अवघॆं मंगळ तुमचें गुणनाम । माझा तो श्रम पाहातां जाये ॥१॥

गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा । आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥

या परतें मागणें दुजें नाहीं आतां । पुरवावी अनाथनाथा आळी माझी ॥३॥

चोखा म्हणे देवा होउनी उदार । ठेवा कृपाकर माथां माझ्या ॥४॥


  - संत चोखामेळा

 बरें हें वाईट आहे माझे भाळीं । तें सुखें हो बळी जीवें माझ्या ॥१॥

आतां कोणावरी रूसों नये देवा । भोग तो भोगावा आपुलाची ॥२॥

आहे जें संचित तैसें होत जात । वाउगा वृत्तांत बोल काय ॥३॥

चोखा म्हणे आतां बहु लाज वाटे । झालें जें वोखटें कर्म माझें ॥४॥


  - संत चोखामेळा

 भ्रमण न करितां भागलों जी देवा । न मिळे विसावा मज कोठें ॥१॥

लागलेंसे कर्म आमुचे पाठारीं । आतां कोणावरी बोल ठेऊं ॥२॥

सांपडलों वैरियाचे भांडवली । न कळे चिखलीं रोवियेलों ॥३॥

चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा । तुम्हाविण फांसा उगवी कोण ॥४॥


  - संत चोखामेळा

 वारंवार किती करूं करकर । माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥

न बोलावें आतां हेंचि शहाणपण । होउनी पाषाण पडो द्वारीं ॥२॥

केव्हां तरी तुम्हां होईल आठवणे । हाचि एक भाव धरूं आतां ॥३॥

चोखा म्हणे मग येशील गिवसित । तोंवरी चित्त दृढ करूं ॥४॥


  - संत चोखामेळा

 नाहीं देह शुद्ध याति अमंगळ । अवघे वोंगळ गुण दोष ॥१॥

करूं जातां विचार अवघा अनाचार । आणिक प्रकार काय बोलूं ॥२॥

वाणी नाहीं शुद्ध धड न ये वचन । धि:कारिती जन सर्व मज ॥३॥

अंगसंग कोणी जवळ न बैसे । चोखा म्हणे ऐसे जीवित माझें ॥४॥


  - संत चोखामेळा

 माझा तंव अवघा खुंटला उपाय । रिता दिसे ठाव मजलागीं ॥१॥

करितोचि दिसे अवघेचि वाव । सुख दु:ख ठाव अधिकाधिक ॥२॥

लिगाडाची माशी तैसी झाली परी । जाये तळीवरी सुटका नव्हे ॥३॥

चोखा म्हणे अहो दीनांच्या दयाळा । पाळा कळवळा माझा देवा ॥४॥


  - संत चोखामेळा

 साच जें होतें तें दिसोनियां आलें । आतां मी न बोले तुम्हां कांहीं ॥१॥

तुमचें उचित तुम्हींच करावें । आम्हीं सुखें पाहावें होय तैसें ॥२॥

विपरीत सुपरीत तुमचीय़े घरीं । तुमची तुम्हां थोरी बरी दिसे ॥३॥

चोखा म्हणे ऐसा हा नवलाव । न कळेचि भाव ब्रम्हादिका ॥४॥


  - संत चोखामेळा

 नेणों तुमचे मन कठिण कां झालें । मज कांहीं न कळे पूर्व कर्म ॥१॥

किती आठवण मागिलाचि करूं । तेणें पडे विचारू पुढीलासी ॥२॥

आतां अवघड दिसतें कठीण । मनाचें हें मन चिताडोहीं ॥३॥

चोखा म्हणे काय करूं तें आठवेना । निवांत वासना कई होय ॥४॥


  - संत चोखामेळा

 मी तो विकलों तुमचिये पायीं । जीवभाव सर्वहि अर्पियेला ॥१॥

माझा मीच झालों उतराई देवा । तुमचें तुम्हीं पाहा आम्हांकडे ॥२॥

नव मास माता वोझें वाहे उदरीं । तैसीच ही परी तुमची माझी ॥३॥

अपत्य आपुलें फिरे देशोदेशीं । ही लाज कोणासी चोखा म्हणे ॥४॥


  - संत चोखामेळा

 बावरलें मन करीं धांवा धावी । यांतुनी सोडवीं देवराया ॥१॥

लागलासे चाळा काय करूं आतां । नावरे वारितां अनावर ॥२॥

तुमचें लिगाड तुम्हींच वारावें । आम्हांसी काढावें यांतोनियां ॥३॥

चोखा म्हणे तरीच जीवा होय सुख । नका आतां दु:ख दाऊं देवा ॥४॥


  - संत चोखामेळा

संसाराचें नाहीं भय । आम्हां करील तो काय । 

रात्रंदिवस पाय । झालों निर्भय आठवितां ॥१॥

आमुचें हें निजधन । जोडियेले तुमचे चरण । 

आणि संतांचें पूजन । हेंचि साधन सर्वथा ॥२॥

कामक्रोधादिक वैरी । त्यांसी दवडावे बाहेरी । 

आशा तृष्णा वासना थोरी । पिडिती हरी सर्वदा ॥३॥

आतां सोडवी या सांगासी । न करीं पांगिला आणिकांसी । 

चोखा म्हणे ह्रषिकेशी । अहर्निशीं मज द्यावें ॥४॥


  - संत चोखामेळा

 हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥

मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥

माझा लागतांचि कर । सिंतोडा घेताती करार ॥३॥

माझ्या गोविंदा गोपाळा । करूणा भाकी चोखामेळा ॥४॥


  - संत चोखामेळा

 बरें झालें येथें आलोंसे सायासें । सुख दु:ख लेशे भोगोनियां ॥१॥

मागिला लागाचें केलेंसे खंडण । तेणें समाधान वृत्ति होय ॥२॥

एकसरें मन ठेविले बांधोनी । निवांत चरणीं तुमचीया ॥३॥

चोखा म्हणे काम क्रोध तोडियेले । येर ते ही केले देशधडी ॥४॥


  - संत चोखामेळा

 नेत्रीं अश्रूधारा उभा भीमातीरीं । लक्ष चरणावरी ठेवोनियां ॥१॥

कां गा मोकलीलें न येसी गा देवा । काय मी केशवा चुकलोंसे ॥२॥

नेणें करूं भक्ति नेणें करूं सेवा । न येसी तूं देवा कळलें मज ॥३॥

चोखा म्हणे माझ्या जीविचा विसावा । पुकारितों धावां म्हणोनियां ॥४॥


  - संत चोखामेळा

 तुमच्या चरणी जें कांही आहे । तें सुख पाहे मज द्यावें ॥१॥

सर्वांसी विश्रांति तेथें मन ठेवीं । तें सुख शांति देई मज देवा ॥२॥

सर्वांभूती दया संतांची ते सेवा । हेंचि देई देवा दुजें नको ॥३॥

चोखा म्हणे आणिक दुजें नको कांहीं । जीव तुझे पायीं देईन बळी ॥४॥


  - संत चोखामेळा

 समर्थांसी रंकें शिकवण जैशी । माझी वाणी तैशी बडबड ॥१॥

शुभ हें अशुभ न कळे बोलतां । परि करीं सत्ता लंडपणें ॥२॥

उच्छिष्टाची आशा भुंकतसे श्वान । तैसा मी एक दिन आहें तुमचा ॥३॥

चोखा म्हणे एका घासाची चाकरी । करितों मी द्वारीं तुमचीया ॥४॥


  - संत चोखामेळा

 भवाचिया भेणें येतों काकुळती । धांवे करुणामूर्ति देवराया ॥१॥

पडीलोंसे माया मोहाचीये जाळीं । येवोनी सांभाळी देवराया ॥२॥

कवणाची असा पाहूं कोणीकडे । जीविचें सांकडें वारीं देवा ॥३॥

गहिंवर नावरे चोखियाचे मनीं । धांवें चक्रपाणी देवराया ॥४॥


  - संत चोखामेळा

 धांव घाली विठु आतां चालुं नको मंद । मज मारिती बडवे कांहीतरी अपराध ॥१॥

विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला । शिव्या देऊनी मारा म्हणती देव कां बाटला ॥२॥

तुमचे दारीचा कुतरा नका मोकलूं दातारा । अहो चक्रपाणी तुम्ही आहां जीमेदारा ॥३॥

कर जोडोनी चोखा विनवितो देवा । बोलिलो उत्तर याचा राग नसावा ॥४॥


  - संत चोखामेळा

 श्वान अथवा सुकर होका मार्जार । परी वैष्णवाचें घर देईं देवा ॥१॥

तेणें समाधान होय माझ्या जीवा । न भाकीं कींव आणिकासी ॥२॥

उच्छिष्ट प्रसाद सेवीन धणिवरी । लोळेन परवरी कवतुकाने ॥३॥

चोखा म्हणे कोणी जातां पंढरीसी । दंडवत त्यासी घालीन सुखें ॥४॥


  - संत चोखामेळा

 मजचि कां करणें लागला विचार । परी वर्म साचार न कळे कांही ॥१॥

कैशी करुं सेवा आणिक ते भक्ति । न कळे विरक्ति मज कांही ॥२॥

आणिक तो दुजा नाहीं अधिकार । कैसा हा विचार करूं आतां ॥३॥

चोखा म्हणे बहु होती आठवण । कठिण कठिण पुढें दिसे ॥४॥


  - संत चोखामेळा

 सुखाचिया लागीं करितों । तो अवघेंचि वाव येतें ॥१॥

करितां तळमळ मन हें राहिना । अनावर जाणा वासना हे ॥२॥

अवघेचि सांकडें दिसोनियां आलें । न बोलावें तें भलें कोणा पुढें ॥३॥

चोखा म्हणे मी पडिलों गुर्‍हाडीं । सोडवी तातडी यांतूनीयां ॥४॥


  - संत चोखामेळा

 माया मोहोजाळे गुंतलोंसे बळें । यांतोनी वेगळें करीं गा देवा ॥१॥

न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ । बुडालोंसे निभ्रांत याचमाजी ॥२॥

न घडे देवार्चन संतांचें पूजन । मन समाधान कधीं नव्हे ॥३॥

नसतेचि छंद लागती अंगासी । तेणें कासावीस जीव होय ॥४॥

चोखा म्हणे याही चोरें नागविलों । माझा मीचि झालो शत्रु देवा ॥५॥


  - संत चोखामेळा

 यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करूं तुमची सेवा ॥१॥

आम्हां नीचांचे तें काम । वाचें गावें सदां नाम ॥२॥

उच्छिष्टाची आस । संत दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे नारायण । पदरीं घेतलें मज दीना ॥४॥


  - संत चोखामेळा

धीर माझे मना । नाहीं नाहीं नारायण ॥१॥

बहुचि जाचलों संसारें । झालों दु:खाचे पाझरे ॥२॥

भोग भोगणें हें सुख । परि शेवटीं आहे दु:ख ॥३॥

भारवाही झालों । वाउग्या छंदा नागवलों ॥४॥

दया करा पंढरीराया । चोखा लागतसे पायां ॥५॥


  - संत चोखामेळा

 माझा मी विचार केला असे मना । चाळवण नारायणा पुरें तुमचें ॥१॥

तुम्हांवरी भार घातिलेंसें वोझें । हेंचि मी माझें जाणतसें ॥२॥

वाउगें बोलावें दिसे फलकट । नाहीं बळकट वर्म आंगीं ॥३॥

चोखा म्हणे सुखें बैसेन धरणा । तुमच्या थोरपणा येईल लाज ॥४॥


  - संत चोखामेळा

 आला नरदेहीं पाहीं । शुद्धी नेणें ठायींचे ठायीं ॥१॥

करी प्रपंच काबाड । भार वाही खर द्वाड ॥२॥

न ये राम नाम मुखीं । नाहीं कधीं संत ओळखी ॥३॥

करी वाद अपवाद । नाही अंत:करण शुद्ध ॥४॥

मळ नासोनि निर्मळ । चोखा म्हणे गंगाजळ ॥५॥


 - संत चोखामेळा

 आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले ॥१॥

पशूचा उपयोग बहुतांपरी आहे । हा तो वायां जाय नरदेह ॥२॥

परि भ्रांति भुली पडलीसे जीवा । आवडी केशवा नाठविती ॥३॥

चोखा म्हणे नाम जपतां फुकाचें । काय याचें वेचे धन वित्त ॥४॥

 
  - संत चोखामेळा

 घरदार वोखटें अवघें फलकटें । दु:खाचें गोमटें सकळही ॥१॥

नाशिवंतासाठी रडती रांडा पोरें । काय त्याचें खरें स्त्री पुत्र ॥२॥

लावूनियां मोह भुलविलें आशा । त्याचा भरंवसा धरिती जन ॥३॥

सकळही चोर अंती हे पळती । चोखा म्हणे कां न गाती रामनाम ॥४॥


 - संत चोखामेळा

 अखंड समाधी होउनी ठेलं मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥

विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥

चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥

चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा । जाणे तो विरळा लक्षामाजीं ॥४॥


 - संत चोखामेळा

 उदंड नागवले वाहावले पुरीं । ऐसी याची थोरी काय सांगों ॥१॥

ब्रम्हादिक जेणें बहु नागविले । सिद्ध ऋषि भुलविले येणें देख ॥२॥

इंद्रादि चंद्रा लावियेले काळें । कामाचिया बळें अहिल्येसी ॥३॥

प्रत्यक्ष शूळपाणि तपियां मुगुटमणी । तो हिंडविला वनीं भिल्लणीमागें ॥४॥

वृंदेचे घरीं विष्णु धरणें करी । अभिलाष करी मनें धरिला ॥५॥

चोखा म्हणे येणें बहु नाडियेले । काय आतां बोल जाय पुढें ॥६॥


- संत चोखामेळा

 असोनि नसणें संसाराचे ठाईं । हाचि बोध पाहीं मना घ्यावा ॥१॥

संतांची संगती नामाची आवडी । रिकामी अर्ध घडी जावों नेदी ॥२॥

काम क्रोध सुनेपरी करी दूरी । सहपरिवारी दवडी बापा ॥३॥

चोखा म्हणे सुख आपेआप घरा । नाहीं तर फजीतखोरा जासी वायां ॥४॥


 - संत चोखामेळा

 असोनि नसणें या नांव स्वार्थ । येथेंचि परमार्थ सुखी होय ॥१॥

स्वार्थ परमार्थ आपुलेची देहीं । अनुभवोनि पाहीं तुझा तूंची ॥२॥

सुख दु:ख दोन्ही वाहूं नको ओझें । मी आणि माझें परतें सारीं ॥३॥

चोखा म्हणे तोचि योगियांचा राणा । जिहीं या खुणा अनुभविल्या ॥४॥


 - संत चोखामेळा

 कोणें देखियेलें जग । पांडुरंगा मी नेणें ॥१॥

मौन्यें पारूषली वाणी । शब्द खाणी विसरली ॥२॥

एका आधी कैचे दोन । मज पासोन मी नेणें ॥३॥

चोखामेळा म्हणती संत । हे ही मात उपाधी ॥४॥


 - संत चोखामेळा

योग याग जप तप अनुष्ठान । नामापुढें शीण अवघा देखे ॥१॥
नामचि पावन नामचि पावन । अधिक साधन दुजें नाहीं ॥२॥
कासया फिरणें नाना तीर्थाटणी । कासया जाचणी काया क्लेश ॥३॥
चोखा म्हणे सुखे जपता विठ्ठल । सुफळ होईल जन्म त्याचा ॥४॥

  - संत चोखामेळा