मनोहारिणी

( चाल---भक्ति ग वेणी० )

तीच मनोहारिणी !--- जी ठसलीसे मन्मनीं ! ॥ध्रु०॥

सृष्टिलतेची कलिका फुलली
अनुपम, माधूर्यानें भरली;
जिच्या दर्शनीं तटस्थ वृत्ती
भान सर्वही विसरुनी जाती;

ती युवती पद्मिनी---जी ठसलीसे मन्मनीं !

निज गौरत्वें शशिकान्तीला
लज्जा आणीलच ती बाला,
तल्लावण्यप्रभा चमकते !
विजेहूनिही नेत्र दिपविते !

रूपाची ती खनी---जी टसलीसे मन्मनीं.

“ इच्या कुन्तलावरणाखालीं
तारका कुणी काय पहुडली ?
उज्ज्वलता ही तरीच विलसे
भाळीं ! ” हा उद‍गार निघतसे,

ती तरुणी पाहूनी---जी ठसलीसे मन्मनीं !

“ शीर्षीं निजल्या त्या तारेचे
किरण आगळे या रमणीचे
नेत्रांवाटें काय फांकती !”
उद्‍गारविते प्रेक्षकास ती

निज दृष्टिप्रेषणीं--- जी ठसलीसें मन्मनीं !

गुलाब गालीं अहा ! विकसले
आणि तेथ जे खुलुनि राहिले,
विलक्षणचि---ते कंटक त्यांचे
सलती ह्र्दयीं कामिजनांचे !

ऐशी ती कामिनी---जी ठसलीसे मन्मनीं !

मृदु हंसतां ती मधुर बोलतां,
प्रगट होय जी ह्र्दयंगमता,
तीच्या ग्रहणा नयनें श्रवणें
सुरांचींहि वळतिल लुब्धपणें

ऐशी ती भामिनी---जी ठसलीसे मन्मनीं !

वक्षःस्थल पीनत्व पावलें,
गुरुत्वहि नितंबीं तें आलें;
तेणें सिंहकटित्व तियेचें
अधिकचि चित्ताकर्षक साचें !

विकल करी मोहिनी---जी ठसलीसे मन्मनीं !

बहाराला नवयौवन आलें,
ओथंबुनि तें देहीं गेलें !
म्हणुनि पळाली बाल्यचपलता,
गतिनें धरिली रुचिर मंदता

गजगमनें शोभिनी --- जी ठसलीसे मन्मनीं !

सौंदर्यें शालिन्यें पुतळी
ती रामायणमूर्तिच गमली,
उदात्त मुद्रा, गंभीर चर्या,
यांहीं भारत खचिता वर्या,

तीं रमणी सद्‍गुणी--- जी ठसलीसे मन्मनीं !

तिच्या दर्शनें मन उल्हासे,
तिजविण सगळें शून्यचि भासे,
म्हणुनी करुनी ध्यानधारणा
अन्तर्यामीं बघतों ललना
तीच मनोहारिणी---जी ठसलीसे मन्मनीं !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १९०४

मयूरासन आणि ताजमहाल

कामें दोन सुरेख त्या नृपवरें केलीं :--- मयूरासनीं,
ज्या तो बैसुनि शोभला; प्रथम तें सा कोटि ज्या लागले,
राजे ज्यापुढते जुळूनि अपुल्या हस्तद्वया वांकले,
झाले कम्पित, तत्कारीं शिर असे, येऊनियां हें मनीं;

प्रेमें मन्दिरही तसें निजसखीसाठीं तयें लादुनी ---
कोटि तीनच त्या गभीर यमुनातीरावरी बांधिलें !
चोरें आसन तें दुरी पळविलें ! स्मर्तव्य कीं जाहलें !
आहे अद‍भुत तो महाल अजुनी तेथें उभा राहूनो !

विल्हेवाट अशीच रे तव कृती त्या सर्वदा पावती;
मत्त भ्रान्त नरा ! सदैव कितिही तूं धूप रे जाळिला

स्वार्थाच्या प्रकृतीपुढें---निजमनीं ही याद तूं जागती
राहू दे---तरि धूर होइल जगीं केव्हांच तो लोपला !

काडी एकच गंधयुक्त, नमुनी प्रीतीस तूं लाव ती,
तीचा वास सदा जगीं पसरुनी देई तो तुष्टिला !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित
- १३ नोव्हेंबर १८९२

चिरवियुक्ताचा उद्‍गार

वृष्टीमागुनि चन्द्रकान्तिधवला ती ये शरत्‍ सजिरी,
तैसा रम्य वसन्त तीव्र शिशिरामागूनि तो येतसे,
सूतिक्लेश सरे अनन्तर सुखा तें तान्हुलें देतसे,
पाणी ओसरतां समग्र भरती येते पुन्हा सागरीं.

द्युत्याविष्कृति मोक्षकाल करितो खग्रास झाल्यावरी,
कृष्णानन्तर शुक्ल पक्ष चढती तो कौमुदी घेतसे,
प्रातः काल सुरेख गाढ रजनीमागुनि तो होतसे,
होता दारुण कल्प-अन्त फिरुनी सृष्टि स्मिता आदरी !

या गोष्टी गणणें असे सुलभ गे त्यांला जयाच्या मनीं
आशातन्तु नसे अजूनि तुटला; ते भाग्यशीली खरे !
कान्ते ! मत्सम मे परन्तु असती जे या अभागी जनीं,
त्यांची वाट विपत्समाकुल जगीं होणार कैशी बरें ?

उत्कंठाज्वलनें तुझा विरह हा टाकी मला पोळुनी
या गोष्टी गणतां निराश ह्रदयीं माझ्या भरे कांपरे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
-  शार्दूलविक्रीडित
- मुंबई १५ नोव्हेंबर १८९२

वियुक्ताचा उद्‍गार

राहे नित्य वसुंधरेस धरुनी हा भाग्यशाली गिरी;
वेलेला लहरीकरीं निरवधी हा अब्धि आलिंगितो;
रेषेला क्षितिजाचिया बिलगुनी आकाश तो नांदतो;

तैसा तो ध्रुव उत्तरेस न कधीं सोडून जाई दुरी;
चित्रोल्लास चिर प्रकाश सुभगच्छायासखीशीं करी;
पोटाशीं धरुनी सदा सुरधुनी स्वर्लोक हा राहतो,
घेऊनी द्युतिदेवतेस तरणी संगें तसा चालतो;

प्रेमें पूरुष संतत प्रकृतिला आश्लेषुनी ती धरी !

हीं युग्में बधतां सुखी, मम मनीं प्राणप्रिये कालवे;
त्यांचा मत्सर उद्‍भवून ह्र्दयीं, होतें नकोसें जिणें !
तूतें सोडूनि दूर हाय ! न मला आतां मुळीं राहवे;
कैसे तूं असशील गे दिवस हे कंठीत माझ्याविणें !

धिक्कारीं मज मीच, ज्यास तुजला कष्टांत या लोटवे !
हीं युग्में बघतां, सखे ! विरह हा दे दूःख मातें दुणें !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित 
- १५ डिसेंबर १९०१

अढळ सौंदर्य

तोच उदयाला येत असे सूर्य.
अहो क्षितिजावर त्याच नव्हे काय ?

तेच त्याचे कर न का कुकुमानें
वदन पूर्वेचें भरिती सभ्रमानें ?

तेच तरु हे तेंशाच पुष्पभारें
लवुनि गेले दिसतात पहा सारे !

त्याच वल्ली तेंसेंच पुष्पहास्य
हंसुनि आजहि वेधिती या मनास !

कालचे जें कीं तेच आज पक्षी
कालच्या हो ज्या त्याच आज वृक्षों

बसुनि गाती कालचीं तींच गानें,--
गमे प्रातःप्रर्थना करिति तेणें !

काल जो का आनन्द मला झाला
तोच आजहि होतसे मन्मनाला;

कालचा जो मी तोच हा असें का ?
अशी सहजच उदूभवे मनीं शंका.

अशी सहजच उद्‍भवे मनीं शंका
काय समजुनि समजलें तुम्ह ला का ?

असे अनुभव कीं-रिझवि एकदां जें
पुन्हां बहुधा नच रिझों त्याच चोजें.

पुन्हां बहुधा नच रिझों त्याच चोजें
कसें मग हें वेधिलें चित्त माजें --

आज फिरुनो या सूर्य-तरु-खगांनीं
आपुलीया नवकान्ति-पुष्ण-गानीं ?

म्हणुनि कथितों निःशंक मी तुम्हांतें,--
असे सुन्दरता अढळ जरी कोठें

तर करी ती सृष्टींत मात्र वास --
पहा मोहिल सर्वदा ती तुम्हांस.


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- दिंडी 
- १८८६

गांवीं गेलेल्या मित्राचि खोली लागलेली पाहून --

( जलधरमाला वृत्ताच्या चालीवर )

येथें होता राहत माझा स्नेही,
स्नेह्यांसाठीं जो या लोकीं राही,
पाशांला जो तोडायाला पाही
स्वदेशपाशीं अपणा बांधुनि घेई.

पाशांविण या कोठें कांहीं नाही,
पाशांकरितां चाले अवघें कांहीं; --
पाशांतुनि या सुटतां सुंदर तारे,
तेज तयांचें विझूनि जाई सारें.

चन्द्रानें या सदैव पृथ्वीपाशीं
राहुनीच कां सेवावें सूर्याशीं ?
शक्त जरी का असेल तो, तरि त्यानें
सेवावा रवि खुशाल निजतंत्रानें

सोडी पत्नीपाशाची तो आस,
स्वदेशसेवेकरितां घाली कास,
तो मत्सख निज गांवीं गेला आहे,
खोलीला या कुलुप लटकुनि राहे.

येथें गोष्टी आम्ही करीत होतों,
होतों, विद्याभ्यासहि करीत होतों,
मित्रत्वाचें बीज पेरुणी खासें
मैत्रीवल्ली वाढविली सहवासें.

देशाविषयीं गोष्टी बोलत येथें
बसलों, विसरुनि कितीकदां निद्रेतें ;
श्वासीं अमुचे श्वास मिळाले तेव्हां.
अश्रूंमध्यें अश्रु गळाले तेव्हां.

ऐसें असतां पहांट भूपाळयांला
पक्षिमुखांहीं लागियली गायाला,
हवा चालली मंद मंद ती गार,
प्रभाप्रभावें वितळे तो अंधार;

तेव्हां आम्ही म्हटलें---’ ही र्‍हासाची
रजनी केव्हां जाइल विरूनि साची ?
स्वतंत्रतेची पहांट तो येईल,
उत्कर्षाचा दिन केव्हां सुचवील ?---

” या डोळयांनीं पहांट ती बघण्याचें
असेल का हो नशिबीं दुदैव्यांचे ?
किंवा तीतें आणायाचे कांहीं
यत्न आमुच्या होतिल काय करांहीं ?”

असो. यापरी आम्ही प्रश्न अनंत
केले, होउनि कष्टी, परस्परांत;
” इच्छा धरितां मार्ग मिळे अपणांला ”
या वचनें मग धीर दिला चित्ताला.

कोठें असशिल आतां मित्रा माझे ?--
करीत असशिल काय काय तीं काजें ?--
देशासाठीं शरीर झिजवायाला
स्फूतीं आणित असशिल का कोणाला ?

तुझी बघुनि ही मित्रा खोली बंद,
विरहाग्नीनें भाजें चेतःकंद,
पुनरपि आपण येथें भेटूं, ऐशी
आशा होई जलधारा मग त्यासी.

( शार्दूलविक्रीडित )

झाल्यानंतर अस्त तो, कमल तें पाहूनियां लागलें,
” उद्यां मित्र करील तो निजकरें येऊनि याला खुलें,”

ऐसें बोलुनि ज्यापरी भ्रमर तो जातो श्रमानें दुरी,
जातों बोलुनि या स्थलासहि तसें, मित्रा ! अतां मी घरीं.


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- मे १८८७

एक खेडें

सह्यगिरीच्या पायथ्याला सुपीक
रम्य खोरें कोंकणामधीं एक;
नदी त्यामधुनी एक वाहताहे,
एक खेडें तीवरी वसुनि राहे.

वदनि सुन्दर मन्दिरें न त्या ठायीं,
परी साधीं झोंपडीं तिथें पाहीं;
मन्दिरांतुनि नांदते रोगराई,
झोंपडयांतुनि रोग तो कुठुनि राही ?

रोग आहे हा बडा कीं मिजासी,
त्यास गिर्द्यांवरि हवें पडायासी;
झोंडयांतिल घोंगडयांवरी त्यास,
पडुनि असणें कोठलें सोसण्यास ?

उंच नाहिंत देवळें मुळीं तेथें,
परी डोंगर आहेंत मोठमोठे;
देवळीं त्या देवास बळें आणा,
परी राही तो सृष्टिमधें राणा,

उंच डोंगर ते, उंच कडे भारी,
पडे धो ! धी ! ज्यांचियावरुनि वारी,
भोंवतालें रान तें दाट आहे;
अशा ठायीं देव तो स्वयें राहे !

स्त्रोत्र ओढे थांबल्यावीण गाती,
सूर वारे आपुला नित्य देती,
अशा भक्तीच्या स्थळीं देव राहे !

अशी नैसर्गिक भव्यता उदास
तया खेडयाच्या असे आसपास ;
तसा खेडयाचा थाट तोहि साधा
भव्यतेला त्या करितसे न बाधा.

सरळ साधेंपण असे निसर्गाचें
मूल आवडतें; केंवि तें तयाचें
भव्यतेला आणील बरें बाधा ?
निसर्गाचा थाटही असे साधा.

लहान्या त्या गांवांत झोंपडयांत
भले कुणबी लोक ते राहतात;
खपोनीयां ते तदा सुखें शेतीं,
सरळ अपुला संसार चालवीती,

अहा ! अज्ञात स्थळीं अशा, मातें,
एक गवतारू खोप रहायातें,
शेतवाडी एक ती खपायाला,
लाधती, तर किति सौख्य मन्मनाला !

तरी नसतों मी दरिद्री धनानें,
तरी नसतों मी क्षुद्र शिक्षणानें,
तरी होतीं तीं स्वर्गसुखें थोडीं,
तरी नसती कीर्तिची मला चाडी !

कीर्ति म्हणजे काय हो ?-- एक शिंगः
प्रिय प्राणांहीं आपुलिया फुंक,
रखाडीला जा मिळूनियां वेगें ;
शिंगनादहि जाईल मरुनि मागें !

कीर्ति म्हणजे काय रें ?-- एक पीसः
शिरीं लोकांच्या त्यास चढायास,
छरे पडती पक्ष्यास खावयास;
मागुनी तें गळणार हेंनि खास !

पुढें माझें चालेल कसें, ऐशी
तेथ चिन्ता त्रासिती न चित्तासी;
नीच लोकांला मला नमायास
वेळ पडती थोडीच त्या स्थळास !

शेत नांगरणें पेरणें सुखानें ,
फूलझाडें वाडींत शोभवीणें;
गुरे ढोरें मी बाळगुनी कांहीं,
दूधदुभतें ठेवितों घरीं पाहीं.

कधीं येता पाहूणा जर घराला,
तुझें घर हें, वदतोंच मी तयाला;
गोष्टि त्याच्या दूरच्या ऐकुनीयां,
थक्क होतों मी मनीं तया ठाया --

” असें जग तें एवढें का अफाट !
त्यांत इतुका का असे थाटमाट ! ”
असें वदतों मी त्याज विस्मयेंसी,
स्वस्थिती तरी तुळितों न मी जगाशीं.

स्वर्गलोकीं सम्पत्ति फार आहे,
इथें तीचा कोटयंश तोहि नोहे;
म्हणुनि दःखानें म्हणत ’ हाय ! हाय ’
भ्रमण अपुलें टाकिते धरा काय ?

तरी, स्वपया जातात सोडूनीयां,
कुणी तारे तेजस्वी फार व्हाया;
तधीं तेजाचा लोळ दिसे साचा,
परी अग्नी तो त्यांचिया चितेचा !

वीरविजयांच्या दिव्या वर्तमानी
कृष्ण कदनें पाहतों न त्या स्थानीं;
भास्कराच्या तेजाळपणीं मातें
डाग काळे दिसते न मुळीं तेथें !

सूर्यचन्द्रादिक दूर इथुनि तारे,
तसें जग हें मानितो अलग सारें;
जसे सेच्छूं त्यावरी चढायास,
इच्छितों नच या जगीं यावयास !

तेथ गरजा माझिया लहान्या त्या
सहजगत्या भागुनी सदा जात्या;
म्हणुनि माझें जग असें तेंचि खोरें
सुखि मजला राखितें चिर अहा रे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- दिंडी
- १८८७