अशा बेलगाम उसळत आहेत हृदयातल्या आकांक्षा
जसे ‘मेक्सिकन’ चित्रपटात घोडे बेफाम दौडणारे!
या साऱ्या आकांक्षा तबेल्यात करताच येत नाहीत ठाणबंद!
इतक्या सावधगिरीने चंद्र उगवला आहे आभाळात
जशी रात्रीच्या काळोखात खिडकीशी येतेस तू
काय! चंद्र आणि जमीन यांच्यातही आहे काही आकर्षण?
आयुष्याच्या खेळात रस्सीखेच चालली आहे एकाच बाजूने
रस्सीचे दुसरे टोक माझ्या हाती दिले असते तर गोष्ट वेगळी!
प्रतिस्पर्धी तगडा तर आहेच, शिवाय तो समोरही येत नाही!
लोकांची तर मेळ्यामध्ये सुद्धा चुकामूक होते
पण भेटतातच ना कहाणीच्या एका सुंदर वळणावर?
तसे कायमचे थोडेच कुणी दुरावते परस्परांना?
रात्री थकल्या भागल्या रस्त्यावर एक सावली
हलत डुलत आली, खांबावर धडकली, गतप्राण झाली
खचित, काळोखाचीच कुणी बेवारस अवलाद असणार ती!
मारून टाका हे विषारी डास, उठणाऱ्या आवाजांचे –
त्यांच्या चाव्याने सूज येत राहाते
मच्छरदाणी लावूनही जगणे अवघड झाले आहे!
पृथ्वी घालते आहे सूर्याभोवती प्रदक्षिणा
आणि चंद्र फिरतो आहे पृथ्वीभोवती रात्रंदिवस
आम्ही आहोत तिघेजण, आमचे कुटुंब आहे तिघांचे!