असेंच करणें होतें तुला । तरी का जन्म दिला मला ॥१॥

जन्म देवोनी सांडिलें । कांहो निष्ठुर मन केलें ॥२॥

कोठें गेला माझे वेळीं । केलें कोणाचें सांभाळी ॥३॥

चोखा म्हणे देवा । नको मोकलूं केशवा ॥४॥


  - संत चोखामेळा

 आतां नकां भरोवरी । तूं तों उदार श्रीहरी ॥१॥

शरणांगता पायापाशीं । अहर्निशी राखावें ॥२॥

ब्रीद गाजे चराचरीं । कृपाळु हरि दीनांचा ॥३॥

चोखा म्हणे भरंवसा । दृढ सरसा मानला ॥४॥


  - संत चोखामेळा

 किती धांवाधांवी करावी कोरडी । न कळें कांहीं जोडी हानि लाभ ॥१॥

जे जे करितों तें तें फलकट । वाउगेंचि कष्ट दु:ख भोगी ॥२॥ 

निवांत बैसोनी नामाचें चिंतन । करूं जातां मन स्थिर नाहीं ॥३॥

दान धर्म करूं तो नाहीं धन पदरीं । जन्माचा भिकारी होउनी ठेलों ॥४॥

चोखा म्हणे ऐसा करंटा मी देवा । काय तुझी सेवा करूं आतां ॥५॥


  - संत चोखामेळा

 कशासाठीं तुम्हां शरण रिघावें । आमुचें वारावें सुख दु:ख ॥१॥

आमुचें संचित भोग क्रियामान । तुमचें कारण तुम्हीं जाणा ॥२॥

आमुचा तों येथें खुंटलासे लाग । न दिसे मारग मोकळाचि ॥३॥

चोखा म्हणे काय करूं आतां । तुमची हे सत्ता अनावर ॥४॥


  - संत चोखामेळा

 कोण माझा आतां करील परिहार । तुजवीण डोंगर उतरी कोण ॥१॥

तूं वो माझी माय तूं वो माझी माय । दाखवीं गे पाय झडकरी ॥२॥

बहु कनवळा तुझिया गा पोटीं । आतां नको तुटी करूं देवा ॥३॥

चोखा म्हणे मज घ्यावें पदरांत । ठेवा माझें चित्त तुमचें पायीं ॥४॥


  - संत चोखामेळा

 करोनियां दया । सांभाळा जी देवराया ॥१॥

मी तो पतीत पतीत । तुमचाचि शरणांगत ॥२॥

लाज येईल तुमचे नांवा । मज उपेक्षितां देवा ॥३॥

आपुलें जतन । करा अभय देवोन ॥४॥

चोखा म्हणे हरि । आतां भीड न धरीं ॥५॥


  - संत चोखामेळा

 जनक तूं माझा जननी जगाची । करूणा आमुची कां हो नये ॥१॥

कासया संसार लावियेला पाठीं । पडलीसे तुटी तुमची माझी ॥२॥

जन्म जरा मरण आम्हां सुख दु:ख । पाहासी कौतुक काय देवा ॥३॥

गहिंवरूनी चोखा उभा महाद्वारीं । विनवी जोडूनि करीं विठोबासी ॥४॥


  - संत चोखामेळा