जगामधी गा तुला कशाला परमेशं धाडिलें?

जगामधी गा तुला कशाला परमेशें धाडिलें ? –
कराया श्रम तुजला योजिलें ।। ध्रु ।।
मधुर माधवीकुंज आपुले विस्तृत करणे कधीं
देऊं नको सोडुनि गा तूं मधीं;
।। चाल ।। घाम उन्हाचा फार येइल बा तुला,
पण धीर धरीं, जों अस्तसमय पातला,
जों कालाच्या मंजुल घण्टाटंकारें सुचिवलें –
चला रे काम अतां संपलें.                                    १

देवें उटाणीं तुला चर्चिलीं काय म्हणुनि सांग की? –
झगडण्या, नच पडण्या मंचकी !
।।चाल।। स्फटिक ते धवल जेंवि शोभले,
अश्रु जे तेंवि तुवां ढाळिले
तुझ्या धाकल्या उद्यबन्धूंकरिता, देव भले
भुजालंकरणीं ते गोविले,                                    २

धैर्य आणि ती कार्यनिरतता दावुनि तूं आपुली,
बांधवी स्फूर्ति पसर चांगली;
तुझें बघुनि ते हृदयिं धीरता घेतिल मग लागली,
करीं ही धरितिल कृत्यें भलीं;
।।चाल।। मग-काय सांगणें ! द्वारें तुझिया तयां
देइल पुष्पही ईश्वर हरिकूनियां.
अल्प पुष्पही बिन्दु हिमाचे अपुल्या पेल्यांतले
वांटितें भावंडीं आपले!                                      ३


कवी - केशवसुत

जायाचें जग का असेंच?

“Doth then the world go thus, doth all thus move?” - W. Drummond

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)

जायाचें जग का असेंच ? सगळें ऐसेंच का चालणें ?
ऐसा न्यायच का जगामधिं अम्हांलागीं सदा लाभणें ?
सर्वाला नियमीतसे दृढ असें ते हेंच का शासन ?
देवांनो ! असलेंच काय तुमचें सामर्थ्य द्या सांगुन ?            १

जे आत्मे अपनीतिच्या निबीड त्या धुंदीमुळें आंधळे
त्यांशीं अन्घ विधी सदैव करितो सख्यत्व कीं आपुलें;
ते कीं, आणिक हे सुनीति ! धरिती भक्ती तुझीयावरी
जाती लोटत वादळामधिं अहा ! ते जीर्ण पर्णांपरी !            २

सर्वांचा अवघ्या नियामक असे का हो कुठें ईश्वर ? –
तो आहे, मग सन्मनें हळळती दु:खामधें कां तर ?
नम्रत्वावरि हाय ! उद्धटपणा वर्चस्व कां तें करी ?
कां हो हाल तुटूनि हंत ! पडती निर्दोषितेच्यावरी ?            ३

(वृत्त-उपजाती)
बा धांव देवा ! तर ये त्वरेनें !
ही दुर्दशा थांबिव रे दयेनें;
वा, साधु आणीक असाधु यांचें
समप्रकर्षी युग आण साचें !


कवी - केशवसुत

कामान्धत्व

“ O me ! what eyes hath love put in may head” - Shakespeare

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)

कामानें मजला अहो ! कुठुनि हे डोळे दिले कायसे ! –
वस्तूंची स्थिती ती खऱी न मजला योगें तयांच्या दिसे;
किंवा ते बघती खरें जर म्हणूं, कोठें पळाली मति?-
जी दे दोष मदीय नेत्रविषया, जाणूं कशी सत्य ती ?            १

खोटे नेत्र मदीय जें बघति तें आहे जरी सुन्दर,
तैसे तें न असे, म्हणोनि जग हे बोले बरें कां तर ?
ते नाहीं रमणीय हें जर खरें, आहे खरें हे तरी –
लोकांची नयनें तशीं न असती कामी जनाची खरी;            २

त्रस्तें जीं अवलोकनें, भरुनि जीं बाष्पांमुळें राहिलीं,
तथ्यालोकनदक्ष कामिनयनें व्हावींत तीं कोठलीं ?
माझ्या या नयनां दिसे न, म्हणुनी आश्चर्य नाहीं मुळीं,
आभ्राच्छादित तें बघूं न शकतो आदित्यही तो बळी.         ३

(वृत्त-इन्द्रवंशा)
व्यंगें प्रियेचीं बघतील, मोकळे
कामी जनाचे जर नेत्र राहिले,
म्हणूनि का आणुनि त्यांत आसवें,
ते धूर्त कामा ! करितोस आंधळे ?                              ४


कवी - केशवसुत
नोव्हेंबर १८८८

अहा पक्षी हे चित्र पक्ष याचें!

(जाति-दिंडी)

अहा पक्षी हे ! चित्र पक्ष यांचे !
पैल जाती निश्चिन्न वारिधीचे;
सुखी खग हो ! येवढें मला बोला,
पंख ऐसे मिळतील कधीं याला ?

जिचे तुलनेला जगीं नसे कोणी
अशी मम तूं चन्द्रिका रुपखाणी !
गडे चन्द्रे ! लागलों जर उडाया,
उन्हातान्हांतुनि झटूं कुठें जाया ?

न त्या कमलीं, किति जरी दिव्य झालें;
परी अगनग लंघुनी, मधुर बाले,
ओष्ठ तव, जे स्मित दावित मधून,
सखें! चुम्बुनि ते, सुखें मग मरेन !


कवी - केशवसुत
७ ऑगस्ट १८८८

जास्वंदीची फुलें आणि पारिजाताचीं फुलें

(वृत्त – इंद्रवज्रा)

पहिली :-

“मातींत खालीं पडणें तुम्हांला
कैसें रुचे, हे न कळे आम्हाला.
ही रक्तिमा स्वीय अम्ही, पहा रे,
शाखांवरी नाचवितों अहा रें!”

दुसरी :-

(वृत्त-उपजाती)
“ती रक्तिमा घेउनियां खुशाल
शाखांवरी सन्तत का रहाल ?
मरुन मातींतचि या पडाल,
अज्ञात ऐशा थडग्यांत जाल !

“भाळीं न तें या अमुच्या म्हणून
तो डौल शाखांवरला गणून –
खोटा, लिहाया थडग्यावरी तें
स्वनाम गन्धें झटतोंचि येथे !”


कवी - केशवसुत
- ६ ऑगस्ट १८८८

मदन आणि मदनिका

“Cupid and my Campaspe played At cards for kisses” & c. - J Lylye.

(दिंडी)
मदन आणि मदनिका प्रिया माझी
चुम्बनांचे कारणें सोंगट्यांही
खेळण्याला बैसलीं; तधीं गाजी
मदन जाऊं लागला हार पाहीं !                                 १

(शार्दूलविक्रीडित)
भाता आणि धनुष्य आणि शर ते त्यानें पणीं लाविले,
तैसे दोनहि चक्रवाक अपुले; सारे तिनें जिंकिले !
स्वोष्ठींच्या मग विद्रुमासि मुकला ! खालीं तयें टाकिला
गालींचाहि गुलाब नंतर भला, तोही तिनें जिंकिला !        २

(वृत्त-वसंततिलका)
तेव्हां हनूवरिल वर्तुळ त्या खळीला,
भाळावरील मग त्या स्फटिकप्रभेला
लावी यथाक्रम सुमेषु पुन: पणास;
जिंकून घे मदनिका सहसा तयांस !                          ३

(वृत्त-शार्दूलविक्रीडित)
वेडा होउनि लावुनी स्वनयनें दोन्ही तदा खेळला,
नेलीं तींहि तिनें; सुमेषु उठला होऊनियां अंधळा !
हा ! हा ! हे मदना ! तुझी जर हिनें केली अवस्था अशी,
व्हायाची न कळे हिशीं तर दशा आतां मदीया कशी !     ४


कवी - केशवसुत
२ मार्च, १८८८

किरातार्जुनीय –सर्ग १ ला

(वृत्त – शार्दूलविक्रीडित)

श्रीमत्कौरवराजराज्यशकटश्रीची प्रजापालनीं
कैशी वृत्ति असे ? – भली उलट वा ? वार्ता अशी काढुनी –
आणाया, द्विजवेष देउनि असा, होता दुरी प्रेषिला,
द्वैताख्यीं विपिनीं किरात फिरुनी धर्मांसि तो भेटला.              १

त्यानें नम्रपणें प्रणाम करुनी राजेश सन्मानिला,
शत्रूनें मग जिंकिलें धरणिला तें वृत्त तो ठाकला –
सांगायास, तयीं व्यथा नच मनीं त्याच्या उभी राहिली,
कांकी उक्ति हितेच्छू ते न वदती खोटी जरी चांगली.              २

दुष्टांचा करण्या विघात हृदयीं जो धर्म इच्छा धऱी,
एकान्तीं मग घेतली वनचरें त्याची अनुज्ञा शिरीं;
जीचा अर्थ उदार निश्चित तसा, वर्णी जिच्या माधुरी
बोलाया सरसावला मग अशी त्याचेसर्वे वैखुरी :-                 ३

“डोळे हेरचि होत हे नृपतिचे, यालागुनी राजया !
त्यांहीं त्यास बरें नसे ठकविणें, हें बोलणें कासया ?
तेव्हां साधु असाधु वा मम वचा सोसावया अर्हशी,
वाणी कारण दुर्लभा हितकरा चेतोहराही तशी.                   ४

“स्वामीला नच तो हितास कथितो, तो हो सखा कायसा?
मित्राचा हितवाद ऐकूनि न घे, स्वामी म्हणों तो कसा ? –
अन्योन्यां अनुकूल होऊनि सदा जे या जगीं नांदती
राजे आणि अमात्य, त्यांवरि करी ती राजलक्ष्मी रति.          ५

“तीं दुर्बोध निसर्गसिद्ध, चरितें कोठें नृपांची बरें!
राजन् ! मत्सम अप्रबुद्धमतिचीं कोठें बरें पामरें !
ऐसें हें असुनीहि गुप्त अरिची मी काढिली बातमी,
हा तों स्पष्ट प्रभावचि असे, ही बोलतों बात मी.                   ६

“तुम्हांपासुनि तो पराभव मनीं शंकी, जरी काननीं
तुम्ही राहतसां, सुयोधन जरी बैसे स्वराज्यसनी;
यालागूनि, दुरोदरीं मिळविली पृथ्वी, अतां इच्छितो
न्यायानें वश ती समग्र करण्या, गांधारिचा सुनु तो.             ७

“जिंकायास तुम्हांस तो खल सदा इच्छा धरुनी, जनीं
कीर्तीला पसरीतसे, निजगुणां कार्यी भल्या लावुनी;
मोठ्याशीं बरवे रिपुत्वहि खलस्नेहाहुनी फारसें,
ज्याअर्थी अति उन्नतीस सहसा लोकांस तें नेतसें.             ८

“कामद्यारि सहा हटें हटवुनी, वैवस्ततें घातली,
ती दुष्प्राप्यहि राज्यरीतिपदवी पावावयाची भली –
इच्छा तो धरुनी मनीं, अलसही टाकूनि, रात्रंदिन
नेमें वाढवितो पराक्रम, नयें वागोनि दुर्योधन.                  ९

“मृत्यांला अपुल्या निबद्धहृदयस्नेह्यांपरी लेखितो,
स्नेह्यांलाहि समान मान अपुल्या बंधूंसवें दावितो,
कौशल्यें निजबांधवां, दडवुनी सारी अहंभावना,
राजाहूनि अह्मी कमी नच, अशी लावी करूं कल्पना.          १०

“आसक्ती कवणावरीहि न कधीं तो ठेवितां फार ती,
चित्तीं किन्तु समानभक्ति धऱुनी, धर्मार्थकामांप्रती-
आराधी उचित क्रिया करुनियां, सारे गुणासक्त ते-
होती मित्र तिघे, परस्पर कसे व्हावेत ते बाधते ?             ११

“दानावांचुनि साम तें नच कधीं सम्पूर्ण त्याचें असे,
सत्काराविण दान तो नच कधीं लोकांमधीं देतसे,
स्फूर्तीला न कधीं तशी चढतसे तत्सत्क्रिया शालिनी,
पात्रांच्याचि जनांचिया गुणगुणें संबोधिल्यावांचुनी.            १२

“द्रव्यातें अभिलाषुनी न, अथ त्या क्रोधामुळें वा न, तो
राजांचा परि धर्मच स्मरुनियां, दुष्टां वशी दण्डितो;
धर्मातिक्रम केलियास, रिपुच्या पुत्राचियाही वरी,
न्यायाधीशजनीं असे कथियली तो तीच शिक्षा करी.           १३

“आत्मीयांस सभोवतीं निरवितो चाणाक्ष संरक्षणीं,
नि:शंकाकृतिला धरी वरिवरी, शंकी जरी तो मनीं;
कोणीं कार्य समाप्तिला मिळवितां, तो पारिसंतोषकें –
अर्पी, तत्कृतज्ञता पसरिती लोकांत तीं गायके.                १४

“योग्यायोग्य’ विचार पाहुनि, सदा पात्रीं अशा तो नरीं
सत्कारा सुचवावयास अपुल्या, नाना उपायां करी;
अन्योन्यांत, उपाय ते, करुनिया स्पर्धा जणूं सम्पदा –
देती आणुनियां चिरस्थिर अशा, दुर्योधनाला सदा             १५

“भूपांचे रथ आणि अश्व भिडती ज्यामाजि रात्रंदिन
तें दुर्योधनमन्दिराजवळचें ओलें असें अंगण;
गन्धें सातवणाचिया सदृश त्या दानोदकें, राजया!
भेटीदाखल धाडिले नरवरीं नागेन्द्र जे त्यांचियां !              १६

किंवा –
“भेटीदाखल धाडिले नरवरीं नागेन्द्र जे त्यांचिया;
गन्धें सातवणाचिया सदृश्य त्या दानोदकें, राजया !
ते दुर्योधनमन्दिराजवळचें ओलें असे अंगण,
भूपांचे रथ आणि अश्व भिडती ज्यामाजि रात्रंदिन !

“ भूय:कर्षण केलियाविण जिथें संपादिती कर्षण
सौकर्यं सगळीं पिकें विपुल, तो राजा ! नदीमातृक
मोठा कौरवदेश आक्रमितसे उत्कर्षसोपान रे,
ज्याची क्षेमकरें धुरा धरियली दुर्योधनाचे करें.               १७

“त्राणोपाय करुनि, तो हटवुनी बाधा दयावान् दुरी,
देशोत्कर्ष करी, म्हणूनि धवला कीर्ति स्वयें त्या वरी;
त्याचे सद्दुण पाहुनी द्रवुनियां चित्तामधें मेदिनी,
पान्हा त्या वसुमूर्तिला वसुमिषें ती सोडिते नन्दिनी.       १८

“ज्यांचे तेज विशेष, मान धन ज्यां, प्रख्यातही जे युधीं,
ज्यांची वृत्ति चळे न, सोडुनि न जे जाती स्वनाथा कधीं,
धन्वी यापरिचे सुयोधन धनें पूजीतसे तो बळी,
तेही तत्प्रिय साधण्या नरहरें ! देती जिवाचा बळी.          १९

“कर्तव्ये अपुलीं करुनि सगळी, हेरां भल्या योजुनी,
राजांच्या सगळ्या नृपा ! मसलती जो घेतसे जाणुनी;
उत्कर्षा करुनी हितास करिती ऐशीं फलें पाहुनी,
धात्याच्या परि गूढ त्या खटपटी याच्या, कळे हें जनी !    २०

“ त्याला सज्ज करावयास न कधी कोदंड तो लागला,
त्याचा सुन्दर चेहराहि न कधी कोपामुळें भंगला;
जैशीं तीं सुमभूषणें नरमणे ! त्याचीं तशीं शासनें
पृथ्वीचे पति सर्वही निजशिरीं घेती गुणांकारणें.            २१

“ज्याचें अप्रतिकार्य शासन, असा तो यौवराज्यावरी
स्वामी त्या नवयौवनोद्धत अशा दु:शासनाला करी;
भूपा! आणिक तो सदा, अनुमतें विद्वान पुरोधांचिया
यज्ञीं तृप्त करावया हुतवडा अर्पी हवि: संचया.              २२

“जीच्यांतील समस्त भूप नमुनी याला सदा वागती,
तो आवारिधी भूमि हा नियमितो आहे जरी स्मप्रति,
धाकानें तुझिया तरी झुरकते हा राजया ! अन्तरीं! -           
मोठ्यांची रिपुता निरन्तर अहो दुष्टावसना खरी !          २३

‘कोणी भाषणसंगतींत वदतां नामाप्रती तूझिया
चित्ती आठवुनी विलक्षण अशा शौर्यासि पार्थाचिया,
ज्या दु:सह मन्त्रशब्द अहि तो ऐकूनि, हाही तसा
खाली घालूनि आनना व्यथित कीं होतो मनीं फारसा !    २४

किंवा –

(वृत्त – वंशस्थ)
“ कथाप्रसंगें तव नाम बोलतां
कुणीहि, आखण्डलसूनुशूरता
स्मरोनि, नम्रानन तो जळे मनीं,
सुदु:सहें मंत्रपदें जसा फणी.

(शार्दूलविक्रीडित)
“यासाठींच तुला अपाय करण्या आहे टपूनी बरें!-
जें कांही करणें असेल तुजला तें तूं पहा सत्वरें !
लोकांची वचनें जमा करित जे माझ्यापरी हिंडती,
वार्तायुक्तचि कुन्तिकायजवरा ! त्यांच्या गिरा राहती !”  २५

(वृत्त-वंशस्थ)
वदूनि हें, घेउनि पारितोषक,
निघूनि गेला वनवासिनायक;
रिघूनि कृष्णासदनीं, युधिष्ठिर
स्वबान्धवां तें वदला सविस्तर                              २६


कवी - केशवसुत
जून १८८७