तत्त्वत: बघतां नामा वेगळा

तत्त्वत: बघतां नामावेगळा । कोण नाही सांगा मजला ।
भिन्न व्यक्तित्व नामाला । नामकरण होतसे ।।
नाम म्हणजे अभिधान । अभिधान म्हणजे जे वरुन ।
धारण केलें, ज्यामधुन अन्त: साक्ष पटतसे ।

भाव शब्दस्पर्शहीन तैसे रुपसगंधावांचुन ।
अतएव ते विषय जाण । इन्द्रियांचे नव्हेत ।।
ही तों वाणी मिथ्या वाटे । कारण पंचविषयांचे थाटें
भाव नटती, खरें खोटें । विचारुनी पाहिजे ।।


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- 'यथामूल आवृत्ती' १९६७, पृ. ४३

गुलाबाची कळी

एका मुलग्यानें
पाहिली कळी,
गुलाबाची कळी बहु गुलजार !
तिला भुलुनियां तो जवळी
गेला, होउनि लंफ्ट फार !
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी बहारदार !            १

मुलगा म्हणे “मी वेंचिन तुला
गुलाबाचे कळी ! सुंदर फार !”
कळी म्हणाली “बोंचिन तुला
नको हात लावूं पहा विचार !”
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी बहारदार !            २

निष्ठुर तो तर वेंचणारच
गुलाबाची कळी ती सुकुमार !
कळीहि त्याला बोंचणारच
असा तिला तो कुठें सोडणार !
हातिं जाणें तिला भाग पडणार !
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी
गुलाबाची कळी बहारदार !            ३


कवी - केशवसुत
- मासिक मनोरंजन, एप्रिल १८९६

उत्तेजनाचे दोन शब्द

(दोहा)

जोर मणगटांतला पुरा
घाल घाल खर्ची;
हाण टोमणा, चळ न जरा
अचुक मार बर्ची !            १

दे टोले जोंवरी असे
तप्त लाल लोखंड;
येईल आकारास कसें
झाल्यावर ते थंड ?           २

उंच घाट हा चढूनियां
जाणें अवघड फार;
परि धीर मनीं धरुनियां
न हो कधीं बेजार !           ३

यत्न निश्चयें करुनी तूं,
पाउल चढतें ठेव;
मग शिखराला पोंचुनि तूं,
दिसशिल जगासि देव !      ४

ढळूं कधींही देउं नको
हृदयाचा निर्धार;
मग भय तुजला मुळीं नको,
सिद्धि खास येणार !          ५

झटणें हें या जगण्याचें
तत्त्व मनीं तूं जाण;
म्हणून उद्यम सोडूं नको,
जोंवरि देही प्राण !            ६


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- विद्यार्थीमित्र, वर्ष १, अंक ७, मार्च १८९५

चिन्हीकरण अर्थात् भाव आणि मूर्ति यांचे लग्न

भूचक्राची घरघर जिथें ती न ये आयकाया,
आहे ध्यानाभिध रुचिर तो कुंज त्या शांत ठायां,
त्याचे द्वारीं उपवर वधू मूर्तिनाम्नी विराजे
तीचे संगें वर परम तो भावशर्माहि साजे !                १

होती पर्युत्सुक बहुत ती शीघ्र पाणिग्रहाला,
तेथें आत्मा भ्रमत कविचा तो उपाध्याय आला;
स्फूर्तिज्वालेवरि मग तयें होमुनी जीविताला,
लग्नाला त्या शुभकर अशा लाविता तो जहाला !       २

गेलें कुंजीं त्वरित मग तें जोडपें दैवशाली
केली त्यांहीं बहुविध सुखें त्या स्थलीं प्रेम-केली;
झालीं त्यांना बहुत मधुरें बालकें दिव्य फार,
तीं जाणा हीं-सुरस कविच्या क्लृप्ति तैसे विचार !       ३


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
वृत्त - मंदाक्रांता
करमणूक, १६ फेब्रुवारी १८९५

फुलांतले गुण

बांधावरि झुडुप एक,
पुष्प तयावरि सुरेख
पाहुनि, मी निजहृदयीं मुदित जाहलों,
त्याजवळि चाललों !                       १

जाउनियां, त्या सुमनीं
काय असे, हें स्वमनीं
मनन करित, उन्मन मी तेथ ठाकलों,
या पंक्ति बोललों !-                         २

पुष्पीं या सुन्दरता
फार असे, ती चिता
वेधुनि, संसारताप सारिते दुरी,
उल्लसित त्या करी !                      ३

पुष्पीं या प्रीति असे,
ती मीपण हाणितसे,
परविषयीं तन्मयता प्रेरिते उरीं,
ने द्दष्टि अन्तरीं !                           ४

मार्दवही यांत फार
कारण, निज मधुतुषार
ढाळितसे स्वलतेच्या पल्लवीं अहा !
तें द्रवतसे पहा !                           ५

सद्गगुणही यांत वसे,
कारण, कीं, तेज असे
तेथें, स्मित करित सदा आढळे पुढें,
त्या तम न आवडे !                       ६

जादूही यांत भरुनि
दिव्य असे, ती पसरुनि
निज धूपा वार्‍यावरि, दश दिशा भरी,
बेहोष कीं करी !                           ७

यापरि मी उन्मनींत
होतों आलाप घेत;
आणिक या फुलांमधीं काय हो असे ?
तें काय हो असे ?-                        ८

तों जवळुनि मधमाशी
आली गुणगुणत अशी
“गाणें तें फुलामधें आणखी असे !”
ती बोलली असें !                         ९

पेल्यामधिं पुष्पाच्या,
गुंगत ती त्यात वचा,
शिरली; त्या वचनाची सार्थता भली
तों व्यक्त जाहली !                        १०

गुणगुणली मधमाशी
“पुष्पीं गुण जे तुजसी
आढळले, तुजमध्ये कितिक त्यांतुनी ?-
बा, घेई पाहुनी !”                        ११


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
जाति - उन्मती
मुंबई, ३१ मार्च १८९३

(खाणावळीतील) धृतधारा!

सुवर्णाची वल्लि प्रचलित जणूं काय गमते !
नभांतूनी भूमीवरति चपला वा उतरते !
पडे खालीं केव्हां त्वरित, नयनांला न दिसते !
नभीं वा पातालीं लपलि धृतधारा न कळते !                १


कवी - केशवसुत
वृत्त – शिखरिणी
करमणूक, ११ मार्च १८९३,

“माझे चित्त ठेवुनि घे”

( करमणुकीतला हितचिंतकाचा “माझें धाडुनि चित्त दे” हा चुटका वाचल्यावरुन)

“माझें धाडुनि चित्त दे” लिहुनि हें मी धाडिलें कां तुला ? –
पश्चात्ताप असा बळावुनि अतां जातीतसे गे मला !
तूं काहीं मजपासुनी हृदय हें मागूनि नेलें नसे;
गेलें तें तुजमागुनी तर तुझा अन्याय का हा असे ?              १

गेलें तें तुजमागुनी, सहृदये ! येऊं दिलें तूं तया,
हा तुझा उपकार मीं विसरुनी जावें न मानावया;
तें राहूनि दुरी, स्वकीय मजला देसी न तूं चित्त तें,
हा मानूनि विषाद, मी चुकुनियां गेलों भ्रमाच्या पथें !           २

चित्ताचा तव लाभ यास घडुनी येणार नाहीं जरी,
पायापासुनि तूझिया चळुनियां जाणार नाहीं तरी –
माझें चित्त दुरी; - असुनि पुरतें हें ठाउकें गे मला –
“माझें धाडुनि चित्त दे” म्हणुनि मीं कैसें लिहावें तुला ?        ३

झाली चुक खरी, परन्तु सदयें ! मातें क्षमा तूं करी,
मच्चित्तावरतीं यथेष्ट कर गे स्वामित्व तूं सुन्दरीं !
अव्हेरुनि मदीय चित्त परतें देऊं नको लावुन,
माझें ठेवुनि चित्त घे ! – मग जगीं धन्यत्व मी मानिन !      ४


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
मुंबई १ मार्च १८२१