जिकडे पाहे तिकडे बांधलोंसे हरी । सुटायाचा करी बहु यत्न ॥१॥

परी तें वर्म मज न कळे कांहीं । अधिंकचि डोहीं बुडतसे ॥२॥

एका पुढें एक पडती आघात । सारितां न सरत काय करूं ॥३॥

चोखा म्हणे येथें न चलेंचि कांही । धांवे माझे आई विठाबाई ॥४॥


  - संत चोखामेळा

 काय हें दु:ख किती ह्या यातना । सोडवी नारायणा यांतोनियां ॥१॥

जन्मावें मरावें हेंचि भरोवरी । चौर्‍यांशीची फेरी भोगाभोग ॥२॥

तुम्हांसी करुणा न ये माझी देवा । चुकवा हा गोवा संसाराचा ॥३॥

चोखा म्हणे माझा निवारावा शीण । म्हणोनी लोटांगण घाली जीवें ॥४॥


  - संत चोखामेळा

 तुम्हांसी शरण बहुत मागं आले । तयांचे साहिले अपराध ॥१॥

तैसा मी पामर यातिहीन देवा । माझा तो कुढावा करा तुम्ही ॥२॥

नाहीं अधिकार उच्छिष्टा वेगळा । म्हणवोनी कळवळा पाळा माझा ॥३॥

चोखा म्हणे मज कांहीं तें न कळे । नामाचिया बळें काळ कंठी ॥४॥


  - संत चोखामेळा

 आन साधनें सायास । कांहीं न करीं आयास ।

नामाचाचि उल्हास । ह्रदयीं वास असावा ॥१॥

हेचि मागतसे देवा । हीच माझी भोळी सेवा । 

पायांसी केशवा । हाचि हेवा मानसीं ॥२॥

जन्म देई संताघरीं । उच्छिष्टाचा अधिकारी । 

आणिक दुजी थोरी । दारीं परवरी लोळेन ॥३॥

नका मोकलूं दातारा । विनंती माझी अवधारा । 

अहो रुक्मादेवीवरा । आवरा पसारा चोखा म्हणे ॥४॥


  - संत चोखामेळा

 आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें । आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥

वायांचि करणें लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥

अंगा नाहीं आलें तंव तें साहालें । खादलें पचलें तरी तें हित ॥३॥

चोखा म्हणे तुमचें तुम्हासी सांगणें । माझें यांत उणें काय होतें ॥४॥


  - संत चोखामेळा

 धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥

कवणासी सांकडें सांगूं पंढरीराया । कांहो न ये दया माझी तुम्हां ॥२॥

बाळकाचे परी लडिवाळपणें । तुमचें पोसणें मी तों देवा ॥३॥

चोखा म्हणे मज तुम्ही मोकलितां । काय आमुची कथा आतां चाले ॥४॥


  - संत चोखामेळा

 कांहीं तरी अभय न मिळे उत्तर । ऐसे कां निष्ठुर झालां तुम्ही ॥१॥

मी तों कळवळोनी मारितसे हांक । तुम्हां पडे धाक कासयाचा ॥२॥

बोलोनी उत्तरें करी समाधान । ऐवढेंचि दान मज द्यावें ॥३॥

चोखा म्हणे माझी पुरवावी आस । न करी उदास माझे माये ॥४॥


  - संत चोखामेळा