विठाईचीच मिठाई चाला ।

ह्रदयांतरी हरी संचरला । त्याच्या मग तो सेवेंचि तरला । यमदुतापासून विसरला । जो पंढरिनाथापायिं न विसरला ।

उत्तम जन्म जरा न घसरला । यमाजीचजा प्रयत्‍न हरला । ज्यांनीं विष्णु ह्रदयीं धरिला ।

तो नभीई अजका सर्वथा । शोध करीरे मना हरि भजानाविण अवघें वृथा ॥शो० ॥१॥

शाश्वत नाहीं करुं आजकाल । हरिभजनाविरहित जें शिकाल । तें कामी सर्वस्वें टिकाल । मोक्षाधिकारी व्हालच मुकाल ।

जितके हरीभजनाला चुकाल । तितके यमाजीकडे धकाल । ते समयीं मग अवघे थकाल । बळकट काढील यमाजी खाल ।

मग त्यापुढें तुम्ही काय बकाल । हरीच्या भजनीं मन हें विकाल । अनंत जन्म सुजन्य पिकाल । यापरता कैचा निकाल ।

तुम्ही जाणा गबाजी हाकाल । सांगितलें नाहीं मग चकाल । मग यमाजी बुकाल । कुंदी करील तेव्हां कसें टिकाल ।

केलें पातक तितकें वकाल । नामामृत घ्या धनवल छकाल । द्या सोडून या भाकडकथा ॥ शोध० ॥२॥

नामस्मरणीं होई चाटुकार । कर भगवज्जनाचा देकार । या कामास न व्हावें चुकार । परंतु सत्य याचा स्विकार ।

दुर होतील हे नाम विकाल । या गोष्‍टीचा नसावा नकार । कांहीं नलगे चकारपकार । फुकटामध्यें नामामृत स्विकार ।

सांपडल्यास न कीजे धिःकार । हातीं आला येवढा अधिकार । हरिहरी फोडित जा तूं वर । भगवान करील अंगीकार ।

सांगितलें तर याचा अंतर । नाहीं तरी माझे जाईल यकार । सत्कर्माची हुंडी स्विकार ।

फंदी अनंत करि हे प्रकार । तुज अर्पण दुर करि भवव्यथा ॥ शोध० ॥३॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

नरदेहामधिं येऊन नर हो साधन ऐसें करा जेणें भवसगर तरुनि सुखें व्हावें पैलतिरा ॥ध्रु०॥

संतारार्णवीं भिजा गडयांनो संसारार्णवीं भिजा । परंतु परमार्थ साधनातें साधा यांतच मजा ।

परनारीधन त्यजा गडयांनो परनारी० ।

मदमत्सर मीपणा सहित द्या तमोगुणाला रजा । भाव न ठेवुनि दुजा । गडयांनो० ॥

अकपट होऊनि थोर लहाना समदृष्‍टीनें पूजा । अन्यायपथें न जा ॥ गडयांनो० ॥

सदसद्विचार करुनी लोकीं सत्कीर्तींनें सजा । कोणा नच द्या इजा ॥ गडयांनो० ॥

परि आश्रय दुःखितांस द्याया तन मन धनें झिजा । संकटसमयीं धजा ॥ गडयांनो० ॥

सत्यवचन राखण्यास न ढळा कथितो ह्या हितगुजा । व्हा सावध नचि निजा ॥ गडयांनो० ॥

पळ घटका प्रहर दिवस, यांहीं होतें आयुष्य होतें वजा । जगदिशाला भजा ॥ गडयांनो० ॥

अनंतफंदी म्हणे तोचि मग तारिल देऊनी करा ॥१॥नरदेहामधि० ॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

येउंदे वाचें नाम देवाचें अष्टौ प्रहरा शिव हर हर हर ॥धृ०॥

दे टाकुनि हे छंद वावुगे फंद विषयाची काय मजा ॥ हरिनामाची लावी ध्वजा ॥

असार हा संसार त्यजा ॥ तमोगुणाला देच रजा ॥ रजसत्वाची करी पुजा ॥

क्षमा शांति मनिं धरीत जा । भगवीं वस्त्रें करी पोटभर भिक्षा मागें घर घर घर ॥येउंदे० ॥१॥

परोपकारा शरीर झिजवावें जैसा मैलागिरी चंदन ॥ कर सज्जन चरणीं वंदन ॥

सा शत्रूंचें करि कंदन ॥ गृहवैभव वाजी स्यंदन ॥ अशाश्वती ह्या हो धुंदन ॥

आठवी मनीं दशरथनंदन ॥ अनंतफंदी ह्मणे घालीं विठ्‌ठला गरके गर गर गर ॥ येउंदे० ॥२॥


कवी - अनंत फंदी

उपदेशपर फटका

देसोडुन तरी फंद वाऊगे-विषयाची तरी काय मजा । हरिनामाची लाव ध्वजा ।

पंढरीस कार्तिकी आषाढी दुवक्ता-येत जातजा । असार हा संसार त्यजा ।

तमोगुणाते द्यावी रजा । रजसत्वाची करी पुजा । क्षमाशांती मनीं धरीतजा ।

भगवीं वस्त्रें करुनि पोटभर भिक्षा मागे घर घर घर । येऊंदे वाचे अष्‍टौप्रहर कीं हर हर हर ॥१॥

वाहते गंगेंत हात धु आलबेली भली भलाई कर मग मर । ईश्वर भजनीं निमग्न राहावे विषयांतरीं वासना नको ।

नामामृत महामुर पिको । सहाणेवर मैलागिरी चंदन देह झिजो यमयातना चुको न चुको । भवपाशाशी मुको न मुको ।

सांगितले हे शिको न शिको । भजनाकडे झुको न झुको । धन ज्याला मृत्तिका तोची साधु, यम कापे थर थर थर ॥२॥

सोदे शिकविती चढी लावितील त्यांच्या नादी न लागावें । ईश्वरभजनीं जागावें ।

कामक्रोध मद मत्सर मोहो लाभ या साजणांशीं सांगावें कीं तुम्ही मार्गीं वागावें ।

असार तितके नागावे । सार असेल तें घ्यावें । जाणे मोक्षपदाशीं झर झर झर ॥३॥

भाव धरुनि मनीं हरीहर । म्हणशील तरी चुकेल चौर्‍यांशीचें चकर । ईश्वरपाई हा नीटकर ।

नरदेह धुतला पवित्र शेला उडून जाईल जसा सकर । दुसरा धंदा काहीं नकर । धर बळकट देवाचें शिखर ।

त्यामध्यें राहील तुझा वकर । अनंतफंदी म्हणे घाल विठ्‌ठलाशी घिरटया गर गर गर ॥४॥


कवी - अनंत फंदी

संध्येंतील चोवीस नामांवर

अनंत भगवंताचीं नामें त्यांतूनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥धृ०॥

केशवकरणी अघटित लीला नारायण तो कसा । जयाचा सकल जनावर ठसा ।

माधवमहिमा अगाध गोडी गोविंदाचे रसा । पीत जा देह होइल थंडसा ।

विष्णु स्मरतां विकल्प जाती मधुसुदनानें कसा । काढिला मंथन समयीं जसा ।

वेष घरुनि कापटय मोहिनी भाग करि निमेनिम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगबंताचीं नामें त्यांतूनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥१॥


त्रिविक्रमान त्रिताप हरिले भक्तीचे सर्वही । वामनें दान घेतली मही ।

श्रीधरसत्ता असंख्य हरिती दुष्‍टांचे गर्वही । वंदिल्या ह्रुषिकेशाच्या रही ।

पद्मनाभ धरियेले तेथुनि देव झाले ब्रम्हही । दामोदरें चोरिलें दहीं ।

गाती मुनिजन नारद तुंबर वसिष्‍ठादि गौतम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगवंतांची नामें ॥२॥

संकर्षण स्मरतांना षड्रिपु नाशातें पावती । स्मरारे वासुदेवाप्रती ।

प्रद्युम्नाचा करितां धावा गजेंद्र मोक्षागती अनिरुद्ध न वर्णवे स्तुती ।

क्षीरसारगरिंचें निधान पुरुषोत्तम हा लक्ष्मीपती । स्मरारे अधोक्षजातें प्रती ।

अपार पापें स्मरतां जाती वाचे पुरुषोत्तम । गाइल्या उद्धरती अधम । अनंत भगवंताचीं ० ॥३॥

प्रल्हादाचे साठीं नरहरि स्तंभी जो प्रगटला । अच्युतें कालनाथ मर्दिंला ।

जनार्दनाची अघटित लीला कीर्तनीं ऐकूं चला । उपेंद्रा शरण जाई तो भला ।

हरिहर स्मरता त्रिबार वाचादोष सर्व हरियला । गोकुळीं कृष्णनाथ देखिला ।

रामलक्ष्मण म्हणे तयाच्या नामें गेला भवभ्रम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगवंताचीं नामें त्यांतुनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥अ० ॥४॥


कवी - अनंत फंदी

बाजीराव कारकीर्द

दुनयेला तिळमात्र उपद्रव काडी नसावा । उलटा सुलटा आया जमाना आतां कधीं चक बसावा ॥ध्रु०॥

दुनयेमध्यें लोक बांडे अनर्थ मोठा करतात । शेत कापुनि त्या कुणब्याचें त्याला बिगारी धरतात ।

वड पिंपळ तोडुनि मोकळे केवढे धर्म आचरतात । घरांत कडबा असला म्हणजे महार पोर आंत शिरतात ।

हत्ती घोडे उंट बैल खुप सलिदा कसावा । मालधन्यानें उगाच आपला पाहत तमाशा बसावा ।

घ्या घर तुमचें दुनयेला तिळमात्र उपद्रव काडीमात्र नसावा । उलटा सुलटा आया जमाना आतां कधीं चक बसावा ॥

नल पिंगल दो सवत्सर हुमजुसकु दुख पैदा । दोदिन घरमे चुप बैठो हाय हुवाजी तुमकु बैदा ।

आपने दिलकी क्या खबर हये तुम कहते बैदा बैदा । सचे आदमी भुके मरते झुटा खावत हय मैदा ।

देऊन दस्ता खांद्या वरता फिरुन सोटा धरावा । देख आगाऊ चलना यारो घेऊन द्याना विसावा ।

लई शीण झाला । दुनयेला तिळमात्र० ॥२॥

खेडीं पाडीं भलताच लुटितो कुणब्याचा जीव उदासला । सुपें टोपलीं बिगार वाहतां बाहतां बिट्टा वासला ।

ज्याच्या घरावर हल्ला तो कुणबी ओझ्यानें त्रासला । चल तेरे जोरुकु चोदु देऊं धक्का पाडूं पासला ।

शरिराची अवघी अवस्था भगवंताला पुसावी । मारी सोटे घेतो झोले बैल भाडयाचा कसावा । चल पळ मोहरं ॥३॥

मागें जाणे जोशी सांगत होते राजीक होईल । रक्ताचे पूर वाहतील नवी मुद्रा उभी राहील ।

कुणी कुणाचें नोहे अति एकंकार होईल । येतील टोपीवाले अशी कांहीं दिवस झुळुक वाहील ।

झाले बाजीराव धणी आतां पृथ्वीला आनंद असावा । जुने मुत्सदी घरीं बसविले दोन दिवस घ्या विसावा ।

लई शिण झाला ॥दुन० ॥४॥

शिपाई थेसो फर्जी हो गये आपने आपने जगा मगन । लाल अखिया कहर कहर उसे रह्मा दो बोटं गगन ।

चल पाटील थोडा जलदी लाव देऊ धका पाडूं सदन । चल तेरे जोरुक चोदु खडा रहे व क्या होवे अलग ।

करो खुदाकी बंदगी यारो उचे मालसे बिकावोंमे । फंदी अनंद कहे उलटी दुनया । किदरसे शिकशिकावोंगे ।

मै चुप बैठ० ॥५॥


कवी - अनंत फंदी

नको जाऊ बाहेरी

नको जाऊ बाहेरी गोर्‍या आंगाशीं लागेल ऊन वारा । बिसणीच्या पलटणी उभे पाहावयास जग सारा ॥धृ०॥

पाई बिचेव पोल्हारे जोडवीं नाद अवघे एकवटले ॥ मांडयांचें गोरेपण पाहून सपेटित मागें हाटले ॥

नाषुक गोरे गाल घडीग परटाची जरा नाहीं मळकटले ॥ इतर स्त्रियांचे मुखडे मज भासती तुझ्या पुढें कळकटले ॥

बहु नाजुक पुतळी झराझर चालण्याचा झटकारा ॥ जशी तोफेवर बत्ती हत्तीच्या पावसाचा फटकारा ॥ नको० ॥१॥

हातीं हिर्‍यांच्या मुद्या चमाचम जसें चांदणें फटफटलें ॥ ऐसी वस्तु कधीं लाधल मनामधी कैक विलासी लठपटले ॥

लज्जीत मृग जाहले पाहतां मनामध्यें चटपटले ॥ इतर स्त्रियांचे मुखडे मज भासती तुझ्यापुढें कळकटले ॥

होट पवळीचे वेल वोट चवळीच्या सेंगा बहुतशिरा ॥ दंत शुभ्र शोभिवंत काळ्या दातवणांच्या मधीं चिरा ॥ नको० ॥२॥

मस्तकी मुदराखडी झोंक वेणीचा थरारी भुजंग जसा ॥ वदनचंद्र न्याहाळी हातीं घेऊन अरसा ।

बालोबाल ग मोती गुंफुनी रेखून भांग करिती सरसा । अटकर छाती सुंदुक त्यावर कुच कंदुक भरला तरसा ॥

सरळ नाक तरतरीत नित्य भरजरीत डुब आलबेली तर्‍हा । तुलाच पाहून भुललों नारी कलम करिना धरी चिरा ॥ नको० ॥३॥

चंद्र तुझा पहा मुखचंद्रावर येउनिया बैसला कसा । प्रत्यक्ष मज भासतो फणीवर त्या नागाचा मणी जसा ।

शब्द तुझा ऐकूनि कोकिळा पांगल्या त्या दाही दिशा । न दाखवी गडे सिंहकटी पाहून झाला हिंपुष्‍टा ।

फंदी मुलाचे छंदबंध कुठवर गेला तर्ख धरा । दिल्लीच्या ह्या पलिकडे बोभाटे झाले हे पोबारा ॥ नको जाऊं० ॥४॥


कवी -अनंत फंदी