खर्ड्याच्या लढाईवर पोवाडा

श्रीमंत सवाई नांव पावले । दिव्य तनू जणुं चित्र बाहुलें । विचित्र पुण्योदरीं समावले । नानातें राज्याचे अवले ।

विधात्यानें नेमून ठेविले । बसल्या जागा कैक छपविले । उन्मत्त झाले तेच खपविले । अति रतिकुल दोरींत ओविले ।

जगावयाचे तेच जगविले । तमाम शत्रू मग नागविले । तपसामर्थ्यें येश लपविलें । दिल्ली अग्र्‍या झेंडे रोविले ।

अटक कर्नाटकांत भोंवले, जिकडे पहावें तिकडे उगवले, माधवराय पुण्याचीं पावले, टिपूसारखे मुठींत घावले, मेणापरिस मृदु वांकविले ।

सवाई तेजापुढें झांकले । पुण्य सबळ उत्कृष्‍ट फांकले । नानापुढें बुद्धिवान चकले । कैक त्यांची तालीम शिकले ।

तरि ते अपक्व नाहीं पिकले, दहा विस वर्षें स्वराज्य हांकिले, श्रीमंताचें तक्त राखिलें , अक्कलवंत कोठेंहि न थकले ।

श्रीमंत गर्भीं असतां एकले, नानांनीं राज्य ठोकुनि हाकिले, माझे करुनि महाभाव केलें, जहाज बुद्धीबळ जवकले,

यावत्काळ पावेतों टिकले, श्रीमंत पाहून धनुवर छकले, छोटेखानी कैक दबकले, जे स्वमींचरणास लुबकले, ते तरले वरकड अंतरले,

जे मीपणांत गर्वें भरले, ते नानांनीं हातिं न धरलें, ते साहेबसेवेंत घसरले, मग त्यांचें पुण्योदय सरलें, न (?) जन्मले माते उदरीं,

घाशिराम कोतवाल त्यावर उलथून पडली ब्रम्हपुरी । सवाई माधवराव सवार भाग्योदय ज्यांचे पदरीं, यशवंत श्रीमंत पेशवे अपेश तेथें पाणी भरा ॥१॥
श्रीमंताचें पुण्य सबळ कीं, न्यून पडेना पदार्थ एकहि, महान्न झाले भिन्न मनोदय खिन्न करुनी, शत्रूचीं शकलें मध्यें एक चिन्ह उद्बवलें,

नबाब झाला सिद्ध करु म्हणे, राज्य आपण पृथ्वीचें सारे, गलीमाचे मोडूनि पसारे, वकील धाडुनिया परभारे, हळुच लाविले सारे दोरे,

म्हणे युद्ध करा धरा हत्यारें, त्यामुळें वीरश्रीच्या मारे, शहर पुण्याच्या बाहेर डेरे, गारपिरावर दिधले डेरे, श्रीमंतांना जयजयकारें,

होळकरास धाडिलें बलाउन, छोटे मोठे समग्र येऊन, वडिलपणानें जय संपदा, पाटिल गेले ते विष्णुपदा, जबर त्यांची सबसे ज्यादा,

गादीवर दवलतराव शिंदा, बहुत शिपायांचा पोशिंदा, त्याच्या नांवें करुनि सनदा, लष्करि एकहि नाहिं अजुरदा, त्याचे पदरचे जिवबादादा,

सुद्धां आणविलें, परशरामभाऊ मिरजवाले, नागपुरांकडुन आले भोसले, बाबा फडके, आप्पा बळवंत, बजाबा बापू, शिलोरकर माधवराव रास्ते,

राजे बहादर, गोविंदराव पिंगळे, विठ्‌ठलसिंग आणिक देव रंगराव वढेकर, गोडबोले, राघोपंत जयवंत पानशे, मालोजी राजे, घोरपडे,

दाजीबा पाटणकर, अष्‍ट प्रधानांतील प्रतिनिधि फाकडे मानाजी मागुन आले, चक्रदेव नारोपंत भले दाभाडे, निंबाळकर हे उभेच ठेले,

रामराव दरेकर चमकले, वकील रामाजी पाटिल सुकले, मग याशिवाय चुकले मुकले । कोण पाह्यला गेले आपले ।

तमाम पागे पतके बेरोजगारी घेउनि कुतुके । अचाट फौजा मिळूनि आले, वळून गेले । जुळून संगम झाला, तीलक्षाचा एकच ठेला,

त्यामधिं नाना ते कुलकल्ला, होणारी शंकर नानाला, बंदुखानी तोफा गरनाळा, वाद्यें रणभेरी कर्णाला, गणित नाहीं शामकर्णाला,

मरणाला नच भीती घोडे, पुढें धकाउनि नानासहवर्तमान पुण्यांत आले, राउत तमाम दुनिया आली, पाह्याला, कन्हया माधवराव फुलाचा झेला,

पेशव्यांनीं कुच केला, सवेंचि मोंगल सावध झाला, याचा त्याचा पाण्यत्वरुनी तंटा झाला, तो तंटा त्यानिंच वाढविला, श्रीमंतांनीं करुनि हल्ला,

घ्या घ्या म्हणून कैक धुडाउन, दिले लुढाउन मोगल गोगलगाय करुनिया, पृथ्वी देईना ठाय, मोकली धाय करित हायहय,

तेव्हां लेंकरा विसरली माय, प्रतापी सवाई माधवराय, मोंगल त्राहे त्राहे करितील माय, करुनि सोडविला गनिमाचा वरपाय,

कैक दरपानें खालीं पाहे, किं सर्पासंनिध उंदिर जाय, असा मृदु मोंगल केला, शरण आला मग मरण कसें चिंतावें त्याला,

उभयतापक्षीं सल्ला झाला, पुढें मग महाल मुलुख कांहीं देतो घेतो श्रीमंताला, ते आपल्याला, कोण सांगतो आतां पुढें जे उडेल

मातु तेव्हां कळेल कीं अमके महाल, अमकी धातु अमकी पांतु, नबाबावर रहस्य राखुनि रंग मारला, पुढें ठेविली अस्ता, रस्ता

धरुनि पुण्याचा थाट दुरस्ता, नबाबावर कंबरबस्ता फिरुत आले वळून एक एक नानापरिच्या वस्ता, स्वतां दाणा पाणी

वाद्यांसहवर्तमान मश्रु मुलुख कैद करुनियां, श्रीमंतानीं कारागृहीं ठेविला, येथुनि पवाडा समाप्त झाला, सब्‌ शहरीं संगमनेरी

फंदी अनंत कटिबंद छंद ललकारी, श्रीमंता दरबारी । सवाई माधवराव सवाई भाग्योदय ज्याचे पदरीं । यशवंत श्रीमंत पेशवे अपेश तेथें पाणी भरी ॥२॥


कवी - अनंत फंदी

पोवाडा - पटवर्धन सांगलीकर

वसविली सांगली । चिंतामणरायें चांगली ॥ध्रु०॥

सर्वांचा मुकुटमणी । मुख्य पटवर्धन चिंतामणि । कर्ममार्गामाजी सुलक्षणी । सर्व यजमानची मनास आणी ।

वचन जें निघेल तोंडातुनि । करावें मान्य सर्वत्रांनीं । दालतीचा खांब मुख्य स्थानी । आज्ञा त्याची कोण न मानी ।

किल्ला सांगली राजधानी । प्रज्ञा उभी जोडून द्वयपाणी । ज्याला जितुकें पाजतील पाणी । त्याला पिणें प्राप्त मुक्यानी ।

लौकिक त्याचा जगत्र वानी । शिपाई मूळचे पुण्यप्राणी । गजानन ज्याचा पक्ष धरोनि । करीत संरक्षण संतोष मानी ।

कानीं नित्य पडावें गानीं । गायन करिती महा महा गुणी । विणे पखवाज कितीक कोण गणी ।

कुशल ज्या त्या ममतेशील धनी । न लागे जेथें किंचित पाणी । तेथें प्रभु यत्किंचित खणी ।

पाणीच पाणी रानोरानीं । किल्ल्याची कीर्ति जग वाखाणी । चुंबित गगन मनोरे गगनीं । कोटांत कोट बाहेरुनि ।

सभोंता खंदक मग रेवणी । वेष्‍टिला वरुनि चिल्हारीनीं । चहुंकडे कीर्ति फाकली । वसविली सांगली ॥१॥

भक्ति गजाननाची भारी । तो मोरेश्वर देतो उभारी । चिंतामणी सर्वांला तारी । जेथें बिघडेल तेथें सवारी ।

चिंतामणीची चिंता वारी । धार्मिक अधर्मास धिःकारी । पटवर्धन जाणती संसारी । घालिती उडयाच जैशा घारी ।

फते केल्याविण माघारी । उलटोनयेची मारी मारी । म्हणावे हेंज मनांत खुमारी । ऐसे थोडे पुरुष अवतारी ।

वडिला वडिलीं नामधारी । सप्त पिढया लौकिक उद्धारी । वृत्ति धर्मा जागली । वसविली ॥२॥

खेरीज बाहेर पुरे । वसविले एकाहुन एक सरे । बंदोबस्ती गस्ती पाहरे । लोक खुखवस्ती बांधूनि घरें ।

एक राहती स्वस्थ नांदती बरे । कौल सर्वांला ताकीद फिरे । धन्याची आज्ञा नांदा कींरे । शिवालय देवालय सुंदरे ।

घाट बांधुनिया कृष्णातिरे । आंत भरचक्का चुनारचिरे । कृपा केली श्रीमोरेश्वरें । प्यसामुग्री भागली । वसविली सांगली० ॥३॥

शेंकडो चारी दुकानदार । जोहोरी बोहोरी शेटे सावकार । रुमाली रस्ते बांधून चार । बनविला बाग चांगला फार ।

आंत मांडव द्राक्षांचे गार । सुरुची झाडें मनोहर । फुलें हरजिनशी अपरंपार । पाचदवणा मरवा कचनार ।

गुलाब चमेली गुले अनार । मोतिया मोगर्‍यांचे हार । सोनचाफे मकरंद बहार । गणित करतांना वाटेल फार ।

म्हणुनि सांगितले सारासार । आंत उमराव जुने सरदार । अश्वरथ गाडया कुंजर बहार । पालख्या शिवाय घोडेस्वार ।

तलावे देती चक्राकार । दुपेटे शेले भरीजरतार । एकापरीस एक दवलतदार । भले लोक संग्रही धनदार ।

पुण्य त्या चिंतामणीचें सारें । मुख्य सवाला तोच आधार । दानधर्माला बहुत उदार । आल्या गेल्याचा आधीं सत्कार ।

कल्पनाबुद्धीचे भांडार । न लागे ज्याचा अंतनापार । पाहिले हें पक राजद्वार । विवेकी बिचार सारासार ।

कविता अनंतफंदी करी । ताल सुर नमुदा लागली । बसविली सांगली० ॥४॥


कवी - अनंत फंदी

महेश्वर शहरावर

नाहीं पाहिलें पारखें महेश्वर क्षेत्रपुर ॥धृ०॥

नर्मदा निकट तट घाट । बहुत अफाट । पायर्‍या दाट । चिरे वाट । मुक्तीचीं शिवालयें ।

कैलास साम्यता नानापरिची रचना रचिली । रामकृष्ण मंदिर । बहुत सुंदरें । बांधिलीं घरें ।

रमे रमणूक हवेल्या । नयनीं पाहिल्या । नूतन थाट । प्रताप अहिल्या । किल्यावर तळवटी ।

शहर गुलजार । बहुत बाजार हारज । दुकानें लक्षापति सावकार ।

भारी भारी माल खजीना रस्ता खस्ता सुकाळ नाहीं दुष्काळ बाल वृद्ध प्रतिपाल करीती ।

गरिब गुरिब कंगाल गांजले । अडले भिडले । त्या देखुनियां अन्नछत्र सरी सारखे ।

नाहिं पाहिलें नयानें पारखे । महेश्वर क्षेत्र पूर ॥१॥

दानधर्म करी नित्य शिवार्चन । सत्वशील ऐकुनी धांवती । देशोदेशींचे कर्नाटक । तैलंग द्रावीड ।

वर्‍हाड कर्‍हाड । कोल्हापूर, कृष्णातीर, गंगातीर । कोंकण काशीकर ।

गयावळ, माळवे बिरांगडे येती कावडे, वेडे बागडे । गुजराथी मैथुलीपुरी । भारती दिगंबर जटाधारी ।

बैरागी योगी कानफाडे दर्शना येती । हरिदासाचे प्रेमळ भक्त सांप्रदाय पुष्कळ पाहिले नयनीं । सर्व महेश्वर क्षेत्रपूर ॥२॥


कवी - अनंत फंदी

बाळासाहेब पटवर्धन मिरजकर

प्रतापी बाळासाहेब पुण्यश्लोक मुखी सर्वत्रांच्या । हेचि ऐकण्यांत आले बहुधा कानीं प्राणिमात्रांच्या ॥ध्रृ०॥

मोठया परि मोठयाशीं भाषणें लहान्याशीं बोलून बरें । जिंकून बसविले तिकून साजिरे अष्‍टपैलू चौकून चिरे ।

दयावंत बुद्धिवंत चतुर साधारण वचनाचे खरे । रयतेचे कनवाळु सभोंवती गजाननाचें चक्र फिरे ।

आल्याचा सत्कार करिती भेटी घेती सत्‍पात्राच्या ॥प्रतापी० ॥१॥

सभोंताला खंदक किल्ल्यामध्येंच उंट घोडे हत्ती । झडत असे चवघडा पदरचे भले लोग त्यांतच राहती ।

बागबगीचे नानापरीचे हवा लहान मोठे पाहती । शिवाय आणखी घाट बांधिला दक्षिणेस कृष्णा वाहती ।

लोकवस्तीची कीर्ति वाखाणती गोविंदपुत्राच्या ॥प्रतापी० ॥२॥

मुख्य दैवत समनामिर दैवत जागृत बस्तीचा वाली । तेथ उपद्रव होऊं न शके पीर मिरजेचा रखवाली ।

तशांत शूर पटवर्धन बाके कीर्ति जघन्यांत झाली । भयाभीत जो होऊनि आला त्याला पाठीशी घाली ।

तृणप्राय परशत्रु जैसा उभ्या बाहुल्या चित्राच्या ॥प्रतापी० ॥३॥

बस्ती अतिगुलजार फार बाजार भरे बृहस्पतवारी । शनवारामध्यें चौक तेथें जोहारी बोहारी ।

व्यापारी राफाचारी तमाम इमाम रस्त्याशेजारी । उदमाची घडामोड होतसे बजान पट्टेकझारी ।

अनंतफंदीचे छंद जखमा जशा जिव्हारी शस्त्राच्या
॥प्रतापी० ॥४॥


कवी - अनंत फंदी

राघोजीराव आंग्रे सरखेल

धन्य सवाई सरखेल राघोजीराव मुख्य अधिपती । कीतीक त्या तेजापुढे लोपती ॥ध्रु०॥

पूर्वी कोण्या पूर्वजाने समयी शत्रु सैन्य पळवुनी । सर्व साकल्य हुजुर कळवुना ॥

महाराजांचे प्रसन्न मन ते आपल्याकडे वळवुना । आले संकट सारे टळवुनी ।

श्रम साध्य सरखेलपणाचे अक्षय पद मिळवुनी । टाकिले दरिद्र दुर खिळवुनी ॥

चा० त्या वंशामध्ये जन्मले ॥ राघोजीराव चांगले ॥ भले मर्दुमिने शोभले ॥ चा०

जळात आणि प्रांतात ज्याला रिपु थर थर कापती । येउन अपराधी पाई लागती ॥१॥

नूतन विसा बाविसात उंबर स्वरूप शाम सुंदर । चढाइत घोड्यावर बहादर ॥

स्वता करवली करून मागे मारितात चादर ।

शूर कर जोडिता एकंदर ॥ कलगि तुरा शिरपेच झळाळित कडी कंठी नादर ।

हजारो जन करिती आदर ॥चा० गर गर भाला फिरविती ॥

राव पहिलवान हरविता ॥ गवयांचे गर्व निरविती ॥ चा० प्रवीण गाण्यामधे टाकिती साजावर थाप ती ।

सूर स्गीन विणे वाजती ॥२॥

स्वारी निघे कडकडीत भयंकर आरब किंकाळती । वारुमधे कोतल चौताळती ।

स्वार पिच्छाडिस मांड बरोबर दाटित संभाळती ।

हात हलतंच हुकूम पाळती ॥ दोहो बाजूस मोरचले मिजाजित रायावर ढाळती ।

पाहून मुखचंद स्त्रिया भाळती ॥चा० पुढे बल्ल बाण चालती ॥ भालदार मधुर बोलती ॥

खावंद मोठे मसलती ॥चा० धनि दिवाण साहेबास शंकरे दिली संतत संपती । ठेंगणी भुय आटीव आकृती ॥३॥

उदार गजराबाई सदोदित हास्यानन मावली । असले पुत्र सती प्रसवली ॥ उभय लौकिक रक्षुन जगात ध्वज लावली ।

हीच महायात्रा घरी पावली ॥ अशा कल्प वृक्षाची पडावी किंचित तरी सावली । जडो हे मन त्यांचे पावली ॥ चा०

मर्जिनरूप जे वागती ॥ झाले वर्तमान सांगती ॥ नंतर निरोप मागती ॥चा०

जलदी किती कामाची हुशारित चक्रापरि तळपती । जेव्हा तेव्हा हत्यार चमके हाती ॥४॥

ताईसाहेब भाग्याची पुत्र आणि पौत्रादिक साजती । श्रीमंतिणी स्त्रियात सुविराजती ॥ अनेक राजद्वारी अखंडित जय वाद्ये वाजती ।

विप्र मंगल घोष गर्जती ॥ राज्य असुन तर लहान मुल्खो मुलुखी कीर्त गाजती । नाव ऐकुन धनाढ्य लाजती । चा०

किती छत्रामधे जेवती ॥ किती घरीच अन्न सेविती ॥ किती कामावर ठेविती ॥ चा०

किती कारकुन लिहिणार किती कर जोडितात दंपती । दया येई मग मातुश्री प्रती ॥५॥

नित्य दान काही पुराण समई गान होतसे । सदा सत्काळ यात जातसे ॥ काय कोठे कमी जास्त सती ते सर्व स्वता पहातसे ।

खबर पर राज्यातिल येतसे ॥ चा० नाही राज्यामधे तस्कर ॥ हे जनास श्रेयस्कर ॥ भोगिती सुख सोयस्कर ॥ चा०

घरोघर गाती गीत जास्त नाही रयतेवर बाबती । शिरस्ते कदीम तेच चालती ॥६॥

सदैव मुक्तद्वार कुलाबा गरिबांचे माहेर । जसे तप साधनास बेहर ॥ श्रीमंत गेल्या पसुन मिळेना अन्न कोठे बाहेर ।

म्हणुन झड घालितात लाहेर ॥ वस्त्र पात्र येई शिधा हेच ह्या सरखेलांचे हेर । उचीच नव्हे शब्दांचा आहेर ॥ चा०

पहा पहा राजांचे मुख ॥ उभे रहा क्षणभर सन्मुख ॥ होइल दरिद्र विन्मुख ॥ चा०

प्रपंच कल्याणार्थ कराया प्रभूस विज्ञापती । सौख्य पावाल सर्व निश्चिती ॥७॥

मंत्री विनायक परशराम ते बुद्धिचे सागर । सर्व गुणी विद्येचे आगर । भुजंग राजे भुलती सुवासिक दिवाण मैलागर ।

राजकारणी एक नट नागर ॥ येती किती दर्शनास ब्राह्मण आणि सौदागर । रात्री हरहमेश होई जागर ॥ चा०

मुळी पुण्यवान ते धनी ॥ कारभारी तसे साधनी ॥ गंगु हैबती कवी शोधनी ॥ चा०

महादेव गुणी म्हणे प्रभाकर क्षेम असो भूपती । न्यहाल कधी करतिल सहजोगती ॥८॥


कवी - अनंत फंदी

नाना शंकर शेट

दैववान नाना शंकर शेट विजाति । केली केवढी उभय वंशात उभयता ख्याती ॥ध्रु०॥

ना कळे कोणाला विचित्र हरिची माया । क्षणमात्रे दीनावर लावील छत्र धराया ॥ बाबुल शेटिवर पडली कृपेची छाया ।

ते पुण्यवान ती धन्य पवित्र जाया ॥ शंकर शेट आले पोती किर्त कराया । झाली प्राप्त अचल लक्ष्मी आरोग्य काया ॥चाल॥

वाढली मान-मान्यता जगामध्ये मोठी ॥ पाहिल्या पडे श्रम केवळ धनाची कोटी ॥

नावडे गोष्ट कल्पांती कोणाची ओती ॥चाल॥

कडकडीत कठीण मर्जी । जसा फर्जी निर्भय गर्जुन बोले ॥ संतत संपत अनुकुळ । नाही प्रतिकुल । या भरपणांत डोले ॥

बाच्छाय आपल्या घरचे । लाल हरीचे । त्या योग्य तसे तोले ॥चाल॥

बहु बळे संपदा मिळवली ॥ मुळापासून औदसा पळवली ॥ विष्णु सहित लक्ष्मी वळवली ॥चाल॥

अहा रे ! शंकर शेट धनाज ॥ भाग्यवान भोळे महाराज ॥ कुटुंबसंरक्षणाचे जहाज ॥

डामडौल नाही काही मिजाज ॥ दीन दुबळ्याचे गरीब नवाज ॥ शरण आल्याची राखुन लाज ॥ आगोदर त्याचे करावे काज ॥

मोठ्या मोठ्याचा जिरवुन माज ॥ हरीस आणिले शेट बजाज ॥ पैलापूर मुंबईत आज ॥चाल॥

जेव्हा टिपूवर इंग्रज गेले ॥ तेव्हा शेट सवे नव्हत नेले ॥ परंतु भर्णै येथुन केले ॥ समय रक्षिले ज्यांनी अशेले ॥चाल॥

म्हणून साहेब बहुत चाहाती ॥ करून गौरव धरावे हाती ॥ काढुन टोपी उभे की राहती ॥चाल॥

देशावर चालता हुंड्या ॥ इतर गाई तर गरीब भुंड्या ॥ अपराधावर धरून पुंड्या ॥ घरी चढवाव्या ॥चाल॥

भलत्याचे पडेना तेज फिटेना भ्रांती । यासाठी लोक भरदिसास हिसके खाती ॥१॥


कवी - अनंत फंदी

लंडे गुंडे हिरसे तट्टु

लंडे गुंडे हिरसे तट्टु ह्यांचीं संगत धरु नको । नरदेहासी येऊन प्राण्या दुष्‍ट वासना धरुं नको ॥ध्रु० ॥

भंगी चंगी बटकी सठकी ह्यांच्या मेळ्यांत बसुं नको । बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मागी सोडुं नको ॥

संसारामधिं ऐस आपला उगाच भटकत फिरुं नको । चल सालसपण धरुनि निखालस बोला खोटया बोलुं नको ॥

पर धन पर नार पाहुनि चित्त भ्रमुं हें देऊं नको । अंगीं नम्रता सदां असावी राग कुणावर धरुं नको ॥

नास्तिकपणांत शिरुनि जनाचा बोल आपणा घेऊं नको । भली भलाई कर कांहीं पण अधर्म मार्गीं शिरुं नको ॥चाल॥

मायबापावर रुसूं नको । दूर एकला बसूं नको । व्यवहारामधिं फसूं नको ॥चा० प० ॥

परी उलाढाली भलभलत्या पोटासाठीं करुं नको ॥ लंडे गुंडे० ॥१॥

बर्म काढुनि शरमायाला उणें कुणाला बोलुं नको । बुडवाया दुसर्‍याचा ठेवा करुनिया हेवा झटुं नको ।

मी मोठा शाहाणा धनाढयही गर्व भार हा वाहुं नको । एकाहुन एक चढी जगामधिं थोरपणाला मिरवुं नको ॥

हिमायतीच्या बळें गरिबागुरिबाला तूं गुरकावुं नको । दो दिवसांची जाइल सत्ता अपेश माथां घेऊं नको ।

बहुत कर्जबाजारी होऊनि बोज आपला दवडुं नको । स्नेह्यासाठीं पदरमोड कर परंतु जामिन होऊं नको ॥चाल॥

विडा पैजेचा उचलुं नको । उणी तराजू तोलुं नको ॥ गहाण कुणाचें डूलवुं नको ॥ असल्यावर भीक मागूं नको ॥ चा० प० ॥

नसल्यावर सांगणें कशाला गांव तुझा भिड धरुं नको ॥ लंडे गुंडे० ॥२॥

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठीं करुं नको ॥ बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची ती मैत्रि नको ॥

कष्‍टाची बरी भाजि भाकरी तूप साखरेची चोरि नको ॥ आल्या अतिथा मुठभर द्याया मागें पुढती पाहूं नको ॥

दिली स्थिती देवानें तींतच मानीं सुख कधिं विटूं नको ॥


कवी - अनंत फंदी