किती तरी आणखी सूर्य उडाले आसमंतात...
मी आकाशाचे गूढ उकलत होतो
ती टॉवेलने ओले केस झटकत होती!
तांबडे फुटले, कोवळ्या किरणात काचेची तावदाने झगमगली
घरी जाण्याची वेळ झाली, पाहा ना, सकाळचे पाच वाजले
घड्याळाने इमानेइतबारे रात्रभर चौकीवर पहारा केला!
असे डोळ्यात भरुन राहिले आहे तुझे रुप
की अनोळखी लोकही ओळखीचेच वाटत आहेत
तुझ्याशी नाते जोडले आणि साऱ्या जगाशी जवळीक झाली!
जाता जाता तुझ्या गाडीचे दिवे लाल झाले अचानक
वाटले असेल तुला, थांबावे की परत मागे यावे?
पण तू ‘सिग्नल’ तोडून भलत्याच रस्त्याला वळलीस!
या बडबडणाऱ्या शब्दांना पकडा चिमटीत
फेकून द्या, चिरडून टाका पावलांखाली बेलाशक
अफवांना रक्त पिण्याची सवय असते!
किती दूरपर्यंत होता तो माझ्याबरोबर, आणि एके दिवशी
मागे वळून बघतो तर तो आता सोबत नव्हता!
खिसाच फाटका असेल तर काही नाणी हरवूनही जातात!
तसे आम्ही कुठे वळलो नाही, कधी आमचा रस्ताही वळला नाही
एक झाले मात्र, कुठे उतार लागला, कुठे होता चढ,
मी खाली खालीच जात राहिलो, तू जाऊन बसलीस उंचावर!