कळेल तैसे बोल तुजचि बोलेन । भीड मी न धरीन तुझी कांहीं ॥१॥

काय करूं देवा दाटलों जाचणी । न या चक्रपाणी सोडवण्या ॥२॥

कोठवरी धांवा पोकारूं केशवा । माझा तंव हेवा खुंटलासे ॥३॥

चोखा म्हणे आतां पुरे चाळवण । आमुचें कारण जाणों आम्हीं ॥४॥


  - संत चोखामेळा

 जन्मांची वेरझारी । तुम्हांविण कोण वारी । 

जाचलों संसारी । सोडवण करी देवराया ॥१॥

शरण शरण पंढरीराया । तुम्हां आलों यादवराया । 

निवारोनियां भया । मज तारा या सागरीं ॥२॥

तुम्हांविण माझें कोडें । कोण निवारी सांकडें । 

मी तों झालों असे वेडे । उपाय पुढें सुचेना ॥३॥

चोखा म्हणे दीनानाथा । आतां निवारीं हे भवव्यथा ।

 म्हणोनी ठेवितसें माथा । चरणांवरी विठूच्या ॥४॥


  - संत चोखामेळा

 तुम्हीं वाढविलें तुम्हीं पोसियेलें । तुम्हींच दाविलें जग मज ॥१॥

तुमचा प्रकार तुमचा तुम्ही जाणा । आमुचिया खुणा जाणों आम्हीं ॥२॥

तुम्हांसी तों भीड कासयाची देवा । हेचि केशवा सांगा मज ॥३॥

चोखा म्हणे काय बोलूं येयावरी । माझा तूं कैवारी देवराया ॥४॥ 


  - संत चोखामेळा

 कवणावरी आतां देऊं हें दूषण । माझें मज भूषण गोड लागे ॥१॥

गुंतलासे मीन विषयाचें गळीं । तैसा तळमळी जीव माझा ॥२॥

गुंतला हरिण जळाचिया आशा । तो गळां पडे फांसा काळपाश ॥३॥

वारितां वारेना सारितां सारेना । कितीसा उगाणा करूं आतां ॥४॥

चोखा म्हणे ऐसा पडलों प्रवाहीं । बुडतसों डोहीं भवाचिया ॥५॥


  - संत चोखामेळा

 आतां याचा अर्थ (संग) पुरे पुरे देवा । येऊं द्या कनवाळा तुम्हांलागी ॥१॥

गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझें तो हरि कांही न चाले ॥२॥

वारंवार करुणा करितों देवराया । कां न ये कनवाळा तुम्हां लागीं ॥३॥

चोखा म्हणे आतां न करा उदास । पुरवावी आस मायबापा ॥४॥


  - संत चोखामेळा

 अहो पतित पावना पंढरीच्या राया । भक्त विसाविया मायबापा ॥१॥

धांवे दुडदुडा आपुलिया काजा । येई गरुडध्वजा मायबापा ॥२॥

दाही दिशा उदास तुम्हांविण झाल्या । न करीं पांगिला दुजीयासी ॥३॥

चोखा म्हणे मज दावीं आतां वाट । मग मी बोभाट न करी कांही ॥४॥


  - संत चोखामेळा

 अहो करुणाकरा रुक्मिणीच्या वरा । उदारा धीरा पांडुरंगा ॥१॥

काय म्यां पामरें वानावें जाणावें । न कळे कैसें गावें नाम तुमचें ॥२॥

विध अविध कोणता प्रकार । न नेणों कळे साचार मजलागीं ॥३॥

चोखा म्हणे मज कांहींच न कळे । उगाचि मी लोळे महाद्वारीं ॥४॥


  - संत चोखामेळा