सरंजामशाही पद्धतीतून युरोपमध्ये भांडवलशाही उभी राहत होती. तो काळ होता १५व्या शतकापासून १८व्या शतकापर्यंतचा. सरंजामशाहीमधे जमीनदार आपल्या आलिशान घरात राहत आणि गावातली आजूबाजूची जमीनही त्यांच्याच मालकीची असे. भांडवलशाहीसाठी कामगार, भांडवल आणि भांडवली नीतिमूल्यं/कायदे या सगळ्यांची गरज होती. पण सरंजामशाहीमध्ये भूदास हे जमिनीला बांधलेले होते. जमीनदार स्वत:साठी मोठी जमीन ठेवून उरलेल्यातले लहान-लहान तुकडे भूदासांना भाड्यानं देत. या भूदासांमध्येही फ्रीमेन, व्हिलेन्स, कॉटेजर्स आणि गुलाम असे बरेच प्रकार आणि पातळ्या होत्या. यातले ‘फ्रीमेन’ हे जमीनदाराला भाडं दिल्यावर इतर काहीही करू शकत. ‘व्हिलेस’ या मंडळींना जमीनदाराची जमीन कसून आणि त्याची इतरही बरीच कामं करून उरलेल्या वेळातच स्वत:ची जमीन कसता येई. त्यांना गाव सोडून कायद्यानं कुठे जाताही येत नसे. कॉटेजर्सना तर दिवसभर जमीनदारांकडे काम करून राहायला फक्त झोपडी आणि खाण्यापुरतं अन्न मिळे. गुलामांना सगळ्यात कमी हक्क असत. थोडक्यात, जमीनदाराची मोठी जमीन, भूदासांना ‘भाड्यानं’ कसायला दिलेले जमिनीचे लहान-लहान तुकडे आणि गुरांना चरण्यासाठी एक सामायिक जमीन असं जमिनीचं वाटप त्या काळी असे. त्याच वेळी इंग्लंडमधल्या लोकरीला भाव चांगला यायला लागला. मग स्वत:च्या मेंढ्यांना चरायला जास्त जमीन मिळावी म्हणून जमीनदारांनी सामायिक चरण्याची जमीन कुंपण लावून (एन्क्लोज करून) इतरांच्या गुरांना वापरायला परवानगी नाकारायला सुरुवात केली. यातूनच पुढे ‘एन्क्लोजर’ चळवळ चालू झाली. शेवटी त्या वेळचं सरकार हे जमीनदारांच्याच बाजूनं असल्यानं त्याविषयीचे ‘ॲक्ट्स ऑफ एन्क्लोजर्स’ असे त्याविषयी कायदेही करण्यात आले. यामुळे मग अनेक भूदासांना शेती करणंच अशक्य होऊन बसलं. मग शेतीतल्या लोकांचा लोंढा शहरांकडे यायला लागला. ही मंडळी शहरांत येऊन लहानसहान कामं करणं, भीक मागणं याबरोबरच चोऱ्या-माऱ्याही करायला लागली. तेव्हापासून या ‘व्हिलेन’वरूनच ‘व्हिलन (खलनायक)’ हा शब्द निघाला. पण पुढे-पुढे त्यातली हुशार, तरुण मुलं यंत्रांवर कामं करायला लागली आणि अशा तऱ्हेनं जगातले पहिले औद्योगिक कामगार तयार झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा