*मी हा प्रयत्न करू शकतो का?*
आपण रोज सकाळी उठल्यावर शुचिर्भूत होऊन आपली पूजा, प्रार्थना करतो, पण खरोखरच आपले मन त्यावेळी एकाग्र असते का? उद्या सकाळी पूजा करताना आठवून पहा, त्यावेळी तुमच्या डोक्यात कितीतरी वेगवेगळे विचार कसे रुंजी घालत असतात, ते!
किमान मिनटभर तरी आपण आपले चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करू शकतो का? विचार करा…
*इतर व्यक्तींबरोबर बोलताना तुम्ही अतिशय सौम्य आवाजात, हळुवारपणे बोलता.*
पण तीच सौम्यता आणि हळूवारपणा तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर बोलताना दाखवता का? नीट आठवून पहा, तुमच्या लक्षात येईल की बऱ्याचदा तुम्ही त्यांच्याशी कठोरपणे आणि रागीट आवाजात बोलत असता.
आपल्या कुटुंबियांबरोबर देखील तसाच व्यवहार करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…
*तुम्ही तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा नेहमीच सन्मान करता आणि त्यांना आदराची वागणूक देता.*
पण ते निघून गेल्यावर त्यांना दूषणे देता, त्यांच्या स्वभावाची, बोलण्याची टिंगल करता!
आपल्या स्वभावातील हा दुटप्पीपणा दुर करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…
*बरेचजण, रोज धार्मिक पुस्तकांचं वाचन करतात, कीर्तन ऐकतात, तासनतास पूजा करतात!*
पण नंतर दिवसभरात इतरांना शिव्या देतात, दूषणे देतात, त्यांचा अपमान करतात!
*हे दुहेरी जीवन जगण्याचा अट्टाहास सोडण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…*
आपण इतरांना अडचणीच्या काळात मदत करतो. पण बऱ्याचदा ही मदत, त्या बदल्यात काहीतरी मिळविण्याच्या हेतूने केली जाते, आपण हे सर्व नि:स्वार्थपणे करत असल्याचा आव आणत!
*आयुष्यात प्रत्येक गोष्टीला पैशाचं लेबल न लावण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…*
बऱ्याचदा आपण इतरांना पुष्कळ गोष्टींत सल्ले देत असतो एखाद्या विशिष्ट परिस्थितीत कसे वागावे, याचे! पण जेव्हा तीच पाळी आपल्यावर येते, तेव्हा मात्र आपण नेमकं यांच्या विपरीत वागतो!
"लोका देती ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण" ही उक्ती स्वतःला लागू न करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…
*जेव्हा तुम्हाला इतरांची मते आवडत नाहीत, तेव्हा तुम्ही त्यांचा द्वेष करता, त्यांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करता!*
इतरांनाही आपल्या सारखीच स्वतंत्र मते असू शकतात हे उमजून घेण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…
एखाद्याच्या केवळ बाह्य व्यक्तिमत्वावरून आपण त्याला जोखतो, स्वतःला त्याच्यापेक्षा मोठे समजू लागतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो.
*"जे दिसतं, तितकंच नसतं" हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का? विचार करा…*
आपण सर्वच ज्ञानाच्या मार्गावर मार्गक्रमणा करत आहोत. म्हटलं तर आयुष्य खूप मोठं आहे आणि इतका मोठा रस्ता पार करताना थोडेबहुत अडथळे तर येणारच! पण जर हे अडथळे अंतर्गत अथवा मानसिक असतील, तर ते सोडविण्यासाठी माझ्या इतका सक्षम माणूस दुसरा कोणीच नसेल!
🙂🙏🏻🙂
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖