जन्मांचें साकडें नाहीं माझें कोडें । जेणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥
कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥
वैष्णवांचे द्वारीं लोळेन परवरी । करीं अधिकारी उच्छिष्‍टाचा ॥३॥
चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी । तयाचिये घरीं पशुयाती ॥४॥

  - संत चोखामेळा
नेणपणें मिठी घालीन पदरा । बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥
आशा हे पाठी घेवोनी सांगातें । निचेष्‍ट निरुतें भरीन माजी ॥२॥
लाभाचा हा लाभ येईल माझे हातां । मग काय चिंता करणें काज ॥३॥
चोखा म्हणे मज हेंचि वाटे गोड । आणिक नाहीं चाड दुजी कांहीं ॥४॥

  - संत चोखामेळा
इतकेंचि देईं रामनाम मुखीं । संताची संगती सेवा सार ॥१॥
निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरीं सुख मज ॥२॥
उच्छिष्‍ट धणिवरी पोटभरी धाये । दुजी नको सोय देवराया ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आळी । माय तूं माउली कृपाळू देवा ॥४॥

  - संत चोखामेळा
आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥
जेथें काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥
भय नाहीं चिंता कोणता प्रकार । झालोंसे निर्भय नामबळें ॥३॥
चोखा म्हणे आतां लागलासे झरा । विठोबा दातारा याचि नामें ॥४॥

  - संत चोखामेळा
अखंड समाधी होउनी ठेलें मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥
विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥
चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा । जाणें तो विरळा लक्षामाजी ॥४॥

  - संत चोखामेळा
पांडुरंगीं लागो मन । कोण चिंतन करी ऐसें ॥१॥
देहभाव विसरला । देव गेला बुडोनी ॥२॥
जीव उपाधि भक्ती वंद्य । तेथें भेद जन्मला ॥३॥
मुळींच चोखा मेळा नाहीं । कैंचा राही विटाळ ॥४॥

  - संत चोखामेळा
शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ॥१॥
मी यातीहीन महार । पूर्वीं निळाचा अवतार ॥२॥
कृष्ण निंदा घडली होती । म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥
चोखा म्हणे विटाळ । आम्हां पूर्वींचें हें फळ ॥४॥

  - संत चोखामेळा