यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करूं तुमची सेवा ॥१॥
आम्हां नीचांचे तें काम । वाचें गावें सदां नाम ॥२॥
उच्छिष्टाची आस । संत दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे नारायण । पदरीं घेतलें मज दीना ॥४॥
- संत चोखामेळा
धीर माझे मना । नाहीं नाहीं नारायण ॥१॥
बहुचि जाचलों संसारें । झालों दु:खाचे पाझरे ॥२॥
भोग भोगणें हें सुख । परि शेवटीं आहे दु:ख ॥३॥
भारवाही झालों । वाउग्या छंदा नागवलों ॥४॥
दया करा पंढरीराया । चोखा लागतसे पायां ॥५॥
माझा मी विचार केला असे मना । चाळवण नारायणा पुरें तुमचें ॥१॥
तुम्हांवरी भार घातिलेंसें वोझें । हेंचि मी माझें जाणतसें ॥२॥
वाउगें बोलावें दिसे फलकट । नाहीं बळकट वर्म आंगीं ॥३॥
चोखा म्हणे सुखें बैसेन धरणा । तुमच्या थोरपणा येईल लाज ॥४॥
आला नरदेहीं पाहीं । शुद्धी नेणें ठायींचे ठायीं ॥१॥
करी प्रपंच काबाड । भार वाही खर द्वाड ॥२॥
न ये राम नाम मुखीं । नाहीं कधीं संत ओळखी ॥३॥
करी वाद अपवाद । नाही अंत:करण शुद्ध ॥४॥
मळ नासोनि निर्मळ । चोखा म्हणे गंगाजळ ॥५॥
आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले ॥१॥
पशूचा उपयोग बहुतांपरी आहे । हा तो वायां जाय नरदेह ॥२॥
परि भ्रांति भुली पडलीसे जीवा । आवडी केशवा नाठविती ॥३॥
चोखा म्हणे नाम जपतां फुकाचें । काय याचें वेचे धन वित्त ॥४॥
घरदार वोखटें अवघें फलकटें । दु:खाचें गोमटें सकळही ॥१॥
नाशिवंतासाठी रडती रांडा पोरें । काय त्याचें खरें स्त्री पुत्र ॥२॥
लावूनियां मोह भुलविलें आशा । त्याचा भरंवसा धरिती जन ॥३॥
सकळही चोर अंती हे पळती । चोखा म्हणे कां न गाती रामनाम ॥४॥
अखंड समाधी होउनी ठेलं मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥
विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥
चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा । जाणे तो विरळा लक्षामाजीं ॥४॥