गणिका अजामेळें काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावतां ॥१॥
नवल हें पहा नवल हें पहा । अनुभवें अनुभवा देहामाजीं ॥२॥
उच्चारितां नाम वैकुंठीचें पेणें । ऐसें दुजें कोणें आहे कोठें ॥३॥
ब्रम्हाहत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥
सुफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥
चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धार अधमा स्त्री शूद्रां ॥६॥

  - संत चोखामेळा
नामाचें सामर्थ्य विष तें अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥
तें नाम सोपें विठ्ठल विठ्ठल । नको काळ वेळ जपें आधीं ॥२॥
नेम धर्म कांहीं नलगे साधन । सुखें नारायण जप करीं ॥३॥
चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा । येणें कळिकाळाचा भेव नाहीं ॥४॥

  - संत चोखामेळा
त्रैलोक्य वैभव ओवाळोनि सांडावें । नाम सुखें घ्यावें विठोबाचें ॥१॥
आणिक साधनें आहेत बहुतांपरी । नामाची ती सरी न पवती ॥२॥
म्हणोनि सुलभ विठ्ठल एक नाम । गातां नाचतां प्रेमें मुक्ति तया ॥३॥
चोखा म्हणे माझा अनुभव उघडा । भवभय पीडा येणें वारे ॥४॥

  - संत चोखामेळा
महादोष राशि पापाचे कळप । नामें सुखरूप कलियुगीं ॥१॥
म्हणोनि आळस करूं नका कोणी । नाम जपा वाणी सर्वकाळ ॥२॥
आसनीं शयनीं नामाचा आठव । आन ठावाठाव करूं नका ॥३॥
चोखा म्हणे खातां जिवितां वाचें । नाम श्रीविठ्ठलाचें उच्चारावें ॥४॥

  - संत चोखामेळा
हातींच्या कांकणा कासया आरसा । धरावा भरवंसा विठ्ठलनामीं ॥१॥
नलगे साचार याग यज्ञ विचार । जप निरंतर विठ्ठलनामी ॥२॥
योग्यांचिया वाटे नलगे खटपट । नामचि फुकट जपा आधीं ॥३॥
चोखा म्हणे सुख संताचे संगती । नाम अहोरात्रीं जप करा ॥४॥


  - संत चोखामेळा
नाम हें सोपें जपतां विठ्ठल । अवघेंचि फळ हातां लागे ॥१॥
योग याग जप तप अनुष्ठान । तीर्थ व्रत दान नाम जपतां ॥२॥
सुखाचें सुख नाहीं यातायाती । बैसोनी एकांतीं नाम स्मरा ॥३॥
चोखा म्हणे येणें साधेल साधन । तुटेल बंधन भवपाश ॥४॥

  - संत चोखामेळा
 आम्हां अधिकार उच्छिष्ट सेवन । संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥
सुलभ सोपारें विठोबाचें नाम । आणिक नाहीं वर्म दुजें काहीं ॥२॥
आवडीनें नाम गाईन उल्हासें । संतांच्या सहवासें खेळीं मेळीं ॥३॥
चोखा म्हणे माझी आवडी ही देवा । पुरवावी केशवा जन्मोजन्मी ॥४॥

  - संत चोखामेळा