आलों, थांबव शिंग !

आलों, थांबव शिंग दूता, आलों ! थांबव शिंग !

किति निकडीनें फुंकिशि वरिवरि ! कळला मला प्रसंग ध्रु०

जरि सखे जन हाटा निघती,

आर्जवुनी मजला बोलविती,

परोपरी येती काकुळती,

पहा सोडिला संग. दूता० १

जरि नाटकगृह हें गजबजलें,

जरि नानाविध जन हे सजले,

मजविण त्यांचें कितीहि अडलें,

पहा सोडिला रंग. दूता० २

जरी खवळलें तुफान सागरिं,

मार्ग भरे हा जरि घन तिमिरीं,

पहा टाकिली होडी मीं तरि

नमुनि तिला साष्टांग. दूता० ३

अतां पुकारो फेरीवाला,

गवळी नेवो गाइ वनाला,

कारकून जावो हपिसाला,

झालों मी निस्संग. दूता० ४

विसर्जिली मीं स्वप्नें सारीं,

आशा लावियल्या माघारी,

दुनियेच्या आतां बाजारीं

माझा न घडे संग दूता० ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - अंजनी
राग - हिंदोल
ठिकाण - अजमेर
दिनांक - १४ ऑगस्ट १९२१

तृणाचें पातें

तृणांचे पातें हालतें डोलतें वातें. ध्रु०

झगा मख्मली हिरवा गार,

मुकुटहि रत्‍नजडित छान्दार,

तुरा तयावर झुपकेदार,

हलवि ह्रदयातें १

यावरि तेज कसें रसरसतें;

जीवन नसांतुनी थबथबतें,

चिमणें इंद्रचाप थयथयतें.

दंवीं जइं न्हातें. २

तुम्हापरि सूर्य किरणिं या न्हाणि !

तुम्हापरि वरुण पाजि या पाणि,

तुम्हापरि पवन गाइ या गाणिं,

बघा हें नातें. ३

मग या पायिं कसें तुडवीतां ?

खड्‌ग यांतलें उद्यत बघतां

भरे कांपरें स्मरतां सत्ता

झुलवि जा यातें. ४

यांतुनि कृष्ण मुरलि वाजवितो,

वामन बलीस यांत दडवितो,

यांतुनि नारसिंह गुरगुरतो,

भ्या रे यातें. ५


कवी - भा. रा. तांबे
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
साल - १९२७

कोण रोधील ?

या भविष्याचिया दिव्य कारागिरा
कोण रोधील ? दे कोण कर सागरा ? ध्रु०

शूल राजा, तुझा रक्त त्यांचे पिओ,
गृध्रगण भक्षण्या पुण्य गात्रां शिवो,
दुर्गिं त्यांचिं शिरें अधम कुणि लोंबवो,
अंत त्याचा नको समजुं हा नृपवरा ! १

ज्योति मृत्युंजय प्रबळ पिंडाहुनी
समज दावाग्निशा चहुंकडे पेटुनी
देशकालांसि रे टाकितिल व्यापुनी,
अंतिं फडकेल रे ध्वज तयांचा खरा. २

ज्यावरी भार तव, ज्यावरी गर्व तव,
विफल तोफा तुझ्या, पलटणी सर्व तव,
विफल बलदर्प तव, यांत का शर्व तव ?
उघड लोचन, पहा दूर राजा, जरा. ३

भव्य ते स्तंभ बघ तुंग अट्टालिका,
त्या कमानी पहा, त्या गवाक्षादिकां,
सौध ते, कळस तो सोनियाचा निका,
ध्वज तरी प्रीतिचा मोहवी भास्करा. ४

तेथ त्या रत्‍नमय दिव्य सिंहासनीं
लखलखे भरतभूजननि बघ विजयिनी !
प्रणय, नय, सत्य हे सज्ज गण रक्षणीं,
बघ भविष्याचिया दिव्य त्या मंदिरा. ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - वरमंगला
राग - भूप
ठिकाण - अजमेर
दिनांक - १८ ऑगस्ट १९२२

मिळे ग नयनां नयन जरी

मिळे गे नयनां नयन जरी-

नयनमोहिनी, मनीं उसळती लहरींवर लहरी. ध्रु०

काय घुसळिला यापरि सागर मंथनकालिं सुरीं ?

विजेपरी लखलखतां अवचित दिपविशि नेत्र खरी.

पिटाळुनी स्मृति, धृति, मति ह्रदया व्यापिशि तूंच पुरी.

निलाजरे हे नयन पाहतिच, हासति लोक तरी.

नयनगवाक्षीं सकलेंद्रियगण एकवटे सुंदरी.

पापदृष्टि ही म्हणति, त्यांहिं मज ओळखिलें नच परी.


कवी - भा. रा. तांबे
जाति - पतितपावन
राग - भीमपलासी
ठिकाण - आग्रा रेल्वेस्टेशन
दिनांक - २२ जुलै १९२२

अवमानिता

कां मज आज तुम्हीं बोलविलें ?
बहु दिवसांनीं स्मरण जाहलें,
आज कसें हें घडलें ? ध्रु०

बालपणांतिल बालिश वर्तन,
तरुणपणांतिल तें भ्रूनर्तन,
स्वप्निं आज कां दिसलें ? १

चित्रगुप्त लिहि वह्या आपुल्या,
वरी धुळीच्या राशि सांचल्या,
त्यांस कुणीं हालविलें ? २

ह्रदयपटावरि सुंदर चित्रें
आपण रचिलीं पूर्वि पवित्रें,
बघुनि आजवर जगलें. ३

स्मराल कधिं तरि या आशेवरि
उदासवाणे दिवस कसे तरि
आजवरी घालविले. ४

परि समजूं का हा भाग्योदय,
भाग्यास्तचि कींपूर्ण तमोमय ?
ह्रदय तरल खळबळलें ! ५

सोक्षमोक्ष घेइन करुनी मी,
जगेन कीं जाइन मरुनी मी,
कांपत येण्या सजलें ! ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - भूपदंड
राग - तोडी
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर,
दिनांक - १५ मे १९३४

दुर्गा

छेड सखे, दुर्गा मधु रागिणि;
बीनलयीं घर टाक थरारुनि. ध्रु०

लालन लालडि, लोचनमोहिनि
अमृत झरूं दे निजकंठातुनि. १

उन्मादक सुर-मोत्यांच्या सरि
उधळ, थरारीं मैफल भारुनि. २

धवल चांदणें स्रवे अमृतरस,
कशी पसरली शांत यामिनी ! ३

धीरोदात्त गभीरा दुर्गा,
ओत ओत सुर गभीर साजणि ! ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग - दुर्गा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ सप्टेंबर १९३५

चरणाखालिल हाय मीच रज !

सांगुं कुणा गुज साजणि, मनिंचे ?

बोलहि वदण्या चोरि समज मज;

मी पतिविरहित, शंकित नयनें

बघुति लोक मज, अशुभ गणुनिया टाळतात मज. ध्रु०

कुणाजवळ करुं ह्रदय मोकळें ?

कोंडमार किति ! दिवस कंठितें गिळुनि दुःख निज १

मी न मनुज का ? काय न मज मन ?

नच विकार का? लहरि उठति मनिं, काय सांगुं तुज ! २

पुरुष वरिति नव नवरि कितितरी,

सकल शुभच तें ! असहायच मी मुकेंच सावज ! ३

कशास जाई तो या मार्गी ?

बघुनि दुरुनिया पाणी पाणी होतें काळीज. ४

दुसर्‍या मिरविति युवति पतिशिरीं,

तुडविति पाउलिं चरणाखालिल हाय मीच रज ! ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - श्रीमती
राग - तिलककामोद
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ सप्टेंबर १९३५