पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं ।
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥

त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥

सकळ संतांचा मुगुटमणी देखा ।
पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥

चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी ।
भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥


  - संत चोखामेळा

ऊंस डोंगा परी

  ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा ।
  काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥

  कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा ।
  काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥

  नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें ।
  काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥

  चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा ।
  काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥

  -  संत चोखामेळा

विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी

विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥

होतो नामाचा गजर ।
दिंड्या पताकांचा भार ॥२॥

निवृत्ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥

हरि कीर्तनाची दाटी ।
तेथें चोखा घाली मिठी ॥४॥


 - संत चोखामेळा

झिणि झिणी वाजे बीन

झिणि झिणी वाजे बीन
सख्या रे, अनुदीन चीज नवीन

कधी अर्थावीण सुभग तराणा
कधी मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधी केविलवाणा, शरणागत अति लीन

कधी खटका, कधी रुसवा लटका
छेडी कधी प्राणांतिक घटका
कधी जीवाचा तोडून लचका, घेते फिरत कठीण

सौभाग्ये या सुरात तारा
त्यातून अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रवीण

  - बा.भ.बोरकर

जोहार मायबाप जोहार

जोहार मायबाप जोहार ।
तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

बहु भुकेला झालो ।
तुमच्या उष्ट्यासाठी आलो ॥२॥

बहु केली आस ।
तुमच्या दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे पाटी ।
आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ॥४॥


 - संत चोखामेळा

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण ।
वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥

आगमाची आढी निगमाचा भेद ।
शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

योग याग तप अष्टांग साधन ।
नकळेची दान व्रत तप ॥३॥

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाम तुझें ॥४॥


 -  संत चोखामेळा

 आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
 विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
 उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
 भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
 चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।

  - संत सेनान्हावी