पायपीट

दुःखाच्या वाटेवर
गाव तुझे लागले;
थबकले न पाय तरी
हृदय मात्र थांबले!

वेशीपाशी उदास
हाक तुझी भॆटली
अन् माझी पायपीट
डॊळ्यातुन सांडली


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

उषःकाल होता होता

उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

अम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली !


उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे!
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली !


गीत : सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले

चांदण्यात फिरताना

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात ॥धृ.॥

निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात ॥१॥

सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात ॥२॥

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात ॥३॥


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा!

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती ‘तात्पर्य’ माझे सारख्या खोट्या दिशा :
‘चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !’

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

एवढे दे पांडुरंगा !

माझिया गीतात वेडे
दु:ख संतांचे भिनावे;
वाळल्या वेलीस माझ्या
अमॄताचे फूल यावे !

आशयांच्या अंबरांनी
टंच माझा शब्द व्हावा;
कोरडा माझा उमाळा
रोज माधुर्यात न्हावा !

स्पंदने ज्ञानेश्वराची
माझिया वक्षांत व्हावी;
इंद्रियांवाचून मीही
इंद्रिये भोगून घ्यावी !

एकनाथाने मलाही
बैसवावे पंगतीला;
नामयाहाती बनावे
हे जिणे गोपाळकाला !

माझियासाठी जगाचे
रोज जाते घर्घरावे;
मात्र मी सोशीन जे जे
ते जनाईचे असावे !

मी तुक्याच्या लोचनांनी
गांजल्यासाठी रडावे;
चोख वेव्हारात मझ्या
मी मला वाटून द्यावे !

ह्याविना काही नको रे
एवढे दे पांडुरंगा !
ह्याचसाठी मांडीला हा
मी तुझ्या दारात दंगा !


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा

बोलणी

आसवांच्या सरी बोलती
मी न बोले, तरी बोलती

ऐक डोळेच माझे अता
ओठ काहीतरी बोलती

संत मोकाट बेवारशी
सांड संतापरी बोलती

बांधती चोर जेव्हा यशे
"ही कृपा ईश्वरी"- बोलती

शांत काटे बिचारे परी
ही फुले बोचरी बोलती

तेच सापापरी चावती
जे असे भरजरी बोलती

रोग टाळ्या पिटू लागले
"छान धन्वंतरी बोलती !"

झुंजणारे खुले बोलती
बोलणारे घरी बोलती


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - एल्गार

रोज

गात्रागात्राला फुटल्या
तुझ्या लावण्याच्या कळ्या
जन्म वेढून बांधिती
तुझ्या भासांच्या साखळ्या!

रोज तुझ्या वेणीसाठी
डोळे नक्षत्रे खुडती;
रोज तुझ्या भेटीसाठी
बाहू आसवांचे होती!


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - रंग माझा वेगळा