आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥
जेथें काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥
भय नाहीं चिंता कोणता प्रकार । झालोंसे निर्भय नामबळें ॥३॥
चोखा म्हणे आतां लागलासे झरा । विठोबा दातारा याचि नामें ॥४॥

  - संत चोखामेळा
अखंड समाधी होउनी ठेलें मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥
विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥
चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा । जाणें तो विरळा लक्षामाजी ॥४॥

  - संत चोखामेळा
पांडुरंगीं लागो मन । कोण चिंतन करी ऐसें ॥१॥
देहभाव विसरला । देव गेला बुडोनी ॥२॥
जीव उपाधि भक्ती वंद्य । तेथें भेद जन्मला ॥३॥
मुळींच चोखा मेळा नाहीं । कैंचा राही विटाळ ॥४॥

  - संत चोखामेळा
शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ॥१॥
मी यातीहीन महार । पूर्वीं निळाचा अवतार ॥२॥
कृष्ण निंदा घडली होती । म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥
चोखा म्हणे विटाळ । आम्हां पूर्वींचें हें फळ ॥४॥

  - संत चोखामेळा
निर्गुणा अंगीं सगुण बाणलें । निर्गुण सगुण एकत्वा आलें ॥१॥
शब्दाची खूण जाणती ज्ञानी । येरा गाबाळ अवघी काहाणी ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान भले । निर्गुण सगुण त्याही गिळीयलें ॥३॥
चोखा म्हणे त्यांच्या पायींची पादुका । वागवितो देखा ऐक्यपणें ॥४॥

  - संत चोखामेळा
न करी आळस जाय पंढरीसी । अवघी सुखराशि तेथें आहे ॥१॥
पहातां भिंवरा करी एक स्नान । घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥
कान धरोनी सुखें नाचा महाद्वारीं । तयां सुखासरी दुजी नाहीं ॥३॥
पाहातां श्रीमुख हरे ताहान भूक । चोखा म्हणे सुख विठूपायीं ॥४॥

  - संत चोखामेळा
विठ्ठल विठ्ठल गजरीं । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर । दिंडया पताकांचा भार ॥२॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरीकीर्तनाची दाटी । तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

  - संत चोखामेळा