३१ डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र

 रातकाळची पसरे शांती,

मुलें माणसें स्वस्थ घोरती;

धूम्रदीप रस्त्यांत तेवतो;

फ़िकट पांढरी दीप्ति पसरितो.

मध्यरात्रिचा निर्जन रस्ता,

प्रकाशांत त्या वितरि विकटता.

दचकचुनी तों-बारा ठणठण

घडयाळ साङ्गे स्पष्ट वाजवुन,

" वर्षाची या सरती घटिका,

पहा,चालली सोडुनि लोकां !"

वर्ष बिचारें गेलें, गेलें

करपलों जणूं वियोगानलें !

अन्त:करणीं ये कालवुनी,

विषादतमिं मी गेलों बुडुनी !

अगणित वर्षे आली गेलीं,

कितीक लोकें जन्मा आलीं;

हंसली, रडली, म्हुनी गेलीं,

'उदो' 'उदो' हो त्या त्या कालीं ,

स्मृतिहि न त्या अमरांची उरली !

आजहि अगणित जगती मरती,

त्यांत कुणी अजरामर होती !

किति अमरत्वा परि पचवोनी,

काळ बसे हा ' आ ' वासोनी !

उदास असले विचार येती,

लाज परी मज वाटे चित्ती.

असेल काळाहाती मरणें,

परी आमुच्या हाती जगणें !

कां नच मग वीरोचित जगणें,

अभिमानाने हांसत मरणे ?

विचार असले जो मनिं आले,

अंत:करणहि पार निवळलें,

दिव्य कांहि तरि मनि आठवुनी,

झोंपी गेलों अश्रू पुसुनी.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा