सर्वही सुखाचें वोतिलें श्रीमुख । त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥

कर दोन्हीं कटीं सम पाय विटे । शोभले गोमतें बाळरूप ॥२॥

जीवाचें जीवन योगियांचे धन । चोखा म्हणे मंडन तिन्ही लोकीं ॥३॥


  - संत चोखामेळा

 ज्या काणें वेद श्रुति अनुवादिती । तो हा रमापती पंढरीये ॥१॥

सुखाचें ठेवणें क्षीरसागर निवासी । तो हा पंढरीसी उभा विटे ॥२॥

भाविकाकारणें उभवोनी हात । उदारपणें देत भक्ति-मुक्ति ॥३॥

न पाहे उंच नीच याती कुळ । स्त्री क्षूद्र चांडाळ सरते पायीं ॥४॥

चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला । म्हणोनियां स्थिरावला भीमातटीं॥५॥


  - संत चोखामेळा

 श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट । उभा असे नीट विटेवरी ॥१॥

कर दोनीं कटीं कुंडल झळकती । तेज हे फांकती दशदिशा ॥२॥

वैजयंती माळा चंदनाची उटी । टिळक लल्लाटीं कस्तुरीचा ॥३॥

चोखा म्हणे माझ्या जीवींचा जीवनु । पाहतां तनु मनु भुलोनी जाय ॥४॥


  - संत चोखामेळा

 करी सूत्र शोभे कटावरी । तोचि हा सोनार नरहरी ॥१॥

पायीं वाजती रूणझुण घंटा । तोचि नामयाचा नागर विठा ॥२॥

काम चरणींचा तोडरू । परिसा ऊठतसे डीगरू ॥३॥

दक्षिण चरणीचा तोडरू । जयदेव पदाचा गजरू ॥४॥

विठेवरी चरण कमळा । तो जाणा चोखामेळा ॥५॥


  - संत चोखामेळा

 व्यापक व्यापला तिन्हीं त्रिभुवनीं । चारी वर्ण बाणी विठू माझा ॥१॥

पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥

षड्ररस पव्कानानें विस्तारिलें ताट । जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥


  - संत चोखामेळा

 आपुलिया सुखा आपणचि आला । उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥

तें हें सगुण रूप चतुर्भुज मूर्ति । शंख चक्र हातीं गदा पद्म ॥२॥

किरीट कुंडलें वैजयंती माळा । कांसे सोनसळा तेज फाके ॥३॥

चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । रूप मनोहर गोजिरें तें ॥४॥


  - संत चोखामेळा

 आणिक दैवतें देतीं काय बापुडीं । काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥

तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा । न सांगता सहजा इच्छा पुरे ॥२॥

न लगे आटणी तपाची दाटणी । न लगे तीर्थाटणी काया क्लेश ॥३॥

चोखा म्हणे नाम जपतां सुलभ । रुक्मिणीवल्लभ जवळी वसे ॥४॥


  - संत चोखामेळा