त्यांत रे काय ऐकायचंय !

पेट्रोल वगैरे आहे ना रे भरपूर ? - ठीक आहे ! तबेल्यांतून आणलीस कीं निघालोंच आम्ही ! - छे हो ! नाहीं जमलें बोवा आज सकाळी फिरायला जायचं ! सगळा वेळ त्या बक्षीस समारंभांत मोडला ! आठ वाजल्यापासूज जें सुरु झालं, तें दहा साडेदहापर्यत चाललं होतं आपलं ! अस्सा कंटाळा आला होता कीं, ज्याचं नांव तें ! - नकोसं झालं होतं अगदीं ! बरं, मधेंच उठून येईन म्हटलं, तर तिकडूनही पंचाईत ! कारण समारंभाची मुख्य देवता .... अध्यक्षच पडलों आम्ही, तेव्हां थोडंच कुठं हालतां येतं आहे ? - हें म्हणा रे, तें म्हणा रे, स .... गळं कांहीं होईपर्यंत मग - शीः ! कसली व्यवस्था अन् काय ! .... चाललं होतं आपलं कसं तरी ! - अहो, मुळीं हेडमास्तरनाच कुणी विचारीना, तिथं कोण जुमानतो अध्यक्षाला अन् फध्यक्षाला ! मारे जोरजोरानं ओरडून बिचारा सांगत होता कीं, ' हें पहा ! हे जे आपले आजचे सन्माननीय पाहुणे आहेत कीं नाहीं, ते या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत ! फार त्यांना शाळेचा अभिमान आहे ! ' - झा.... लं ! असं म्हणतांच, जो कांहीं टाळ्यांचा, अन् बाकांवर हातपाय आपटण्याचा धडाका सुरु झाला, तो कांहीं .... राम ! राम ! .... पुसूं नका ! म्हटलं आतां शाळा पडते कीं काय होतंय तरी काय ! पुढं हीच रड आमच्याही भाषणाच्या वेळीं ! - अहो, कारटीं आवरतां आवरेनात ! हा उठतो आहे, तो ओरडतो आहे, गोंधळ इथून तिथून ! अन् जरा कांही झालं कीं नाही, कीं टाळ्या अन् दणदणा हातपाय आपटायचे ! - काय हें ! छे बोवा ! आपल्या वेळेला होतं कांहीं असं ? - हेः ! तर्‍हाच कांही वेगळी आजची ! काय पोरं, अन् काय मास्तर ! वा रे वा !! - जाऊं द्या झालं ! सगळीच जिथं घाण .... रॉटन झालं आहे, तिथं काय आपण तरी - चला ! आली मोटार वाटतं दाराशीं - पण हे.... चिरंजीव कुणीकडे निघाले आहेत आमचे ? फिरायला न्यायचं म्हणतों मी त्याला ! - अप्पू, ए अप्पा ! कोणीकडे निघाला आहेस ? ग्राउंडांत - काय असतं रे रोज उठून तिथें ? चल आज बरोबर फिरायला ! - पुरे रे बोवा ! असेल बोलावलं मास्तरांनीं ! - आहे ठाऊक किती ऐकतां तुम्ही तें ! - हँततेच्या ! येवढंच ना ? म ... ग रे काय ! चल ये बैस लवकर ! - भिकार स्काउटिंग तें काय ! अन् त्यांत रे काय ऐकायचं येवढं त्यांचं ! ....

माझी डायरेक्ट मेथड ही !

शंभरापैकीं पंचवीस मार्क ? - कांहीं जिवाला शरम ! जा ! आतांच्या आतां हें कार्ड घेऊन, दाखव तुझ्या त्या मास्तरला नेऊन ! बेशरम ! शिकवतात का हजामती करतात ? - या ! छान झालें ! ऐन वेळेवर आलांत ! पहा हे आमच्या चिरंजिवांचे प्रताप ! इंग्रजींत सारे पंचवीस मार्क ! - काय पोरखेळ आहे ? - मोठा अगदीं तुमच्या शिफारशीचा मास्तर ! कारण तुम्ही आमचे स्नेही - अन् शिक्षणपद्धतीचे अगदी गड्डे - म्हणून तुम्हाला आम्हीं विचारलें ! - तोंडांत मारायला नव्हते कुणी त्या वेळी माझ्या - दरमहा वीस रुपयेप्रमाणें आज अडीचशें रुपये त्या मास्तरड्यांच्या उरावर घातले त्याचें हें फळ होय ? म्हणे नवीन पद्धति ! विद्वान् कीं नाहीं मोठे ! - काल मॅट्रिक झाला नाहीं, तों आज मास्तरच्या खुर्चीवर जाऊन बसतां, काय येत असतं रे तुम्हांला ? - हीच रड तुमच्या त्या सुपरिटेंडटची ! - आज एम. ए. होतो काय, अन् शाळा चालवतो काय ! इकडे पालक तर विचारायलाच नको ! सगळेच अवलिया ! स्वतःला मुलें किती आहेत याची तरी त्यांना शुद्ध असते कीं नाहीं कुणास ठाऊक ! वर आणखी नवीन नवीन खुळें हीं ! आग लावा त्यांना ! यापेक्षां आमची जुनी पद्धति खरोखरच चांगली ! एवढा मोठा ' दाऊ ' चा धडा अवघड ना ! पण एकदां चांगली गालफडांत देऊन, मास्तरांनी इ - एस - टी लावायला सांगितली कीं काय विशाद आहे पोरटें विसरेल ! पक्की जन्माची आठवण ! तें राहिलें बाजूलाच ! आतां धड ए - एस - टी नाहीं, अन् आय - एन् - जी नाहीं ! कारट्यांना पाठ म्हणून करायला नको मुळीं ! - आज त्या मास्तरकडे पाठवून याला वर्ष होत आलें, अन् खरोखर सांगतों - चेष्टा नाहीं - या टोणग्याला सी - ए - टी कॅट करतां येत नाही ! - तेव्हां नांव काढूं नका तुम्ही अगदीं ! - ' नवीन - नवीन ' म्हणतां तुम्ही हें ! पण सगळें फुकट - ऑल बॉश - आहे ! - तें कांहीं नाहीं ! यापुढे माझी डायरेक्ट मेथड आतां ही - उठतांक्षणींच कांही अपराध न केल्याबद्दल पांच छड्या, अन् निजण्यापूर्वी अपराध केल्याबद्दल पांच छड्या ! रोजचा हा खुराक ! मग पहातों कसा पोरटीं अभ्यास करीत नाहींत !....

यांतही नाहीं निदान - ?

यंदा नाहीं म्हणजे मग कायमचेंच नाहीं ! कारण कांहीं जमण्यासारखें असलें, तर तें याच वर्षी. नाहीं तर .... हो, तें खरें ! नाहीं म्हणतों आहे कुठें मी ! मार्क कमी पडले आहेत, दोन तीन विषयांत नापास झालों आहें, सर्व कांही कबूल आहे. पण .... मी तरी काय बरं करणार ? गेल्या सबंध वर्षात कोण माझी ओढाताण आणि दुर्दुशा झाली म्हणून सांगूं ! - वडलांचा तर पत्ताच नाहीं ! - कोणास ठाऊक कुठें गेले आहेत ते ! रात्री एक दिवस घरांतून नाहींसे झाले - अहो छे ! कांही भांडण नाहीं अन् कांही नाहीं ! दैव ओढवलें इतकेंच ! - झालें ! वडलांच्या शोधांत कुठें आहोंत, न आहोंत तों एक दिवस सकाळी आपळी मेहुणा गेल्याची बातमी ! भोराहून इकडे पुण्याला येत होते, तों गाडीवानाला म्हणतात रस्ता नीट दिसला नाहीं, अन जी गाडी भलतीकडे उताराला लागली, ती उपडी होऊन, पार कोणीकडच्या कोणीकडे फेकली गेली ! गाडीवाला काय तो कसाबसा जिवंत निघाला, बाकी सगळीं माणसें.... माझा मेव्हणा, त्याचा एकुलता एक बरोबरीचा मुलगा, सर्व कांहीं निकाल ! बहीण इकडे आजारी म्हणून हवा पालटायला आलेली, कळतांच जी तिची वाचा बसली, तों अद्यापपर्यंत एक शब्द नाहीं ! विचारलेंच कोणी कांहीं, तर तोंडाकडे पहाते, आणि रडूं लागते धळधळां ! - आहे ! आई आहे घरांत ! पण ती तरी काय करते बिचारी ! धीर तरी तिनें कोठवर द्यायचा ? - बरं, वडलांच्या आणि मेव्हण्यांच्या या प्रसंगांतून आम्ही कुठें हातापाय हालवतों आहोंत तों .... महिना पंधरा दिवसांचीच गोष्ट ! काय बाबाला बुद्धि झाली कुणास ठाऊक ! बंधुराज आमचे सहज कोणाबरोबर तरी पोहायला म्हणून गेले, तेही.... तिकडे कायमचेच ! - घरांत मिळवता.... आधार असा तोच काय तो उरलेला ! पण तोही असा .... तेव्हां कशाची प्रिलिमिनरी, अन् कसला अभ्यास होतो नीट ! त्यांतूनही करायची तेवढी धडपड केली मी ! आणि याहीपुढें .... येवढें सांगतों मी आपल्याला कीं, जर मिळाला फॉर्म, तर तो .... वाया नाहीं जायचा ! कारण.... काय असेल तें असो ! सारखें मला आपलें वाटतें आहे येवढें खरें ! कीं सगळीकडून असें .... इथें नाहीं, तिथें नाहीं, चोहोंकडूनच जर असें अपयश, तर .... मी म्हणतों .... देव यांतही नाहीं निदान मला ? ....

पंत मेले - राव चढले

[ पंतांच्या घरीं ]

.... असें काय ? सोड मला ! चिमणे, असें वेडयासारखें काय करावें ! रडतेस काय ? जा ! दार लावून घे - घरांत आपला गोपूबाळ निजला आहे ना ? त्याच्याजवळ जाऊन बैस हं ! रडूं नकोस, जा ! - आई आबासाहेबांकडे भात सडायला गेली आहे, ती आतां इतक्यांत परत येईल ! जाऊं मी ? रडायची नाहींस ना ? भूक लागली आहे म्हणून का तूं रडतेस ? - असें काय ? चिमे, मी येईपर्यंत तूं अगदी गप रहा हो ! - आईनें दळून ठेवलेलें हें पीठ यमुनाबाईच्या घरीं पोंचवितों, आणि तसाच माधुकरी मागून मी लवकरच परत येतों ! मग माझ्या ताईला भात, वरण, भाकरी - माधुकरी म्हणजे काय ? ताई ! माधुकरी मागणें म्हणजे भीक मागणें हो ! - लोक आपल्याला भिकारी म्हणतील ? म्हणूं दे ! बाबा देवाच्या घरीं गेले आहेत; त्यांनी देवाला सांगितलें म्हणजे मग देव आपल्याला श्रीमंत करील ! - बाबा केव्हां येतील ? छे ! ते आतां कुठलें यायला ! हें बघ ताई ! तूं बाबांच्याबद्दल पुनः कधीं आईला विचारुं नकोस हो ! ती किं नाहीं लागलीच रडायला लागते ! कोण आई ! केव्हां आलीस ? हें ग काय ! - आई ! आई !! कां ग अशी एकदम मोठमोठ्यानें रडायला लागलीस ? मी माधुकरी मागायला जातों म्हणून ? होय ? - पण आई ! तूं नाहीं का ग लोकांची भांडी घांशीत - दळण दळीत - धुणें धुवीत ? तसेंच मी - आई ! गोपू उठला वाटतें, जा तूं आतां घरांत ! - मी आज नको गोपू उठला वाटतें, जा तूं आतां घरांत ! - मी आज नको जाऊं म्हणतेस ? कां बरें ? ऊन फार पडलें आहे, आणि माझे पाय फार पोळतील म्हणून ? असूं दे कीं ! मी पळत पळत जाऊन लवकर परत येतों ! जर आतां मी गेलों नाहीं तर गोपू, चिमी, तूं, मी, सगळे जण आपण भूक लागून रडायला नाहीं कां लागणार ? मग आपल्याला कोण बरें खाऊं घालील ? आई ! मी आत्तां जाऊन येतों, सोड मला !....

[ रावांच्या घरीं ]

.... खाऊ ! अरे पेढे आणले आहेत पेढे ! थांबा, थांबा ! अशी घाई करुं नका ! सगळ्यांना देतों बरें मी ! आधीं देवाला नैवेद्य दाखवूं ! आणि मग - हो, हो ! तुला आधीं देईन सोने मी ! मग तर झालें ! - पाणी आणलेंस ? शाबास ! हं, सोने, बापू, देवाच्या पायां पडा, आणि म्हणा ' जय देवबाप्पा ! असेच सुखाचे दिवस आम्हांला वरचेवर दाखवीत जा !' - अस्सें ! शाबास ! हं, हे घे सोने, तुला चार, आणि हे बापू, तुला चार, झालें ना आतां ? - कोण आहे ? रामभाऊ ? अरे वाः ! तुम्ही तर अगदीं वेळेवर आलांत बुवा ! हं, हे घ्या, - आधी खा मुकाट्यानें ! मग कारण विचारा ! मला पांच रुपये प्रमोशन झालें पगार वाढला, त्याचे हे पेढे ! समजलें ? अरे बापू ! आतां हे आंत घेऊन जा ! आणि इकडे बघ, आपल्या त्या गोविंदरावांना, आपासाहेब कर्व्याना, झालेंच तर माडीवरच्यांना, सगळ्यांचा घरी आतांच्या आतां जाऊं द्या म्हणावे ! समजलें ना ? नको, नको, मला नको ! अहो हपिसांत मीं पुष्कल खाल्ले आहेत ! - मंडळी ऐकेचनात ! तीन रुपयांचे पेढे द्यावे लागले मला ! - म्हटलें जाऊं द्या ! मंडळी आपली आहेत ? आणि पुनः असे आनंदाचे प्रसंग वरचेवर थोडेच येत आहेत ? - बरें झालें चला ! इतके दिवस आशेनें रात्रंदिवस वाट पाह्यल्याचें परमेश्वरानें शेवटीं सार्थक केलें ! अहो, पंधराचे वीस व्हायला सहा वर्षे लागली - सहा वर्षे ! नुकतेच आमचे दिवाकरपंत मेले, आणि त्यांची ही जागा मला मिळाली, बरें ! - असो, ईश्वराची कृपा होती म्हणून हे तरी दिवस दिसले ! हो ! करतां काय ? - बरें आपण आतां मुंबईला कधी जाणार ? - रविवारची ना ? मग हरकत नाहीं ! कारण मी परवांच्या दिवशीं श्रीसत्यनारायणाची पूजा करण्याचें योजले आहे ! तेव्हं म्हणतो, प्रसाद घेऊन मुंबईला जा ! - ठीक आहे ! अहो, परमेश्वरांची कृपा असली तर उत्तरोत्तर आपल्याला आणखीही असेच सुखाचे दिवस येतील ! काय ? म्हणतो तें खरें आहे कीं नाहीं ?....

पोरटें मुळावर आलें !

म्हणजे ! म्हणतेस तरी काय ? अग, काल त्याला दारावरुन जातांना मी पाहिला ! अन् तूं म्हणतेस, - चल ! कांही तरी सांगते आहेस झालं ! तसे नाही ग, तूं खोटं सांगतेस असं नाहीं म्हणत मी. पण बाई, असं होईल तरी कसं ? काल संध्याकाळी तो चांगला होता ना ? मग ? - आतां तूंच तर म्हणालीस, की ' रात्री चांगला जेवला, बाहेरुन फिरुन आला, ' अन् मग एकाएकींच हें ! - अरे ! अरे !! शेवटीं अफू खाऊन मेला ना ! - कसं तरणं ताठं पोर ! अन् काय ग त्याला आठवलं हें ! - खरंच का ? कुणाची चोरी केली होती त्यानं ? त्या .... यांची ? काय बाई तरी ! पण मी म्हणतें जीव द्यायचं काय येवढं - आपल्याला धरतील, अन् तुरुंगांत टाकतील म्हणून का? - काय - ही - संगत ! संगत भोंवली बरं त्याला ही ! - सदा मेली ती दारु अन् जुगार ! होतं नव्हतं त्याचं वाटोळं केलं, अन् शेवटीं बिचारा अस्सा जिवानिशीं गेला - अग, परवाच तो मरायचा ! या कोपर्‍यावरचीच आपल्या गोष्ट ! अंधारांत - रस्यांत आपला हा झिंगून पडलेला ! त्या टागेवाल्याची नजर केली, म्हणून बरं ! नाही तर त्याच वेळेला याचं भरायचं ! बिचारी बायको मात्र फुक्कट बुडाली हो ! - सारखी रडते आहे ना ! - रडेल नाहीं तर काय करील ? - कोणाचा आधार का आहे तिला आतां ! सांग ! - बरं, का ग, तिला कांही पोरबाळ ? - कांही नाही ना ? - बरं, कांहीं दिवसबिवस तरी ? - लोटले आहेत ना पांचसहा महिने ? - असो चला ! तेवढाच तिच्या जिवाला आधार ! - हो, तें तर खरंच ग ! आलं पोरटं तें बापाच्याच मुळावर ! ...

झूट आहे सब् !

किती ? - बारा वाजले ! - हेः ! भलताच उशीर झाला आपल्याला ! वाद करायला बसलें, कीं वेळेचं भानच राहत नाहीं बोवा ! - अरे असें काय ! चार कोळसे टाक आणखी बंबांत कीं आतां - हां हां म्हणतां - पाणी तापेल ! उगीच वेळ गेला झालं ! बरं, इतका काथ्याकूट करुन निष्पन्न कांहींच नाहीं ! - ओ हो ! काय ठिणग्या उडाल्या रे या ! ती पहा ! किती उं.... च उडाली आहे ! - पण आ .... लीच शेवटी खालीं ! - लहानपणीं विझली काय, किंवा मोठेपणीं - उंच जाऊन विझली काय, दशा शेवटीं एकच ! - म्हणजे फरक जगली किती हाच काय तो ! एकदां ठिणगी विझली .... लक्षांत आलं का ?.... प्राणी मेला, कीं संपलं सगळं ! - हो हो, सगळं संपलं ! - नाहीं रे बोवा ! कांहीं पुनर्जन्म नाहीं, अन् कांही नाही ! - असतं तसं कांहीं, तर तुझा तो शेक्सपीअर नसता कां आला पुन्हा ? चक्क येऊन सांगितलं असतं कीं, ' हीं नाटकं माझीं आहेत, मीं लिहिलेलीं आहेत ! कांहीं कुणा बेकनचा अन् फिकनचा संबंध नाहीं ! ' कशीं छान सुंदर नाटकें ! आणि तीही कांहीं थोडीथोडकी नाहींत ! ' सोडील होय कोणी ? - पण पत्ताच जिथं नाही त्याचा, तेव्हां तो पुन्हा येतो कशाचा अन् जातो कशाचा ! - हो हो, आहे ना स्वर्गात ! जा, आणा जाऊन मग ! - ठेवला आहे, स्वर्ग अन् नरक ! थोतांडं सगळी ! - अरे कुठला घेऊन बसला आहेस आत्मा ! - काय, आहे तरी काय तो ? - वारा ? का प्रकाश ? - हां, वार्‍यामध्यें किंवा प्रकाशांत मिसळणें, हें जर तुमचें स्वर्गानरकाला जाणं असेल, तर मात्र कबूल ! कारण मग राजश्री मनोविकार कुठले आले आहेत तिथं ! - तें कांही नाहीं ! तुमचा तो आत्मा कीं नाहीं, देहांत आहे तोंवरच त्याची प्रतिष्ठा ! - हो मग ? नाहीं कुठं म्हणतों आहें मी ! देहाचंही तेंच आहे ! दोघं जोंपर्यंत एकत्र तोंपर्यत ती एकमेक जिवंत ! - मेलं कीं दोन्हीही गेली पार ! मागमूस नाही कुठं मग ! - तेंच तर बाबा म्हणतों आहें मी, कीं जेवढे म्हणून प्राणी जन्माला येतात ते सगळे इथून तिथून नवीन ! आणि शेवटही त्यांचा .... ! बरं का ? शेवटही पुन्हा सगळ्यांचा एकच ! - मग पाप करा, नाहींतर पुण्य करा ! - स्वर्ग, नरक आणि तुझा तो पुनर्जन्म, सगळें - सब कांहीं झूट आहे ! ....

कशाला उगीच दुखवा !

अहो कोण विचारतो हेडक्लार्कला ! कसे दिवस काढीत आहोंत हें आमचें आम्हांलाच ठाऊक. म्हणायला हेडक्लार्क ! सत्ता पाहिली तर काडीइतकी देखील - घ्या, पान घ्या - बा ! नानासाहेब ! हें काय बोलणें ! अहो परिचय म्हणजें कांही थोडाथोडका नाहीं ! डलर्ड हायस्कुलांत असतांना रोज मधल्या सुट्टींत - आठवतें का ? - आपण एकत्र बसून चिवडा खाल्लेला आहे ! मोठे गमतींत दिवस गेले नाहीं ? - कोण सुंदरे ? काय आहे ग ? मला खालीं बोलावलें आहे ? आलों म्हणावें अं ! - कांहीं विशेष नाहीं. बसा. जरुरीचें काम आहे ? मग काय बोलणेंच खुंटलें ! भेट का ? सकाळी किंवा रात्री - केव्हांही होईल. - नको ! तें नको आतां सांगायला ! नव्याण्णव हिश्शांनी हपीसांतली जागा ही तुमच्याच मुलाला मिळेल ! कांही काळजी करायला नको, समजलें ना ? - चाललेंच आहे ! यांत कशाचे आले आहेत उपकार ! - मोठा त्रास आहे ! हपीसांत कामाची दगदग, आणि घरीं यावें तर हा त्रास ! कोण पाहिजे ? - हो ! या बसा. मलाच आप्पासाहेब म्हणतात. काय काम आहे आपलें ? - भेटले होते खरेच. काल संध्याकाळींच त्रिंबकराव मला भेटले होते ! आपलें आडनांव काय - पोंकशे नाही का ? अस्सें ! यंदांच एस. एफ. पास झालांत वाटतें ? - टाइपराइटिंगसुद्धां येतें ! मग हो काय ? फारच चागलें ! अर्ज पाठवून दिला आहे ना ? - झालें तर ! अरे ! हें काय वेडयासारखें ! उठा, उठा. रडूं नका ! मिळेल नोकरी, - काय आहे तिच्याच मोठें ! अहो, लागलें नाहीं कोणाच्या ? - सगळ्यांच्या पाठीमागें द्रारिद्य लागलें आहे ! - जा ! मनाला काही वाटूं देऊं नका. तुमच्याकरितां मी लागेल तितकी खटपट करीन बरें - एकदां हो म्हणून सांगितलें ना ? जा आतां - काय पहा ! या पोटानें माणसाला कसें अगदी भंडावून सोडलें आहे - रडायला लावले आहे ! - येवढ्याचकरितां का खाली हाक मारीत होतां मला ? अबब ! किती फोडी रे या ! कटकट कोठली ! हपीसांतल्या जागेकरितां आतांपर्यंत शंभर जणांच्या खेपा झाल्या असतील ! - खरेंच, गोडीला आंबे मोठे छान आहेत नाहीं ? - तें कांहीं नाहीं मोरु, उद्यां तुला साहेबापुढें उभा केलाच पाहिजे. नाहीं तर - हं, अरे खाल्ल्या म्हणून काय झालें ! आणखी दोन फोडी घे - मूर्ख कोठले ! प्रत्यक्ष मुलाला टाकून माझ्या हपीसांतील जागा दुसर्‍याला मी मिळूं देईन कसा ? इतकें कसें यांना - हो, तें तर खरेंच ! आपलें हो - ला हो म्हणावें, सोडून द्यावें ! कशाला उगीच कोणाला दुखवा ! ....