सांजवेळी सोबतीला, सावली देऊन जा...
भैरवी गाईन मी, तू मारवा गाऊन जा...
मी जपोनी ठेविल्या, संवेदना स्पर्शातल्या,
त्या खुणांचे ताटवे, तू एकदा फुलवून जा...
पेरला श्वासातुनी मी गंध ओल्या प्रीतिचा,
धुंद मी माझ्यात आहे, धुंद तू होऊन जा...
घेतला झोळीत माझ्या, मी व्यथेचा जोगवा,
एकदा हातात माझ्या, हात तू देऊन जा...
या पुढे जमणार ना तुज, ओळखीचे, पाहणे,
त्या तुझ्या नजरेत मजला, तू जरा भिजवून जा...
नववधू होऊन तू, जाशील जेव्हा, त्या घरी,
त्या घराच्या वळचणीला, आठवण, ठेवून जा...
- इलाही जमादार