आपण वाढवावें आपण बुडवावें । ऐसी रिती बरवें तुमचे घरीं ॥१॥
पाळिल्या पोसिल्या विसर पाडावा । समर्थाच्या नांवा लाज येते ॥२॥
रंक मी भिकारी उच्छिष्ठाचा अधिकारी । काय भीड हरि माझी तुम्हां ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरीनिवासा । उगवा हा फांसा लवकरी ॥४॥


- संत कर्ममेळा
आम्ही सखे देवाजीचे । येका विठ्ठ्ल बीजाचे ॥
जन्म पाचही जहाले । बीज नाही पालटले ।
येकबीज आजीवरी । जन्म याच क्षितीवरी ।
दंड्कारण्य देशात । याची कलीयुगा आत ।
शकामाजी शालीवान । जन्म पाच जाले धन्य ।
तुकाविप्र पाचवीया । जन्म जाली गुरु दया ॥

या विठूचा गजर

या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ।
या संतांचा मेळा गोपाळांचा, झेंडा रोविला ॥१॥

कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण ।
नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा ॥२॥

उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्‍गुरूजवळी ।
प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा ॥३॥

पंचतत्त्वांची गोफण, क्रोध पाखरें जाण ।
धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण ।
केशवदास ह्मणे संतांचा मेळा गोपाळांचा ॥४॥


- संत केशवदास

भक्ताचिया काजासाठी

भक्ताचिया काजासाठी, साधुचिया प्रेमासाठी,
सोडली मी लाज रे ॥१॥

धुतो अर्जुनाचे घोडे, सदा राहे मागे पुढे ।
घाली अंगणात सडे, बांधुनिया माज रे ॥२॥

वेडी गवळीयांची पोरे, त्यांचे ताक प्यालो बा रे ।
स्वाता भिल्लिनीची वोरे, उच्छिष्ठाची चोज रे ॥३॥

दुर्योधन सदनी गेलो, विदुराच्या गृहा आलो ।
आवडीने कण्या प्यालो, जोंधळ्‌ची पेज रे ॥४॥

पुर्णब्रह्म ह्मणती माते, पुर्णब्रह्म मींच त्यांते ।
ऐंसी याची जाणीव ते, ह्मणे अमृतराय रे ॥५॥


 - संत अमृतराय महाराज

हरिभजनाविण काळ घालवू नको

हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥१॥

दोरीच्या सापा भिवुनी भवा ।
भेटी नाही जिवाशिवा ।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥२॥

विवेकाची ठरेल ओल ।
ऐसे की बोलावे बोल ।
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ॥३॥

संत संगतीने उमज ।
आणुनि मनी पुरते समज ।
अनुभवावीण मान हालवू नको रे ॥४॥

सोहिरा ह्मणे ज्ञानज्योती ।
तेथ कैचि दिवस-राती ।
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे ॥५॥


 - संत सोहिरोबानाथ

अजि मी ब्रह्म पाहिले

अजि मी ब्रह्म पाहिले

अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी
कटिकर नटसम चरण विटेवरी, उभे राहिले

एकनाथाच्या भक्तिसाठी, धावत आला तो जगजेठी
खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले

चोख्यासंगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्त्वतां
जनीसंगे दळिता कांडिता, गाणे गाईले

दामाजीची रसिद पटवली, कान्होपात्रा ती उद्धरिली
अमृतराय ह्मणे ऐसी माऊली, संकटा वारिले


रचना - संत अमृतराय महाराज
राग -  जयजयवंती

देह शुद्ध करुनी

देह शुद्ध करुनी भजनीं भजावे ।
आणिकांचे नाठवावे दोष-गुण ॥१॥

साधनें समाधी नको पां उपाधी ।
सर्व समबुद्धी करी मन ॥२॥

ह्मणे जनार्दन घेई अनुताप ।
सांडी पां संकल्प एकनाथा ॥३॥


 - संत जनार्दन महाराज

संतपदांची जोड दे

संतपदांची जोड दे रे हरि साधुपदाची जोड ॥१॥

संतसमागम आत्मत्वाचा, सुंदर उगवे मोड ॥२॥

सुफलित करुनी पूर्ण मनोरथ । पुरविशि जिविंचें कोड ॥३॥

अमृत ह्मणे रे हरि । भक्ताचा शेवट करिसी गोड ॥४॥


 - संत अमृतराय महाराज