अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न

मुलें अंत्यजांचीं बिचारीं मजेनें
पथाच्या अहो खेळताती कदेनें;
दुरूनी तिथें विप्र डौलांत आला,
वदे काय तो मुग्ध त्या बालकालाः---

” सरा रे दुरी पोर हो म्हारडयांचे !
चला ! खेळ हे मांडले डोंबलाचे !
निघा ! वाट द्या लौकरी ब्राह्मणातें ! ”
पळालीं मुलें;---कोण राहील तेथें !

परी एक त्यांतील तैसाचि ठेला;
उगारी तधीं दुष्ट तो यष्टिकेला.
म्हणे---” गाढवा ! सांवली ना पडेल !
दुरी हो ! पहा हाच खाऊ मिळेल !”

तधीं बाळ तोही घराला निघाला,
मनीं आपुल्या या करी चिन्तनालाः---
” जरी त्यावरी सांवली माझि गेली.
तरी काय बाघा असे ठेविलेली ?”

घरीं जाउती तेंचि मातें विचारीं ;
वदे तेधवां त्यासि माता विचारीः---

” अम्ही नीच वा, आणि ते लोक थोर;
तयां पाहतां होईजे नित्य दूर.”
सुधें बोलली !--- हें परी काय तीतें
कळे कीं जगीं नाडुनीयां परांते,
म्हणूनी करूनी अधीं घोर पाप,
जनीं गाजवी मानवी स्वप्रताप !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
वृत्त - भुजंगप्रयात
- १ सप्टेंबर १८८८

एका तरुणीस

आगबोटीच्या कांठाशीं समुद्राच्या शोभेकडे पहात उभ्या असलेल्या एका तरुणीस

अहा ! गे सृष्टीच्या वरतनु सुते ! निर्भयपणें
पहा अब्धीच्या या तरल लहरींचें उसळणें !---
मनोराज्यीं जैशा विविध ह्रदयीं क्लूप्ति उठती
तशा ना अब्धीच्या तरल लहरी या विलसती ?

मनोराज्याला या बघ जलधिच्या, फार विरळे !
कशाला हे तूतें फुकट म्हटलें मीं ? नच कळे !
स्वयें अब्धीला तूं बघत असतां पाहुनि, मुळीं,
’ सुता तूं सूष्टीची ’ मम ह्रदयीं ही मूर्ति ठसली.

निसर्गोद्यानींचे अमृतलतिके ! केंवि दिसतो ?
कशा या सिंधूच्या चपल लहरी गे उगवती ?---
जशा कांहीं जाडया अनवरत देहांत उडती
तशा ना सिंधूच्या चपल लहरी या उचलती ?

कसा गे अस्ताला द्युतिपति अहा ! हा उतरतो ?
कसा या दिग्भागीं सदरुणपणा हा पसरतो ?---
जणों, सोडोनीया धरणिवनिता ही, दिनमणी
विदेशाला जातो, प्रकट करितो राग म्हणुनी !

पहा आकाशीं गे सुभग तरुणी, या दिनकर ---
प्रभेच्या लालीने खुलत असती हे जलधर !
जसे क्रोडाशैल त्रिदशललनांचे तलपती !
जशीं केलिद्वीपें अमरमिथुनांचीं चमकती !

जिथें सौन्दर्याची तरुणि ! परमा कोटि विलसे,
जिथें आनन्दाची अनपकृत ती पूर्तिहि वसे,
अशा या आकाशोदधिमधिल या द्वोपनिचयीं
रहायाचें तूझ्या अभिमत असें काय ह्रदयीं ?

मलाही या पृथ्वीवरिल गमतें गे जड जिणें !
इथें या दुःखांचें सतत मनुजांला दडपणें !
इथें न्यायस्थानीं अनय उघडा स्वैर फिरतो !
नरालागीं येथें नरच चरणांहीं तुडवितो !

म्हणोनि, आकाशोदधिमधिल त्या द्वीपनिचया
निघाया, टाकूं या प्लुति अनलनौकेवरुनि या !---
शरीरें जीं दुःखप्रभव मग तीं जातिल जलीं !
सखे ! स्वात्मे द्वीपें चढतिल पहाया वर भलीं !

जरी दुःखाचें हें निवळ अवघें सर्व जगणें,
तरी या देहाचा सुखदचि असे त्याग करणें !
सुखासाठीं एका सतत झटतों आपण जरी,
तरी देहत्यागें सुख अनुभवुं आपण वरी !

अशुद्ध स्वार्थें जीं नयनसलिलें मानुष सदा,
शिवायाचीं देहा मग अपुलिया नाहिंत कदा !
जलस्था त्या देवी, फणिपतिसुता सुंदरमुखी,
स्वबाष्पें या देहांवरि हळूहळू ढाळितिल कीं !

प्रवालांच्या शय्ये निजवितिल त्या देवि अपणां,
प्रवालांला ज्या हा त्वदधरगडे ! जिंकिल पण;---
तशी मोत्यांची त्या पसरितिल गे चादर वरी,
सरी ज्या मोत्यांना न तव रदनांची अणुभरी !

शिराखालीं तुझ्या भुज मम गडे ! स्थापितिल हा,
तसा माझ्या कण्ठीं कर तव सखे ! सुन्दर अहा !
जलस्था त्या देवी चरण अपुले गुंतवितिल,
मुखें लाडानें त्या निकट अमुचीं स्पर्शवितिल !

अशा थाटानें त्या निजवितिल गे सारतलीं,
नसे याचेमध्यें नवल विमले ! जाण मुदलीं,
जरी या रीतीचें शयन अपुलें योग्य न इह ।
नरांच्या जिव्हां तें म्हणतिल जरी पाप अहह !---

पयःस्था त्या देवी, फणिपतिसुता पंकजपदी,
स्वयंभू सूष्टीचे नियमचि सदा मानीति सुधी.
स्वयंभू सृष्टीचे नियम सुधखं पाहत असे
नराच्या ऐसा या कवण दुसरा मुर्ख गवसे ?

पयोदेवी तूझा बघूनी कबरीपाश निखिल
स्ववेणीसंहासा धरतिवरतीं त्या करतिल;---
तुझी नेसायाची बघूनि सगळी मोहक कला
स्ववस्त्रप्रावारीं उचलतिल गे ती अविकला.

कदाचित्‍ त्या देवी, अणि, फणिमणींच्या पण मुली,
सजीव प्रेतें तीं करितिल गडे ! दिव्य अपुलीं !---
पयोदेवी तेव्हां विचरशिल तूं सागरतलीं ;
तुझे संगें मीहो विचरित पयोदेव कुशली !

प्रवालांची तेथें विलसित असे भूमि सुपिक,
पिकें त्या मोत्यांची विपुल निघती तेथ सुबक,
सुवर्णाचीं झाडें, वर लटकती सुन्दर फळें
फुलें हीं रत्नांचीं; बघुनि करमूं काळ कमळे !

समुद्राच्या पृष्ठीं सखि ! बघत बालार्कसुषमा
उषीं बैसूं, त्याच्या अनुभवित मंदौष्ण तिरमा
धरूं दोघे वस्त्रा, जवपवन कोंडूं अडवुनी,
शिडाच्यायोंगें त्या फडकत सरू सिंधुवरुनी !

कधीं लीलेनें तूं बसशिल चलद्देवझषकीं,
फवारे तो जेव्हां उडविल जलाचे मग सखी---
तघीं दावायाला तुजसि मघवा प्रेम अपुलें,
स्वचापाचें तुझेवरि घरिल गे तोरण भलें !

कधीं कोणी राष्ट्र प्रबल दुसर्‍याला बुडविण्या,
जहाजें मोठालीं करिल जरि गे सज्ज लढण्या;
तरी सांगोनीयां प्रवर वरुणाला, खवळवूं
समूद्रा तेणें त्या सकळ खलनौका चूथडवूं !

गुलामां आणाया गिघतिला कुणी दुष्ट नर ते,
तरी त्यांचीं फोडूं अचुक खडकीं तीं गलबतें !---
नरांलागीं त्या गे त्वरित अधमां ओढुनि करीं
समुद्राच्या खालीं दडपुनि भरूं नक्रविवरीं !

प्रकारें ऐशा या जरि वरुणराज्यांत कुशले !
वसूं आनंदानें समयगणति जेथ न चले;
तशीत्या आकाशोवधिमधिल त्या द्वीपनिचयीं

शिरीं त्या मेरूच्या विलसत असे नन्दनवन;
अधस्तात्‍ शोभे ती अमरनदि तद्‍बिम्ब धरुन;
वनीं त्या देवांच्या सह अमृत तें प्राशन करूं;
तशीं रम्भासंगें चल ! सुरनदीमाजि विहरूं !


कवी - केशवसुत
- शिखरिणी 
- डिसेंबर १८८७

मुळामुठेच्या तीरावर

( चाल---हरिची भगिनी म्हणे सुभद्रा० )

तोः---

” मुळामुठेच्या हिरव्या सुन्दर या तीरावर, खिका अशी,
इकडे तिकडे स्फुंदत सुन्दरि ! वद मजला तूं कां फिरसी ?

क्षण पाण्यावर काय पाहसी ! काय अशी मुर्च्छित पडसी !
पुनरपि उठुनी वक्षःस्थल गे काय असें बडवुनि धैसी !

बससी-पडसी-उठसी ! क्षणभर वस्तीव वृष्टी देसी !
वस्त्र फाडिसी ! दुःखावेगें केशहि तोडूनियां घेसी !

हिंडत हिंडत सुटल्या केशीं फुलें गुंफिसी वनांतलीं !
तीरीं जाउनि त्यांच्या अंजलि सोडुनि देसी रडत जलीं !

काय असा तर घाला तुजवर पडला, मजला वद बाले !
जेणेंकरुनि स्थल हें तुजला रम्य असुनि शून्यचि झालें ! ”

तीः---

” रम्य तुझें हें तीर आणि हें पात्रहि होतें मुळामुठे !
रमणीयपणा पण तो आतां गेला सरिते ! सांग कुठें ?”

तोः---

” मुळामुठा ही आतां सुद्धां रम्य असे गे पहा पहा !
सुन्दरिच्या पण नेत्रजलांनो ! क्षणभर तुम्ही रहा रहा ! ”

तीः---

” नाहीं ! माझ्या नेत्रजलांनो ! अखण्ड येथें वहा वहा !
रमणीयपणा परलोकीं मग मन्नेत्रांनो ! पहा पहा ! ”

तोः---

” रमणीयपणा मनोहारिणी ! या लोकांतचि अजुनि असे !
तुझ्याबरोबर तो जाइल कीं काय, असें भय वाडतसे ! ”

तीः---

” रमणीयपणा स्वयें मूर्तिमान्‍ मत्प्रियकर होता होता !--
नेला ! नेला ! तो या नदिनें ! हाय हाय ! आतां आतां !
तीरांवरि या तुझ्या एकदां दिसला जो, गे मुळामुठे !
रमणीयपणा हाय ! तो न दिसे आतां मुळीं कुठें !”


तोः---

” डोळे पुसुनी चल गे सुन्दरि ! पैल माझिया गांवाला !
संमति अपुली दे मजला तूं राणी माझी व्हायाला !
घरचा मोठा, लष्करांतही अधिकारी गे मी मोठा !
दास आणि दासींचा सजणें ! तुजला नाहीं गे तोटा !
सवाशेर सोन्यानें रमणी ! तुजला मढवुनि काडिन मी ! ---
पाणिदार त्या सवाशेर गे मोत्यांनीं तुज गुम्फिन मी ! ”

तीः---

” सोनें मोतीं प्रिय मज होतीं, किंवा होतीं वन्य फुलें,
तें मन्नाथा ! लग्नाआधीं तुला समजलें कशामुळें ?
उद्यां आमुचें लग्न जाहलें असतें--मग आम्ही दोघें
या तीरावर फिरलों असतों वन्यसुमें शोधित संगें !

तुम्हीं लवविल्या फांद्यांचीं मीं फुलें गडे असतीं खुडिलीं !---
त्यांची जाळी माझ्या अलकीं असती तुम्हीं गुम्फियली !
न कळे कैसें तुम्हांस कळलें आवडती मज वन्य फुलें !---
म्हणुनी येथें आलां त्यांला जमवाया मत्प्रीतिमुळें !

येथे आलां तर आलां ! पण त्या दरडीवर कां चढलां ?---
माझ्याकरितां पुष्पें खुडितां अहह ! घसरुनी मज मुकलां !
आलें ! आलें ! मीहि जिवलगा ! त्याच तरी या मागनिं ”
असें वदुनि ती चढुनि गेली त्या दरडीवर वेगनें !

तिनें जवळचीं फुलें तेथलीं बरींच भरभर हो खुडिलीं !
आणि सख्याच्या नांवें डोहीं खालीं सोडुनियां दिधलीं !
दिव्य अप्सरा भासुनि ती, तर तो विस्मरला भानाला !---
पण फार पुढें बघुनि वांकली; धांवुनि जवळी तो गेला !
पण... ! मित्रांतो ! पुढें कवीला कांहीं न सुचे सांगाया !
तुम्हिच विचार मुलामुठेला, जाल हवा जेव्हां खाया !


कवी - केशवसुत
जुलै १८८७

अपरकविता दैवत

प्रिये, माझ्या उच्छृंखल करुनियां वृत्ति सगळया,
तुझ्या गे भासानें कवनरचनेला वळविल्या ;
अशी जी तूं देशी प्रबलकवनस्फुर्ति मजशी,
न होशी ती माझें अपरकविता-दैवत कशी ?

बरें का हें वाटे तुज ?-- तुजवरी काव्य लिहुनी
रहस्यें फोडावीं सकळ अपुलीं मीं मग जनीं ?

त्यजूनी ही इच्छा, मज सुखविण्या ये तर खरी,--
स्तनीं तूझें व्हावीं तर रचिन काव्यें स्वनखरीं !

रचायापूर्वीं तीं, रसनिधि असे जो मग उरीं --
जयाच्या काव्यें या खचित असती फक्त लहरी,
तुला तो द्याया या निधिच किती हा उत्सुक असें !--
करांनीं गे आकर्षुनि निघिस त्या घे तर कसें !

अस मी द्याया हें ह्रदय तुजला पत्नि सजलों,
पुन्हां कां तूं मातें तरि न दिसशी ? - वा, समजलों !--
पुण्यामध्यें ना मी अहह ! बहरीं सोडूनि तुला
शिकायाला आलों !-- तर मग तुझा द

कुठें तूं ?-- मी कोठें ? जवळ असशी तूं कुठुनियां !
निवेदूं हें कैसें ह्रदय तुजला मी इथुनियां ?
तुझेवीणें तूझेवर मजसि कव्येंच लिहिणें !
उपायानें ऐशा मन विरहतापीं रमविणें.

विदेशीं गे भुंगा प्रियकर कळीला स्मरुनि तो
स्वगुंजालापांला फिरुनि फिरुनि घेत असतो,
वियोगाचीं तेवीं करुनि कवनें हीं तुजवरी !
तयांच्या आलापां, स्मरुनि तुज, मी सम्प्रति करीं !


कवी - केशवसुत
- शिखरिणी
- १८८६

प्रियेचें ध्यान

" उद्यां प्रातःकालीं इथूनि मजला जाण निघणें
पुण्याला जाण्याला, स्वजन सगळा सोडुनि गडे;
उद्यां एव्हां माझ्याविण वद कसें होइल तुला ?--
दुणे तूझेवीणें श्रम सखि ! पथीं होतिल मला ! ”

असें मोठया कष्टें तुजजवळिं मी पत्नि ! वदतां,
गळां तूझे माझे, मम तव, सखे हस्त असतां,
विशालाक्षीं तूझे जल भरुनियां मी न दिसुनी,
वियोगाला भावी, समजलिस तूं भूत चुकुनी !

निशीथीं या आतां असशिल मला ध्याउनि जसें
मदाभासा स्वांगीं विरहविकलीं वेष्टित, तसें --
मला शोकानें तूं समजुनि मदाभास दिधलें ,
स्मरूनी तें आलिंगन, ह्रदय हें फारचि उले !

गमे तूंतें ध्याया मज न दुसरी आकृति बरी,
रतीचे वेळींच्या शिरति ह्रदयीं अन्यहि जरी;
म्हणूनीयां वाटे मज अनुभवें याच सखये --
सुखाहूनी दुःखा स्मरति बहुचा बद्ध हृदयें !

अहा ! अंकीं माझे तुज बघतसें मी बसलिस,
शिरा स्कंधीं माझे लववुनि गडे तूं पडलिस,
वियोगाचे तकें रडत असतां, अश्रु सुदती !
तुझे, माझ्या वक्षीं टपटप बधें मी उतरती !

टिपापा मी त्यांतें, पदर सरसावीं, परि गडे,
भिजीनी तो तूझें गयन सुकणें, हें नच घडे ;--
असें कां व्हावें हें न कळुनि रडें मी खळखळां,
पुसाया तें लागे अहह ! नयनां तोच मजला !


कवी - केशवसुत

रा. वा. ब. पटवर्धन, मु, नागपूर, यांस

( श्लोक )

प्रगल्भा त्या नारी, मधुर जगतीं साच असती,
परी व्रीडायुक्ता मधूतर मुग्धाचि गमती;
बिजेची ती ये ना कधिंहि पुनवेला अणु सरी.
बरी ही या ठायीं सरस उपमा लौकिक खरी.

किंवा, त्या युवती जधी पतिचिया नामास घेती मुखें,
तेव्हां तें परिसूनियां जन जरी हे डोलती हो सुखें,
तें ध्याया तरि त्या मुखा फुलविती तेव्हां वरौष्ठांतुनी,
अव्यक्त घ्वनि जो निघे, प्रिय खरा तो फार होतो जतीं.

तैशी तुझी मधुर कविता गाइल त्वद्यशाला,
लोकांमध्यें प्रिय करिल तो आपुल्या गायनाला:
आरम्भींचे परि परिसुनी बोल हे मुग्ध तीचे,
भूरि प्रेमें ह्रदय भरुनी डोलते फार याचें.

आहे तुला सर्वहि सृष्टि मोकळी,
व्योमांतली सर्वहि तेंचि पोकळीं;
संचार कीजे तरि तूं स्वमानसें,
कोल जराही प्रतिबंध तो नसे.

या अन्तरालांतिल तारकांत
आत्मे कवीलागुनि दीसतात;
कांचेमधूनी दिसतें जनांला,
घोंडयामधूनीहि दिसे कवीला !

निजींव वस्तु तर लाव वदावयाला,
जन्तूंस लावहि विचार करावयाला,
आम्हीं शिकीव सुवचीं सुर व्हावयाला
पृथ्वीस सांग अमरावति जिंकण्याला !

किंवा, हें तुजला कशास म्हणुनी सांगावया पाहिजे ?
हा माझा घडला प्रमादचि, वरी मी बोलिलों तूज जें;
डोळयांला बघन्या तसें शिकविणें कानांस ऐकावया,
हें हास्त्यार्ह जसें, तसें पढविणें शाहीर आहे तया !

ऐकती न बघती न जे जन,
गम्य होयचि कवींस तें पण;
हे म्हणूनि नरजातिचे खरे,
नेत्रकर्णचि नव्हेत का बरे ?

जगावें तूं वषें प्रिय मम कवे ! शंभर पुरीं,
समृद्धी सौख्याची चिर तव वसावी घरभरी,
जन स्वायीं तूझी सुरस कवनें सुन्दर घरी,
भविष्यीं कालीं तें शुवि यश तुझें निश्चल ठरो !

प्रीति

कविता करितां मला न येई,
रचिले हे गुण हो परन्तु कांहीं;
म्हणुनी करुनी क्षमाचि मातें,
करणें स्वीकृत मन्नमस्कृतींतें !


कवी - केशवसुत
- पुणें १८८८

गोष्टी घराकडील

गोष्टी घराकडिल मी वदतां गडया रे
झालें पहा कितिक हें विपरीत सारे !--
आहे घरासचि असें गमतें मनांस,
ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास !

ही देख म्हैस पडवैमधिं बांधलेली
रोमथभाग हळु चावित बैसलेली.
मित्रा ! गजांमधुनि या पडवीचिया रे
मौजा पहा क्षणभरी रजनीचिया रे !

डोळयांत बोट जरि घालूनि पाह्‍शील
अंधार तो अधिकची तुजला दिसेल ! --
अंधार-- जो फलक होत असे अम्हांस
चेतोनिबद्धजनचित्र लिहावयास !

आवाज ’ किरं ’ रजनी वदतेच आहे,
’घों घों ’ असा पवन नादहि बोलताहे;
ऐके पलीकडुनि बेडुक शेतभातीं
पर्जन्यसूक्त सगळे मनमोख्त गाती ?

हीं चारपांच चढूनी हळु पायठाणें
या ओसरीवर अतां जपुनीच येणें !
हें ऐक रे ’ टकटका ’ करितें घडयाळ
या शान्ततेंत गमतें कुटितेंच टाळ !

डावीस हा बघ निरेखूनि एक माचा
निद्रिस्थ त्यावरि पिता अतिपूज्य माझ्या.
त्याचा खरोखर न मी क्षण पुत्र शोनें !
तो सर्वदा जरि म्हणे मज पुत्र लोभें !

तातास या बघुनि या ह्रदयांत खातें,
होऊन हें ह्रदय विव्हळ सर्व जातें !
त्याच्या तरी पदयुगावरि या पडूनी
नाणूं तयास मग कां वद आंसवांनीं ?

ताताचिया बघ गडया उजवे कडेला
बापू असे तिथ बेरें अमुचा निजेला,
अज्ञान तो चपलधी परि बाल आहे
त्याचेविशीं मम मनीं अतिलोभ राहे !

बापू ! गडया ! ध्वज उभा करशील काय ?
तूं देशकारण करूं झटशील काय ?
बापू ! जनांत दिवटी धरशील काय ?
स्वातंत्र्यदेव मनसा भजशील काय ?

मित्र ! घरीं सुदुढ हस्त मदीय फार,
दारास आडसर घट्ट असेल थोर,
दाराचिया तर फटींतुन आंत जाऊं,
सानंद सुस्थित घरांतील सर्व गाऊं !

मित्रा ! इथें कितितरी मज हर्ष होई,
येथें हवा मधुर, निश्वबनांत येई,
नाहीं कधींहि बुधवारवनांत जैशी
वाटेवरी चतुरशिंगिचिया न तैशी !

मित्रा ! असा हळूच ये उजवे
खोली पहा पघळ ही किती ऐसपैस,
निद्रावश स्वजन येथ, बघूनि यास
हर्षाचिया न उकळया फुटती कुणास

ती एक खाट अवलोक समोर आतां
आहे सुषुप्तिवश तेथ मदीय माता,
तीचे कुशींत निजली दिसते मदीय
भीमा स्वसा, बधुनि ती मज हर्ष होय,

मत्कारणें स्तवुनि देव, निजावयातें
आलीस तूं खचित गे असशील माते !--
मोठे त्वदीय उपकार, जरा तरी ते
जातील का फिटूनियां तव पुत्रहस्तें ?

खालीं मदीय भगिनी दिसती निजेल्या,
गोष्टी जयांस कथितां न पुर्‍याच झाल्या !
ती कोण दूर दिसते ?-- निजली असूनी
जी श्वास टाकित असे मधूनीमधूनी !

कान्ताच ही मम ! -- अहा ! सखये ! मदीय
स्वप्नें अंता तुज गडे ! दिसतात काय ?--
आतां असो ! पण पुढें तुजला दिसेत
स्वप्ने तुझीं मग समग्र तुला पुसेन !

मागील दारीं सखया ! तुळशीस आतां
वन्दूं, जिला मम जनीं नमिला स्वमाथा !
सोडूनि गांव वळणें अमुच्या घराचें !
येऊं घरा परत खासगिवालियाचे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- वसंततिलका
- २२ जुलै १८८७