जोवर फुलांच्या बागा फुलताहेत,
पहाडामागे वारा अडत नाही.
शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे,
फळे नित्यनेमाने पिकत आहेत,
माणसाला उपकार आणि आणि त्याची
निर्व्याज परतफेड करता येत आहे,
एखाद्याची महायात्रा पाहून एखादा
सहजच नमस्कार करतो आहे
तोवर आम्हाला एकमेकांबरोबर
अबोला धरण्याचा अधिकार नाही.
आम्ही आमच्या पडजिभेइतकेच
सर्वार्थांनी एकमेकांचे आहोत.
कालच प्रत्येक क्षण उष्टावतो
तरी काल ताजा टवटवीत आहे.
ईश्वराने दिलेले हे अंग प्रत्येकजण
बारा दिवसाच्या अर्भकाइतक्याच
हळुवारपणे सर्व तर्हांनी धूत राहतो,
आपापल्या मापाचे पापपुण्य बेतून
सगळे आयुष्य कारणी लावतो.
म्हणून कधीतरीची प्रसन्नताही
मनाची उन्हे करते आणि सारा ताप
उन्हातला पाऊस होऊन टपटपतो.
धरेच्या पोटात पाणी आहे,
घशाखाली त्याची तहान आहे,
माणसाच्या पोटात आनंद आहे
म्हणूनच नेहमी भूक लागते,
इंद्रियांची वेल पसरत पसरत
झोपेचा गारेगार मोगरा फुलतो.
शेतकरी पिकाला जपत असतो
पहिलटकरणीसारखा, रात्रंदिवस
कायावाचामनाचा पावसाळा करुन
मातीच्या कणाकणातून झिरपतो,
अशा वेळी आकाशाच्या कोनन कोनाचा
स्पर्श त्याला झुळकाझुळकातून होतो,
हवेचेही कोनेकोपरे प्रत्यक्ष चाचपतो.
दाण्यादाण्यातील धारोष्ण दुधाची जाग
पाखरांच्या पिसापिसातून जाते,
थव्याथव्यांनी आनंद उतरतो,
शेतमळा डुलतो, वारा डुलतो,
शेताचा पिका पिका दरवळ
झुळझुळत्या झर्यासारखा
शेतकर्याच्या मनातून वाहतो,
सुईणीच्या मुखावरील कष्टासारखी
रसरसून लखाखते कोयतीची धार.
जीवनावर प्रेम करणारे सगळे जण
एकमेकांना नमस्कार करीत करीत
सुखदुःख वाटतात जिवाभावाने.
सर्वांना पोटाशी धरुन सर्वांवर
स्वत:च्या आयुष्याची सावली धरतात,
एखादा अनवाणी चालणारा विरक्त पाहून
सांगतात : सर्वांच्या पायतळी जमीन आहे.
एखाद्या मेलेल्या मित्राच्या स्मृतीवर
हलकेच कधीतरी अमोल क्षणांचा
एखादा ताटवा वाहून रात्रभर जागतात,
आणि मग कधीतरी झोपेतून उठून
स्वत:वरच आनंदाश्रू ढाळतात,
स्वत:लाच नमस्कार करतात.
सखीने सजणाल्या दिलेल्या गुलाबाच्या
गेंदाप्रमाणे, वचनाप्रमाणे प्रत्येकानेच
कधीतरी मन दिले - घेतलेले असतो;
सखी-सजणाच्या संकेतस्थलासारखेच
हे आयुष्यही एकमेकांचेच आहे.
या जगण्यात खोल बुडी मारुन आलेला
एखादा कोणी सर्वांना पोटाशी धरणारा
आणि ते पोटाशी धरले गेलेले सगळे -
दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे
कवी -
आरती प्रभू
कवितासंग्रह -
नक्षत्रांचें देणें