राम हीं अक्षरें सुलभ सोपारी । जपतां निर्धारीं पुरे कोड ॥१॥

मागें बहुतांसी उद्धरिलें देखा । ऐसें बळ आणिका नाही अंगीं ॥२॥

नामामृत पाठ घेईं कां घुटका । होईल सुटका संसाराची ॥३॥

नाम हेंचि सार नाम हेंचि सार । भवसिंधु उतार दो अक्षरीं ॥४॥

चोखा म्हणे नाम सुलभ सोपारें । जपावें निधरिं एका भावें ॥५॥


  - संत चोखामेळा

 आमुचें संचित जैसें जैसें आहे । तेथें तो उपाय न चले कांही ॥१॥

सुखें आठवीन तुमचें हें नाम । न होय तेणें श्रम जीवा कांही ॥२॥

कासया करूं जिवासी आटणी । नाम निर्वाणी तारीतसे ॥३॥

मागेही तरले पुढेंही तरती । चोखा म्हणे चित्तीं दृढ वसो ॥४॥


  - संत चोखामेळा

 गोजिरें श्रीमुख चांगलें । ध्यानीं मिरवले योगीयांच्या ॥१॥

पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरीं । वैकुंठाचा हरी उभा विटे ॥२॥

राई रखुमाई सत्यभामा नारी । पुंडलिकें सहपरिवारीं आणियेला ॥३॥

वैजयंती माळ किरीट कुंडलें । प्रेमें आलिंगिलें चोखियानें ॥४॥


  - संत चोखामेळा

 दुर्लभ होतें तें सुलभ पैं झालें । आपण नटलें सगुण रूप ॥१॥

धरोनी आवडी पंढरीये आलें । उभेंचि राहिलें कर कटीं ॥२॥

युगें अपरंपार न कळे ज्याचा पार । वैष्णवांचा भार शोभतसे ॥३॥

दिंडया गरूड टके पताका शोभती । बागडे नाचती हरिदास ॥४॥

चोखा म्हणे ऐसें धरोनियां भीड । उभ उभी कोड पुरवितो ॥५॥


  - संत चोखामेळा

 बहुतांचे धांवणे केलें बहुतापरी । उदार श्रीहरी वैकुंठीचा ॥१॥

तोचि महाराज चंद्रभागें तीरीं । उभा विटेवरी विठ्ठल देवो ॥२॥

भक्तीचा आळुका भावाचा भुकेला । न कळे ज्याची लीला ब्रम्हादिका ॥३॥

चोखा म्हणे तो हा नांदतो पंढरी । दरूशनें उद्धरी जडजीवां ॥४॥


  - संत चोखामेळा

 मज तो नवल वाटतसे जीवी । आपुली पदवी विसरले ॥१॥

कवणिया सुखा परब्रम्हा भुललें । गुंतोनी राहिलें भक्तभाके ॥२॥

निर्गुण होतें तें सगुण पैं झालें । विसरोनी गेलें आपआपणा ॥३॥

चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ । दीनांचा दय़ाळ पंढरीये ॥४॥


  - संत चोखामेळा

 विठोबा पाहुणा आला आमुचे घरा । निंबलोण करा जीवें भावें ॥१॥

पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥

षड्‌रस पव्कानानें विस्तारिलें ताट । जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥


  - संत चोखामेळा