चोखट चांग चोखट चांग । एक माझा पांडुरंग ॥१॥

सुख तयाचे चरणीं । अवघी सुकृतांची खाणी ॥२॥

महापातकी नासले । चोखट नाम हें चांगले ॥३॥

महाद्वारी चोखामेळा । विठ्ठल पाहातसे डोळां ॥४॥


  - संत चोखामेळा

अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची । महिमा आणिकांची काय सांगों ॥१॥

पुराणें भागलीं नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥

शेषादिकां जेथें न कळेचि अंत । तेथें ती पतित काय वानूं ॥३॥

चोखा म्हणे माझा नाहीं अधिकार । कैसा हा विचार होईल नेणों ॥४॥


  - संत चोखामेळा

इतुकेंचि देई रामनान मुखीं । संतांची संगती सेवा सार ॥१॥

निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरी सुखे मज ॥२॥

उच्छिष्ट धणिवरी पोटभरी घाये । दुजी नको सोय देवराया ॥३॥

चोखा म्हणे माझी पुरवावी आळी । माय तूं माउली कृपाळु देवा ॥४॥


  - संत चोखामेळा

 आतां कासया हा दाखवितां खेळ । म्यां तंव सकळ जाणितला ॥१॥

जेथें ब्रम्हादिक वेडे पिसे झाले । न कळे वहिलें तयांलागीं ॥२॥

कोणासी हा पार न कळे तुमचा । काय बोलों वाचा कीर्ति तुमची ॥३॥

चोखा म्हणे तुमचा अवित हा खेळ । भुललें सकळ ब्रम्हांडचि ॥४॥


  - संत चोखामेळा

 काय हें मातेसी बाळें शिकवावें । आपुल्या स्वभावें वोढतसे ॥१॥

तैसाच प्रकार तुमचीये घरीं । ऐसीच निर्धारी आली वाट ॥२॥

तेचि आजी दिसे वोखटें कां झालें । संचिताचें बळें दिसे ऐसें ॥३॥

चोखा म्हणे हा तो तुम्हां नाहीं बोल । आमुचें सखोल कर्म दिसे ॥४॥


  - संत चोखामेळा

 आतां कोठवरी करूं विवंचना । कां हे नारायणा तुम्हां न कळे ॥१॥

सांपडलों जाळीं गुंतलोंसे गळी । जीव हळहळीं वाऊगाचि ॥२॥

कामक्रोधांचे सांपडलों हातीं । बहुत फजीति होय तेणें ॥३॥

नेणों कैसें दु:ख पर्वतायेवढें । सुख राई पाडें झालें मज ॥४॥

चोखा म्हणे तुमचें नाम न ये वाचे । बहु संकल्पाचें वोझें माथा ॥५॥


  - संत चोखामेळा

 असेंच करणें होतें तुला । तरी का जन्म दिला मला ॥१॥

जन्म देवोनी सांडिलें । कांहो निष्ठुर मन केलें ॥२॥

कोठें गेला माझे वेळीं । केलें कोणाचें सांभाळी ॥३॥

चोखा म्हणे देवा । नको मोकलूं केशवा ॥४॥


  - संत चोखामेळा