दिवाळी, तो आणि मी

दीपांनीं दिपल्या दिशा !--सण असे हा आज दीपावली.

हर्षानें दुनिया प्रकाशित दिसे आंतूनि बाहेरुनी !

अंगा चर्चुनि अत्तरें, भरजरी वस्त्रांस लेवूनियां,

चंद्र्ज्योति फटाकडे उडविती आबाल सारे जन.

पुष्पें खोवुनि केशपाशिं करुनी शृंगारही मङल,

भामा सुंदर या अशा प्रियजनां स्नाना मुदे घालिती.

सृष्टी उल्हसिता बघूनि सगळी आनंदलें मानस,

तों हौदावर कोणिसा मज दिसे स्नाना करी एकला;

माता, बन्धु, बहीण कोणि नव्हतें प्रेमी तया माणुस;

मी केलें स्मित त्यास पाहुनि तदा तोही जरा हांसला.

एखाद्या थडग्यावरी धवलशीं पुष्पें फुलावी जशीं,

तैसें हास्य मुखावरी विलसलें त्या बापडयाच्या दिसे !

तो हांसे परि मद्‌ह्रुदीं भडभडे, चित्ता जडे खिन्नता;

नाचो आणिक बागडो जग, नसे माझ्या जिवा शांतता !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ४ नोव्हेंबर १९२६

प्रेमळ पाहुणा

निरोप द्याया कुणा पाहुण्या आलिं सर्व धांवून,

परी कुणीशी दिसे न म्हणुनी मनीं मुशाफिर खिन्न.

वृध्दांचा, बाळांचा घेउनि निरोप जों वळणार,

सहजच गेली अतिथीची त्या दारावरती नजर.

दारामागुनि पहात होते डोळे निश्चल दोन,

जरा खुले, परि क्षणांत झालें दुःखित त्याचें वदन.

"दोन दिवस राहिला परी या लळा लागला अमुचा !"

पिता वदे त्या दारामागिल डोळ्यांच्या धनिनीचा !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १ जानेवारी १९२७

एक करुणकथा

असे दुहिता श्रीमन्त पित्या कोणा;

असति त्याचे तिजवरी बेत नाना.

गोष्टि साङे तरुणास कुणा एका;

तरुण जोडी ती बघे एकमेकां !

"लग्न, नवरे या झूट सर्व गोष्टी,

खूप शिकवोनी करिन इला मोठी !"

पित्यामागें राहून उभी कन्या,

कटाक्षांनीं खुणवून होइ धन्या !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १ जानेवारी १९२७

जइं भेटाया तुज

जइं भेटाया तुज आतुर होतों ह्रुदयीं,

मनिं मधु-आशांची उभी मयसभा होई !

किति रंगवितें मन मधु-चित्रें भेटीचीं,

योजितें किती बोलणीं ललितगमतीचीं !

परि जवळ जवळ तव दाराशीं जों येतों,

भय भरुनि अकारण जीव कसा थरथरतो !

पायांचीं मोजित नखें दृष्टिनें बसशी,

अनपेक्षित लाजत कांहिं तरी पुटपुटशी;

मग शेखमहम्मदि बोलांना विसरुन,

कांहीं तरि तुटकें जातों मी बोलून !

परततों कसासा उदास मनिं होऊन;

'प्रीति' ती हीच का, बघतों अजमावून !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३ नोव्हेंबर १९२६

प्रीति

'प्रीती काय ?' म्हणून कोणि पुसतां, मी बोललों हांसुनी,

'बाला कोणिहि पाहुनी तिजसवें तें बोलणें हांसणें.

येवोनी गृहिं जेवणें, मग पुन्हा निष्काळजी झोपणें !'

आतां प्रीती कळे तदा पुनरपी हे बोल येती मनी.

चक्रव्यूह असे पहा विरचिला हा प्रीतिचा सुंदर,

वेडे होऊनि आंत आम्हि घुसतो--कांहीं न आम्हा कळे !

जीवाला भगदाड खोल पडुनी हा जीव जेव्हां वळे,

तेव्हां त्यास कळे पुन्हा परतणें झालें किती दुष्कर !

देवालाहि उठून निर्भय जयें आव्हान तें टाकणें,

प्रीतीनें परि कोंकरु बनुन तो, हो दैववादी जिणें !

कांहीं रम्य बघून, शब्द अथवा ऐकूनियां वेधक,

जीवानें उगिच्या उगीच बसणें होऊन पर्युत्सुक !

इष्टप्राप्तित जी सुधा, जहर जी त्यावांचुनी होतसे,

'प्रीती प्रीति' म्हणूनि नाचति कवी ती हीच प्रीती असे !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३० सप्टेंबर १९२६

जेव्हां चिंतित

जेव्हां चिंतित मी मनांत बसतो माझ्या तुझ्या प्रीतितें,

तेव्हां दावित भीति ठाकति पुढें तीं बंधनें धार्मिक ;

प्रीतीच्या परि सृष्टिनिर्मित अशा धर्मापुढें पावक,

अस्वाभाविक बंधनें सहजची तोडीनसें वाटतें.

हे सारे तुटतील बंध सहसा धार्मीक सामाजिक;

आईच्या परि भाबडया दुखुवुं का जीवास मी प्रेमळ,

सारीं तोडुनि बंधनें सुखविण्या माझ्या जिवा केवळ ?

आईचाहि विचार पार पळ्वी मूर्ती तुझी मोहक !

अंतश्र्वक्षुपुढें परंतु सहसा ये मातृमूर्ती तदा,

जन्मापासुनि हाल सोसुनि मला जी वाढावी माउली;

माझ्या मात्र कृतघ्न नीच ह्रुदया ती कोणि ना वाटली !

हातांनीं मुख झांकिलें---मज गमे ती वृत्ति लज्जास्पदा.

दीना, वत्सल माय चित्तनयनां तेव्हां दिसूं लागली;

दुःखाचे कढ येउनी घळघळा अश्रूजळें वाहलीं.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १८ सप्टेंबर १९२६

मीं म्हटलें गाइन

'मी म्हटलें, गाइन तुलाच गीतशतांनीं;
ह्रुदयाची वीणा म्हणुनी ही लावोनी,

भिरिभिरी गाइलीं गीतें तव प्रीतीचीं;
मज दिनें वाटलीं अशीच हीं जायाचीं.

जीव हा लावुनी तुझिया जीवावरती,
म्हटलें मी, जडली तुझीहि मजवर प्रीती.

चित्तीं शंकेचीं परी वादळें उठती;
झगडतां जिवा या अनन्त खन्ती जडती.

तिमिरांतुनि कुणि ही दुसरी तारा हंसते,
क्षणभरी तुझी मग विस्मृति मजला पडते !

या नवतारेचीं गीतें गाण्या उठतों;
ह्रुदयाची वीणा छेडाया जों जातों,

तों जुनीच गाणीं वीणेवरती येती !
लज्जेनें दुःखद पीळ जिवाला पडती.


परि प्रीत असे फुलपांखरु गोजिरवाणें;
औदासीन्याच्या हिमांत तें ना जगणें !

त्या हवें स्मिताचें ऊन कोवळें जगण्या,
आणिक चुंबनमधु स्वैरसुखानें लुटण्या !

तव सौदर्याची जादु न आतां उरली ;
तव जादू कसली !--भूल मला ती पडली !

माझ्याच प्रीतिचे रंग तुझ्यावर उठले;
त्यांतून तुझें मज रुप जादुचें दिसलें !

ही दो ह्रुदयांविण जादु न चालायाची;
प्रीत ना अशी वा-यावर वाढायाची !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २८ मे १९२७