सिंहावलोकन

मुखा फिरवुनी, जरा वळुनि पाहतां मागुती,
कितीक ह्रदयें वदा चरकल्याविणें राहती ?
‘ नको वळुनि पाहणें ! ’ म्हणुनि दृग्‍ जरी आवरूं,
धुकें पुढिल जाणुनी मन न घे तसेंही करूं !

प्रदेश किति मागुते रुचिर ते बरें टाकिले,
कितीक तटिनीतटें श्रम जिथें अम्हीं वारिले;
किती स्मृतिस धन्यतास्पद वनस्थली राहिल्या,
जिथें धवलिता निशा प्रियजनासवें भोगिल्या !

सुखें न मिळतील तीं फिरुनि !-तीं जरी लाविती,
मनास चटका, तरी नयन त्यांवरी लोभती.
परन्तु ह्रदयास जे त्वरित जाउनी झोंबती,
प्रमाद, दिसतां असे, नयन हे मिटूं पाहती !

किती घसरलों !--- किती चुकुनि शब्द ते बोललों ! ---
करून भलतें किती पतित हंत ! हे जाहलों !
स्वयें बहकुनी उगा स्वजनमानसे टोंचिलीं ! ---
वृथा स्वजनलोचनीं अहह ! आंसवें आणिलीं !

चुकोनि घडलें चुको ! परि, ’ असें नव्हे हें बरें ’
वदूनिहि कितीकदां निजकरेंचि केलें बरें ! ---
म्हणूनिच अम्हांपुढें घनतमिस्त्र सारें दिसे,
पुढें उचलण्या पदा धृति मुळींहि आम्हां नसे !

“ चुकी भरुनि काढणें फिरुनि, हें घडेना कधीं ”
विनिष्ठुर असें भरे प्रगट तत्त्व चित्तामधीं ! ---
म्हणूनि अनिवार हें नयनवारि जें वाहतें,
असे अहह ! शक्त का कवणही टिपायास तें ?


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- पृथ्वी
- वळणें, ३ मे १८९०

दोन बाजी

त्या शूरानें भगवा झेंडा हिंदुस्थानीं नाचविला.
निजराष्ट्राचें वैभव नेलें एकसारखें बढतीला;
जिकडे तिकडे समशेरीची कीर्ति आपुल्या गाजविली,
खूप शर्तिनें कदर आपली गनीमांस त्या लावियली,

आणिक तुवां रे ! --- त्वा नीचानें पाठ आपुली दादुनियां
रणांतुनी पौबारा केला, शेपुट भ्याडा वळवुनियां ?

गुणी जनाची पारख करुनी त्या धीरानें गौरविलें,
उत्साहाच्या वातें अपुल्या तेज तयांचें चेतविलें;
प्रतापदीपज्योति पोषिली सुजनस्नेहा वाढवुनी,
गनीममशकें कितीक गेलीं तिच्यामधें खाक्‍ होवोनी !

आणिक तूं रे ? -- नाचलासि तूं नग्नच संगें अधमांचे,
धूळ खात गेलास---लाविले सर्वत्र दिवे शेणाचे !

भटांस जे रणधुरंधर तयां पाचारुनि त्या सिंहानें
माराया कीं मरावया अरिवरि नेलें आवेशानें,
’ हरहर !’ शब्दा परिसुनि वळली कितिकांची घाबरगुंडी
’ अला मराठा ! ’ म्हणत पळाल्या सैरावैरा किती लंडी !

तूंहि भटाला पाचारियलें, काय त्यांसवें परि केलें ?---
यथेच्छ लाडू मात्र झोडिले---नांव हाय रे बुडवीलें

घोडयावरिच हुरडा चोळित शत्रुशासना धांवोनी
तो गेला --- तूं बिछान्यावरी राहिलास रे लोळोनी !
वीर भले खंबीर आणखी मुत्सद्दीते सद्‍बुद्धि
त्यांच्या साह्यें निजसत्तेची त्यानें केली रे वृद्धि.

पण तूं रे ?--- तूं नगरभवान्या नाच्येपोर्‍ये घेवोंनी
दौलतलादा केला --- धिग्‍ धिग्‍ भटवंशीं रे जन्मोनी !

या भटवंशी महाप्रतापी ख्यात जाहले असूनिया
तुळशीमध्यें भांग निघाली अभद्र ऐशी कोठुनिया !
निजनामाचा ’ गाजी ’ ऐसा अर्थ उरवुनी तो गेला,
तर हळहळली आर्यमाउली ऐकुनि त्याच्या निधनाला

मरणाआधिंच मरून आणुनि काळोखी निजराष्ट्रला,
तूं गेलासी करून ’ पाजी ’ अहह ! पितामहनामाला !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- मुंबई १६ फेब्रुवारी १८९५

घुबड

( एडगर पो याच्या ‘ रेव्हन ’ या अप्रतिम काव्याची मुख्य कल्पना या चुटक्याच्या आधारास घेतली आहे. )

श्यामा राणी गभीर रजनी,
अलंकृता जी नक्षत्रगणीं,
वेत्र आपुलें उंच धरोनी

बसुनी राज्यासनीं दरारा दावित आहे जों फार,

समोरच्या चिंचेवरुनी तों
घुबड तियेचा बन्दीजन तो

घूघू घूघ---महिमा तीचा वर्णी करुनी धूत्कार !

कवी आपुल्या खिडकीमधुनी
बाहेंर बघे शून्य लोचनीं ---
स्तब्धत्व जनीं, स्तब्धत्व वनीं,

मनींहि दयितानिधनें वागे स्तब्ध निराशा अनिवार !

अवघड झालें एकलेपणें;
परि त्या तरुवरुनी घुबडानें

‘ ऊंहूं मी तुज सोवत ! ’ म्हटलें, घू घू करुनी घूत्कार !

“ खाशी सोबत !” कवी म्हणाला;
“ माझ्या विरहव्यथित मनाला;
वाटे मनुजांचा कंटाळा;

दुःख करित बैसणें आवडे, येथें राहे अंधार !

हा मित्र मला भला मिळाला
धीर मदीय मना द्यायाला !”

“ ऊंहूं ऊंहूं !” उत्तर दिधलें त्यानें करूनी घूत्कार !

“ नाही ?--- धीर न देशिल काय ---
शोकें मी मीकलितां धाय ?”

“ ऊंहूं ! घूघू !” उत्तर बोले त्याचा भेसुर घूत्कार !

“ हे अप्रतिमे ! प्रिये, प्रियतमे !
तुजवीण जिणें निर्माल्य गमे !
अहह ! वेढिले असे मज तमें !

मरुन तर मी, जेथें वसे ती दिवंगता दिव्याकार,

तेथ पूजिली सुरांगनांनीं
पाहिन काय न सखी स्वनयनीं ?”

“ ऊंहूं ऊंहू ?” बोले निष्ठूर त्या घुबडाचा घूत्कार !

“ बरें बरें !--- मी नरकीं जाइन,
घोर यातना तेथिल सोशिन;
खेद न त्यांचा अगदीं मानिन;

जर त्या स्थानीं वागेल मनीं कान्तेचा पुण्याकार;

तेथ तियेचें द्याया दर्शन
स्मृति मम समर्थ होइल काय न ?”

“ ऊंहूं ! घूघू ! ” बोले निर्घूण त्या दगडाचा घूत्कार !

“ जा, निघ येथुनि !--- मला रडूं दे !
शोकें माझें ह्र्दय कढूं दे !
कानीं परि तव रव न पडूं दे,

“ घूघू !--- ऊंहूं !” दे प्रत्युत्तर त्या अधमाचा घूत्कार !

निशीथसमयीं या अन्धारीं
वेताळाची मिरवे स्वारी,
पाजळूनियां टेंभे सारीं

भुतें नाचती भयानकपणें !--- चित्तीं उपजविती घोर !

नैराश्यें मज पुरें घेरिलें,
खिडकीपुढुनी घुबड न हाले,

घूघू ! घूघू ! चाले त्याचा घूघू भीषण घुत्कार !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- फैजपूर, १२ डिसेंबर १९०१

दिवस आणि रात्र

दिवस बोलतो “ उठा झणीं ! ”
रात्र ---“ विसांवा ध्या ! ” म्हणते,

या दों वचनीं दिनरजनी
बहुत सुचविती, मज गमतें,

दिवस सांगतो ” काम करा, ”
रात्र ---” विचारा करा मनीं. ”

दिवस बोलतो ” मर मरा ”
रात्र ---“ मजमुळें जा तरुनी. ”

दिवस वदतसे “ पहा प्रकाश; ”
आंत शिरतसे परि अंधार ?

रात्र बोलते “ पहा तमास ! ”
परि आंत पडे प्रकश फार !

दिवस म्हणे “ जा घरांतुनी ”
रात्र वदे “ या सर्व घरास. ”

स्पर्धा लावी दिवस जनीं;
रात्र शिकविते प्रीति तयांस !

नक्षत्रें जगतीवरलीं
दिवस फुलवितो, असे खरें;

पुष्पें आकाशामधलीं
रात्र खुलविते, पहा बरें.

एकच तारा दिन दावी,
असख्य भास्कर परी निशा;

दिवस उघडितो ही उर्वी,
रजनी अनन्त आकाशा !

दिवस जनांला देव दिसे,
परि गद्यच त्याच्या वदनीं;

रात्र राक्षसी भासतसे,
परि गाते सुंदर गाणीं !

“ ही भूपी हा नरक ! ” असें
वदे अदय दिन वारंवार;

“ ही धरणी हा स्वर्ग असे !”
गाते रजनी, जी प्रिय फार !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १४-९-१८९५

स्वर्ग, पृथ्वी आणि मनुष्य

आरम्भीं, म्हणजे मनुष्य नव्हता तेव्हां, क्षितीपासुनी
होता स्वर्ग न फार दूर, अपुल्या कान्तिप्रसन्नेक्षणीं
तो पृथ्वीप्रत सौख्य नित्य वितरी तेव्हां पुढें त्यावरी
गेली प्रीति जडूनि गन्धवतिचे चित्तांत भारी खरी.

निर्मीला नर नन्तर स्वतनुच्या तीनें मळीपासुनी
इच्छा आपुलिया धरूनि ह्रदयीं हीः--- गायनें गाउनी
स्वार्गा आळवुनी नरें सुकुशलें मोहूनियां टाकिजे,
स्वर्गें येउनि खालतीं मग तिशीं प्रेमें सदा राहिजे.

या दुष्टें, पण मानवें स्वजननीपृथ्वीस ताडूनियां
लाथेनें, अपुल्या मनीं अवथिलें स्वर्गावरी जावया;
ती पाहूनि कृतघ्नता निजमनीं तो स्वर्ग जो कोपला,
आवेशांत उडुनि दूरवर तो जाता तघीं जाहला.

तेव्हांपासुनि ही धरा झुरतसे ! माते ! चुकी जाहली !
स्वर्गा ! तूंहि अम्हां क्षमस्व सदया !--- ये खालता भूतलीं---
ये बा ! आणिक या घरेस अगदीं देऊं नको अन्तर !---
आहे तूजवरी तसेंच बसलें स्वर्गा ! तिचें अन्तर.


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- खेड, ११ एप्रिल १८९०

कल्पकता

( खालच्या पद्यांत वर्णिलेली देवी ती कल्पकता होय. सर्व जग आपल्या आहारनिद्रादि ठरीव व्यवसायांत निमग्न असतां ती एकांतांत बसून भारत-रामायणासारखीं काव्यें लिहिते, शाकुंतल, हँम्लेट यांसारखीं नाटकें  रचिते, गुरुत्वाकर्षणासारखे गहन शास्त्रीय सिद्धांत सुचविते आणि  एडिसनच्या फोनोग्राफसारखीं यंत्रें तयार करिते, तेणेंकरून नवीन आयुःक्रम पृथ्वीवर सुरू होतो, आणि स्वर्ग पृथ्वीला जवळ होतो, )

खा, पी, नीज, तसा उठूनि फिरुनी तें जा चिन्तित ---
आवर्तीं जग या ठरीव अपुल्या होतें हळू रांगत;
एका दुर्गम भूशिरावरि. परी देवी कुणी बैसली,
होती वस्त्र विणीत अद्‍भुत असें ती गात गीतें भलीं.
होते शोधक नेत्र, कर्णहि तिचे ते तीक्ष्ण भारी तसे,
होतें भाल विशाल देवगुरूनें पूजा करावी असें.
सूर्याचीं शशिचीं सुरम्य किरणें घेऊनि देदी सुधी
होती गोवित इंद्रचापहि तसें, त्या दिव्य वस्त्रामधी;

मेघांच्याहि छटा, तशीच कुटिला विद्युत्‍ ,तसे ते ध्वनी
लाटा, पाउस, पक्षि ते धबधबे---य तें पटीं ती विणी;
तारांचें पडणें, तसें भटकणें केतुग्रहांचें, पहा
सारे सुन्दर, भव्य घेउनि तिनें तें वस्त्र केलें अहा !

आली भू कुतुलें तिथें तिस तिनें तें वस्त्र लेवीवलें;
तों त्या वृद्ध वसुंधरेवरि पहा ! तारुण्य ओथंबलें;
भूदेवी, मग ह्रष्ट होउनि मनीं, नाचावया लागली,
‘ आतां स्वर्ग मला स्वयेंच वरण्या येईल ! ’ हें बोलली.


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- १७ फेब्रुवारी १८९१

स्वप्नामध्ये स्वप्न!

प्रीतीला विरही दशा कठीण हो मीं फार गार्‍हाणिली,
हंसाचे मग पक्ष ती द्रवूनियां देती मला जाहली;
आनन्दें प्रणती तिला करुनि मीं स्कंधांस ते लाविले,
वेगानें मग अन्तरालभवनीं उड्डाण मीं मारिलें !

आशेचा चमके जसा किरणा तो चिन्तांमधीं आगळा,
तैसा तारक मेघवेष्टित तरी तेजाळ मीं पाहिला;
त्या तार्‍यावरि जाउनि उतरलों. चिन्तीत हें मानसीं---
भेटूं केंवि निजप्रियेस ? रमवूं शब्दीं तियेला कशी ?
ऐशामाजि सखी, परीपरि तिथें उड्डाण घेऊनिक्यां---
आली; कोण असे समर्थ मग त्या सौख्यास वर्णावया !
वक्षें दोनहि चार ओष्ठहिं तधीं एकत्र झाले जवें !
पायांखालुनि जाय-हाय ! तुटुनी तारा परी तो सवें !

हा ! हा ! मी पडलों तसा घसरुनी या विलष्ट पृथ्वीवरी,
त्या धक्क्यासरशीं मदीय सगळी गुंगी पळे हो दुरी !
माझ्या या ह्रदयावरी ममचि हे वेंगुनि होते कर,
हंसाचीं नव्हतीं पिसें चढविलीं या दोन बाहूंवर !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- मुंबई, २५ जानेवारी १८९०