" एकदा असं झालं की उत्तर भारतातनं एक खानसामा फिरत फिरत पोटासाठी नौकरीच्या शोधात कोल्हापूरला आला. येऊन असाच कुठंतरी राहिला असेल, महाराजांची भेट व्हायची वाट बघत होता. तो अतिशय निष्णात होता. त्याच्या हाताला मोठी चव होती. नबाब रईसांच्या हवेल्यातल्या रसोईखान्यात बरीच वर्षे त्याने इमानेइतबारे काम केलं होतं. पदार्थाच्या नुसत्या वासानं तो सांगू शकत होता की त्यात काय कमीजास्त झालेय ते.
तरूणपणी त्यानं नवाब, खानदानी रईस यांच्या दरबारात हवेल्यात मोगलाई पद्धतीचे अस्सल जेवण तो बनवायचा.
त्याच्या या गुणामुळे एका नवाबाची एक चिठ्ठी घेऊन तो कोल्हापूर दरबारात काम मिळतेय काय ते बघायला आला होता.
त्याच्या या गुणामुळे कुणीतरी त्याला मग महाराजांकडे नेले. हत्तीखान्याच्या समोरच्या मोठ्या दरवाजासमोर खुर्चीत नेहमीच्या लोकांबरोबर महाराज बसले होते.
खानसाम्याने मुजरा केला... "आदाब महाराज, मी उत्तर भारतातून आलोय. महाराजांची कृपा झाली तर मला कोल्हापूर संस्थानची सेवा करण्यात धन्यता आहे. पोटासाठी फिरतोय. मी कोणत्याही प्रकारे हुजुरांची इतराजी करणार नाही...."
" बरं बरं
काय काय करतोस तु??"
महाराजांनी त्याच्याकडे निरखून पाहत विचारले.
" महाराज, मी कोणत्याही प्रकारचे अस्सल चवीचे पदार्थ बनवू शकतो. शाकाहारी, मांसाहारी, गोड पदार्थ, मोगलाई चवीचे अस्सल मोगल दरबारातल्या पंगतीसारखे... "
" बरं बरं उद्या संध्याकाळी करा मग बेत सगळ्यांसाठीच.. ह्यासनी घेऊन जावा आपल्या मुदपाकखान्यात अन काय लागंल ते द्या... जेवल्यावरच ठरवू.... या आता... "
" आदाब महाराज येतो "
.
दुसऱ्या दिवशी खानसाम्याने आपले पाककलेचे कौशल्य पणाला लावले. पहाटेपासून कामाला लागला. त्याने सांगेल ते ते सगळे पदार्थ मागवले गेले. मटनाचा, शाकाहारी, गोडाचा असे सगळे पदार्थ त्याने रांधले.
मग पंगत बसली.
सगळे लोक नुसत्या वासाने दंग झाले असा दरवळ सुटला होता. कधीच न खाल्लेले जायकेदार पदार्थ खानसामा वाढू लागला. प्रत्येकाने एखादा घास खाल्ला की खानसामा उत्सुकतेने बघायचा मग वाहवा मिळाली त्याचा चेहरा फुलून यायचा.
महाराजांचेही ताट वाढले, एक - दोन वाट्यात बोटं बुडवून महाराजांनी चव घेतली. अगदी थोडा गोडा पदार्थ खाल्ला "हं झ्याक"
खानसाम्याचा चेहरा उजळला.
पण लगेचच महाराजांनी ताटाला हात लावून नमस्कार केला व ताट पुढे सरकवले...
"महाराज घ्या, काय झालं???"
महाराजांनी हातानेच काही नाही या अर्थी खुणावले.
तोवर रोजचा माणूस महाराजांचे ताट घेऊन आला, आणि मग खरं महाराज जेवायला बसले.
ज्वारी बाजरीची भाकरी अन तांबडा, पांढरा रस्सा...
एकदम साधा जेवण....
महाराज पोटभर जेवले.
तोवर सगळ्यांचे जेवण उरकले.
सगळे पुढे आले. "महाराज, असं जेवण कधी झालं नव्हतं. याला आपल्या मुदपाकखान्यात ठेवून घेतलेच पाहिजे....."
महाराजांनी त्या खानसाम्यास बोलावले " ह्यांचा फेटा बांधून सत्कार करा अन योग्य ती बिदागी देऊन पाठवणी करा..."
" पण महाराज माझं काय चुकलंय का??
मला नोकरीत घ्या."
" नाही तुमचं काय चुकलं नाही.. "
असं म्हणत महाराजांनी खिशातनं एक लांबलचक यादी काढली ज्यावर काल मागवलेल्या पदार्थांची नावे अन किमती होत्या.
" मी या संस्थानचा सेवक आहे अन माझ्या लोकांसाठी कामे करताना आम्हाला हे मोठे चोचले पुरवणे सोपे नाही. एवढा खर्चात माझ्या संस्थानातील कितीतरी कष्टकरी लोक खाऊन निघतील. आम्हाला हे परवडणारे नाही. या आता....."
.
#शाहू_जयंती
#अभिवादन........