शून्य शृंगारते

आतां सरी वळवाच्या ओसरू लागल्या,
भरे निली नवलाई जळीं निवळल्या.

गंधगर्भ भुईपोटी ठेवोन वाळली
भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी.

कुठे हिरव्यांत फुले पिवळा रुसवा,
गगनास मेघांचा हा पांढरा विसावा.

आतां रात काजव्यांची माळावर झुरे,
भोळी निर्झरी मधेंच बरळत झरे.

धुके फेसाळ पांढरे दर्वळून दंवे
शून्य शृंगारते आतां होत हळदिवें.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - जोगवा

माळ

हिरव्या माळापुढे निळा गिरि
गिरवित काळी वळणे काही
छप्पर झाले लाल अधिकच
धूर दरीतून चढतच नाही

पुसून गेले गगन खोलवर
काठावरति ढग थोडासा
थोडासा पण तीच हेळणा
पिवळा झाला फ़क्त कवडसा

हिरव्या माळापुढे निळा गिरि
मावत नाही इतुका फ़िक्कट
अबरळ्त चाललि पुढेच टिटवी
माळ ओसरे मागे चौपट


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - जोगवा

कविता

या माझ्या अजाण कवितेचा अपमान
कां करतां बाबांनो कां?
प्रेम हवंय का या कवितेचं?
मग तें मागून मिळणार आहे का तुम्हांला?
खूप कांही द्यावं लागेल त्यासाठी.
काय काय द्याल?
आत्म्याची बाग फुलवतां येईल तुम्हांला?
पण त्यासाठी तुम्हांला तुमचा आत्मा
तुमच्याच तळहातावर
एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल,
पण त्यासाठी तुमचे हात तुम्हांला
चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील.
कराल?

माझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून,
दूर असतों.
भीत भीत स्पर्श करतों तेव्हा तिचे डोळे
पाणावल्यासारखे चमकतात.
डहुळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम.
ती एका पोक्त कलेने प्रौढ होते.
या कवितेच्या मुलायम केसांवरून
सरकून जातात श्यामघनांतले मंद संधिप्रकाश.
वाटतं की ती आताच उभीच्या उभी
निसटून जाणार आहे
दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गांत.
स्पर्श करतांना अजूनहि मी तेवढा शुद्ध नाही
एखाद्या बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा

या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाउं नका
कारण ती ज्या वाटा चालते आहे
त्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या.
मोडून पडाल!
तिच्या नावाचा जप करायचा असेल तर
त्यासाठी तुम्हांला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे
रुद्राक्षमणी ओवून
जपमाळ करावी लागेल
आणि श्वासनि:श्वासांचा करावा लागेल कमंडलू;
पसरावें लागेल संज्ञेचें व्याघ्रचर्म.
आहे तयारी?
ज्या आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने;
तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा,
मगच पाहा तिच्याकडे डोकें वर उचलून.
ती भोगतेय जें जें कांही त्यांतल्या तिळमात्रही वेदना
तुम्हांला सोसायच्या नाहीत.

मी स्वत: पाहातोंय स्वत:च्याच कवितेला
एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

दोन मी

तो कुणी माझ्यातला तो घनतमी ठेचाळतो
तरीही मी का चालतो ? तो बोलतो ना थांबतो

वाकणारया अन मला तो पाहुनिया मोडतो
झाकितो तो गच्च डोळे, श्वास वक्षी रोखतो

अग्निज्वालेच्यापरी तो नग्न आहे केशरी
कल्पना होती अशी अन अजून आहे ती खरी

कोणते पोशाख त्याचे चोरले मी भर्जरी
विकित बसलो येत हाटीं, आणि खातो भाकरी

तो उपाशी तरीही पोटी लाज माझी राखतो
राख होतानाही ओठी गीतगाणी ठेवितो

मैफलीला तो नि मी दोघेही जातो धावूनी
एकतो मी सूर , तो अन दूरचे घंटाध्वनी

तो कुणी माझ्यातला तो घनतमी तेजाळतो
दीन मी बांधून डोळे एकटा अन चालतो


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

गाडा

कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर?
गाणें सुरू झालें तेव्हा चंद्र होता डोईवर,
गाणे मध्यावर आलें - चंद्र झाला रानभर,

गाणें संपले आणिक पक्षी फडाडला तमीं
आणि तसाच मिटला घरट्यांत ... अंतर्यामी.

वाट रानांतली किर्र, हुरहूर सर्वदूर,
चक्रें फिरती फिरती, करकरे चराचर,

कळ्या फुलतात येथे, पाने गर्द वाजतात,
फुलें घळतात येथे तरी पानें वाजतात,
पानें झडतात येथे तरी वारे वाजतात,
वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात.

कुणासाठी भरूं पाहे डोळां ऐसें उष्ण पाणी?
कुणासाठी झरताहे झरा गप्प ऐशा रानीं?
कुणासाठी झरताहे आयुष्य हें क्षणोक्षणीं?
कुणासाठी रस भरे सालोसाल फळांतुनी?

प्रश्न नव्हे पतंग अन्‌ खेचूं नये त्याची दोरी
आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी?

कुणासाठी, कशासाठी, कुठे आणि कुठवर
ऐंसे घोकीत घोकीत व्हावयाचे दिगंबर.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

व्यथा गात गात

कशाला दिले तू मला लक्ष डोळे
उभा तू उभा तू असा पाठ मोरा
किती जन्म गेले त्वचेचे तमाला
तरी बाहुली रे जपे अश्रु खारा

कहाणी मनाची तुझा शब्द पाळी
मुक्याने वहातो तमी देहमेणा
जरा बाजुला घे कुणी अश्रुबुंथी
नवा जन्म येतो पुन्हा त्याच वेणा

कुठे दूर झाल्या तुझ्या पायवाटा
जळे उंबर्‍याशी दिवा रात रात
धुक्याच्या दिशेला खिळे शून्य दृष्टि
किती ऊर ठेवू व्यथा गात गात


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण
- १०-५-५९

अश्रु दे तूं

लाविशी तूं कां खुळ्याने येथ वाती?
जा तुझीं तूं लाव दारें; कां उभी तूं?
जागती या अजगराच्या येथ राती;
पालवाया ऊर माझा कां उभी तूं?
तेवत्या डोळ्यांतल्या या बाहुल्यांना
एक साधा अन खरासा अश्रु दें तूं!


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण 

पूर

तुझे गात्र गात्र:
पावसाळी रात्र;
सारे. क्षेत्र ऐसें
झालें पूरपात्र

माझे दोन्ही डोळे:
गाव झोंपलेले;
मला नकळत
पुरांत बुडाले

हृदयाचें बेट:
कुठे त्याची वाट?
हातास लागावा
एक तरी काठ!


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण

अर्थ

हा भार हा शिणगार
हा उत्सव ही वाटचाल
या सगळ्यावर पसरलेल
अफवेसारख आभाळ

याचा अर्थ सांगण्यासाठी
कुठल्या तरी झाडावर
बसलेला असेल का
एखादा पक्षी उत्सुक-पर? 


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण

तिचे गाणे

किति गोड गोड वदलां,

हृदयी गुलाब फुलला.

खुडुनी तया पळाला,

कांटा रुतून बसला !

स्मृतिचा सुवास येई,

जिव हा उलून जाई.

कांटा हळूच हाले,

कळ येई- जीव विवळे.

फुलला गुलाब तसला,

कांटा कुठून असला !

छे, छे नको ग बाई,

राहूं कशी अशी ही ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १४ फेब्रुवारी १९२६.

त्याचे गाणे

एकहि वेळा न तुजला भरूनि डोळे पाहिलें,

परि जिव्हारी घाव बसुनी हृदयी जखमी जाहले !

मी फिरस्ता चुकुनि कोठे दारि तुझ्या पातलो;

सहज तुजला निसटतांना पाहिलें ना पाहिलें

नेसली होतीस तेव्हां शुभ्र पातळ रेश्मी,

त्यांतुनी आरक्त कांती और कांहींशी खुले!

रर्विकरीं सोनेरि उड्ती केस पिंगट मोकळे;

तपकिरी तेजांत डोळे खोल अर्थ भारिले !

पायिं त्या नाजूस गोर्‍या रूळ्त होते पैंजण,

रक्त तापे , अंग कांपे , हृदय पेटूं लागलें !

न कळता तुं प्रीतिचा खंजीर हृदयी मारिला,

ध्यानिंही नाहीं तुझ्या कीं काय माझें जाहलें !

स्मृति जशीच्या तशि असे ही-काळ कितिही लोटला;

हसत तुं असशील, परि या अश्रु भालीं रेखिले !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २८ डिसेंबर १९२४

पंचप्राण

तेज पांढरे सांडत होते कृष्ण निळ्या लाटांत.

नांव आमुची वहात चाले वार्‍यावर भडकून

प्राणभीतीने जवळ येउनी मज बसला बिलगून

"पोहण्यास मज , भाऊ,येतें भिंवू नको बघ आंता."

धीराचे किति शब्द बोललों कांपतची तरि होता.

काळ-लाट तो एक येउनी नाव उलथुनी गेली !

फोडुनिया हंबरडा त्यानें काया मम वेढियली.

क्षण हृदयाचे स्पंदनही जणु बंद जाहलें आणि-

-विकार सगळे गोठुनि झालो दगडाचा पुतळा मी !

"याला धरूनी मरणे, कां जगणार लोटुनी याला ? "

विचार मनिंचा विजेसारखा मनांत चमकुन गेला.

दगडाच्या पुतळ्याने झर्कन नेले दगडी हात;

कमरेची ती मिठी हिसडुनी लोटियला लाटांत !

'दा-आ-आ-दा' शब्द करूणसा लाटांमधुनी आला ;

भुतासारखा हात पांढरा लाटावर क्षण दिसला.

दगडाचे पारि डोळे होते - कांही न त्याचे त्यांना !

करही भरभर कापित होते उठणार्‍या लाटांना !

वळुनि पाहिलें-काळ्जांत जी धड्की बसली तेव्हा,

भूत होउनी उरावरी ती बसते केव्हा केंव्हा !

कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ६ फेब्रुवारी १९२६

जोडपे

तो आणि ती शय्येवरी होती सुखानें झोंपली;

आपापल्या किति गोडशा स्वप्नांत दोघे गुंगली.

जिव भाळला होता तिचा ज्याच्यावरीअ लग्नाआधी

तिज वाटले जणु येउनी तो झोंपला शय्येमधी

म्हणुनी तिने कर टाकिला पडला परी पतिंकांठी

क्षणि त्याच कीं पतिही तिचा कंठी तिच्या कर टाकितो.

त्यालाहि स्वप्नीं भेटली त्याची कुणीशी लाडकी;

आनंदुनी हृदयी सुखे कवळावया अपुली सखी--

कर टाकिला त्याने परी पडला तिच्या कंठ्स्थली !

कर कंठि ते जागेपणी बघती तदा आनंदली !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १४ जानेवारी १९२६

एके रात्रीं

टप टप टप टप वाजत होता पाउस पानावरी

दाटली काळिकुट्ट.शर्वरी,

काळोखांतुनि अंधुक अंधुक उजळत कोठेंतरी,

दिव्यांच्या ज्योति लालकेशरी.

काळोख्या असल्या निर्जन वाटेवरी

जातांना भरते भय कसलेंसे उरीं !

असलीच मृत्युच्या पलिकडली का दरी ?

अज्ञाताच्या काळोख्या त्या दरींत कोठेतरी,

कसले दिवे लालकेशरी ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ४ जानेवारी १९२६

ऐरण

घाव घालुनी पहा एकदा सोशिल सारे घण

माझ्या हृदयाची ऐरण !

दु:ख येउनी कधी हिच्यावर कपाळ घे फोडुन !

कण्हतसे शोस-गीत ऐरण

हर्षबाल खिदळुनी करितसे स्वैर कधी नर्तन;

नादती मंजुळ नृत्य्स्व्न.

प्रीतिदेवता लाथ हाणितां ध्वनी उठे भेदुन;

हळवा सूर घुमवी ऐरण.

कुणि कधीं येउनी घाला येथे घण;

सौदर्य-ज्योतिचे उडतिल तेज:कण!

या अशा कणांचे गीत-हीर बनवुन,

घाव घालिता, हार हिर्‍यांचा तुम्हालाच अर्पिन !

असली माझी ही ऐरण !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १२ डिसेंबर १९२५

नि:श्वासगीत

प्रेमाचें मजला नकोच आतां नांव !

कां व्यर्थ कांचणी, फसवुनि भोळा जीव ?

हांसली मंद मधु पाहुनि कोणी रमणी.

भुलविलें जिवाला कुणि साखरबोलांनीं !

रंगवीत मोहन चित्र मंद हास्याचें,

गुंगीत आठवुनि गीत गोड बोलांचे ,

कंठणे तळमळत भकास सारी रात;

ढग खिन्नपणाचे दाट हृदयिं जमतात !

हांसती पांढ्र्‍या तारा काळ्या राती

नि:श्वास सोडणे लावुनि दृष्टी वरती !

'त्या' मुखचंद्राचें एकच वेड जिवाला

लावुनी जीव हा उदास रडवा केला

तिजसाठी दुखविला बापुड्वाणा ऊर;

ती असेल चुंबित तिच्या जिवाचा प्यार !

छे ! नकोच मजला तें प्रेमाचे नांव !

बंबाळ विवळतो भोळा हळवा जीव !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २३ जुलै १९२५

सावल्यांचे गाणें

तेजाची आम्ही बाळे,

रूप जरी अमुचें काळें !

लहान वा कोणी मोठी

ससेमिरा अमुचा पाठी !

जनी स्मशानीं कुठे तरी,

अशी तरळतों पिशांपरी.

मेघांच्या काळ्या पंक्ती

निळ्या नभीं जेव्हां फिरती

राक्षसरूपांना धरुनी

मंद मंद आम्ही फिरतों;

निळ्या जळा काळें करितों

पीतारुण संध्या बघुनी

वंदन दिर्घ सरूं पडुनीं !

मग येई रजनीमाई

पदराखालिं अम्हा घेई.

चांद्ण्यांत अमुची माया

भुताटकी गमते हृदया.

पांढुरक्या तेजांतून

कुठें कुठे बसतों दडुन.

पांढुरक्या वाटेवरुनी

एकलेच फिरती कोणी,

लपत छपत पाठुनि त्यांच्य़ा

फिरत असूं आम्ही वेड्या !

पानांचें पसरुनि जाल

आणिक पारंब्या लोल,

वट कोणी ध्यानस्थ बसे;

मंद अनिल त्या डुलवितसे.

मग अमुचीं रुपे डुलति;

बाळांना बागुल दिसती



जुनाट हे पड्के वाडे,

पर्णहीन त्यांतिल झाडें

धवल चंद्रिका रंगविते;

आम्ही मग त्यांतील भुतें !

जर का कुणि चुकुनी आला

वाटसरू रात्रींमधला,

बघुनि विकट अमुचे चाळे

चरकुनि तो मागेंच वळे !

प्रेम स्थल अमुचें एक;

त्यासाठी विसरुनि भूस,

दाहि दिशा मागुनि फिरणें

ही अमुची वेडी प्रीत

झिडकारा - मारा लाथ !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १२ मे १९२५

एक स्वप्न

रमणिला कवळुनि हृद्यीं । असें मी जाहलों दंग ;

स्वप्न तो गूढ पाहोनी । समाधी जाहली भंग !


गुलाबी गाल रमणीचे । सुकोनी सुरकुत्या झाल्या;

मृदुल घन कृष्ण केसांच्या । लोंबती पांढर्‍या दोर्‍या!

तिच्या त्या गोठल्या नयनी । पाहिलें रूप मी माझें,

पाहुनी जीर्ण मुखडा तो । चरकुनी हृदयिं-मी लाजें.

कांहिसें चरकुनी हृदयी । रमणिला घट्ट मी धरिलें:

गळाले पाश देहाचे । शांत मग श्वासही झाले !

निसटल्या दिव्य दो ज्योती । आमुचे देह सांडून,

तळपुनी नील आकाशी । जाहल्या तारका दोन !

उराला ऊर भिडवोनी । स्तब्ध मातींत पडलेल्या

पाहुनी आपुल्या देहा । खदखदा तारका हंसल्या !

बसुनिया एअकमेकांच्या । सन्निधीं तारका गाती,

'येउं दे काळ काळाचा । तयाची कोण धरि भीती !'

स्वप्न हें गूढ पाहोनी । समाधी जाहली भंग !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ऑगष्ट १९२५

गुलाबांचा हार

गुलाबांचा घेऊनि एक हार,

ह्रदयदेवीचें गांठियलें दार.

अर्पियेला सोत्कंठ तिच्या हातीं;

(अनुष्टुप्‌) मनीं आनंदुनी गेला युवा तो प्रणयी घरा ;

शब्द हे वदली चित्तीं, हांसुनी तरुणी जरा:

"आज आहे येणार नाथ माझा ;

त्यास अर्पिन हा हार बरा ताजा !"


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २९ जून १९२५

संध्यासंगीत

सिंधूचे मर्मरगीत

फेंसाळे कानीं शांत.

संध्येची पिवळी माया

रंगविते डोंगर--काया.

शुभ्र अभ्र दाटे गगनीं,

मोत्यांचे चढवुनि पाणी.

फिकट पांढरा रविराणा

मंद हांसला बुडतांना !

दडले मग पिवळे किरण

तरल निळ्या पाण्यांतून.

लेवुनि तें पिवळें तेज

जग गमलें यक्षिणी-कुंज !

मधुनि मधुनि जन जे फिरती

गूढ कुणी यक्षचि गमती !

पीत विरल वातावरणीं

जिव गेला वेडावोनी !

स्वप्नफुलें रंगित फुललीं;

दिवसाही स्वप्नें दिसलीं !

नारळिच्या झाडांतून

रजनि बघे डोकावून.

रजनीची काळी काया

घट्ट ह्रुदयिं आलिंगुनिया,

रजनी-रमणीच्या ह्रुदयीं

दिवस-रमण विरुनी जाई !

काळवंडलीं हीं रानें,

झाडांचीं हिरवी पानें.

आणिक त्या काळ्या छाया

माझ्याही ह्रुदयीं शिरल्या !

ह्रुदयिं दाटली हुरहूर ;

कां न कळे दुखतो ऊर !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ११ मे १९२५

एकलेपणाची आग

एकलेपणाची आग लागली ह्रुदया ;

घनदाट दाटली विषण्णतेची छाया.

तडफडे जिवाचें पांखरु केविलवाणें,

होत ना सहन त्या एकलकोंडें जगणें !

जोडीस शोधितें उदात्त अपुल्यावाणी;

प्रतिशब्द जिवाचा न दिला अजुनी कोणी !

गुम्फीत कल्पनाजाला । गुंगणें,

गुरफटुनि त्यांत जीवाला । टाकणें,

रंगीत स्वप्नसृष्टीला । उठविणें ;

ही स्वप्नसृष्टि पटतसे जिवाला वेडया;

ही सुवर्णलंका दिपवित अवघी ह्रुदया !

परि इंद्रजाल हें जात जघीं विरुनीया,

एकलेपणाची आग लागते ह्रुदया !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १९ जानेवारी १९२५

भावबंधन

चित्ताला रमवावया पहुडलों होतों खुल्या सैकतीं;

तों दृष्टी सहजींच जाइ वरती गंभीर नीलांबरी.

तेजाला उधळीत कोणि चमके तारा तिथें सोज्वळ,

माझी दृष्टि खिळे विशाळ गगनी त्या रम्य तारेवरी.

पाहोनी तिजला मनांत रमलों चित्तास ये शांतता,

चाटे ती जणु हांसली सुखविण्या संत्रस्त माझ्या मना !

चित्ती कांहि तरंग अद्रुत उठे - अश्रु उभे लोचनीं !

वाटे या हृदयास काय नकळे - तें जाहलें तन्मय.

ती कोठें सुरबालिका !----कुणिकडे मी येथला पामर !

नाहीं का सुरलोकिंचा रवि परी उत्फुल्लवी पद्मिनी ?

कैसा ये कवळावया धरणिला पर्जन्य पृथ्वीवरी ?

तारा स्नेहलता मधुस्मित करी--हें खूप आहे मला.

कोणी जीव कुण्या जिवावरी रमे--कैसें कुणी सांगणें !

कैसें अन्तरि भावबंधन जडे--तें अंध वेडें खरें !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

बाजू उलटली !

मनीं भोळया चोरटा भाव नाहीं.,

मुग्ध आणि निर्व्याज तुझ्या ठायीं.

प्रणयचंचल तुज ठावुक्या न लीला

कसलि नाही दरकार तव मनाला !

आजवेरी पाहिल्या खूप बाला,

नजर कितीकींच्या लाविली मुखाला,

लाजलाजुनी आरक्त किती झाल्या

आणि हरिणीसम पळुनि किती गेल्या !

लोचनांना भिडवून लोचनांशीं

धीट मजला पाहून अशी घेशी!

तुझी कांही न्यारीच रीत बाई,

मींच गेलों लाजून तुझ्यापायीं !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ११ ऑक्टोबर १९२४

चटका

तंद्री लागुनि गुंग मी हळुहळू होतों पथीं चालत,

तुंही मग्न विचारिं चालत पुढें आलीस सामोरुनी.

देहाला मम देह लागत तुझा-दोघांसही ना कळे !

दोघेही चमकून पाहत क्षणी त्या एकमेकांस कीं !

होवोनी मनि बावरा बघतसें मी तेथ वेडयागत,

वेड्याला मज वाटलें सहजची तूं शाप देशीलसा ।

कांही धीर करोनी शब्द तुटके ओंठांवरी नाचले,

डोळे मात्र गयावया करुनिया होते तुला सांगत ।

तुंही अस्फुट कांहिसें वदुनियां माझ्याकडे पाहिलें,

तों डोळांत तुझ्या मला चमक ती न्यारीच कांहीं दिसे !

ओंठानी कितिही जरी अडविलें आलें तरी बाहीर-

-तें मंदस्मित- आणि तूं निसटुनी गेलीस केव्हाच गे ।

एका दिव्य क्षणात खेळ सगळा हा गोड आटोपला ,

जों जों आठवतो मनास चटका लागे कसासा मला !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १७ नोव्हेंबर १९२४

प्रेम आणि पतन

कुठ्ल्याशा जागी देख

बिल्डिंग मोड्की एक । पसरली.

चाळीत अशा वसणारी।

पोरगी कुणी्शी होती छबकडी !

जाताना नटुनी थटुनी

कुणी तरुण पाही ती तरुणी । एकला.

त्या क्षणी

त्याचिया मनी,

तरड:ति झणीं,

गोड तरि जहरी । प्रीतीच्या नवथर लहरी । नकळतां.

तो ठसा मनावर ठसला ।

तो घाव जिव्हारी बसला । त्याचिया

वेड पुरे लावी त्याला ।

चाळीतिल चंचल बाला बापडया !

अकलेचा बंधही सुटला ।

संबंध जगाशीं तुटला । त्यापुढें.

आशाहि,

कोणती कांहि,

राहिली नाहिं.

सारखा जाळी । ध्यास त्यास तिन्ही काळी । एक तो.

ही त्याची स्थिति पाहुनियां,।

चाळींतिल सारी दुनिया बडबडे.

इष्काचा जहरी प्याला।

नशिबाला ज्याच्या आला । हा असा.

धडपडत चाळिंतुनि फिरणें ।

तें त्याचें होतें जगणें । सारखें !

लोकांना नकळत बघणें ।

पिउनिया चहाला जगणें । गरमशा.

पटत ना,

त्याचिया मना,

जगीं जगपणा,

डाव तो टाकी । मनुजांतुनि दगडची बाकी । राहतो.

यापरी तपश्चर्या ती

किति झाली न तिला गणती । राहिली.

सांगती हिताच्या गोष्टी।

हातांत घेउनी काठी । लोक त्या

तो हंसे जरा उपहासें ।

मग सवेंच वदला त्रासें । चिडुनियां

'निष्प्रेम चिरंजीवन तें।

जगिं दगडालाही मिळ्तें । धिक तया'



निग्रहें,

वदुनि शब्द हे,

अधिक आग्रहें,

सोडिना चाळे । चाळीचे चढला माळे । तरुण तो.

पोरगी आलि मग तेथ ।

जोड्यांना धरुनि करांत । फाटक्या.

धांवली उताविळ होत ।

जोडा झणिं थोबाडांत । मारिला.

तिरमिरुनी खालीं पडला ।

परि पडतां पडतां हंसला । एकदां !

तो योग ।

खरा हटयोग ।

प्रीतिचा रोग ।

लागला ज्याला । लागतें पडावें त्याला । हें असें !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ६ डिसेंबर १९२४

स्मृती माझी परि नसे तुला बाई '

मंद अनिलावरि वाहतो सुगंध,

सुवासानें मी होत असें धुंद.

तुझ्या प्रीतीनें ह्रुदय भरुनि जाई,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

रोज फुलती गोजिरीं फुलें येथें

खुडुनि त्यांना आणितों मी गृहातें;

गमे ओतावीं सर्व तुझ्या पायीं

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

निशादेवीचें हास्य जणूं कांत,

खुले जेव्हां चांदणें शुभ्र शांत

ह्रुदय तळ्मळतें--स्मृती तुझी होई,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

नील गगनीं चमकती रम्य तारा;

मधुर गुंगीनें देह भरे सारा !

नयन दिसती तव-विध्द जीव होई ;

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

खिन्न होउनि बागेंत भटकतांना,

गुलाबांचा हो स्पर्श कपोलांना;

ह्रुदय दचके-तनु कंटकिता होई ,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !

ध्वनी मंजुळ कधिं कर्णपथीं येती

तुझी हांकच जणुं !---गोड पडे भ्रांती.

निराशेनें मम ह्रुदय भग्न होई,

स्मृती माझी परि नसे तुला बाई !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३ सप्टेंबर १९२४

थांब थांब, बाले आतां

थांब, थांब बाले आतां, ठेव दिलरुब्याला !

सूरसागराच्या लाटा बुडविती जिवाला !

विश्व शांत, रजनी शांत, चांदणेंहि फुललें शांत,

शांतिचेंच घुमतें का हें गीत दिलरुब्यांत ?

दिव्य तुझ्या संगीताची साथ आणि त्यांत !

देहभान सुटलें आतां, ठेव दिलरुब्याला !

ह्रुदयाच्या तारा माझ्या होति एकतान !

एकसुरीं लागुनि गेलें सृष्टिंचेंहि गान !

जीव उडे दिव्यीं करुनी नादमय विमान !

धराखर्ग मिळुनी गेलीं सूर सागराला !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २४ ऑक्टोबर १९२४

प्रीतिची हूल फुकट ना तरी !

'तूं माझी अन्‌ तुझा मीच,' ही खातर ना जोंवरी,

प्रीतिची हूल फुकट ना तरी !

गालाला पडते खळी मला पाहुनी,

ही नजर पाहते धरणी न्याहाळुनी !

भयभीत प्रीत थरकते लीन लोचनीं,

ऒंठाची थरथरत पाकळी,----बोल गडे, झडकरी !

प्रीतिची हूल फुकट ना तरी !

जिवाजिवाची अभंग जडली जोड असे ही जरी,

भिति मग कोणाची अंतरीं ?

ही गांठ भिडेची तांत गळ्या लाविल ;

हिरव्याचीं पिवळीं पानें हीं होतिल !

प्रीतिच्या फुलाचा वास उडुन जाइल ;

फसाल पुरत्या, बसाल गाळित घळ्घळ अश्रू-झरी !

प्रीतिची हूल फुकट ना तरी !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

३१ डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र

 रातकाळची पसरे शांती,

मुलें माणसें स्वस्थ घोरती;

धूम्रदीप रस्त्यांत तेवतो;

फ़िकट पांढरी दीप्ति पसरितो.

मध्यरात्रिचा निर्जन रस्ता,

प्रकाशांत त्या वितरि विकटता.

दचकचुनी तों-बारा ठणठण

घडयाळ साङ्गे स्पष्ट वाजवुन,

" वर्षाची या सरती घटिका,

पहा,चालली सोडुनि लोकां !"

वर्ष बिचारें गेलें, गेलें

करपलों जणूं वियोगानलें !

अन्त:करणीं ये कालवुनी,

विषादतमिं मी गेलों बुडुनी !

अगणित वर्षे आली गेलीं,

कितीक लोकें जन्मा आलीं;

हंसली, रडली, म्हुनी गेलीं,

'उदो' 'उदो' हो त्या त्या कालीं ,

स्मृतिहि न त्या अमरांची उरली !

आजहि अगणित जगती मरती,

त्यांत कुणी अजरामर होती !

किति अमरत्वा परि पचवोनी,

काळ बसे हा ' आ ' वासोनी !

उदास असले विचार येती,

लाज परी मज वाटे चित्ती.

असेल काळाहाती मरणें,

परी आमुच्या हाती जगणें !

कां नच मग वीरोचित जगणें,

अभिमानाने हांसत मरणे ?

विचार असले जो मनिं आले,

अंत:करणहि पार निवळलें,

दिव्य कांहि तरि मनि आठवुनी,

झोंपी गेलों अश्रू पुसुनी.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात