एखादी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला एक निर्धारित रक्कम निवडणूक आयोगात जमा करावी लागते. या रकमेला डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम म्हटलं जातं. जर एखाद्या उमेदवाराला निश्चित मतं मिळवता आली नाही तर त्याची अनामत रक्कम जप्त होते.ही अनामत रक्कम प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळी असते. ग्रामपंचायत निवडणुकीपासून राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत, प्रत्येक निवडणुकीत उतरलेल्या उमेदवाराला अनामत रक्कम द्यावी लागते.
अनामत रक्कम किती असते ?
प्रत्येक निवडणुकीतील अनामत रक्कम वेगवेगळी असते हे समजलं असेलच. लोकसभआ आणि विधानसभा निवडणुकीची अनामत रक्कमेचा उल्लेख रिप्रेझेन्टेटिव्ह्स ऑफ पीपल्स अॅक्ट, १९५१ मध्ये तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या अनामत रक्कमेचा उल्लख प्रेसिडेट अॅण्ड व्हाईस प्रेसिडेंट इलेक्शन अॅक्ट, १९५२ मध्ये करण्यात आला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य वर्ग आणि एससी-एसटी वर्गातील उमेदवारांसाठी वेगवेगळी अनामत रक्कम असते. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीत सर्व वर्गातील उमेदवारांसाठी समान अनामत रक्कम असते.
कोणत्या निवडणुकीत किती रक्कम?
लोकसभा निवडणूक : सर्वसामान्य वर्गातील उमेदवारांना २५ हजार रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागते. तर एससी आणि एसटी वर्गाच्या उमेदवारांसाठी ही रक्कम १२,५०० असते.
विधानसभा निवडणूक : सर्वसामान्य गटातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम १० हजार रुपये असते. तर एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये जमा करावे लागतात.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक : सर्व वर्गासाठी अनामत रक्कम समान असते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवारांना १५ हजार रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करावी लागते.
अनामत रक्कम जप्त का होते?
एखाद्या निवडणुकीत तर उमेवाराची अनामत जप्त झाली असेल, तर त्याचा अर्थ जनतेने त्याला स्पष्टपणे नाकारलं असा होतो. त्या पदासाठी तो उमेदवार लायक नाही, असं जनतेचं मत असल्याचं यातून स्पष्ट होतं. त्यामुळे अशा उमेदवारांची अनामत जप्त केली जाते.निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा उमेदवार जागेवर एकूण मतदानाच्या १/६टक्के म्हणजेच १६.६६% मते मिळवू शकला नाही, तेव्हा त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते.समजा एका जागेवर १ लाख मते पडली आणि ५ उमेदवारांना १६,६६६ पेक्षा कमी मते मिळाली, तर त्यांचे सर्व डिपॉझिट जप्त होईल.
हाच फॉर्म्युला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीलाही लागू होतो. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवाराला आपली अनामत रक्कम वाचवण्यासाठी १/६मते मिळवावी लागतात.
कोणत्या परिस्थितीत अनामत रक्कम परत मिळते?
उमेदवाराला १/६पेक्षा जास्त मते मिळाल्यास त्याची अनामत रक्कम परत केली जाते.विजयी उमेदवाराला १/६ पेक्षा कमी मते मिळाली तरीही त्याचे पैसे परत केले जातात.
मतदान सुरु होण्यापूर्वी उमेदवाराचा मृत्यू झाल्यास, अनामत रक्कम त्याच्या कुटुंबीयांना परत केले जातात.
- प्रा डॉ सुधीर अग्रवाल