कंटाळा आला बोवा आपल्याला इथचा ! - हो तर काय ? रोज तेंच, तेंच ! अग, काडीइतकासुद्धां फरक नसावा ? - उठल्या - बसल्या तें अमृत ढोसावें, आणि खुशाल टोळासारखें आपलें भटकावें ! कांहीं उद्योग दुसरा ? - छे छे छे !! ओकारी आली बोवा आपल्याला येथची ! असार ! असार आहे हा स्वर्ग निव्वळ ! - तेंच कीं ! सदा म्हणे आपला आनंद ! एक वृत्ति ! केव्हां संपते आहे कुणास ठाऊक ! - आतां थोडी कां वर्षे झाली असतील इथें येऊन ? - पण कांहीं आहे का फरक ? हें आपलें नंदनवन, होतें तस्सें आहे ! - नादीं लागलों ! आणि फुकट इथें तडफडायला आलों ! - चोर कुठले ! म्हणे ' स्वर्गात जा म्हणजे शांति मिळेल ! ' - वा ! काय छान शांति मिळते आहे इथें ! एकाला म्हणून करमत असेल तर शपथ ! नकोसें झालें आहे अगदीं ! - हें ग काय ? तूं तर रडायलाच लागलीस ! उगी ! - जाऊं ! लवकरच आपण मृत्युलोकांत जाऊं बरें ! तिथें मग आपल्याला सुंदर सुंदर देह मिळतील ! आणि मग काय महाराज ! - हंसली रे हंसली ! - अग तें कांहीं पुसूं नकोस ! देहलोकची मजा कांहीं और आहे ! घटकेंत आनंद आहे, तर घटकेंत दुःख आहे ! चाललें आहे ! शेंकडों वृत्तींत जिवाला बागडायला सांपडतें ! आणि हें कशामुळें ? - तर हें सगळें देहामुळें बरें का ! - आणि हो ! सगळेंच तिथें अस्थिर ! त्यामुळें अश्शी माणसाची परीक्षा होते कीं, ज्याचें नांव तें ! चांगला तावून सुलाखूनच निघतो ! उगीच नाहीं मृत्युलोक ! - बरें का ? - म्हटलें खरी मुक्ति तिथें आहे माझे बाई ! - नाहीं तर इथें ! पडा सदा आनंदांत कुजत ! - मृत्युलोकाशिवाय नाहींच तें ! सुख खरें तिथें ! अग आपलेंच काय, कंटाळा आला कीं देवसुद्धां जातो तिथें ! उगीच नाहीं अवतार घेत ! ....
कारण चरित्र लिहायचें आहे !
चरित्र काय पुढच्या अंकांत देणार आहांत का ? - छान बाळाभाऊ म्हणजे नामांकितच लेखक ! अहो वा ! त्याचा माझा स्नेह लहानपणापासूनचा ! - लंगोटीमित्रच आम्ही ! त्यामुळें हवी तितकी माहिती मला देतां येईल ! - हां, तेवढें मात्र विचारुं नका ! लेखनांत काय त्यानें तेज दाखविलें असेल तेंच ! बाकी मनुष्य आपला - तुमच्या आमच्यांतल्या गोष्टी या - मनुष्य आपला असा तसाच ! - अहो स्वभाव काय, अन् वर्तन काय ! गोंधळ ! काय सांगायचें तुम्हांला ? सरळपणा म्हणून यत्किंचित् नाहीं ! कधीं कोणाचे पैसे घेतले, आणि ते बोवा परत केले आहेत, नांव नाहीं ! याचे घे, त्याचें घे असें करुन सातआठ हजारांला तरी त्यानें बुडविलें असेल ! शिवाय लोकांची पुस्तकें दाबली ती वेगळीच ! हा जिथें साधा व्यवहार, तिथें काय बोलायचें आणखी ! हीच तर्हा व्यसनाची ! अहो, परवां मरायच्या आधीं महिना दोन महिन्यांतली गोष्ट ! दिवसाढवळ्या, अगदी भर चौकांत एक टांगेवाल्याशीं मारामारी केली ! बोला आतां ! - अहो, कसचें कारण अन् काय ! यथास्थित झोकली होती झालें ! - नीट नोकरी नाहीं, धंदा नाहीं, सदा चहा आणि विडया ! रोज उठून घरांत भांडणें ! - कां नाही व्हायची ! वेळ नाहीं, अवेळ नाहीं, येईल त्याच्या नरड्यांत चहा ओतायचा ! कांही त्याला सुमार ? - आपलें बोलायचें किंवा लिहायचें नाही इतकेंच ! बाकी अशा एक एक गोष्टी आहेत कीं, - चांगलें बाबांचें लग्न करुन दिलें, पण घटकाभर पटेल तर शपथ ! कारण बाहेर यांचा रोमान्स बोकाळलेला ! शेवटीं एक दिवस नवराबायकोची अशी जुंपली कीं काहीं पुसूं नका ! - झालें ! पुढें काय ? ती उठून बापाच्या घरी चालती झाली, आणि हें काय ? - यांची उप्पर मिशी ! कारण, गेली, तर गेली ! नाकावर टिच्चून दुसरें लग्न करीन मी ! - आणि ठणठणीत केलें लग्न ! तेव्हां अशा या भानगडी, पण लिहून थोडेंच चालतें आहे ? तिथें म्हणजे, ' यांना दोन बायका होत्या ही गोष्ट खरी. पण पहिलीला मूल होईना, तेव्हां ती सारखी झुरणीस लागली ! इतकी कीं, शेवटीं तिनें अंथरुण यांनीं दुसरें लग्न करावें ! शेवटीं अगदीं निरुपायानें - कारण लग्न केलें ! ' - म्हणजे अशा तर्हेनें सगळें फिरवून - कारण चरित्र लिहायचें आहे, तेव्हां तें -
फाटलेला पतंग
छे ! आतां कोठून मी धड व्हायला ! अशा फाटलेल्या स्थितीतच फडफड - रडरड - करीत मला किती काल कंठावा लागणार आहे, तें एका ईश्वरालाच ठाऊक ! - अहो ! नका ! त्या आकाशाकडे पाहूं नका ! हरहर ! हेंच निरभ्र आकाश निराशेची घरघर लागलेल्या प्राण्यालासुद्धा, गोड - सुंदर - अशीं मोठमोठीं स्वप्नें पाडून - बिचार्याला नादीं लावून - कधीं म्हणून लवकर मरुं देत नाहीं बरें ! अशा स्वच्छ आकाशांत, अमळ वारा आनंदानें खेळूं लागला कीं, अंतः करणांत गुंडाळून ठेवलेली - सदैव आनंदाश्रु व दुःखाश्रु यांनीं भिजलेली माणसाची कल्पनाशक्ति - जगाच्या दुर्लक्षपणानें हूं म्हणतांच - जिवाला इतक्या कांहीं उंचच उंच भरार्या मारीत घेऊन जाते कीं, शेवटीं पश्चिमेच्या अंकावर अर्धवट झोंपीं गेलेला सूर्य एकदम जागा होऊन विचारतो कीं, ' नभोमंडलांत माझ्यामागे इतक्या वैभवानें हा कोण बरें महात्मा तळपतो आहे ? ' - पण अरेरे ! तो वैभवाचा क्षण आत्म्याला मिळतो - न मिळतो - तोंच ' ओढा खाली ! खालीं खेंचा ! नाहीं तर तो वेडा होऊन, कोठें तरी भडकेल ! ' अशी एकच जगाची हाकाटी सुरु होते ! मग काय ? खालीं जग, वर स्वर्ग, या उभयत्नांच्या जोरानें - अगदी निकरानें - चाललेल्या ओढाताणीमध्यें बिचार्या जिवाची - हाय ! - किती भयंकर दशा होते म्हणून सांगूं तुम्हांला ! - नको ! त्या दिवसाची - त्या स्थितीची आठवणसुद्धां नको ! अहो ! एके काळी धड असलेला हा फाटका पतंग, अशाच जगाच्या व स्वर्गाच्या ओंढाताणीमध्यें सांपडला होता बरें ! अहाहा ! किती सुखाचा - माझ्या पूर्ण भाग्याचा - दिवस होता तो ! ब्रह्मानंदाकडे न्यायला आलेला शीतल वायु कसा अगदी मिठी मारुन की हो मला घेऊन चालला होता ! जगाला मी पूर्ण विसरुन - पण होय ? जग कोठें मला विसरलें होतें ? माझी किंमत किती ? पण तिचासुद्धां जगाला कांही केल्या लोभ सुटत नाहीं ! शेवटीं ! जग मला खेंचूं लागलें - ' स्वर्ग जातो ! स्वर्ग जातो ! ' असें म्हणून मी मोठमोठ्यानें रडूं लागलों - अगदी सुचेनासें होऊन संतापाच्या - सोसाट्याच्या - वावटळींत सांपडून धाडकन् - या बाभळीच्या झाडावर येऊन आदळलो ! आतां हें फाटलेलें हदय कधीं तरी धड होईल का हो ! - नाहीं ! - नाहीं ! - नाही !! - उलट मी आतां दिवसानुदिवस अधिकाधिक असा विरतच जाणार ! - अहो ! माझ्या स्थितीबद्दल रडूं नका ! आधी ऐका ! एकदां धड असलेल्या पतंगाचें - या बाभळीच्या कांट्यांवर बसून अहोरात्र रडणारें - कण्हणारें - फाटत चाललेलें पिशाच्च ! - काय सांगतें तें ऐका ! गर्वानें भरार्या मारुं नकोस ! भरार्या मारुं नकोस ! नाहीं तर अस्सा फाटून - जन्मभर, जन्मभर - रडत बसशील !...
हें काय उगीचच ?
पन्नास - नाहीं शंभर वर्षाचें असतों म्हणून काय झालें असतें ? आहे काय त्यांत ? आणायचा अवकाश, तेव्हांच नीट करुन दिलें असतें ! - एकदा नीट पहाल तर खरें ! ऐसें झकास तुमचें घड्याळ झालें आहे, कीं नांव नको आतां पुनः बिघडण्याचे ! - अलवत् ! आमचें इस्पितळच असें आहे ! आला रोगी कीं बरा झालाच पाहिजे ! - ती पाहा ! ती बाजाची पेटी दुरुस्त करायला आणली, तेव्हां एक सूर धड असेल तर शपथ ! हाडेंन हाडें खिळखिळींत झाली होतीं ! पण तीच आतां ? अशी गोड गाते आहे कीं, ज्याचें नांव तें ! - सांगतो ना ! एकदां जिथल्या तिथं ठाकठीक होऊन जेव्हां तिचे सूर निघायला लागले, तेव्हां किती मनस्वी आनंद झाला म्हणून सांगूं तुम्हांला ! - मालक तर उड्या मारायला लागला ! - बरोबरच आहे ! करावयाचें कांहीं, तर असेंच केलें पाहिजे ! नाहीं तर सांगा, जन्माला घातलें कशाला ? - असें हें सगळें मोडलेलें चालू करावयाचें, याचकरितां कीं नाहीं ? अन् खरी मौज यांतच ! नाहीं का ? - तेव्हां एकंदर क्रमच असा आहे कीं, बिघडलेले म्हणून कांहीं राह्यचेंच नाहीं - हो मग ! शंका आहे काय ? - तें जें प्रेत चाललें आहे, तें सुद्धां पुन्हा धड व्हायलाच ! - मला सांगा, आपण केलेलें कांहीं नादुरुस्त झालें, तर काय हव्वें तें करुन, नीट करतोंच कीं नाहीं आपण ? - झालें तर ! हें जसें माणसाचें, तेंच आपल्या निर्माणकर्त्याचें ! तेव्हां इथं आपल्या हदयाचे ठोके बंद पडले, तर काय बिघडलें त्यांत ? पुनः कुठें तरी चालू होतातच ते ! - आणि असें आहे, म्हणूनच आपण सगळें हें - हव्या तशा हाल अपेष्टा सोसतों, जिवाची माणसें जातात - तेंही सोसतों, अन् सगळें हें नेटानें करीत राहातों ! - हें काय उगीचच ?...
तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त !
हो, बरोबर, दोनदां आपल्याकडे येऊन गेलों मी. - नाहीं, काल नाहीं, संध्याकाळीं आलों होतों तें परवा. आणि सकाळचे जें म्हणतां, ती कालची गोष्ट. असो, गांठ पडली चला. - हो, तेंच विचारणार होतों, कीं शेजारी एवढी गडबड कसली ? सारख्या मोटारी अन् गाडया येताहेत ! बायकांची तर ही गर्दी लोटली आहे ! - केव्हं ? आतां मघाशीं सहाच्या सुमारास ? - नाहीं बोवा, तुम्ही सांगेपर्यत वार्तासुद्धां नव्हती याची मला ! आज बरेच दिवस आजारी आहेत, फारशा कुठे जाता - येत नाहींत, येवढें ठाऊक होतें ! पण इतक्यांतच असें कांहीं होईलसें - बाकी बर्याच थकल्या होत्या म्हणा ! - साठ कां हो ! साठाच्या पलीकडे खास गेल्या होत्या ! - असो. चला ! मोठी एक कर्तीसवर्ती बाई गेली ! पेशवाईनंतर महाराष्ट्रांत इतक्या योग्यतेची मला नाहीं वाटत दुसरी कोणी असेलशी ! - खरें आहे. अगदी खरें आहे ! मनुष्य आपल्यामध्यें असतें, तोपर्यंत आपल्याला त्याची कल्पना नसते ! - स्वभावानें ना ? वा ! फारच छान ! अतिशय मनमिळाऊ आणि शांत ! कटकट म्हणून नाहीं ! - हळूहळू, थोडंथोडं, पण खरोखरच मोठं कार्य केलं ! अन् फारसा गाजावाजा न करतां ! - आधींच थोरामोठ्यांतली ती ! आणि रावसाहेबांचें वळण ! मग काय विचारतां ! - बोलणें काय, चालणें काय आणि - हो ! लिहिणेंसुद्धां - तेंच म्हणतों मी - कीं, ' आठवणी ' कशा नमुनेदार लिहिल्या आहेत ! मराठींत असें पुस्तक नाहीं आहे ! - तें काय विचारायला नको ! आज गर्दी म्हणजे - सगळा गांव लोटायचा आतां ! - मोटारी अन् गाडयांचा चालला आहे धडाका ! - काय ! खूपच लोटली आहे हो ! दर्शनाकरतां दिवाणखान्यांतच ठेवलेलें दिसतें आहे त्यांना ? - चला, येत असलांत तर .... जाऊं म्हणतों ! इतकीं माणसें जात आहेत तेव्हां - हो गर्दी तर आहेच ! - राह्यलं, तब्येत बरोबर नसली तर नाहीं गेले ! मला तरी कुठें येवढें जावेंसे वाटतें म्हणा ! कारण आतां गेले काय, अन् न गेलें काय सारखेंच ! पण बोवा ' अमूक एक फलाणे प्रोफेसरद्वय आले होते शेवटच्या दर्शनाला ' ! तेवढेंच ' ज्ञानप्रकाशां ' त !....
पण बॅट् नाहीं !
चक्क खोटा डिसिजन् ! कॅच असेल कोठून ? बॅटला बॉलच जर मुळीं लागला नाहीं तर - दुसरें काय ! वुइकिटकीपरनें विचारलें, अंपायरनें ' हो ' म्हटले. मामा लेकाचा ! - किती बेचाळीसच ना ? - उं: ! कांहीं फार झाल्या नाहींत ! - अरे चांगला सेट् झालों होतों, सहज सेंचरी निघाली असती ! - हुश्श ! बॉय ! सोडा लाव ! छे बोवा ! आज फारच थकलों ! छान म्हणजे ? राव बिजली आहे बिजली ! गन् अँड् मूरचा आटोग्राफ आहे ! बॅट् हलकीसलकी नाहीं ! पैसेच तसे मोजले आहेत ! - अरे तिचें आधीं केनच किती कॉस्टली आहे ! अन् खेळायला काय ! अगदीं फुलासारखी ! इतकें त्या - तो इकडचा बोलर नाहीं ? - इतकें त्याचें बोलिंग मारलें ना ! पण हाताला हूं की चूं नाहीं ! - कटिंगला तर बोलायलाच नको ! नुसती टाकायचा अवकाश, कीं ऐसा बॉल जातो आहे ! नुसते पहात रहावें ! बॅट म्हणजे दिलजान् आहे ! हजार पांचशेंतून निवडून काढली आहे ! उगीच नाहीं ! - पहा ! आहे ? अगदीं त्रिफळा उडाला ! लाख वेळां सांगितलें कीं, बॅकवर्ड खेळूं नको म्हणून ! आले आतां हाका मारीत ! नेक्सट कोण भिडे जातो आहे ना ? - जपूज खेळ रे बोवा - लेगब्रेक आहे ! जरा संभाळून ! नाहीं तर होशील बबड्याजीराव ? - काय ? बॅट् ? माझी बॅट् देऊं तुला ? हात जोडतों ! भाई माफ कर ! तेवढें नाहीं व्हायचें । दुसरें काय हव्वें तें - अगदी माझ्या जिवाचें माणूस - स्वतःचा जीव मागितलास तरी देईन ! पण बॅट् नाहीं हो !....
हें काय सांगायला हवें !
हां, आतां बरोबर ! घरचेच तुमच्या बातमीदार ! तेव्हां इतक्यांत तुम्हांला कळलें हें ठीकच ! - छे ! मला अजून वार्तासुद्धां नाहीं ! आपली कुणकुण लागली आहे इतकेंच ! - बाकि आहे काय त्यांत म्हणा ! कळेल, आज नाहीं उद्या ! - कां .... हीं खटपट नाहीं अन् कांही नाहीं ! पत्रंही कोणाला घातलीं नाहींत, किंवा कोणाकडे जोडेही फाडले नाहींत ! - अन् अर्ज तरी काय, खरडायचा म्हणून खरडला इतकेंच ! वांकडयांत असा शिरलोंच नाहीं ! म्हटलें काय होईल तें आपलें सरळ ! - नेहमीचेंच माझें आहे हें ! काम मनापासून करायचें, अन् चोखपणानें वागायचें ! हव्यात कशाला इतर खटपटी आणि लटपटी ! - आतां तुम्ही म्हणाल कीं, हें जमलें कसें ? अहो ! तेंच तर मोठें आश्चर्य आहे ! अर्ज जेव्हां म्हणतात माझा दृष्टीस पडला, तेव्हां .... आपले लोक बाजूलाच राहिले, पण एका युरोपियननें म्हणे हट्टच धरला कीं, ' अमुक एक गृहस्थ माझ्या जोडीला परीक्षक असतील, तरच मीही परीक्षक होईन ! नाहींतर साफ जरुर नाहीं मला युनव्हर्सिटीची ! ' - तेव्हां बोला आतां ! फादर लगबगमननेंच असें म्हटल्यावर ... अन् तें म्हणजे बडं प्रस्थ ! .... कोण पुढें काय बोलणार ! मुकाटयानें सगळे कबूल ! - छेः ! ओळख ना देख ! काळा कां गोरा त्यानें अजून पाहिलंसुद्धां नाहीं मला ! कुठं कांहीं लिहितों सवरतों, तें त्यानें मला वाटतें वाचलेलें ! तेवढयावरुन हें सगळें, बाकी खटपटीचें म्हणून नाव नाहीं ! - हॉ ! हॉ कसें बोललांत ! सरळ आपलें काम करीत असावें, पारख करणारा, आज ना उद्या, भेटतो कोणी तरी जगांत ! - ब .... रें ! कांही नवल विशेष ? - कुशाभाऊ जोशी; कोण बुवा हा ? - ओ ! आय् सी ! आपल्या तो .... नागुअण्णाच्या .... बयडीचा कुशा ? तो का बसणार आहे आमच्या परीक्षेला ? - काय ! इतका मोठा झाला आहे ! अहो परवां ना त्याला पाहिला आपण? धड नाकसुद्धां पुसतां येत नव्हतें ! आणि तो आतां कॉलेजांत का आला आहे ! - काय ! दिवस कसे हां हां म्हणतां जातात पहा ! - हो, तेंही खरेंच आहे ! प्रकृतीमुळें जे नागुअण्णा कोल्हापूरला गेले, ते तेही तिकडेच, आणि कुशाही तिकडेच ! तेव्हां काय मध्यंतरी दिसायचें कारण ? बरें कामाशिवाय आम्ही थोडेच कुठेंख हालतों आहों ! आपलं पुणें, नाहीं तर मुंबई ! बाकी म्हणून .... बरें आहे येऊं आतां ? - वा, वा ! भलतेंच ! त्याची नको काळजी ! कसें झालें तरी आपल्या बयडीचा कुशा ! तेव्हां हें काय सांगायला हवें ? हळूच केव्हांतरी बरं का ? - हळूच केव्हां तरी नंबर वगैरे ....
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)