चाफा

चाफा बोलेना । चाफा चालेना
चाफा खंत करी । कोणी त्यासी पुसेना!

गेला फुलांच्या ग वनी । सारा शिणगार लेवुनी,
बसला डोके उंचावुनी । कोणी त्यासी बघेना !

सुकुनी झाली चोळामोळा । फुले ती करी बाजुची गोळा,
चुकवुनी इतरांचा मग डोळा । डकवी आपुल्या पाना?

बोले, 'पुष्पांचा मी राजा । आला बहार मजसी ताजा!'
केला ऐसा गाजावाजा । परी कोणी बघेना!

म्हणे, 'मी वृक्ष थोर प्रेमळ । नम्रता रसाळ निर्मळ,'
बोलला वाडेकोडे बोल । खरे कुणा वाटेना !

भुंगे पळती आल्यापायी । पांखरे उडती घाई घाई,
केली खूप जरी चतुराई । कुणी तया भुलेना!

भवती गुलाब, बटमोगरा । सुगंधी किती फुलांच्या तर्‍हा
विचारी कोण तिथे धत्तुरा? । जरिही केला बहाणा !

फांशी अंगी चंदन-उटी । लावी हळदलेप लल्लाटी!
आणि कांति पीत गोमटी । परी कोणी फसेना !

चोळिले अत्तर अंगी जरी । प्राशिली दोन शेर कस्तुरी ।
गंध का जातिवंत ये तरी? । असे मुळामध्ये उणा !

लागे जरा उन्हाची झळ । झाला तोच नूर पातळ,
सरले सगळे उसने बळ । पडे खाली उताणा!!

खदखदा हसू लागली झाडे । फूलांची मिष्किल झाली तोंडे!
डोळे झाकुनि चाफा रडे । हाय-ते सांगू कुणा?

(चाल नाही तरी निदान सूर बदलून)

चाफा बोलेना । चाफा चालेना
चाफा खंत करी । कोणी त्यासी पुसेना!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

नवरसमंजरी - शृंगाररस

काव्याचे निज बाड घेउनि दर्‍याखोर्‍यातला शाहिर,
होता गाउनि दाखवीत कविता कोणा महाराणिला;
कंटाळा तिज ये परंतु कवि तो गुंडाळिना दप्तर,
रागावूनि म्हणून टाकि गजरा ती खालि वेणीतला !

होता बोलुनिचालूनीच कवि तो त्याला कळावे कसे?
प्रेमाची करण्यास चाकरि तया संधी बरी ही दिसे !
लज्जाकंपित हाति देइ गजरा, तो प्रेमवेडा तिला,
ती गाली हसली (किमर्थ नकळे!) शाहीर आनंदला !


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें








नवरसमंजरी - वीररस

होता तो मृगराज जोवरि वनी सिंहासनाधिष्टित,
कोल्हे तोवरि हे विळांत दडुनी होते भये कापत !
त्याचा देह विराट आज पडता निष्प्राण भूमीवरी,
आली धावत टोळधाड जिभल्या चाटीत ही त्यावरी !

तन्नेत्रा उघडूनि कोणी म्हणती, 'या गारगोट्या पहा ।'
दाढीचे उपटूनि केस वदती, 'संजाब खोटाच हा!'
बोटेही जबड्यांतुनी फिरविती निःशंक आता कुणी,
कोणी खेचुन शेपटी फरफरा नेई तया ओढुनी !

कोणी ठेवुनि पाय निर्भयपणे छातीवरी नाचती,
'आता सोडविण्यास कोण धजतो याला बघू!' बोलती;
जो तो सिंहच आपणा म्हणवुनी आता करी गर्जना,
मारि हात मिशांवरी फिरवुनी वीरश्रिच्या वल्गना!

दारोदार बघून वीर असले संतोष होतो जरी,
नाही भेकड मात्र कोणि उरला हे शल्य डांचे उरी !


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

नवरसमंजरी - करुणरस

कुठे लिहिल्या कविता न पाच-सात
एकदाच्या छापिल्या मासिकात;
तोच बोले, 'शाहीर जाहलो मी,
महाराष्ट्रा हलवीन रोमरोमी!'

पुढे सरली कंगाल काव्यकंथा,
येरु बोले, 'टीकाच लिहिन आता !
मस्त झाली आहेत बडी धेंडे !
एकएकांची फोडतोंच तोंडे !'

हाति बाळाच्या लागता कुर्‍हाड
जिते राहिल का एक तरी झाड?
तसे टीकेचे लागताच वेड,
मोठमोठ्यांचा काय पुढे पाड?

'अमुक लेखक करितोच उसनवारी,
तमुक लोळतस बिछान्यात भारी!
तमुक ओढतसे रोज विड्या फार,'
असे टीकेचे चालले प्रहार !

चारचौघांची परी करुनि चोरी,
येरु सजवी लेखनाची शिदोरी!
शिव्या द्यायाही शब्द न स्वतांचे
कसे वर्णू दारिद्र्य मी तयाचे?

असो; येरू जाहला सुप्रसिद्ध,
लेखनाची संपली त्यास हद्द !
म्हणे, 'आता होईन पत्रकार,
देशभक्तीच्या अखाड्यांत वीर !'

येरु घेई बगलेत जाड ग्रंथ,
आणि सुतक्यासम जाइ मार्गि संथ !
धुवट बगळ्यासम दिसे वरुनि शांत,
कोण जाणे परि अंदरकी बात?

मोठमोठ्यांच्या बसुनि कच्छपात,
बने मुत्सद्दी चार आठवड्यात !
लिहू लागे गंभीर, 'लेखमाला'!
'तीन खंडी' जाहला 'बोलबाला'!

'जाहिराती', 'संस्कार', वृत्त', 'पोंचा'-
हातखंडा लिहिण्यात होय त्याचा!
'स्फुटा' वरती जो टाकणार हात-
तोच मागुनि दुर्दैव हाणि लाथ!

'जहालांचा भुरकाच तिखट -जाळ'.
येरु बोले, 'मज नको कधी काळ!'
'मवाळांचा आळणी दूधभात,
बरा आता बैसेन ओरपीत!'

येरु संन्यासी होइ (करुनि क्षौर)
बांधि आश्रम रानात कुठे दूर !
भोवताली जमवुनी चार शिष्ट,
काळ घालवितो 'काव्यविनोदात.'

'मनी आले ते होइ सर्व पूर्ण!'
हेच येरूला एक समाधान.
शांत ही अजुनी न चित्त हाय!
परी धंदा उरला न! करू काय?

देवा, तो विश्वसंसार राहू द्या राहिला तरी,
परी कारुण्यमूर्तीला द्याच या मोक्ष लोकरी !


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

नवरसमंजरी - हास्यरस

काही शाहीर एकदा उतरले साहित्यर‍नाकरी
काढाया तळिंची वरी उपसुनी अज्ञात वाक्संपदा;
आले उत्सुक होउनी रसिकही सारे किनार्‍यावरी,
ऐशी वाङ्मयपर्वणी उगवते जन्मांतुनी एकदा !

रत्‍ने आतुनि फेकुनी दिलि कुणी, कोणी समुक्तावली,
कोणी रंगित पोवळी; कुणि तशा धातु सुरम्याकृती.
दैवे लाभत 'वैजयंति' हि कुणा, कोणा परी शिंपली,
टाळ्या-हर्षनिनाद थोर घुमुनी सर्वत्र राहे तटी?

तो गर्दीतुनि दंड ठोकित पुढे आला कुणी शाहिर,
बोले गर्जुनि 'पोरखेळ कसले हे बैसला पाहत?
माझे थक्कच व्हाल पाहुनि तुम्ही चातुर्य लोकोत्तर!
ऐसे बोलुनि घेइ सागरि उडी तो देखता देखत !

संमदी उठला गभीर ध्वनि तो निःस्तब्ध झाले पुन्हा,
डोळे फाडुनि त्याकडे टकमका जो तो बघू लागला;
झाला वेळ बरच; वीर तरिही बाहेर का येइना?
येती तर्ककुतर्क! धीर अगदी कोणा नसे राहिला !

कोणा आणिल वाटले फिरुनि हा चौदाहि रत्‍ने वरी,
किंवा ओढुनि आणणार वरती वाग्देवता शारदा !
वाटे सागर कोरडा करिल हा कोणा अगस्तीपरी,
'गेला कायमचा तळी!' भय असे वाटे कुणा एकदा!

आले बुद्धुद तो तरंग उठले, डोकेहि आले वरी,
झाले लोक अधीर! प्राण बसले डोळ्यांमधे येउनी!
तेजस्वी मुखचंद्रमा मग हळू ये पूर्ण पृष्ठावरी
फाके काहितरी अपूर्व भवती कांती मनोमोहिनी!

आनंदातिशये पटापट उड्या मारून तो ओरडे,
'या रे या, मज नाचवा रसिक हो, डोक्यावरी घेउनी!
फुंका दुंदुभि वाजवा चहुंकडे मत्कीर्तिचे चौघडे,
की पृथ्वीवर आज ये मजमुळे सत्काव्यसंजीवनी!'

ऐसे बोलूनि हात तो वर करी सर्वांपुढे जो कुठे,
आले तेहतिस कोटि देव गगनी ते पाहण्या अद्‌भुत,
संपे संशयकाल, मूठ उघडे, भांडार सारे फुटे !
हाती एक दिसे 'सुनीत' तुटके!!! झाली मती कुंठित!

हास्याचा उठला तदा खदखदा कल्लोळ विश्वातुनी,
आकाशी सुर लागले गडबडा हासून लोळावया!
मेलेले मुडदेहि ताठ उठले तात्काळ गर्तेतुनी,
दातांच्या कवट्या 'सुनीत' वदुनी हासावया लागल्या !


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

नवरसमंजरी - वत्सलरस

बहुत दिवसांनी लांबुनी कुठून
येति भेटाया संतकवी दोन
भरुनि आली तो नयनि प्रेमगंगा,
जशी वर्षाकाळात चंद्रभागा !

एकमेका कवळिती बाहुपाशी
मिठ्या प्रेमाने घालती गळ्याशी,
हसुनि पुसती हलकेच कुशल प्रश्ना,
'काव्यप्रसुती जाहली किती कोणा?

दंग झाले मग काव्यविनोदात
एकमेका विसरले बोलण्यात
श्लेष, कोट्या, रूपके, अलंकार,
किती झाली, त्याला न मुळी पार !

तालसूरावर करुनि हातवारे,
गायनाचे मग सोडती फवारे,
ऐन ब्रह्मानंदात टाळि लागे,
जाति विसरुनि देहास पार दोघे !

जवळ सरकत मग हळूहळू येती,
एकमेकां सप्रेम डंवचताती!
घेति चिमटे चिमकुर्‍या हळुच तैशा,
बालक्रीडा त्या वर्णु तरी कैशा?

चापट्याही लागले मारण्याला,
आणि प्रेमाने तसे चावण्याला
खालि पाडुनि एकास मग अखेर,
वीर त्यावरि जाहला दुजा स्वार !

मिशा ओढुनि, घेऊन गालगुच्चा,
'बरा सापडला!' म्हणे 'अरे लुच्चा'
'नाही आता देणार हलूसुद्धा,
लबाडा, का पोटात मारु गुद्दा?'

बाळलीला चालल्या त्या अशाच,
नको वर्णन ते! करा कल्पनाच,
खरे इतुके पण, प्रौढता निमाली,
आणि भरती वात्सल्यरसा आली!

कुणा कविची सुप्रिया रसिक कांता,
हाय, दुर्दैवे कालवशा होता;
पडे त्यावरि आकाश कोसळून,
म्हणे, 'आता करु काय तरि जगून?'

'आत्महत्या जरि करू तरी पाप,
दोन बच्चांचा आणि त्यात बाप!
आजपासुनि करतोच प्रतिज्ञाही,
लग्नबंधी पडणार पुन्हा नाही!

तिच्या नावाची घेउनिया माळ;
क्रमिन आता मी कसाबसा काळ;
तिच्यावाचुनि गाणार दुजे नाही,
काव्यस्फूर्ती वाहीन तिच्या पायी!!'

दोन महिने पुरते न यास झाले,
तोच लग्नाचे दुष्ट दिवस आले,
बँण्डताशाचा नाद कानि आला,
भीष्मकविचा थरकाप उडुनि गेला !

तोच स्वप्नी येऊन म्हणे कांता,
'हाल तुमचे मज बघवती न नाथा !
मुलांचीही होतसे फार दैना,
प्रिया, फिरुनी संसार थाटवाना !'

मृतात्म्याचे आज्ञेस अप्रमाण,
मानणारा चांदाळ असे कोण?
भीष्मकविने दुसर्‍याच मुहूर्ताला,
प्रियेसाठी निजव्रतत्याग केला !

कुणी म्हणती, 'भुललाच कवि सुखाला!'
काय बोलाया होतसे टवाळा !
करी तत्त्वाचा त्याग प्रियेसाठी,
समाजाची नच त्यास लाज खोटी !

दुजी भार्या स्वर्लोकि तोच गेली,
फिरुनि आज्ञा आणखी तीच झाली!
दोन आत्म्यांचा हुकुम पाळण्याला!
जोर दुप्पट भीष्मास अता आला!

असो; झाली जरि कितिहि वेळ आज्ञा!
भीष्म नाही करणार तरि अवज्ञा !
दिसो कोणा 'बीभत्सरस' हि यात,
प्रेमगंगा परि असे आत गुप्त!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

नवरसमंजरी - रौद्ररस

फोटो काढविणे तशांत मग तो छापावया मासिकी,
कोणाला न रुचे? नकोच कविची बोलावया गोष्ट क!
होता एक प्रसंग मंगल असा संपादकाचे घरी,
आले शाहिर थोरथोर सगळे आशाळभूतापरी!

फोटोग्राफर त्या नियुक्तसमयी पाचारि स्थानांवर,
ईर्षेने सरसावुनी सकल तो धाविन्नले शाहिर !
आता प्रश्न पडे महा बिकट हा, कोठे कुणी बैसणे,
'मी येथे बसणार ! मान पहिला माझाच!' जो तो म्हणे!

'आहे मी तर वाल्मिकी, वसतसे श्रीशारदा मन्मुखी!'
बोले एक, तया दुजा वदतसे, 'मी व्यास प्रत्यक्ष की!'
'हा येथे कवि कालिदास असता बाता नज्का या करू'
बोले गर्जुनी वीर एक तिसरा वाग्युद्ध झाले सुरू.

पद्याला विसरून येति सगळे शाहीर गद्यावर,
झाले कत्तल गद्य!येति मग ते वाग्वीर गुद्द्यावर!
कैलासेश्वर रौद्र रूप धरितो विश्वान्तकाली जसे,
वाग्देवीसुत भासले मज तदा रौद्रस्वरूपी तसे!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें